गोइंग टू बॉम्बे…

मयूरेश भडसावळे

नायक मुंबईत येतो…देशाच्या एखाद्या कोपऱ्यातला बंडखोर,पराभूत,अव्हेरला, आव्हानला गेलेला नायक स्वतःची ‘भूमी’ शोधत मुंबईत येऊन पोहोचतो…आपल्या पावलांपाशी दाबून ठेवलेल्या कोलाहलाकडे भलत्याच तटस्थपणे पाहणारी व्हिक्टोरिया टर्मिनसची सर्वांगसुंदर इमारत असतेच त्याच्या स्वागताला…अफाट प्रवाही गर्दी आणि मुक्ततेचे वारे हुंगत गर्दीत विरघळून जात जात त्याचा नायक बनण्याचा प्रवास सुरु होतो…

कट टू बांद्रा-वरळी सी लिंक किंवा मरीन ड्राइव्ह….समुद्राच्या भव्य बॅकड्रॉपवर भावूक तो…वधारलेला, सुधारलेला, आश्वस्त, यशस्वी, या महानगरात रुजलेला… ‘नायकपदी’ जाऊन पोहोचलेला आहे… आणि चाळवलेल्या अंधारात रुपेरी पडद्यावर भक्कपणे ‘THE END’ ची पाटी! दशकानुदशकं मुख्य प्रवाहातल्या सिनेमाने आपल्याला नायकाचा हा प्रवास दाखवला आहे…बराचसा एकरेषीय, परिचित, फॉर्म्युलेबाज असला… तरीही तो प्रवास, त्यातले टप्पे महत्वाचे ठरतात. कारण ते एका स्थलांतराची (Migration) कहाणी सांगत राहतात. या कहाणीत मुंबई उमटत राहते, पडद्यावर फार न दिसताही तिचं प्रभावी अस्तित्व सातत्याने जाणवत राहतं.

स्थलांतराशी, स्थलांतरितांच्या समूहांशी मुंबईचं जुळलेलं नातं केवळ सिनेमातूनच नव्हे तर अन्य अनेक कलाकृतीमधून सामोरं येत राहिलं आहे. मर्ढेकर-सुर्वे-ढसाळ-कोलटकरांच्या कवितांमधून, भाऊ पाध्ये-किरण नगरकर-बाबुराव बागुल यांच्या साहित्यकृतींमधून, सुधीर पटवर्धनांच्या चित्रांमधून, सुसान हापगुड-शारदा द्विवेदी ते गोपाळ बोधे-सुधारक ओलवे या अफाट रेंजमधल्या छायाचित्रांमधून आणि अनेक शोधनिबंधांमधून. मुंबई महानगरीकडे येणारा ‘जनांचा प्रवाहो’ संवेदनशील, चिकित्सक मनं टिपत राहिली आहेत. मात्र हे झालं मुख्यत्वे विसाव्या शतकातल्या, औद्योगिक महानगरी म्हणून सुस्थापित झालेल्या मुंबई शहराबद्दल. असं अनेकांना आपापलं स्वतंत्र अस्तित्व बहाल करणारं, नवं स्वातंत्र्य मिळवून देणारं मुंबई शहर.

A PASSAGE TO INDIA
ज्या थोड्याफार ‘फिशिंग फ्लीट गर्ल’चं documentation झालं त्यापैकी हा महत्वाचा संदर्भ…इरीस बटलर नावाच्या मुलीचा हा फोटो तिच्या लग्नाच्या वेळी १९२७ साली घेतला आहे.

हे महानगर म्हणून प्रस्थापित होण्यापूर्वी इथे होणारी स्थलांतरं कशी होती, त्या स्थलांतरितांची मनःस्थिती कशी होती याचं चित्र मात्र आपल्यासमोर सहज येताना दिसत नाही. त्यातही स्थलांतरित समुदायांतील स्त्रियांविषयी, मग त्या एतद्देशीय असोत वा विदेशी, आपल्याला विशेष वाचा-ऐकायला मिळत नाही. विसाव्या शतकातील स्थलांतराला भावुकपणे आठवत राहताना अठराव्या, एकोणिसाव्या शतकातल्या स्थलांतराबद्दल काय दिसतं? इथल्या बेटांवरले कोळी-आगरी-भंडारी-पाचकळशी-पाठारे प्रभु हे स्थानिक वगळता इथे नव्याने जे जे आले, त्यांच्या स्थलांतराचा अनुभव कसा होता ? या महानगरीची पायाभरणी करणाऱ्या मानवी समूहांबद्दल काय? विशेषतः त्यांच्यामधल्या स्त्रियांबद्दल काय? नागरीकरणाची पहाट होत असलेल्या मुंबईत या स्त्रिया कशा आल्या, कशा नांदल्या हे प्रश्न आणि त्यांची अस्फुट, अस्पष्ट उत्तरं अधिकच अस्वस्थ करत राहतात. अस्फुट याकरता की एकोणीसाव्या शतकातील इंग्लिश प्रवासिनींचे भारताबद्दलचे ट्रॅव्हलॉग, त्यातले मुंबईबद्दलचे उल्लेख किंवा पारशी समाजातल्या लोकांची आत्मकथनं, अनुभव हे अस्तित्वात जरूर आहेत. पण सहजी उपलब्ध मात्र नाहीत.

गोविंद नारायण माडगावकरांचं ‘मुंबईचे वर्णन’ किंवा आचार्य-शिंगणेकृत ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकांसारखे ते आपल्यामध्ये रूजण्यापासून खूप दूर आहेत. अस्वस्थ याकरता की विशिष्ट सामाजिक स्थान, सांस्कृतिक-राजकीय वर्चस्व असणाऱ्या वर्गाचे हे अनुभव संपूर्ण चित्र कधीच उभे करू शकत नाहीत. अक्षरशः शून्यातून मुंबई उभी राहिली तेव्हा इथल्या इमारती, रस्ते, सांडपाण्याच्या व्यवस्था, बंदर-धक्के बांधून काढण्यासाठी जो मजूर वर्ग आला, आंध्रातून कामाठी आले, गुजरातेतून वाल्मिकी-मेहतर आले. त्यांच्या आयुष्यात डोकावून बघणे आपल्याला कधीच शक्य होणार नाही. गिरणी कामगारांचा मौखिक इतिहास मांडताना नीरा आडारकर-मीना मेनन ज्या तीक्ष्ण सखोलपणे स्थलांतरितांच्या विश्वात डोकावल्या आहेत ते अठराव्या, एकोणिसाव्या शतकातील मुंबईबाबत शक्य उरलेलं नाही. अर्थात या अपूर्णतेच्या, अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवरही अठराव्या शतकापासून पुढे मुंबईत आलेल्या इंग्लिश स्त्रियांच्या स्थलांतराकडे पाहिलं तरीही एक वेगळं भान येते, हे निश्चित.

१६६२ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन द ब्रगन्झा यांचा विवाह झाला तेव्हा मुंबईची सात बेटं चार्ल्सला हुंडा म्हणून मिळाली, हे आपण वर्षानुवर्ष वाचत आलो आहोत. खरं तर, राजकीय सोयीसाठी झालेल्या विवाहात हुंडा मिळालेली, कुठेतरी दूर इस्ट इंडीजमध्ये वसलेली ठिपक्याएवढी बेटं चार्ल्सच्या खिजगणतीतही नव्हती. सदैव पैशांच्या विवंचनेत असणाऱ्या चार्ल्सने ५०,००० पौंडांचं कर्ज मिळण्याच्या बोलीवर ही बेटं इस्ट इंडिया कंपनीला दिली. कर्जफेडीव्यतिरिक्त सालाना भाडं ठरवलं १० पाउंड. कंपनीने मात्र या संधीचा पुरेपूर उपयोग पोर्तुगीज लोकांची सद्दी संपवून आपला व्यापार वाढवण्यासाठी केला. गेराल्ड ओन्जीएरसारख्या गव्हर्नरने मुंबई बेटावर वसाहत व्हावी, इंग्लिश व्यापारी-सैनिक येऊन राहावेत म्हणून विशेष प्रयत्न केले. सुरतमधून कारभार बघणाऱ्या पारशी, बोहरी व्यापाऱ्यांना त्याने खास सवलती देऊन मुंबईत यायला प्रोत्साहन दिलं. गोव्यामधल्या पोर्तुगीज जेसुइट पंथीयांच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या हिंदू व्यापाऱ्यांना त्याने मुंबईत यायचं आमंत्रण दिलं.

Image 2 - Husband of the Raj
एक लग्नोत्सुक वर !

या काळाविषयी भरभरून लिहावं असं नसलं तरी मुंबईतील बेटांवर असणारी नारळीची झाडं, त्यांच्या बुंध्याशी घालण्यात येणारा सुक्या माशांचा कुटा, त्याचा भयंकर उग्र, डोकं उठवणारा दर्प आणि चिखलाने माखलेल्या खाजणजमिनी ही जवळपास हरेक स्थलांतरिताची प्रमुख आठवण असल्याचं आढळून येतं. वारंवार उद्भवणारा मलेरिया आणि दूषित पाण्यामुळे पसरणारे साथीचे आजार यांमुळे मुंबई हा एक मृत्यूचा सापळा आहे अशी भावनाही जोर धरून होतीच. मुंबईमध्ये होणाऱ्या स्थलांतरापेक्षाही या काळात कुलाब्याच्या मेनधम पॉइंटकडे प्रवास करणाऱ्यांचा ओघ अधिक होता. आजच्या मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमसमोर उभ्या असलेल्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या जागी असणारा मेनधम पॉइंट सतराव्या शतकातील एकमेव ख्रिश्चन दफनभूमी होती !

अठराव्या शतकाची पहिली पाच-सहा दशकं उलटल्यावर मुंबईमधून होणाऱ्या व्यापाराने जोर धरला, मुंबईत फोर्ट भागात, त्यातही दक्षिणेकडील ‘इंग्लिश टाउन’ भागात इंग्लिश सैनिक, व्यापारी, सरकारी अधिकारी राहू लागले. इंग्लंडमधलं घरदार मागे ठेऊन इस्ट इंडिया कंपनीत रुजू होऊन आपलं नशीब अजमावयाला कित्येक तरुण भारताकडे वळू लागले. इकडे यायचा मार्ग खडतर होता. सहा-आठ महिन्यांचा खडतर, धोकादायक समुद्र प्रवास संपवला, तरच कुठे मुंबईचं दर्शन होत होतं. मुंबईत मलेरिया होऊन कधी जीव जाईल सांगता येत नव्हतं. तरीही एका आशेवर स्कॉटलंड, आयर्लंडमधून एकांडी तरुण मुलं इस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत रुजू होत होती. कारण, कंपनीच्या छत्राखाली उपलब्ध असणाऱ्या अनेक संधी. इस्ट इंडिया कंपनीने भारतामधून चालणाऱ्या व्यापारावर आपला एकाधिकार प्रस्थापित केला होता. त्यामुळे कंपनीमध्ये अधिकृतपणे सैनिक, कारकून, व्यवस्थापक या पदांसाठी जशा नोकरीच्या संधी होत्या तशाच अनधिकृतपणे चोरटा व्यापार करून उत्पन्न वाढवण्याच्याही संधी होत्या. सैनिक म्हणून भारतात आलेल्या तरुणाने व्यापारी म्हणून जम बसवल्याची शेकडो उदाहरणं आहेत. व्यापारासाठी आलेल्या इस्ट इंडिया कंपनीला भारताच्या राजकीय पटावर महत्वाचं स्थान प्राप्त करून देणाऱ्या, भारताच्या पहिल्यावहिल्या गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जसह (१७७२-१७८५) अनेक बडे अधिकारी अशा चोरट्या व्यापारात हात धुवून घेत होते.

Image 3 - A tennis party
मुला-मुलींचा परिचय व्हावा म्हणून आयोजित कार्यक्रमांपैकी महत्वाचा कार्यक्रम, टेनिस पार्टी

इस्ट इंडिया कंपनीत रुजू होणाऱ्या तरुणांच्या सामाजिक जीवनाचे संदर्भ बऱ्याच गोष्टी सांगून जातात. या तरुणांसाठी ‘योग्य वधूशी’ म्हणजे ‘गोऱ्या, इंग्लिश, ख्रिश्चन मुलीशी लग्न जमणे’ ही मोठी समस्या होती. मुंबईच्या रोगट हवामानामुळे इंग्लंडमधल्या मुली इथे यायला राजी नसत. इंग्लंडमधल्या लग्न न होऊ शकलेल्या मुली कंपनीच्या खर्चाने भारतात आणणं आणि लग्नासाठी काही ‘पर्याय’ उपलब्ध करून देणं असा एक उपाय इस्ट इंडिया कंपनीने राबवून बघितला खरा. पण त्याला फार प्रतिसाद मिळत नसे. गोऱ्या,युरोपियन ख्रिश्चन बायका मिळणं शक्य नसल्यामुळे इंग्लिश तरुणांचा ओढा इथल्या स्त्रियांकडे वळला. व्यापारात जम बसलेला ‘सिनियर मर्चंट’ वा कनिष्ठ सरकारी अधिकारी पोर्तुगीजांशी असलेल्या संबंधांतून जन्मलेल्या मिश्रवंशीय स्त्रीशी संबंध जुळवू बघे. ती मिळाली नाही, तर ‘भारतीय वंशाची स्थानिक स्त्री’ पदरी बाळगण्याकडे त्याचा कल असे. यापैकी कोणताही पर्याय न परवडणारे अतिकनिष्ठ सैनिक मात्र वेश्यांकडे आसरा घेत. ‘बीबीखाना’ अथवा लग्नाशिवाय संबंध ठेवलेल्या स्त्रियांसाठी स्वतंत्र घरं, हा कुलाब्यातल्या अनेक बंगल्यांचा एक महत्वाचा हिस्सा होता. १७९३-९५ या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या जॉर्ज डिकने उघड उघड एक हिंदू, मराठी स्त्री आपल्या बीबीखान्यात ठेवली असल्याची नोंद आहे. बीबीखान्यातील या मिश्रवंशीय अथवा भारतीय स्त्रियांचा ‘गौण स्त्रिया’ (Inferior Women) असा सर्रास उल्लेख आढळतो.

Image 4- Overland Route
इंग्लंड-इजिप्त-येमेन-भारत ह्या ओव्हरलंड रूटचा एक प्रातिनिधिक नकाशा

मुंबईत जेव्हा इंग्लिश लोकांसाठी पहिलंवाहिलं चर्च, सेंट थॉमस कॅथेड्रल बांधलं, तेव्हा प्रार्थनेसाठी येणाऱ्या लोकांच्या आसनव्यवस्थेत सगळ्यात अखेरीस ‘गौण स्त्रियांसाठी आसनव्यवस्था’ अशी एक रचना आढळते.  आपल्या मालकाच्या बिछान्यापासून चर्चच्या शेवटच्या रांगेपर्यंत या ‘गौण स्त्रिया’ रुजू होऊ शकत होत्या. पण सामाजिक रचनेत मात्र त्यांना कोणतंही अधिकृत स्थान नव्हतं. इतकंच नव्हे, तर अशा गौण स्त्रियांच्या पोटी जी अपत्यं जन्माला येत त्यांना मिळणारी वागणूकही वांशिक श्रेष्ठत्वाच्या व लिंगभेदाच्या कल्पनांवर आधारलेली होती. वरिष्ठ व्यापारी वा लष्करी अधिकारी यांना जर मुलगा झाला तर त्याला पुढील संगोपनासाठी इंग्लंडला त्याच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येई. जोपर्यंत तिथल्या समाजात त्याचा रंग खपून जाई तोपर्यंत तो सुरक्षित असे. पण जर त्याच्या ‘मिश्रवंशाची’ ओळख पटली, तर त्याला तातडीने भारतात पाठवण्यात येई. मुलींना कोणत्याही प्रकारे इंग्लंडमध्ये धाडलं जाण्याची सवलत नव्हती. त्यांचा बाप जर पैसा आणि प्रतिष्ठा राखून असेल तर त्या मुली मोठ्या होऊन, पुढे भारतात आलेल्या इंग्लिशवंशीयाशी लग्न जुळवण्याजोग्या होतील इतपत बरं संगोपन त्यांच्या वाट्याला येई.

गरीब सैनिक, कनिष्ठ व्यापारी यांच्या मिश्रवंशीय मुली उघडउघड वेश्याव्यवसायात ढकलल्या जात. मुंबईत व्यापारानिमित्त येणाऱ्या खलाशांमुळे जे ‘रेड लाईट एरिया’ नव्याने विकसित होत होते तिथे देहविक्रय करता करता या स्त्रिया कोणत्या दफनभूमीत गाडल्या गेल्या त्यांची कोणतीही नोंद इतिहासात नाही. मुंबई बेटांवर पोर्तुगीज वा इंग्रजही स्थलांतरित म्हणून बाहेरून आले. पण इथल्या स्त्रिया उपभोगून घेताना जे भोग त्यांनी या आणि पुढल्या पिढ्यांमधल्या स्त्रियांच्या माथी रचले, ते भीषण होते.

Image 5 - Social Event
सोशल इव्हेंट…नाचाचे, चहापानाचे कार्यक्रम

अठरावं शतक संपून एकोणीसावं शतक सुरु होण्याच्या संधीकाळात युरोपात आणि भारतात जे बदल घडत गेले, त्यामुळे मुंबईला मोठ्या प्रमाणात आकार येऊ लागला- अनेक अर्थांनी ! शतकाच्या सुरुवातीला मराठा सरदारांच्या व पेशव्यांच्या पाडावानंतर इस्ट इंडिया कंपनीला असलेला मोठा राजकीय अडथळा दूर झाला (१८१८) आणि कंपनीने व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित केलं. १८३० च्या दशकात चीनसोबत चालणाऱ्या अफूच्या व्यापारात मुंबई एक महत्वाचं भू-सामरिक ठिकाण म्हणून उदयाला येत होते. बगदादी ज्यू, अरबी मुस्लिम, गुजरातमधील भाटीया-कपोल महाजन असे अनेक व्यापारीसमूह मुंबईत स्थलांतरित होत होते. १७८० पासून हॉर्नबी वेलार्ड /वरळीचा बांध, कॉजवे प्रकल्प, बेलासिस रोड प्रकल्प अशा कित्येक प्रकल्पांमुळे मुंबईतील खाजण जमीन भराव घालून सपाट केली गेली होती. त्यामुळे मुंबईच्या नागरीकरणाला एक दिशा आली होती. युरोपात औद्योगिकरणाची सुरुवात झाली होती. वाफेच्या इंजिनाचा शोध लागला होता, इंग्लंडमध्ये रेल्वे आली होती (१८२५) आणि शिडाच्या जहाजांऐवजी वाफेवर चालणाऱ्या आगबोटी/स्टीमशिप्स जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाल्या होत्या.

Image 7 - Afternoon Tea-Bombay 1897
मुंबईतील ‘ब्रिटीश स्त्रियांचं हाय टी’ – 1897

युरोपातून येताना दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून येण्याऐवजी भूमध्यसमुद्रातून इजिप्त-येमेनमार्गे भारताकडे येण्याचा खुष्कीचा मार्ग उदयाला आला होता. पूर्वी ज्या प्रवासाला सहा ते आठ महिने लागायचे, जिथे सागरी चाच्यांची भीती वाटायची तिथे आता 2-3 महिन्यांत भारतात पोहोचणं शक्य होतं. १८३० च्या दशकात अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या मागणीमुळे इस्ट इंडिया कंपनीने खुष्कीचा मार्ग वापरून आपली स्वतःची प्रवासी वाहतूक सुरु केली. इस्ट इंडिया कंपनीचे पगारदार नोकर, भारतात येऊन कंपनीसोबत व्यापार करण्यास इच्छुक असणारे व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही वाहतूक व्यवस्था होती. १८४० पासून पेनिन्सुलार अँड ओरीएंटल कंपनीने याच मार्गावरून सर्वांसाठी खुली प्रवासी जलवाहतूक सुरु केली. अनेक ट्रॅव्हलॉग्जमधून किंवा इयान मार्शलच्या ‘पॅसेज इस्ट’सारख्या महत्वाच्या संदर्भग्रंथांतून या प्रवासाचे अनेक पदर उलगडत जातात.

इंग्लंडच्या साउदम्पटन बंदरातून निघणाऱ्या स्टीमशिप्स जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून, भूमध्यसमुद्र ओलांडून इजिप्तमधल्या अलेक्झांड्रीया बंदरात पोहोचत असत. तिथून एका छोट्या बोटीतून, नाईल स्टीमरमधून कैरोपर्यंत प्रवास. कैरोपासून सुवेझ बंदरापर्यंत प्रवास इजिप्तमधल्या तप्त वाळवंटातून, घोडागाड्यांच्या ताफ्यामधून. सुवेझ ते एडन आणखी एक स्टीमशिप आणि एडन ते मुंबई किंवा मद्रास किंवा कलकत्ता आणखी एका स्टीमशिपमधून. पुढे रेल्वेचं जाळं युरोपभर पसरल्यावर तर इंग्लंडहून इंग्लिश खाडी ओलांडून फ्रान्स आणि रेल्वेने फ्रान्स ओलांडून मार्सेली बंदरातून अलेक्झांड्रीयाकडे प्रयाण हा अधिक जलद पर्याय पुढे आला. एकूणच या प्रवासात तीन-चार वेळा जहाज बदलावं लागलं, तरी ते सुखावह होतं. कारण प्रवाशांचे सामान उंटांवरून पुढे पाठवलेलं असे. वाळवंटातला प्रवास ज्या घोडागाड्यांमधून होई त्या प्रशस्त, कार्पेटने मढवलेल्या लाकडी केबिन्स असत, दर १०-१२ मैलांवर घोडे बदलले जात आणि दिवसातून दोनदा सुग्रास जेवण मिळे. उकडलेले बटाटे, अंडी, मटन चॉप्स, रोस्ट पिजन, ब्रेड आणि उत्तम प्रतीची एल बियर हे पदार्थ जेवणात असतच असत. जेव्हा शिडाची जहाजे हा एकमात्र पर्याय होता तेव्हा स्वतःची गादी,चादर, पांघरूण, दिवा, मग, बादली अशा अनेक गोष्टी स्वतःजवळ बाळगाव्या लागत. प्रवासभाडे एक हजार पाउंड इतकं असे. खुष्कीचा मार्ग सुरु झाल्यावर फक्त स्वतःचे कपडे आणि आवश्यक वस्तू जवळ बाळगल्या की झालं, असं असे. पुन्हा प्रवासभाडं १०५ पाउंड इतकं कमी झालं.

Image 8 - Family Women Leaving for Bombay
सरकारी अधिकारी वा व्यापाऱ्यांच्या घरातील स्त्रीचे मुंबईकडे प्रयाण

या घडामोडींचा परिणाम म्हणजे इंग्लंडमधून भारतात, त्यातही मुंबईत येऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली. विशेषतः कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातल्या सुशिक्षित स्त्रिया-मुली, बायका, बहिणी मुंबईत अगत्याने येऊ लागल्या. मुंबईच्या गव्हर्नरच्या पत्नीने मुंबईत येऊन त्याच्यासोबत राहणं आणि फर्स्ट लेडी म्हणून सभासमारंभांची शोभा वाढवणं हा शिरस्ताच झाला. त्यापैकी काहींनी आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. १८४८-१८५३ या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या लॉर्ड फॉकलंडची पत्नी लेडी फॉकलंड, अमेलिया फिटझक्लरेन्स हिने लिहिलेल्या आठवणी ( Chow Chow- Being Selections from a Journal  Kept in India, Egypt and Syria ) मुंबईविषयीच्या अत्यंत हृद्य आठवणी मानल्या जातात. अरुण टिकेकरांनी मराठी वाचकांसाठी ‘स्थल-काल’मध्ये त्याचा मोठ्या कौतुकाने, आदराने उल्लेख केला आहे. ओघानेच हेही सांगायला हवं, १८३० च्या दशकात, स्टीमशिप्समुळे मुंबईत जे मिशनरी प्रचारक आले त्यापैकी स्कॉटीश मिशनरी फादर जॉन विल्सन मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील, गिरगाव चौपाटीवरील विल्सन कॉलेज हे त्याचं सगळ्यात मोठं, जिवंत स्मारक आहे. त्याहूनही अधिक त्याची पत्नी मार्गारेट विल्सन हिला स्मरणात ठेवायला हवे कारण मुंबईत येऊन अस्खलित मराठी शिकलेली पहिली वहिली इंग्लिश महिला बनण्याचा मान तिच्याकडे जातो. क्रॉस मैदानाच्या एका कोपऱ्यात चिरनिद्रा घेत पहुडलेली मार्गारेट विल्सन आज विस्मृतीमध्ये थिजून गेली आहे. इंग्लंडच्या राजाची, चौथ्या विल्यमची अनौरस संतती म्हणून जन्मलेल्या लेडी फॉकलंडचं नाव मात्र मुंबईतल्या रेड लाईट एरियाशी जोडलं जाऊन लोकांच्या ओठांवर खेळत आहे, हा एक विलक्षण क्रूर योगायोग आहे.

Image 9 - On board the Ship
पेनिन्शुलर & ओरिएन्तल बोटीवरील प्रातिनिधिक चित्र

प्रवासी वाहतुकीत कमालीचे बदल झाल्यामुळे केवळ उच्चपदस्थांच्या घरंदाज स्त्रियाच मुंबईत आल्या, असं नाही. मुंबई आता झपाट्याने विस्तारत होती. व्यापारासोबतच कंपनी सरकारचा दरारा आणि विस्तारवादी धोरण व्यापक होत चाललं होतं. हा व्याप सांभाळण्यासाठी लष्करी सेवा, मुलकी सेवा निर्माण झाल्या होत्या. मुंबईकडे येणारे स्वप्नाळू तरुणही संख्येने वाढले होते. त्यांच्यासाठी ‘सुयोग्य वधू’ मिळावी म्हणून कंपनीने स्वखर्चाने जे ‘पर्याय’ उपलब्ध करून देण्याचं धोरण स्वीकारलं होतं त्याला आता भरभरून प्रतिसाद मिळू लागला होता. इंग्लंडमधल्या गोठवणाऱ्या थंडीतून भारतातल्या आल्हाददायक हिवाळ्यासाठी जहाजं भरून येणाऱ्या या मुलींना ‘Fishing Fleet Girls’ म्हटलं जाई. कंपनी सरकार या मुलीना भारतात आणत असे, सामाजिक समारंभ-सहली-घोडसवारी-इंग्लिश क्लब नाईट्स अशा प्रसंगांतून त्यांना मुलांसमोर सादर केलं जात असे. बहुसंख्य मुलींची लग्नं वर्षभरात जुळत असत. भारतात वर्षंभर राहूनही लग्न न जमू शकलेल्या मुलींना परत इंग्लंडला पोहोचवलं जात असे. भारतातही लग्न न जमू शकल्याची सामाजिक नामुष्की कपाळावर वागवत या मुली इंग्लंडला जात तेव्हा त्यांच्यावर ‘The Returned Empties’ हा शिक्का मारला जाई. सरकारी खर्चाव्यतिरिक्त स्वतःच्या खर्चानेही उपवर मुलींचे कुटुंबीय त्यांना ‘गळ टाकून बसण्यासाठी’ भारतात पाठवू पहात होते. यामागे खूप अर्थ दडले होते.

Image 10 - Going to Bombay
मुली भारताकडे निघताना, बोटीवर वावरतांना

इंग्लंडमधील श्रेष्ठ-मध्यम-कनिष्ठ सामाजिक वर्तुळात स्वीकारल्या न गेलेल्या मुली आता लग्न होईल, या आशेने भारतात येऊ पाहात होत्या. इंग्लंडमधील सामाजिक अवहेलनेपेक्षा, निम्नवर्गीय, ग्रामीण जीवनापेक्षा भारतातील गरजू इंग्लिश वरांकडून होणारं स्वागत, इथली सत्ता, सुबत्ता त्या मुलींना आपलीशी वाटू लागली होती. ‘Three Hundred a Year, Dead or Alive Men’ ही या सौद्यामागची प्राथमिकता होती. वर्षाला ३०० पाउंड कमावणारा नवरा भौतिक सुबत्तेचं किमान परिमाण बनलं होतं. भारतातल्या हवामानात, लढायांत तो जगला तर ३०० पाउंड. शिवाय शारीरिक सुखं होतीच. नवरा मृत्युमुखी पडला तरी दयाळू कंपनी सरकार त्याच्या वाटचं संपूर्ण पेन्शन विधवेला देत होतं, हा मोठाच फायदा होता. तिला जसा भौतिक सुखं हजर करणारा नवरा हवा होता, तशी त्यालाही आदर्श ‘व्हिक्टोरियन मोरलिटी’नुसार त्याचं श्रेष्ठत्व मानणारी, जपणारी बायको हवी होती. फिशिंग फ्लीट गर्ल्ससाठी असणारे जे अलिखित संकेत होते, त्यातला एक संकेत  बरंच काही सांगून जातो. भावी नवऱ्यासमोर कसं वागावं, याविषयी सांगताना डोरोथी ह्युजेस सल्ला देते – ‘If you are unfortunate enough to be born clever, for heaven’s sake, be clever enough to hide it’. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने स्त्रीला निव्वळ एक भोगवस्तू बनून तिचा जो व्यापार चालवला होता, त्या व्यापारात आपली किंमत व्यवस्थित वसूल करणाऱ्या या फिशिंग फ्लीट गर्ल्स कुठेतरी एक चरा उमटवून जातात.

लग्नाच्या बाजारात नवरा पटकवण्यासाठी भारतात जाण्याचं जे आकर्षण इंग्लंडमध्ये निर्माण झालं होतं त्यावर Thomas Hood नावाच्या कवीने   I’m Going to Bombay (1840)  या शीर्षकाची कविता रचली आहे. आपल्या उपहासात्मक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हूडने या कवितेत मुंबईला निघालेल्या विवाहोत्सुक मुलीची मानसिकता, तिच्या कुटुंबियांची मानसिकता पहिल्या दोन कडव्यांत फार समर्पकपणे रंगवली आहे.

By Pa and Ma I’m daily told
To marry now’s my time,
For though I’m very far from old
I’m rather in my prime.
They say while we have any sun
We ought to make our hay —
And India has so hot an one,
I’m going to Bombay!

My cousin writes from Hyderabad
My only chance to snatch,
And says the climate is so hot,
It’s sure to light a match, —
She’s married to a son of Mars,
With very handsome pay,
And swears I ought to thank my stars
I’m going to Bombay!

इंग्लंडमध्ये मुलगी वयात आली आहे, आईबाबांना लग्नाची काळजी आहे आणि ते मुलीला सल्ला देताहेत भारतात जाण्याचा, जिथे लग्नबाजार तेजीत आहे. तिची बहिण हैदराबादमध्ये कोणा श्रीमंत, देखण्या इंग्लिश मुलाशी लग्न करून सुखी झाली आहे. आणि आपल्या बहिणीचंही असंच भलं व्हावं म्हणून तिला भारतात येण्याची संधी सोडू नकोस असा आग्रहाचा सल्ला देतेय. हे चित्र रंगवताना हूडने जी ठेवणीतली शब्दकळा वापरली आहे, जो सौदेबाजीचा रंग उतरवला आहे तो अंगावर काटा आणतो. भुवनवर भाळलेली एलिझाबेथ रसेल किंवा मनोहर माळगावकरांच्या ‘प्रिन्सेस’ मधली इंग्लिश गव्हर्नेस, या भाबड्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखा नवीन अर्थ,वेगळ्या छटा घेऊन डोळ्यांसमोर तरळून जातात. तसा भाबडेपणा चिरंतन, व्यापारही चिरंतन …

बाकी, साम्राज्यवादाच्या जागतिक पटावरचं महत्वाचं व्यापारी केंद्र म्हणून जडणघडण झालेल्या मुंबईत स्थलांतरांची मालिका सुरु झाली व टिकून राहिली ती व्यापारी सौद्यापोटी, हेच तेव्हढं सत्य ना ?

मयूरेश भडसावळे

10392092_1058599654206855_4639392027283626545_n

मुळात कॉम्प्युटर इंजीनियर. भारतातील नामांकित अशा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ‘अर्बन पॉलिसी & गव्हर्नंस’ मध्ये एमेस्सी. शहरांच्या प्रश्नांवर, शहरीकरणवर सातत्याने action oriented research work  केले आहे. अर्बन डेव्हलपमेंट प्रॅक्टीशनर म्हणून हॅबिटॅट लॅब इंडिया या थिंक टंक  सोबत सध्या काम सुरू आहे. Just , socially inclusive and sustainable cities या थीमअंतर्गत एका  कमिटमेंटमधुन शहरांकडे बघतो. त्यासाठी लेखन, सिटी वॉक , फोटोग्राफी ,नरेटिव्ह डॉक्युमेंटेशन आणि  सोशल मीडिया अशा साधनांचा प्रभावी वापर.
स्थलांतरीत समूहाने आकारलेली शहरे अथवा  शहरातील  माणूस समजून  घेणे  हा विशेष अगत्याचा विषय.
सर्व फोटो – इंटरनेट फोटो

2 thoughts on “गोइंग टू बॉम्बे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s