प्राजक्ता काणेगावकर
एसटीच्या ताफ्यात एशियाड रुजू झाली तेव्हा आम्ही पणजीला राहात होतो. नुकतेच एशियाड खेळ होऊन गेले होते. त्या चकाचक हिरव्या गाड्या बघून खूप भारी वाटायचं. तो मॅस्कॉट अप्पू, त्या धडधाकट बसेस बघून नेहमी वाटायचे की आपल्याला कधी हा प्रवास घडेल. तोपर्यंत एसटी महामंडळ आणि लाल बस याची पक्की सांगड डोक्यात बसलेली. कुठेही प्रवासाला निघायचे म्हणजे लाल एसटीचे रिझर्वेशन करायचे, धावत पळत स्टॅन्डवर पोचायचे. मग घुसून सीटा पकडणे, खिडकीतून टाकलेले रुमाल हटवणे, सीटवर चढून वरच्या जाळीच्या रॅकवर सुटकेसी टाकणे, स्थानापन्न होऊन विजयी मुद्रेने चढणाऱ्या जनतेकडे बघणे असा साग्रसंगीत कार्यक्रम असायचा.
रत्नागिरी ते पुणे हा रत्नागिरी ते मुंबईसारखाच, पुल देशपांडे गुरुजींनी म्हणल्याप्रमाणे हाडे मोजून घ्यावीत असा प्रवास मला बराच घडलेला आहे. तेव्हा तर रातराणी पकडून पुण्याला यायचो आम्ही. गाडी चालवायला लागते म्हणून ड्रायव्हर आणि कितीही झोप असे म्हणाले तरी जागी राहणारी माझी आई असे दोनच लोक गाडीत जागे असावेत बहुतेक. बाकी आम्ही आईच्या किंवा बाबांच्या मांडीत घुसून, समोरच्या सीटच्या दांडीवर हाताची घडी घालून त्यावर डोके टेकून (मोठ्या माणसांचे बघून) झोपून गेलेलो असायचो. बरोबर मध्यरात्री गाडी कोल्हापूरला पोचायची. मग जनता आळोखेपिळोखे देऊन उठायची. कोपभर चहा मारून परत गाडीत येऊन बसायची. तितक्यात जागी झालीच तर किंवा मग मुद्दाम जागे करून आया पोराबाळांना शू करून आणायच्या. या सगळ्या स्टॅन्डवरच्या बायकांसाठी आडोसा म्हणून बांधलेल्या जागांवर एक स्वतंत्र लेख होईल खरेतर. थोड्या वेळाने कंडक्टर टाणटुण टाणटुण अशी बेल मारायचा. त्याचा दमदार “आले का सगळे?” असा आवाज घुमायचा आणि गाडी मार्गस्थ व्हायची.
पुण्याला पोचेपर्यंत पहाट झालेली असायची. शिरवळ सुटले की कात्रजच्या बोगद्याचे वेध लागायचे. जेमतेम मिनिटभर टिकणाऱ्या त्या बोगद्याच्या अंधारात आम्ही एकमेकांना चिकटून बसायचो. मग घाटातून दिसणारे पुणे बघायचे. परतीच्या रातराणीत मग पुण्याचे घाटातून लखलखणारे दिवे मान वळवून वळवून बघायचो. पुणे आले की बाबांचा चेहरा खुलायचा. त्यांना कधी एकदा स्वारगेट येतंय असे व्हायचे. नवी पेठेत आजीचे घर येईपर्यंत त्यांची अवस्था बरीचशी माहेरवाशिणीसारखी झालेली असायची.
लाल एसटीच्या प्रवासाची सुरुवात माझ्यासाठी म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे पुण्याला येणे आणि तिथून आजोळी औरंगाबादला जाणे अशी झाली. इतक्या वेळा प्रवास करूनही माझ्या वाट्याला नेमकी काच सैल असलेली खिडकीच कशी येते हे कळलेले नाही. त्या खिडकीला विभागणारी आडवी सैल पडलेली लोखंडी पट्टी आणि ती काच यांचे युगुलगीत म्हणण्यापेक्षा युगुल-आदळआपट चालू असते. त्या नादाला नादब्रह्म मानून संगीतनिर्मिती करण्याइतके आपण प्रतिभावंत नसल्याची खंत मला झोपू देत नाही. त्यात आपल्या शेजारी डाबर आमलावाली कुणी सुगंधी ताई किंवा काकू आली की संपलाच खेळ. अशा वेळी वाचायला म्हणून घेतलेल्या वर्तमानपत्राचे कागद त्यात काचेच्या फटीत कोंबणे किंवा वर्तमानपत्राने वारा घेत वास हटवणे यातला एक उपाय करून पाहता येतो.
आम्ही गोव्याला राहायला होतो. तोपर्यंत आमच्याकडे रॉकेलचा घुरर्र करणारा ष्टो होता. आम्हाला बऱ्याच प्रयत्नांनी आणि दिवसांनी गॅसचे कनेक्शन मिळाले. पण त्यासाठी जिथे आम्ही दापोलीला आधी राहत होतो तिथून काहीतरी कागदपत्रे आणणे गरजेचे होते. बाबांना जाणे शक्य नसल्याने आईने आम्हा दोन्ही चिंगळ्यांना घेऊन जावे असे ठरले. पणजी ते रत्नागिरी आणि मग रत्नागिरी ते दापोली असा तो लाल डब्याचा प्रवास माझ्या अजून लक्षात आहे. तीन आणि दोन बाकांच्या रांगा असलेली एसटी. ड्रायव्हरच्या मागच्या बाजूचे लांब बाक, आणि तसेच मागची सीट म्हणजे असलेले ते लांबलचक बाक. मागच्या लांब बाकावर बसून प्रवास करायला लागू नये म्हणून तर तिकीट आधीच काढून ठेवायचे.
आम्ही गोव्याहून निघालो. दादू तेव्हा अगदीच लहान होता. त्याची चणही लहानखुरीच होती. त्याची एक आवडती हिमरू शाल होती. त्याच्या दशा घट्ट पकडून, तोंडात अंगठा घालून तो झोपत असे. आम्ही बसमध्ये बसलो आणि आईच्या लक्षात आले की दादूचे तिकीट काढलेले नाहीये. बरं परिस्थिती फारच बेताची होती. प्रवासाचे बजेट अगदीच मर्यादीत होते. तरीही तिने दादूचे तिकीट काढायचे ठरवले. काम करून येणे गरजेचे होते नाहीतर गॅस कनेक्शन मिळाले नसते. कंडक्टर मागच्या सीट वरून पुढे येत होता. तिने माझी जागा बदलून मला खिडकीत शिफ्ट केले. दादूला त्याची शाल गुंडाळली. त्याने शालीच्या दशा पकडल्या, अंगठा तोंडात घातला आणि तो झोपलाच. कंडक्टरने टिकटिक चिमटा वाजवला. “दोन हाफ आणि एक फुल” आईने नरम पट्टीत तिकीट सांगितले. कंडक्टरने एकदा आम्हा तिघांकडे पहिले. त्याला काय वाटले कुणास ठाऊक?
“कशाला पोराचे तिकीट काढताय? लहानच आहे तो.”
असे म्हणून त्यानेच एक हाफ आणि एक फुल असे तिकीट तिच्या हातावर ठेवले. दादूला यातला काही पत्ताच नव्हता. तो शालीच्या दशा पकडून मस्त गाढ झोपून गेला होता. मी खिडकी मिळाल्यामुळे खूष होते आणि आई एकदम शांत होती. एकूण आमच्या छोट्याशा आयुष्यात ती जरा धमाल घटना होती.
मोठे झालो तशी मग शिंगे फुटायला लागली. लाल डब्यापेक्षा प्रायव्हेट बशी कशा चांगल्या असे पटवून देण्यात बराच वेळ खर्ची पडू लागला. तरीपण आई आणि बाबा दोघेही लाल बसशी असलेली निष्ठा सोडायला तयार नव्हते. लाल बस परवडते हे फार महत्वाचे कारण होते त्यांच्यासाठी. आम्ही दोघे बहीणभाऊ मात्र चान्स मिळाला की प्रसन्न ट्रॅव्हल्सने जात असू. प्रसन्न सुरु झाली तेव्हा अगदीच दणकेबाज होती. औरंगाबादच्या वाटेवरचे स्माईलस्टोन हे आमच्यासाठी खास आकर्षण होते. बायकांची स्वच्छ आणि चांगली सोय हा पण एक मोठा निकष होता या बसने जाण्याचा. फार भारी वाटायचे प्रसन्नचे तिकीट काढून ऐटीत त्या मोठ्या बसने जायला. शनिवार पेठेत कॉसमॉस बँकेची बिल्डिंग, देवी हाईट्स तिकडून सुटायच्या त्या वेळी.
असेच एके वर्षी माझी आजी आली होती पुण्यात. अचानक मी आणि आजीने कोल्हापूरला देवीदर्शनाला जायचा प्लॅन केला. माझ्या डोक्यात प्रायव्हेट बसने जायचे कारण सीट्स एकदम आरामशीर आणि आजीला त्रास होणार नाही. पण आजी माझ्या आईचीच आई. तिने मला लाल डब्यात बसवले. शिरवळ, खंडाळा, सातारा करत करत आम्ही सकाळी साडेसहाला निघालेलो ते पार दुपारी दोनच्या आसपास कोल्हापूरला पोचलो. बरं प्लॅन एका दिवसात परत यायचा होता. त्यामुळे परतायची घाई पण होती. सडकून भूक लागलेली. अंबाबाईपेक्षा माझी चिडून महाकाली झालेली. आई असती तर मी हातपाय आपटले असते. आजीपुढे काय बोलणार?
दर्शन घेतले आणि जेवायला हॉटेल शोधायला सुरुवात केली. माहिती काहीच नाही. आता सगळीकडे शेट्टी पंजाबी मिळते तसे तेव्हा काही मिळेल कुठे असे वाटत नव्हते. एकाही हॉटेलचा तोंडवळा आत जावेसे वाटेल असा दिसेना. त्यातून कोल्हापूरच्या तिखट स्वयंपाकाची आणि खाण्याची कीर्ती इतकी की आम्ही जीव मुठीत धरूनच हॉटेल शोधात होतो. शेवटी तिकडून माझ्या मित्राला पुण्यात फोन केला. “अगं ताराबाई पार्कात जा की. तिकडे वूडल्यांड आहे. तिकडे जेवा” असे अस्सल कोल्हापुरी खाक्यात उत्तर मिळाले. मग ते हॉटेल शोधले. या सगळ्यात माझ्या सत्तरीच्या आजीचे कौतुक हे की मला हे चालतंय, ते नाही, ते पचत नाही, इत्यादी काहीही न म्हणता ती मस्त माझ्याबरोबर पालक पनीर आणि पराठे असे जेवली. ष्ट्यांड्वर परत आल्यावर मात्र मी तिचे काहीही न ऐकता तिला प्रायव्हेट बसमधे बसवले. मला लाड म्हणून एक ‘माझा’ प्यायला मिळाले तिच्याकडून. अजून ती या ट्रिपची आठवण काढते. आता थकली ती. नाहीतर पुन्हा एकदा बसने कोल्हापूरला नेऊन ताराबाई पार्कात तिला जेवायला घालायची माझी तयारी आहे.
शिवनेरी सुरु झाली तोपर्यंत कॉम्पिटिशनने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला बऱ्यापैकी दणका बसला असावा. शेजारचा व्हॉल्वो ऐरावत इकडे येऊन झुलायला लागला त्यामुळे लगेच तुमचा हत्ती तर आमचा गड करत बहुतेक शिवनेरी स्पर्धेत उतरली. शिवनेरीची खरी मजा पण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर. आधीच तो रम्य रस्ता. गाडीत गर्दी नाही. मोठ्या मोठ्या खिडक्या. अदबीने बोलणारे चालक वाहक … (उगाच कंडक्टर म्हणाले की चिमटा आणि खटक खटक खिडक्या वाटते) इत्यादी इत्यादी झकास. एकदम टिपटॉप गोष्ट.
अप्रूप होते शिवनेरीचे. मला तर अजूनही आहे. मस्त पावसाचे दिवस, लोणावळा ओलांडले की दरी डोंगर, डूकुचे नाक, ढाकच्या बहिरीचे डोंगर सगळे धुक्याआड गुडूप होतात. काचेवरून खाली येणारे थेंब बघत बघत रस्ता संपतो. तक्रार करायचीच झाली तर लोणावळ्याच्या नीताऐवजी दत्तला थांबली बस तर बरं पडेल खरेतर. पण ते काय होणे नाही, त्यामुळे व्यर्थ आशा ठेवू नये.
मला वाटते गर्दी नाही, गाडीत वास नाहीत, घाटात गाडी लागणे असले प्रकार नाहीत, आरडा ओरडा, भांडणे, मधल्या खांबांना आणि वरच्या बारला लटकलेले लोक नाहीत हे शिवनेरी, एशियाड वगैरे गाड्यांचे मोठे अपील होते. आता तर बस पण दोन दोन सीटच्या रंग असलेल्या झाल्या. कंडक्टरची टिकटिकी गेली. आता इलेक्ट्रॉनिक पावती मिळते प्रवासाची, पण त्यात त्या चिमट्याची गम्मत नाही. पण खडखड करणाऱ्या खिडक्या, लोखंडाचा वास, खणाचे ब्लाउज घातलेल्या, डोक्यावर पदर असलेल्या, हातभार बांगड्या असणाऱ्या आज्या मावश्या बदलेल्या नाहीत. गांधी टोपीवाले तात्या, आजोबा आहेत अजून. त्यातल्या त्यात जीन्स आणि कानात हेडफोन लावलेले आणि फोनवर विडिओ बघणारे दादा ताई ही नवीन भरती आहे.
माझा सगळ्यात आवडता एसटीचा प्रवास हा कशेडी घाटाचा आहे. महाबळेश्वरवरून खाली कोकणात उतरताना किंवा पाटणवरून कशेडीतून खाली उतरताना निसर्गाची उधळण बघायला मिळणे याला खरेच भाग्य लागते. कशेडी तर इतका विचित्र घाट आहे कि सगळा प्रवास आपण विरुद्ध दिशेला तोंड करून करतोय आणि तरीही बरोबर दिशेने खाली उतरतोय… हे कसे काय बुवा? असे अनाकलनीय कोडे आहे.
स्वारगेटला एकदा मी चिपळूण गाडीत बसले. जायचे दापोलीला होते. शेजारी एक खास कोकण स्पेशल आजोबा बसले होते. बुटकेसे, घारे डोळेवाले, डोळ्यावर फोटो क्रोमॅटिक चष्मा घातलेला. पांढरा शर्ट (कोकणात पांढऱ्या कपड्याला प्रवासात लाल माती लावून आणली नाही तर बहुतेक घरात घेत नसावेत), आणि मस्त गप्पिष्ट. नुकतेच ते अमेरिकेत मुलाकडे जाऊन आले होते. त्यामुळे रसभरीत वर्णन चालू होते. मी मन लावून ऐकत होते. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान उतू चालला होता. त्यांच्या अमेरिका वर्णनापेक्षा त्यांच्या डोळ्यातली ती अभिमानाची चमक जास्त देखणी होती.
पाटणला गाडी थांबल्यावर त्यांनी मला स्वखुशीने चहा पाजला. “या हो आमच्याकडे आंजर्ल्याला. फोटो दाखवीन. पाणी नाय हालत हो पोटातले रस्त्यावर. इथे बघा जेवण करा ना करा चार उलट्या काढल्याव गाडीत बसल्यासारखे वाटतंय”. मी मान डोलावली. तसेही वाद घालण्यात त्यांच्या वयामुळे शहाणपणा नसतो इतकी या वयात त्यांची मते सेट असतात. त्यातून आजोबांची अमेरिकानंदी टाळी लागली होती. ती मोडून त्यांना पाटणच्या टपरीवर आणण्यात काही फारसे हशील नव्हते. चिपळूणला उतरल्यावर दापोलीला जाणारी गाडी शोधली. काकांनी जातीने दापोली गाडीत बसवून दिले. फोन नंबर दिला आणि माझाही घेतला. वहिनीकडे साडेचारला पोचले तर पाच वाजता त्यांचा पोचलीस का म्हणून फोन पण आला. हरवला त्यांचा नंबर नंतर माझ्याकडून. पण अजूनही त्यांचा पोचलीस का म्हणून केलेला फोन लक्षात आहे. कोण कुठले काका, जीव लावून जातात माणसे खरंच.
लाल डब्यातून प्रायव्हेट बसमध्ये असं माझं प्रमोशन बरेच दिवस टिकून होते. मग हळू हळू स्वतःची गाडी किंवा हायर्ड कार हा आणखी सुखाचा पर्याय समोर आला. मग बस सुटली ती सुटलीच. बरेच दिवस मग बस घडली नाही.
एसटीशी परत संबंध जुळला गेल्या दोन महिन्यात. नवी मुंबई मध्ये दर गुरुवारी शिकवायला जायचे काम मिळाले. पुन्हा शिवनेरी, एशियाड, हिरकणी या सगळ्या जुन्या मंडळींशी नव्याने संबंध प्रस्थापित झाले. अशाच एका गुरुवारी वाशी नाक्याला यायला उशीर झाला. मिळेल त्या बसने जायचे आता असे डोक्यात. नेमकी दादर स्वारगेट मिळाली. कधी एकदा घरी पोचतेय असे झालेले. सकाळी चार वाजल्यापासून उठले असल्याने डोळे मिटत होते. बरोबर मागच्या सीट वर एक सुबक ठेंगणी कन्या होती. सणसणीत आवाजाची देणगी लाभलेली. आधीच बसमध्ये ईन मिन माणसे.
जो तो ताणून द्यायच्या इराद्यात. ताईंचे नॉन स्टॉप फोन सुरु होते. सध्याच्या ट्रेंड प्रमाणे प, फ, ब, भ, म शब्द भरपूर पेरत, मधून मधून बेबी, लव्ह, डार्लिंग करत ती उच्च आवाजात सतत बोलत होती. सराईतासारखे फोनवरून मुआह मुआह पण सुरु होते. माझ्याच मागे असल्याने मला दुर्लक्ष करता येईना. बाई गं तुझ्या आवाजाला फोनची गरज नाही, असेच बोलशील तरी ऐकू जाईल असे म्हणायचा मोह मी ठायी ठायी आवरत होते. लोणावळा आले. “चल रे… मैं अभी सुट्टा मार के आता हू” असे म्हणून ती खाली उतरली. चला तेव्हढीच वीस मिनिटांची झोप म्हणून मी खिडकीला डोकं टेकले. थोड्या वेळाने “आले का सगळे?” अशी परिचित हाक आली. मी जरा नाईलाजानेच डोळे उघडून इकडे तिकडे बघितले. कन्या समोरच होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि मग एकदम मस्त, अत्यंत लाघवी आणि इनोसंट असे मला स्माईल टाकले. माझा राग खाली आला. तिला सुनवायची चार वाक्ये माझ्या डोक्यात विरघळली. आणि मग एकदम ट्यूब लागली. मी चार वाजता उठून, काम करून, प्रवास करतेय हा तिचा प्रश्न नव्हता. संध्याकाळचे साडेसात ही तिच्या दृष्टीने लोकांशी बोलायची नॉर्मल वेळ होती. संध्याकाळच्या प्रवासात तसेही शिवनेरीतले दिवे बंद झाल्यावर ती तिच्या मित्र मैत्रिणींशी कॅचिंग अप म्हणतात तसे बोलत असेल. मला नेमके खटकले काय होते मग? शिव्या, सिगारेट का तिचा आवाज? यातले काहीही मला नवीन नव्हते.
गेली कितीतरी वर्षे या वयोगटाला शिकवून किंवा त्यांच्याबरोबर काम करून मला या भाषेची, वागण्याची सवय होती. मला त्रास झाला तो माझ्या मीच करून घेतलेल्या गैरसमजाचा. कुठेतरी तिच्या बोलण्यावरून आणि बिनधास्त असण्यावरून मीही तिच्याबद्दल वाया गेलेली मुलगी असा विचार करत होते. दिडमीती वेळ भेटणाऱ्या माणसाबद्दल आपण केवळ प्रथमदर्शनी वागण्यावर गेलो हे माझे मलाच बोचले. त्रागा, त्रास हा माझा प्रश्न होता. त्याने माझ्या जजमेंटवर परिणाम व्हायला नको होता. तिच्या त्या मस्त मनापासून हसण्याने मला आरसा दाखवला हे नक्की. तिला काय वाटले कोण जाणे, कदाचित तिचे फोन करूनही झाले असतील, नंतरचा प्रवास ती शांत होती पण माझी झोप उडाली होती.
धो धो पावसात एका आठवड्यात मी वाशीला पोचले. रस्त्यात असतानाच लेक्चर कॅन्सल झाल्याचा फोन आला. मी उलट पावली येऊन बससाठी थांबले. मुंबईची अवस्था पावसात काय होते ते माहित असल्याने शिवनेरी वगैरेसाठी न थांबता समोर आली त्या निमआराम मध्ये चढले. पुढच्या नाक्याला एक खुटखुटीत तब्बेतीचे, पायजमा, टोपी पैरण आजोबा शेजारी येऊन बसले. मी माझ्याच नादात. फोन अनलॉक केला आणि स्क्रीनवरचा पांडुरंगाचा फोटो पाहून आजोबांनी हात जोडले.
“विठोबा जणू?”
मी आजोबांना रीतसर नमस्कार केला.
“हो.”
“आमीबी माळकरी”, गळ्यातली माळ काढून दाखवत आजोबा म्हणले.
“पांडुरंग हरी”.
“पांडुरंग हरी. कुटं चाललाय?”
“पुण्याला”
“मालक?” आजोबांचा थेट माझ्याकडे बघत रोखठोक सवाल.
आता मला पण जरा मस्करी करायची लहर आली.
“असतात पुण्यात”
“काय करतात?”
“मोठ्या ऑफिसमध्ये आहे”
“बरं बरं” आजोबांचे समाधान झाले असावे. ते भोरला जाणार होते. विचित्रगडापाशी गाव होते त्यांचे. पिशवीत गच्च झेंडूची फुले होती.
“नवरात्र न्हाई का आता. घरी नेतोय. पूजेला व्हत्यात”. मी पिशवीकडे पाहिल्यावर आजोबांचा खुलासा. “तुम्हाला देऊ का थोडी?”
“नको. घरी आहेत हो.”
आजोबा खूष होते. बडबड करत होते. मी ऐकत होते आणि नव्हते. मला डुलकी लागली. शाल गुंडाळून मी झोपले. थोड्या वेळाने मला हाताला धरून आजोबांनी जागे केले.
“मगापासून बघतोय. झोपू नका. उठा जरा. बोला. माणूस माणसाला भेटत न्हाई इथे बोलायला.”
मी उठून बसले.
“बोला”
“मुलेबाळे किती तुम्हाला?”
“कोणी नाही”. माझा झोपेतून उठवल्यामुळे चिडलेला पण आजोबांचे वय बघून कंट्रोल केलेला आवाज.
“अ रा रा… काय हो? पटेना व्हय मालकांशी तुमचे?”
आता मुळात मालक नाहीत तिथे पटायचे काय असे माझ्या जिभेच्या टोकावर.
“नाही हो तसे काही नाही… पांडुरंगाची इच्छा”.
आजोबांनी टोपी डोलवली.
“बरोबर आहे. त्याच्यापुढे काय करणार आपण?”
थोडा वेळ ते शांत बसले. पण त्यांची चुळबुळ चुळबुळ सुरु होती. शेवटी मीच विचारले.
“काय झाले आजोबा?”
“काही नाही. बोललो तर तुम्हाला वाईट वाटेल.”
“नाही वाटणार. बोला”
“सोडवणूक असते बघा माणसाची. पाहिजे पण तशी. असून नसल्यागत. कळले का?”
मी आजोबांकडे बघितले. ते माज्याकडे बघून हसले. काही कारण नसताना त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.
एकदा, वाईजवळ आडरस्त्याच्या गावात जाताना दर दहा मिनिटांनी खचाखच भरलेली बस कंडक्टर थांबवत होता आणि माणसे घेत होता. त्या बसची कॅपॅसिटी संपली होती. तरी त्याचे स्टॉप घेणे काही थांबत नव्हते. शेवटी एका बाबाने चिडून त्याला विचारले
“अजून किती माणसे भरणार हैस? हुबे राहवेना हिते”.
“बाबा या रस्त्याला गाड्या थांबत नाहीत. तेव्हढीच सोय होतीय लोकांची. घरी जायचे असतंय बायाबापड्यांना. आता कधी पोचणार त्येबी? सगळ्यांनाच पोचायचंय. घ्या सांभाळून थोडे.”
सगळ्यांना सांभाळून बरोबर घेऊन जायची सोडवणूक पाहिजे खरंच. असून नसल्यागत. .. .
प्राजक्ता काणेगावकर
इ-मेल – pkanegaonkar@gmail.com
वा, बढिया! अनेक वर्षांपूर्वी आजोळी जायचं म्हणजे बाॅम्बे सेंट्रल ते रत्नागिरी आणि पुढे रत्नागिरी ते पावस असा लाल डब्याचा प्रवास अनेकदा केलाय. कधीकधी बाॅम्बे सेंट्रल ते वाईसुद्धा. त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. शिवनेरीतल्या त्या मुलीबद्दलचा अनुभव आवडला.
LikeLike