मेधा कुळकर्णी
सायलीबरोबर डिजिटल दिवाळी १७ च्या प्रवास विशेषांकाची आखणी सुरू होती. प्रवासाची विविध निमित्तं, पर्यटनाचे नवेनवे प्रकार यांची चर्चा सुरू असताना स्लम टुरिझमवर काही असावंसं वाटलं. नैरोबीच्या स्लम्स आठवल्या. धारावीच्या स्लम टूरच्या जाहिराती आठवल्या. वाटलं की या वस्त्यांना बोलता आलं असतं, तर? तर त्यांनी काय सांगितलं असतं? २०१६ साली वलयांकित पॉपसिंगर मॅडोना नैरोबीतल्या किबेरा वस्तीत गेली होती. तिथल्या वाहत्या उघड्या गटाराच्या सान्निध्यातल्या फोटोसह तिने ट्विट केलं होतं की या वस्तीतलं पिण्याचं पाणी इथून, म्हणजे त्या गटारातून येतं. त्यावेळी वस्तीतले लोक चिडले, रागावले, व्यथित झाले होते. आमच्या वस्तीला भेट देऊन आमच्याविषयी असं का लिहिता, बोलता? आमच्याविषयी बरं बोलण्यासारखं काहीसुद्धा नाही का?
आत्ता हा लेख लिहिताना, या वस्त्या मला असेच प्रश्न विचारताय. मी त्यांना आश्वस्त करतेय की तुम्हीसुद्धा माणसाने निर्मिलेल्या बर्यावाईटाचा एक भाग आहात. वस्त्या आणि बाहेरचं शहर यांचं सहअस्तित्व आहे खरं तर. तुम्हाला टाळता येईल एक वेळ. पण तुमचं अस्तित्व नाकारता नाही येणार. आणि आता स्लम टुरिझमने तर पर्यटकांना थेट तुमच्या दारातच आणून ठेवलंय.
माझं आजवर प्रवासाला जाणं झालंय, ते जास्त कामानिमित्तानेच. त्यामुळे एक लाभ झाला. पर्यटक म्हणून भारावून जाऊन बघितलं जातं त्यापलीकडे बरंच काही असतं, हे कळत गेलं आणि बघायलाही मिळालं. वरलिया रंगाने भुलून जाणं टळलं. वरवरचं खरवडल्यावर जे दिसतं, तेही बघायला मिळालं. अमूक ठिकाणी वॉव…असंही आहे आणि ओह…असंही आहे, हे वास्तव उलगडलं.
१९९१ साली वॉशिंग्टन डीसीमध्ये पब्लिक इंटरेस्ट ॲडव्होकसीचे धडे घेताना ‘विकास’ या संकल्पनेची चर्चा झाली होती. माणसाला निवडीचे पर्याय अधिकाधिक मिळत जाणं म्हणजे विकास, अशी एक व्याख्या सांगितली गेली. आणि आम्ही अनुभवलंच तिथे. तिथल्या सुपर मार्केट्समध्ये दहा प्रकारची दुधं, विविध तर्हेचे ब्रेड्स, चीज, बटरचे कितीतरी प्रकार. बघून अवाक व्हायला झालं होतं. त्यावेळी भारतात, अगदी मुंबईतदेखील अशी मुबलकता यायची होती. चर्चेच्या दुसर्याच दिवशी आम्ही राहात होतो त्या ड्यूपॉंट सर्कल परिसरात सकाळी वॉक घ्यायला गेलो असताना गार्बेज बॅग्जमधून शोधून शोधून पाव खाणारे दोन तीन भिकारी दिसले. आणि पुन्हा अवाक व्हायला झालं. त्यांना निवडीचा दुसरा पर्याय नव्हता. पुढे तिथल्या मुक्कामात अभ्यासाचा भाग म्हणून तिथली होमलेस लोकांसाठीची सेंटर्स, साक्षरतावर्ग, रात्रशाळा वगैरे पाहिलं. सुंदर, झगमगीत, विकसित, ज्ञानसमृद्ध, तंत्रश्रीमंत अमेरिकेचाच एक भाग, ही अमेरिकासुद्धा होतीच.
आपण प्रवासाला जातो. तेव्हा तिथला प्रदेश बघतो. जंगलं, पर्वतशिखरं, नद्या, समुद्र, डोंगर, दर्या या निसर्गलीला आणि मानवनिर्मित किल्ले, मंदिरं, विविध संग्रहालयं, कलादालनं असं काय काय. पण एखादा प्रदेश म्हणजे फक्त स्थळ नसतं. या सार्यात प्राण फुंकणारी तिथली तिथली माणसं असतात. माणसांनी निर्मिलेलं एक वातावरण असतं. त्यांनी घडवलेला इतिहास, त्यांचे जय-पराजय, धर्म, संस्कृती यांचा रंगगंध त्या वातावरणात मिसळलेला असतो. त्यांची भाषा, खाणं-पिणं, घरं, जगण्याची रीत यामुळे त्या प्रदेशाला व्यक्तिमत्व बहाल झालेलं असतं. प्रवासात त्या त्या प्रदेशातल्या स्थानिक माणसांना भेटणं म्हणजे त्या ठिकाणची खरी ओळख करून घेणं असतं. माणसं आलिशान सुखवस्तू भागांत राहातात तशी वंचित अभावग्रस्त वस्त्यांमध्येही राहातात. ही सगळी माणसं हेच त्या प्रदेशाचं प्राणतत्व. आजवरच्या साइट सीइंग टूर्समध्ये ही माणसं आणि त्यांच्या वस्त्या अदृश्य असायची. उदाहरणार्थ किबेरा.
नैरोबी
किबेरा. आफ्रिकेतली सर्वात मोठी स्लम. किबेरा नैरोबी शहरात आहे. नैरोबी हे आंतरराष्ट्रीय शहर. केनया देशाची राजधानी. केनया पूर्व आफ्रिकेतला देश. आफ्रिकेत ब्रिटिश वसाहतींनी युगांडा रेल्वेलाइन बांधताना प्रशासकीय गरजेसाठी १८९९ मध्ये नैरोबी शहर वसवलं. रेल्वेलाइन बांधण्यासाठी आफ्रिका आणि आशिया खंडातून मोठ्या प्रमाणावर मजूर आणले होते. मजूर कसले? गुलामच ते. युरोपियन्स आणि हे काम करणारे यांच्यासाठी कायदे वेगवेगळे, दोघांसांठी राहाण्याच्या व्यवस्था वेगवेगळ्या. केनयाच्या मूळ रहिवासी असलेल्या जमातींमधले लोकही यात होते. स्वतःच्याच भूमीत त्यांचं असं शोषण सुरू होतं. १९६३ मध्ये केनया स्वतंत्र झाल्यावरही फार फरक पडला नाहीच. सरकारने सुमारे अकराशे एकर जागेवर वसलेल्या किबेरा वस्तीला बेकायदेशीर ठरवून टाकलं. तरी तिथे लोक राहातायत. केनयाच्या ग्रामीण, आदिवासी भागांतून लोक तिथे येतात आणि कायमचे राहू लागतात. वस्ती बेकायदेशीर. त्यामुळे पिण्याचं पाणी, शौचालयं, दवाखाने, शाळा वगैरे सुविधा अधिकृतपणे देण्याचा प्रश्नच मिटतो. आज दहा लाखांवर लोक तिथे राहातायत. आता युनिसेफसारख्या एनजीओंनी तिथे सुधारणा करणारे अनेक प्रकल्प शासनासोबत सुरू केलेत. मुंबईत अनेक स्लम्स आहेत. बर्याच उपनगरांत वस्त्या आहेत. तरी धारावीसारखं नाममहात्म्य अन्य वस्त्यांना नाही. तशीच आफ्रिकेतली धारावी म्हणजे किबेरा.

२००९ साली आठव्या आंतरराष्ट्रीय नागरी आरोग्य परिषदेसाठी मी नैरोबीला गेले होते. केनया हा देश आफ्रिकन सफारीसाठी पर्यटकांना प्रिय आहे. पर्यटक नैरोबी शहरात उतरतात आणि फार तर एखादा दिवस थांबून आफ्रिकन सफारीसाठी मसाई मारा अभयारण्याकडे जायला निघतात. आम्ही परिषदेसाठी गेलो होतो. तिथे जाण्याचा उद्देश जगभरातले नागरी आरोग्याचे प्रश्न समजून घेणं, त्या प्रश्नांवर काम करणार्या संस्थांबरोबर अनुभवांची देवाण घेवाण करणं, परिषदेतल्या तज्ञ व्यक्तींची भाषणं ऎकणं, केनयामधलं आणि पूर्व आफ्रिकेतल्या अन्य देशांमधलं समाजकारण समजून घेणं, खुद्द नैरोबीतलं या संदर्भातलं काम बघणं आणि हे सगळं करून राहिलेल्या वेळात जंगल सफारीचा आनंद घेणं असा होता. तिथल्या वास्तव्याचे दहा दिवस कारणी लागावेत यासाठी आधीपासूनच ओळखी काढून भेटीगाठी ठरवल्या होत्या. आणि तिथल्या सर्व मंडळींनी “कारिबु.. कारिबु” म्हणजे, तिथल्या स्वाहिली भाषेत “स्वागत असो” म्हणत आमंत्रण दिलं होतं.
परिषदेला एकूण ४५ देशांचे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित होते. केनयाशेजारच्या इथिओपिया, सोमालिया, टांझानिया, युगांडा, रवांडा, सुदान, घाना या देशातल्या प्रतिनिधींची उपस्थिती नजरेत भरत होती. परिषदेदरम्यान नैरोबीतल्या काही वस्त्यांना भेट देण्याचा कार्यक्रम होता. नैरोबीत बर्याच स्लम्स आहेत. त्यापैकी तीन वस्त्यांना तिथल्या मुक्कामात जाणं झालं. नैरोबी शहर मुंबईसारखंच वाटलं. त्यामुळे वस्त्यांमध्ये काय चित्र असणार त्याचा थोडा अंदाज होताच. तो दिवस होता २० ऑक्टोबर, केनयाच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या नेत्यांचा स्मरणदिवस. वातावरण उत्सवी आणि उत्साही. कोरोगोशो नावाच्या एका मोठ्या वस्तीत आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांसोबत गेलो.
स्वाहिली भाषेत कोरोगोशो शब्दाचा अर्थ गिचमिड गर्दीची जागा. केनयाच्या स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण आदिवासी भागांतून स्थलांतरित झालेल्यांची ही वस्ती. कुबट वास, लांब-लांब बोळ, दुतर्फा कच्ची-पक्की घरं, कच्चे धूळभरले रस्ते, उघडी वाहती गटारं, जागोजागी कचर्याचे ढीग, मातीत खेळणारी मुलं, पाणी भरणार्या बाया, नळाला पाणी आल्यामुळे त्यांची पाणी भरण्याची घाई चाललेली, दारूने झिंगलेले पुरुष वगैरे. आपल्या एखाद्या गावातल्या वस्तीत शिरल्यासारखंच वाटलं. आणखीही काही होतं. झटून काम करणारे कार्यकर्ते होते. वस्ती विकासासाठी काम करणार्या संस्था होत्या. वस्तीचा कम्युनिटी रेडिओ होता. सरकारचे, नगरपालिकेचे शहर विकासाचे प्रकल्प होते.
सोबतचे कार्यकर्ते सांगत होते – तिथे सरकारी योजना आहेत. पण भ्रष्टाचारापायी लोकांपर्यंत त्या धड पोचत नाहीत. खासदार निधीचंही तेच. इथल्या लोकांचे आरोग्याचे प्रश्न फार बिकट आहेत. कुपोषणापायी होणारे बालमृत्यु, गर्भावस्थेत, बाळंतपणात होणारे मातामृत्यु, मलेरिया जोरात. लोकांमध्ये पुरेशी जाण नाही. मच्छरदाण्या दिल्या तरी वापरत नाहीत. आरोग्यकेंद्रात जात नाहीत. गेले तरी तिथे सुविधा नसतात…..! समस्यांची न संपणारी साखळी. आपल्यासारखीच. अरबी समुद्र ओलांडून गेलेली मी पुन्हा आपल्याच देशात परतले की काय असं वाटण्याइतका सारखेपणा.
वस्तीत फिरताना एक धक्का बसला. नैरोबी स्लम टूर कंपन्यांच्या बसेस दिसल्या. स्लम टुरिझम? हे काय प्रकरण? सोबतच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली. आम्ही गेलो त्या सुमारास नैरोबीत या स्लम टूर्स पर्यटकप्रिय ठरू लागल्या होत्या. आफ्रिकन सफारी करण्यासाठी येणारे पर्यटक विमानाने नैरोबीत उतरतात. मसाई माराला जाताना किंवा येताना एखादा दिवस किंवा काही तास त्यांना नैरोबीत रहावं लागतं. तेवढ्या वेळात या कंपन्या त्यांना गाठतात आणि स्लम्स दाखवायला घेऊन येतात. त्यावेळी आपल्याकडे धारावीतही अशा टूर्स सुरू झाल्याचं ऎकून होते. पण फारशी माहिती नव्हती. नैरोबीच्या स्लम टूरचा तरी अनुभव घ्यायचं ठरवलं. दोन तीन पॉश, आरामदायी बसेसमधून पर्यटक उतरले. एकेका टूरमध्ये १५-२० पर्यटक होते. युरोपातले, अमेरिकेतले गोरे. आणि काही आफ्रिकेतलेच काळे. टूरचं तिकिट २०-२२ डॉलर्स होतं. युरोही चालणार होते. पण सोबतच्या कार्यकर्त्याने काही मांडवली केली आणि मला त्या टूरबरोबर विनामूल्य फिरण्याची परवानगी मिळाली. पर्स, पैसे, मोबाईल, कॅमेरा सांभाळा असं कार्यकर्ते आणि टूरगाइड पुन्हा पुन्हा सांगत होते.
टूर सुरू झाली. ही पहा स्लम. इथे सोयीसुविधांचा अभाव आहे. लोक कसे दाटीवाटीने राहातायत. एका खोलीत वीसबावीसजण. विविध रोगांचं आगार आहे हे…. गाईड बोलत होता. आम्ही चालत असताना आजुबाजुला लहान मुलं जमली. ती अशा टुर्सना सरावलेली दिसत होती. मुलं आमच्या मागे-पुढे चालू लागली. आम्ही फोटो घेऊ लागलो तेव्हा कॅमेर्यापुढे पोजेसही देऊ लागली. फोटो क्लिक केल्यावर गोर्या पर्यटकांकडे पैसे मागण्यासाठी झोंबू लागली. हे सारं एकीकडे करूण वाटत होतं. दुसरीकडे या स्थितीचा संतापही येत होता. आणि हतबलही वाटू लागलं होतं. गाईड सांगत होता – तुम्हाला या मुलांना पैसे द्यायचे असतील तर द्या. मी अडवणार नाही. पण तुम्ही मोठी रक्कम आमच्याकडे दिलीत तर आम्ही या वस्तीसाठी तिचा विनियोग करू.
टूर पुढे निघाली. सांभाळून पाय टाका. तुमच्या शूजना घाण लागेल….गाईड सांगत होता. हे सगळं मला खूप विचित्र वाटत होतं. पुढे आणखीच धक्का बसला. एका डबक्यात प्लास्टिकच्या बंद पिशव्या फेकलेल्या होत्या. त्या पारदर्शक असल्याने त्यात काय आहे, तेही दिसत होतं. असह्य दुर्गंधी. पोटातलं सगळं ढवळून उलटून पडेलसं वाटू लागलं. इतक्यात गाईड सांगू लागला. ही फ्लाइंग टॉयलेट्स. इथे शौचालयाची सुविधा अपुरी. एका शौचालयावर तीनशेच्या वर लोक अवलंबून अशी स्थिती. त्यामुळे या पॉलिथिनच्या पिशव्या वस्तीत वाटल्या जातात. लोक त्या वापरतात. आणि त्या अशा फेकून दिल्या जातात. या बॅगेबाबतही काही प्रयोग झाले आहेत. ‘पीपो’ (PeePoo) या नावाने बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक बॅग्जही दिल्या जातात हेही तिथे कळलं. गोर्या पर्यटकांच्या चेहर्यावर या फ्लायिंग टॉयलेट्सबाबत फारच कुतूहल दिसत होतं. कार्यकर्ते सांगत होते की मुळात शौचालयांना पर्याय म्हणून युनोमार्फत केली गेलेली ही तात्पुरती व्यवस्था. पण या पॉलिथिनच्या पिशव्या वापरण्याबाबतदेखील पुरेशी समज नसल्याने आणि त्या नष्ट करण्याचीही यंत्रणा नसल्याने रोगराई वाढते, वस्तीच्या बकालपणात भर पडते. अनेक एनजीओ आता ही फ्लाइंग टॉयलेट्स बंद करण्यासाठी सरसावल्या आहेत, असंही कळलं.
टूर तिथून पुढे निघाली. आता वातावरण बदललं. तिथे नेत्यांची आठवण साजरी होत होती. वस्तीतली बाया-माणसं नृत्यवादनासाठी तयार होती. काही वेळातच ड्रम्स वाजू लागले. आणि सगळ्यांच्या पावलांना नाच फुटला. अंग सळसळू लागली. काही क्षणांपुरतं गरिबी, भूक वगैरे सगळं विसरून ते सर्वजण नाचू लागले. देशगौरवपर गाणी गाऊ लागले. तिथे काही वेळ थांबून त्यांचं कौतुक करून टूर पुढे निघाली.
त्यानंतरचा टप्पा. कम्युनिटी हॉल. आपल्याकडे वस्त्यांत, गावांत समाजमंदिर असतं, तसल्या त्या हॉलमध्ये सगळ्यांना नेलं. तिथे काही स्थानिक नेतेमंडळी होती. स्वाहिली भाषेत त्यांची भाषणं झाली. वस्तीतल्या समस्या, त्या सोडवण्याचे उपाय वगैरे नेहमीचेच विषय. मी ज्या परिषदेसाठी आले होते तिथेही हीच चर्चा सुरू होती. एकोणीसावं शतक साम्राज्यांचं होतं; विसावं राष्ट्रांचं तर एकविसावं शतक शहरांचं असणार आहे. युनोच्या अंदाजानुसार येणार्या तीस वर्षात जगात होऊ घातलेली सगळी वाढ छोट्या अथवा मध्यम शहरांमध्ये होणार आहे. शहरीकरणाची आणि त्यासोबत येणार्या समस्यांची तीन प्रमुख केंद्र असणार आहेत सबसहारन आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका. शहरीकरणाच्या समस्यांनी पुरत्या वेढलेल्या, पिचलेल्या एका वस्तीत मी टूर करत होते.
संध्याकाळ उलटून गेली होती. ती टूर सोडून मला आता माझ्या ग्रुपमध्ये परत जायचं होतं. मला ती स्लम टूर दाखवायला मदत करणार्या कार्यकर्त्याने दुसर्या एका कार्यकर्त्याला- थॉमसला माझी ओळख करून द्यायला बोलवून घेतलं. मी भारतातल्या रेडिओशी संबंधित आहेत हे ओळख करून देण्याचं खास कारण. थॉमस बीवायर हा पुमवानी नावाच्या दुसर्या एका वस्तीत कम्युनिटी रेडिओ पत्रकार होता. त्याने मला तीही वस्ती बघायला येण्याचं आमंत्रण दिलं. दुसर्या दिवशी परिषदेतून थोडी सवड काढून तिथे गेले.
तशीच गजबजलेली वस्ती. वाट काढत काढत एका छोट्या बैठ्या इमारतीत पोचले. हे वस्तीतलं रेडिओ स्टेशन. स्टुडिओतून निवेदक कार्यक्रम सादर करत आहे. तो श्रोत्यांना विचारतोय त्यांच्या स्वप्नांविषयी, आकांक्षा, भविष्यातल्या योजनांविषयी. श्रोते फोनवरून बोलताहेत किंवा एसएमएस पाठवताहेत. (तेव्हा स्मार्ट फोन यायचा होता) तरुणांना चांगली नोकरी हवी आहे. निवेदक नोकरी कशी कुठे मिळेल, त्यासाठी वस्तीत कधी कुठे प्रशिक्षण, मार्गदर्शन आयोजित केलंय ते सांगतोय. नोकरीनंतर छोकरी नको का, असंही गंमतीत विचारतोय. लगोलग एचआयव्ही एडसबद्दल सावधगिरीची सूचना देतो. रक्त तपासणीची सोय कुठे असते, तपासणी का महत्वाची आहे, देशात, शहरात एडसग्रस्तांचं प्रमाण, स्थिती वगैरे. पोरं सांगताहेत त्यांना खूप शिकायचं आहे. आया सांगताहेत वस्तीत चांगली शाळा हवी. कोणी जन्माला येणार्या बाळांविषयी बोलताहेत. निवेदक त्या त्या विषयावर श्रोत्यांना माहिती देतोय. मधून सुयोग्य गाणीसुद्धा. अगदी रंगतदार कार्यक्रम.
हा नैरोबी शहरातल्या पुमवानी नावाच्या वस्तीतला ‘घेट्टो’ एफएम कम्युनिटी रेडिओ. मला तो निवेदक फारच आवडला. जॉन त्याचं नाव. पुमवानी वस्तीतच लहानाचा मोठा झालेला. फार काही मोठा नव्हता. वीस-बावीस वर्षांचा असेल. वस्तीतला रेडिओ असावा, तर असा. किबेरा, कोरोगोशो आणि पुमवानी या वस्त्यांमध्ये चालणारे कम्युनिटी रेडिओ स्थानिकांमध्ये भरपूर ऎकले जातात. रेडिओत काम करणारे सगळे या वस्त्यांतलेच लोक. त्यांना विचारलं की तुम्हाला या स्लम टुरिझमविषयी काय वाटतं? यामुळे बाहेरून येणार्या लोकांपुढे कोणतं चित्र जातं? त्यांचं म्हणणं होतं की टूरमुळे आमची वाईट प्रतिमा लोकांपुढे जाते हे खरं असलं तरी यातून काही बर्या गोष्टीही घडतात. सरकारवर दबाव येतो. मोठा निधी मिळतो. आणि वाईट प्रतिमेची आम्ही चिंता का करावी? आहेच तसं आमचं जगणं. जे आहे ते दिसतं लोकांना. सुस्थितीत राहाणर्यांनी बघावं की कधीतरी, दुःस्थितीत राहाणं काय असतं ते. त्यांचं बोलणं ऎकून स्लम टुरिझमकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलू लागला. शेवटी आपण ‘बाहेरचे’. आतल्यांना काय वाटतं, तेच जास्त महत्वाचं.
तिथून बाहेर पडले तो पुन्हा एका स्लम टूरशी गाठ पडली. आता मात्र ती टूर पाहाणंही नको झालं होतं. परिषद संपली. आणि आम्ही मसाई मारा सफारीसाठी निघालो. तिथलं निसर्गसौंदर्य आणि प्राणीजगत बघताना नैरोबीतल्या वस्त्या मागे टाकल्या गेल्या.
धारावी
सुरुवातीला लिहिलं तसं – शहरात राहाताना वस्त्या टाळता येतात. नाकारता येत नाहीत. मुंबईत तर धारावी टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही. माहीम, माटुंगा, सायन, वांद्रा, कुर्ला, बीकेसी – इथे येता-जाताना धारावीशी गाठ पडतेच. माझ्या धारावीशी कितीक भेटी झालेल्या. नव्वदच्या दशकात मटासाठी केलेलं लिखाण, आकाशवाणीचे कार्यक्रम, साक्षरता मोहीम, माता-बालमृत्यू विषयात काम ही निमित्तं. धारावी अलिकडे चर्चेत असते ती तिथल्या पुनर्विकासाच्या बातम्यांसंदर्भात. आता, खरं तर, तिचं वर्णन कुणी पूर्वीसारखं झोपडपट्टी म्हणून करतच नाही. आणि नकोच करायला. पण टूरिझमसाठी मात्र ती अजूनही ‘स्लम’ आहे.
तर पुन्हा वेळ आली होती, अनेक वर्षांनंतर धारावीला भेटण्याची. नैरोबीनंतर धारावीतला स्लम टुरिझमही अनुभवायचा होता. धारावीत स्लम टुरिझम पहिल्यांदा सुरू करणारी संस्था रिॲलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल. तिचा एक संस्थापक कृष्णा पुजारी. २००८-०९ मध्ये ऑस्करविजेता ‘स्लमडॉग मिलियनेअर’ चित्रपट गाजला होता. मुंबईतल्या झोपडपट्टीत जगणार्या मुलांची ती कथा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने धारावी चर्चेत होती. तेव्हा कृष्णाच्या मुलाखती वाचल्या होत्या. खुद्द कृष्णाचीच जीवनकहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेहून कमी नाहीये. धारावीतल्या कार्यकर्त्याकडून कृष्णा पुजारीचा फोन नंबर मिळवला. लगेचच भेट ठरली.

माहिम रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडून नव्वद फुटी रस्त्यालगतच्या गल्लीत, कुंभारवाड्याजवळ रिॲलिटी टूर्सचं ऑफिस आहे. त्या ऑफिसच्या वरच्या खोलीत कृष्णा वाट बघत होता. दिल्लीची फ्लाइट पकडायला निघायच्या घाईत होता. त्यांनी दिल्लीलाही स्लम टूर्स सुरू केल्यात. धारावीत सगळीकडे असतात, तशासारखीच एक निमुळती शिडी चढून वर गेले. कन्नड मातृभाषा असलेला कृष्णा मराठी नीटच बोलतो. त्याच्या आसपास काही परदेशी मुलंमुली काम करत होती. त्यांच्याशी तो सफाईदार इंग्लिश बोलत होता. तेरा वर्षांचा असताना कर्नाटकातल्या आपल्या गावाहून, काम करण्यासाठी तो मुंबईत आला. वडाळ्याच्या प्रतीक्षानगर वस्तीत राहिला. कृष्णाने बावीसाव्या वर्षी धारावीत बारमध्ये काम सुरू केलं. मग स्वतःचा कॅफेटेरिया काढला. २००५-०६ च्या दरम्यान त्याला मूळचा बर्मिंगहॅमचा असलेला ख्रिस वे हा माणूस भेटला. ख्रिसने लॅटिन अमेरिकन समाजाचा अभ्यास केलेला. ब्राझीलमध्ये रिओ शहरात त्याने वस्त्यांमधलं पर्यटन पाहिलेलं. ‘बाहेरच्या’ लोकांना अशा वस्त्यांत आणल्याने वस्त्यांचा विकास व्हायला मदत होऊ शकते अशी त्याची धारणा झाली होती. धारावीत स्लम टुरिझम सुरू करण्याची हीच प्रेरणा ठरली.
विकिपिडियातल्या नोंदींप्रमाणे १९ व्या शतकात या स्लम पर्यटनाची सुरूवात लंडन आणि मॅनहॅटन शहरांतल्या स्लम्सपासून झाली. मुळात गरिबीचा, शहरीकरणाचा अभ्यास करणारे या तर्हेचं पर्यटन करत असत. दिवसच्या दिवस वस्त्यांत जाऊन राहात असत. अभ्यासक अजूनही तसं करतातच. पण जागतिकीकरणाच्या वेगात माणसांचे प्रवास वाढू लागले. पर्यटनाला गती मिळाली. मिडियाचा प्रभाव वाढत गेला. याचा परिणाम म्हणून स्लम टुरिझम हा प्रकार वेगाने अनेक देशांत, शहरांत पसरायला सुरूवात झाली. आता स्थानिक युवकांना काम, रोजगार देणारा हा एक उद्योगच झाला आहे.
धारावीत हे काम करण्यासाठी ख्रिसला स्थानिक माणूस हवा होता. कॅफेटेरियामध्ये त्याने स्मार्ट, तरूण कृष्णाला हेरलं. आणि २००४ मध्ये रिॲलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल सुरू करण्यासाठी जमवाजमव करायला सुरुवात केली. कृष्णा तेव्हा फक्त पंचवीस वर्षांचा होता. ख्रिसने त्याला तयार केलं. आता ख्रिसने स्वतःला धारावीतल्या कामातून मुक्त करून घेतलंय. तो आता फिलिपिन्स, मनिला वगैरे ठिकाणी याच प्रकारचं मॉडेल सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे. आता कृष्णा आणि त्याची देशी-परदेशी सदस्यांची टीम भारतातले त्यांचे सर्व प्रकल्प सांभाळते आहे.
धारावीत हे पर्यटन सुरू केलं तेव्हा स्थानिकांनी कडक विरोध केला. प्रवाशांना इथे कशाला आणताय, इथे बघण्यासारखं आहे तरी काय, त्यांना गेट वे ऑफ इंडिया बघायला न्या…असं लोक म्हणायचे. पण कृष्णाने त्यांना मनवलं. आणि त्यांचा विरोध हळुहळु मावळला. टूर कंपनीबरोबरच त्यांनी रिॲलिटी गिव्ह या नावाची एनजीओही सुरू केली आहे. टूर्समधून मिळालेल्या नफ्याचा काही हिस्सा या एनजीओतर्फे समाजसेवेची कामं करण्यासाठी वापरला जातो.
मी कृष्णाला भेटायला गेले तेव्हा रिॲलिटी गिव्हतर्फे चालवल्या जाणार्या इंग्लिशच्या क्लासमध्ये पास झालेल्यांचा प्रमाणपत्रं देण्याचा कार्यक्रम आयोजला होता. मला तो क्लास बघायचाच होता. पुन्हा एक निमुळती शिडी चढले. कृष्णाने त्याचं मार्केटिंग कौशल्य माझ्यावरच अजमावत मला त्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी करून टाकलं. आणि माझ्याच हस्ते प्रमाणपत्रं देण्याचा कार्यक्रम घडवून आणला. मुला-मुलींनी इंग्लिशमधून दोनचार वाक्यांची भाषणं केली. त्यांना शिकवणार्या मुलीही स्मार्ट आणि गोड होत्या. इंग्लिशबरोबरच तिथे कंप्युटरही शकवला जातो. या क्लासेसचं सगळं व्यवस्थापन धारावी, माटुंगा लेबर कँप परिसरातलीच मुलं-मुली बघतात. छान वाटलं, स्लम टुरिझमचं हे बायप्रॉडक्ट बघून.
कृष्णाने त्याच्या टीमशी ओळख करून दिली. ऑफिसात पर्यटकांची नोंदणी सुरू होती. मलाही त्यांची वॉकिंग टूर करायची होती. पण त्यांच्या ओळखीतून जायचं नव्हतं. अन्य पर्यटकांपैकी एक होऊन जायचं होतं. त्या टूरमध्ये जी माहिती दिली जाते, जे सांगितलं जातं ते माझ्या माहितीशी, दृष्टिकोनाशी ताडून बघायचं होतं. जॉन ग्रिफिन हा गोरा अमेरिकन पत्रकार. त्याने अमेरिकेतल्या वंशवादाचा थेट अनुभव घेण्यासाठी, त्यांच्यासारखं होऊन जगण्यासाठी स्वतःला काळा रंग लावून घेतला आणि तो अफ्रिकन अमेरिकनांच्या वस्तीत काही महिने राहिला. हे अनुभव त्याने ‘ब्लॅक लाइक मी’ या पुस्तकात लिहिलेत. असं करणं थोर आणि महाअवघड. तसलं नाही. पण मला, धारावीची माहीतगार म्हणून नाही, तर साधी पर्यटक म्हणून त्यांची तीन तासांची धारावी वॉकिंग टूर करायची होती. मी काही दिवसांनी त्यांच्या वेबसाईटवरून पैसे भरून टूरचं बुकिंग केलं. माहिम रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे दुपारी २ वाजता टूर गाईड चेतन आणि राजेश यांच्यासह आमची टूर सुरू झाली. सोलर दिवे बनवणार्या अबुधाबीस्थित एका कंपनीचे दोन अधिकारी – त्यांना धारावीत काही प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती, ऑस्ट्रिलियाहून भारत बघायला आलेली एक मुलगी, एक सॅनफ्रॅन्सिस्कोवासी मुलगी ‘शांतारामा’ या पुस्तकाने प्रभावित झालेली, एक फ्रान्सहून आलेला तरूण आणि दोघं मुंबईतच राहाणारे पंजाबी अशी आमची टूर.

माहिम रेल्वे स्टेशन ओलांडून आम्ही पूर्वेकडे आलो. आणि तिथून चेतन-राजेशने माहिती सांगत एकेक ठिकाण दाखवायला सुरुवात केली. धारावी ही उद्योगनगरी असल्याची साक्ष देणारी ठिकाणं. कचर्याचं हातांनी केलं जाणारं वर्गीकरण, गारमेंट्स शिवण्याच्या छोट्या फॅक्टर्या, प्लॅस्टिक रिसायकलिंग, धातू वितळवण्याचं प्रचंड धोक्याचं काम, चामड्याचं कटिंग आणि त्यापासून स्त्री-पुरुषांसाठी बॅग्ज, पर्सेसची निर्मिती, कुंभारवाड्यात माती रगडून मडकी, पणत्या घडवणं, लिज्जत आणि अन्य कंपन्यांचे पापड लाटून वाळत ठेवले होते, वेफर्स, चिवडा वगैरे बनवणं – अख्ख्या मुंबईला धारावीतून चखणा पुरवला जातो – अशी गाइडची टिपण्णी. दोघे चटपटीतपणे इंग्लिश बोलत होते. गप्पा मारताना कळलं की ते १२वी पास आहेत. धारावीतच जन्मले, वाढले. रिॲलिटी टूर्स कंपनीच्या स्टाफवर आहेत. त्यांना महिना १५ हजार पगार आहे. त्याखेरीज पर्यटकांकडून टिप मिळते. अडचणीच्या काळात मोठी मदत देणारे प्रवासीही भेटतात. पैशाच्या मिळकतीहून बरंच काही मिळतं, असं ते सांगत होते. प्रतिष्ठा मिळतेच. देशोदेशींच्या पर्यटकांना भेटून आमची समज वाढते. आमच्यातल्या काहींना परदेशी जायची संधीही मिळाली आहे. आमच्यातला मयूर तर फुटबॉल खेळायला ऑस्ट्रेलियालाही जाऊन आलाय.
टूरमधल्या प्रत्येक थांब्यांच्या वेळी आजुबाजुच्या रहिवासी बायांशी मी बोलले. जेवणं आटोपून, मागचं सगळं आवरून त्या बाहेर निवांत बसल्या होत्या. सगळ्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला या टूर्सचा, बाहेरून बघायला येणार्या माणसांचा काहीच त्रास नाही. तिथले अरुंद बोळ ओलांडताना दुतर्फा घरं अगदी जवळून सहजच दिसतात. पण प्रत्येक वेळी गाइड सांगत होता की घरांमध्ये डोकावून बघू नका. टूर घेणारे सगळेजण खूप कुतूहलाने प्रश्न विचारत होते, समजून घेत होते. सुमारे तीन तास भटकून आम्हा सगळ्यांना ऑफिसात आणलं. फीडबॅक वगैरे लिहून घेतला.
या टूर्स गरिबीचं प्रदर्शन करणार्या असतात, असा आक्षेप घेतला जातो. पण तिथल्या दोन भेटींदरम्यान तसं काहीच दिसलं नाही. म्हणजे, मुद्दाम मांडून ठेवून असं काही दाखवलं गेलं नाही. मुळात धारावी गरीब आहे का, हा मुद्दा आहे. कारण अनेक व्यावसायिक तिथे राहातात. करोडोंची उलाढाल होते. धारावीत कोणी रिकामं, निरुद्योगी बसलेलं दिसतच नाही. तुम्ही धारावी बघायला म्हणून जाता. पण तिथल्या कुणाचं तुमच्याकडे लक्षही नसतं. प्रत्येक जण बाराबारा, सोळासोळा तास आपापल्या कामात मग्न. घरं लहान आणि दाटीवाटीने असली तरी घराघरात आवश्यक ते सारं सामानसुमान आहे. शौचालयं वगैरे अपुरी आहेत. पण नैरोबीच्या वस्त्यांसारखी बकाली इथे नाही.
स्वतः कृष्णा आणि त्याच्या स्टाफमधले सगळेच सांगत होते की गेल्या पंधरा वर्षांत धारावी खूप बदललीये. घरोघरी एकाहून अधिक कमावणारे लोक आहेत. आता मुलांना शाळेत घाला – असं कुणाला सांगावं लागत नाही. ते म्हणत होते, बघा की… आम्ही सगळेजण धारावीचीच प्रॉडक्ट्स आहोत. अगदी पटलंच त्यांचं म्हणणं. नैरोबीत पैसे मागणारी मुलं होती. इथे मुलं शाळेत जातात, क्लासेसना जातात आणि कामही करतात. एक छोटी आमच्यासोबत रेंगाळली होती. ऑस्ट्रिलियन मुलीने तिला फोटो काढू का विचारलं. त्यावर तिने नकार देत गोड स्वरात उत्तर दिलं, “मेरे मम्मी ने नही बोला है..”
कॉम्रेड राजू कोरडे हा माझा पूर्वपरिचित. धारावीत वाढलेला. आता ज्येष्ठ कार्यकर्ता, शेतकरी कामकरी पक्षाचा चिटणीस आणि लोकांच्या प्रश्नांचा जाणकार. मुख्य म्हणजे मोकळ्या विचारांचा, बदलत्या काळाशी स्वतःला जोडून घेणारा. त्याचं म्हणणं – या टुरिझमने धारावीचं काहीच नुकसान नाही. सायन – म्हणजे शीव. हीच जुन्या मुंबईची शीव, सीमा होती. आणि महाराष्ट्रातून मुंबईत आलेल्या स्थलांतरितांनी या शिवेपाशी वस्ती थाटली. पूर्वी ही मुंबईबाहेरची वस्ती होती. पण आता मुंबई इतकी वाढलीये की ही वस्ती भर शहरात आली. भारतभरातले लोक इथे आहेत. प्रचंड उत्पादन इथे होतं. सगळे असंघटित उद्योग इथे चालतात. मुंबईच्या आर्थिक वाढीत धारावीचं मोठं योगदान आहे. मुंबईत येणार्या पर्यटकांना याची जाणीव करून द्यायलाच हवी. त्याने मला धारावी पुनर्विकास आराखडा दाखवला. हा वास्तवात येईल तेव्हा ही उद्योगनगरी दिमाखात उभी राहील.
तेव्हा, प्रवास करताना निसर्गासोबत माणसंही अवश्य बघावीत. आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांना भेटण्यासाठी हा निराळा स्लम टुरिझमचा अनुभवही घेण्यासारखा आहे. मुख्य म्हणजे ‘बाहेरून’ या वस्त्यांना नाक मुरडू नयेत. इथे रिकामटेकडे लोक राहातात असं समजू नये. ही, दिवसातले अठरावीस तास राबून भुकेल्या पोटी झोपणारी माणसंदेखील शहराला जगवत असतात. शहरं वेगाने धावतायत. या वस्त्या आपल्या धावणार्या शहरांचं वंगण आहेत.
मेधा कुळकर्णी
इ-मेल – kulmedha@gmail.com
निवृत्तीउत्तर आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहे. आकाशवाणी आणि संपर्क संस्थेद्वारे केलेल्या कामाच्या अनुभवाने समृद्ध आहे. आसपासच्या तरूणांच्या नवनिर्मितीविषयी कुतूहल आणि नवा काळ समजून घेण्याची आस्था आहे.
छान मस्तच झालाय लेख
LikeLike
Chan zalay lekh..shevstcha paricched tar saglyvarati kalas
LikeLike
Lekh sarvarthani mahitipurna,ani uttam ahe. Koutuk karave title thodech.
LikeLike
I miss this tour,but this article is very easy to understand what exactly you want to say
LikeLike
स्लमकडे बघण्याचा दृष्टिकोन असाही असू शकतो…!
मस्त लेख…
LikeLike
अतिशय सुंदर लेख मेधा ताई !
स्लम टुरिझम कन्सेप्ट फारच वेगळा वाटला, अश्या ठिकाणी जाऊन काय पहायचं ??? असंच वाटत होतं, त्यामुळे लेखात के असेल याची थोडी कल्पना आली होती…पण काही गोष्टी कल्पनेहून भयानक वाटल्या आणि सुरवातीला आतून फार कालवाकालव झाल्यासारखं वाटलं…
तसंच धारावी बद्दल मनात वेगळंच चित्र होतं, त्याची एक वेगळीही बाजू आहे हे या लेखातून समजलं, तिथे रिकामटेकडी नाहीत तर कष्टाने जगणारी लोकं राहतात हे वाचून मनोमन आनंद झाला.
फार सुंदर आणि मुद्देसुद मांडलं असल्याने मनाला भावलेलं लिखाण 😊👍
LikeLike
फार छान प्रकारे लिहिलं आहेस मेधा. अशा टूर्स नी मदत होऊ शकते या कल्पनेच्या प्रणेत्याला सलाम करावासा वाटला. नुसती हळहळ किंवा करूणा यापेक्षा वास्तवाची जाणीव आणि त्यातून येणारं समाजभान देणाऱ्या या टूर्स. तू लिहिलंही आहेस प्रभावी. एका चांगल्या लेखासाठी आणि प्रवासी अंकाला हाही angle देण्यासाठी धन्यवाद!
LikeLike