माझी मुंबई

श्रद्धा बेलसरे -खारकर

मला लहानपणी मुंबईचे फार अप्रूप वाटायचे, नातेवाईकातले कुणी मुंबईला जाऊन आले की त्यांनी सांगितलेल्या मुंबईच्या गर्दीच्या, तिथल्या लोकांच्या स्मार्टपणाच्या कथा मोठ्या भक्तिभावाने आम्ही ऐकायचो. तसे हे प्रसंग खूप काही नसत कारण त्या काळी, म्हणजे १९८५ पर्यंत, आम्हा मराठवाड्यातील लोकांना जवळचे वाटायचे ते हैद्राबाद. महत्वाची खरेदी करायची असेल तर लोक हैद्राबादला जात. मराठवाडा अनेक वर्षे निझामी राजवटीत राहिलेला असल्यामुळे हैद्राबादी भाषेबरोबरच राहण्या-जेवण्याच्या सवयीही हैद्राबादशी मिळत्याजुळत्या होत्या. माझे वडील, अनेक वर्षे जानेवारीत हैद्राबादमध्ये लागणा-या ‘नुमाईश’ म्हणजे प्रदर्शनातून आमचे वर्षभराचे कापड खरेदी करीत. त्यामुळे मुंबईला जायचे प्रसंग फार कमी असत.

मी मुंबई प्रथम बघितली ती नववीत असताना, एका लग्नाच्या निमित्ताने! पुढे शासकीय नोकरीत आल्यावर मात्र या न त्या कारणाने मंत्रालयात चकरा होऊ लागल्या. पण इथली गर्दी, सारख्या अंगाला येणा-या घामाच्या धारा, राहत्या जागेच्या अडचणी, यामुळे मुंबईत कधी रहावेसे वाटले नाही. आपल्याला मुंबईत राहावे लागेल असा तर विचारही मनाला शिवला नाही. परंतु ‘कायम दुष्काळी’ प्रदेशातून आलेली असल्यामुळे की काय, समुद्र मला कायमच साद घालायचा. परतायची कितीही घाई असली तरी मी मुंबई भेटीत मंत्रालयाजवळच्या समुद्राचे दर्शन घेऊनच यायची. त्या अथांग जलनिधीचे दर्शन झाल्यावर मन आणि डोळे कसे शांत, तृप्त होत असत. त्यावेळी मात्र या समुद्र असलेल्या गावाशी आपले काहीतरी जन्मोजन्मीचे नाते आहे असे सतत वाटत रहायचे.

माझे सगळे शिक्षण मराठवाड्यात झाले. वडीलांची बदलीची नोकरी असल्याने परभणी जिल्ह्यातील वसमत, परतूर, जिंतूर या तालुक्याच्या ठिकाणी मी राहिले. मग औरंगाबादला  आले. तेव्हा आम्हाला औरंगाबाद हे  फार मोठे शहर वाटायचे.  खरा जीव रमला तो औरंगाबादेत. साहित्य, संस्कृती, प्रशासकीय वर्तुळ  यात चांगली उठबस होती. दिवस खूप छान आणि मजेचे होते. हे चारी बाजूच्या डोंगरांनी वेढलेले बशीच्या आकाराचे शहर मला प्राणप्रिय वाटत आले होते.

एक दिवस श्रीनिवासचा  मुंबईहून अचानक फोन आला. तो ‘राजभवन’मध्ये मुलाखतीसाठी गेला होता आणि त्याची तिथे राज्यपालांचा ‘विशेष कार्य अधिकारी’ म्हणून नियुक्ती झाली होती.  तो नाशिक सोडून मुंबईत रुजू झाला. मध्यंतरीच्या २ महिन्याच्या काळात खूपच घटना वेगाने घडत गेल्या. माझ्या सास-यांना अर्धांगवायुचा झटका आला. त्यांना दवाखान्यात ठेवावे लागले.  माझ्या  पोटातले फायब्रॉईड वाढल्यामुळे पोटात सतत तीव्र वेदना सुरु असत. मी खूप आजारी पडले. माझ्या सास-यांची तब्बेत पाहायला आणि मलाही धीर द्यायला म्हणून माझे वडील नाशिकला आले आणि अवघ्या ८ दिवसात त्यांना हृद्यविकाराचा झटका येऊन ते जागीच कोसळले. मी त्यांच्या शेजारीच उभी होते. त्यांना घोटभर पाणी पाजले. डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर इंदुमती माठा लगेच आल्या. पण त्या म्हणाल्या २० मिनिटापुर्वीच मृत्यू झालेला आहे. माझे सारे भावविश्व कोसळले.  अशातच माझे स्वत:चे मोठे ऑपरेशन करावे लागले. मी त्यातून कशीबशी सावरत असतानाच मायबाप सरकारने माझी मुंबईला  बदली केली.

तशा स्थितीत माझी मुंबईला येण्याची मानसिक तयारी अजिबात नव्हती. पण नाईलाज  झाला.  मोठ्या विचित्र मनस्थितीत मी मुंबईला आले. राहण्यासाठी  वाळकेश्वरला  राजभवनमध्ये मोठे घर मिळाले होते. घराचे नाव होते ‘बीच बंगलो’.  पूर्वी इथे महाराष्ट्राचे मुख्य सचिव राहत असत. राजभवनाच्या मुख्य  गेटपासून साधारण एक दीड किलोमीटर अंतरावर आमचे हे घर होते. मी १०८ नंबरच्या बसने मंत्रालयात जात असे. सकाळी थोडा उत्साह असायचा पण संध्याकाळी घरी परतताना खूप थकल्यासारखे होऊन जायचे. बसस्टँडपासून घरी पोचायला अर्धा  तास लागत असे. ते दिवस उन्हाळ्याचे  होते.  खूप घामघाम व्हायचा. सारखे रुमालाने तोंड पुसावे लागले.  मी आमच्या मराठवाड्याच्या रुक्ष भूमीतून आले होते.  मला तो घामघाम करणारा उन्हाळा असह्य व्हायचा पण राजभवनाच्या  गेटमधून आत शिरल्यावर सर्व थकवा क्षणार्धात निघून जायचा.

संध्याकाळची वेळ. विशाल अरबी समुद्राचे दर्शन सुखद वाटायचे.  समुद्रावरून येणा-या ताज्या थंड वा-यामुळे मन प्रसन्न होत असे. मग मी रमतगमत जात असे.  आत गेल्यागेल्या राज्यपालांचे हेलिपॅड लागे. ते झाले की राज्यपालांच्या ऑफिसपुढचे एक मोठे कारंजे!  आजूबाजूला  मात्र घनदाट  जंगल होते. ऑफिसच्या बाजूला मोठ्या कलाकुसरीने विविधरंगी फुलांची झाडे कुंड्यात लावलेली होती,  शेकडो सुंदर फुले फुललेली असत. त्यांचे विविध रंग आणि गंधाने सगळे वातावरण प्रफुल्लीत होई.  कारंज्याला वळसा घातला कि माझ्या  घराकडे जाणारी एक नागमोडी वाट लागे.  एका बाजूला  गर्द झाडी आणि दुस-या बाजूला  विशाल सागर.  रस्त्याच्या  बाजूला  मोठी उंचचउंच गुंजांची झाडे होती. कपाळी काळा टिळा लावलेल्या लालधमक  गुंजांचा सडा पडलेला असे.  मला आधी वाटले की इथे कुणीतरी तारीख उलटून गेलेल्या औषधी गोळ्या फेकून दिल्या असाव्यात. कारण आमच्याकडच्या  गुंजा आकाराने छोट्या असतात.  ह्या तर खूपच मोठ्या होत्या. रस्त्यावरून जाताना कधीकधी मोठे मोठे सापही दिसत.  भीती वाटायची.  प्रत्येक १०० फुटावर पोलिसांच्या चौक्या असत. त्यांच्या उपस्थितीमुळे भीती जरा कमी व्हायची.  झाडी इतकी होती की अंधारून आलेले असायचे.  साप हटकून भेटत असल्याने मी स्वत:च्याच चपलांचा मोठा आवाज करत चालत असे.

आम्हाला निवास म्हणून दिलेले घर हा युरोपियन शैलीने बांधलेला एक प्रचंड बंगला होता. दरवाजा उघडला की लाकडी गोल जिना होता. तो चढून वर गेले की प्रशस्त ऐसपैस घर होते. छताची उंची तर २० फुटाहूनही जास्त होती त्यामुळे तिथे १० फूट उंच पाईप लावून लावलेल्या पंख्याचे वारे फारसे अंगाला लागत नसे. पण खिडकीतून मात्र सुंदर समुद्र दिसे आणि दिवसभर वा-याच्या मंद झुळका सुरु असत. व्हरांड्याला पार्टिशन टाकून एक अधिकची खोली बनवली होती. तिचीच मी बेडरूम केली. समोरच्या झाडावर दोन मोर राहत होते. वेळी अवेळी ते केकारव करीत असत. खूपच विलोभनीय दृश्य असे ते. रात्री बेरात्री झोपेतून मला घाबरून जाग येई काहीतरी वेगळे आहे असे जाणवे. कसलातरी नादमय आवाज येत असे. नंतर लक्षात आले तो आवाज म्हणजे समुद्राची गाज होती. हळूहळू त्या समुद्रगाजेची तनामनाला सवय होऊन गेली.

तेव्हा मी मंत्रालयात माहिती खात्याच्या प्रकाशन विभागात रुजू झाले होते. विविध सरकारी योजनांवर छोट्यामोठ्या पुस्तिका काढण्याचे काम माझ्याकडे होते. मंत्रालयासमोरच्या नवीन प्रशसकीय भवनांच्या १७ व्या मजल्यावर माझे ऑफिस  होते. इथल्याही खिडकीतून नरीमन पोइंटच्या विशाल समुद्राचे दर्शन होत असे. मंत्रालयाची कार्यपद्धती आमच्या माहिती विभागाच्या जिल्हा कार्यालयापेक्षा वेगळी होती. धुळे आणि नाशिकला छोटे का होईना १०-१२ लोकांचे माझे स्वतंत्र ऑफिस होते. इथे मात्र अनेक वरिष्ठांच्याबरोबर काम करावे लागे. त्यामुळे कामात स्वत: एखादा निर्णय घेऊन, तो पूर्ण करून, काही विशेष करून दाखवायची संधी आणि मजा नव्हती.

मुंबईत आल्यावर आयुष्यात पहिल्यांदा, ३६व्या वर्षी, घड्याळाचे काटे वाचण्याचे समजले. आमच्याकडे,  औरंगाबादला  ४ नंतर सरळ साडेचार वाजायचे आणि नंतर ५ साडेपाच वाजत. फारच कोणी काटेकोर असेल तर सव्वापाच. पण मुंबईत आल्यावर प्रथमच ‘चार त्रेपन’, ‘आठ बावन्न’, ‘तीन एक्केचाळीस’ अशा विचित्र वेळा असतात हे समजले. दुसरा एका त्रास मला झाला तो अनोळखी गर्दीचा! इथे प्रत्येक जण आपापल्या तंद्रीत आणि जणू काही वाघ मागे लागला आहे अशा घाईत पळत असतो. कोणी कोणाला ओळख दाखवत नाही. वर्षानुवर्षे एका इमारतीत राहाणारे लोक एकमेकांना ओळखत नाहीत ही गोष्ट माझ्यासाठी फार भयानक होती. कारण मी राहिलेल्या बहुतेक गावांमध्ये बहुसंख्य लोक एकमेकांना ओळखणारेच असत. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, परिचित हे तर सोडाच, पण आजूबाजूचे दुकानदारही ओळखीचे असत. इथे मात्र सगळेच जण को-या चेहऱ्याने वावरत. मी नेहमीच्या सवयीप्रमाणे दुकानात गेले की अघळपघळ हसत बोलायचे. माझ्याकडे लोक विचित्र नजरेने बघत. कधीकधी चुकूनमाकून ऑफिसमधला एखादा सहकारी किंवा कुणाशी महत्वाचे बोलत असताना अचानक अर्धे वाक्य तोडून, ‘चल मला ५.५३ मिळायला पाहिजे.’ असे म्हणून चालायला लागायचा. कसेतरीच वाटायचे ते ! पुढे अनेक वर्षानी समजले की आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या गप्पांपेक्षा त्याची ५.५३ची ट्रेन हुकणे खरेच किती त्रासदायक ठरायचे ! हळूहळू मी मुंबईत रुळू लगले. कोणी फटकन निघून गेले तर वाईट वाटेनासे  झाले. पण मनामध्ये हटकून मराठवाड्याची आस मात्र लागलेली रहायची.

राजभवनमध्ये गेल्यावर मी आजूबाजूच्या इन मीन तीन शेजा-यांना सवयीप्रमाणे भेटून आले. त्यातही एक नागपूरचा मुलगा होता. दुसरे दोन पक्के मुंबईकर  होते.  त्यांच्याशी थोडाफार संवाद होई. तसे बरे चालले होते  पण ऐसपैस  गप्पा मारावे असे कुणी नव्हते. श्रीनिवासच्या कामाची वेळ सकाळी ९ ते १ आणि दुपारी २.३० ते ५.३० असे. संध्याकाळी राज्यपाल बहुदा बाहेरच्या एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जात. त्यामुळे श्रीनिवासही उशिरा घरी येत असे. अनेकदा रात्रीचे १० किंवा ११ ही वाजत. ओहोटीच्या  वेळी वारा पडला की घरात फार घुसमट व्हायची. मी उदासपणे संध्याकाळी घरी एकटीच बसत असे. सोबतीला फक्त समुद्राची गाज होती.  शेजारी एस.आर.पी. पोलिसांची बटालियन असायची मी कधीकधी त्या पोलिसांशी  बोलायचे.  पण मग लक्षात आले की मी त्या कॉन्स्टेबल लोकांशी बोललेले त्यांच्या वरिष्ठ  अधिका-यांना आवडायचे नाही.

काही दिवसांनी आम्हाला गेटजवळ ‘नीर-वंदन’ या इमारतीतले घर मिळाले.  हे घर फार छान होते.  येथून समोर हेलीपॅड आणि त्यासमोर राजभवनाची मंत्र्यांच्या शपथविधीसाठी प्रसिद्ध असणारी हिरवळ होती. त्यापलीकडे पुन्हा अफाट समुद्र ! इथे साधारण ४०० लोक काम करीत असत. छोट्या गावात जसे बारा बलुतेदार असतात तसे सर्व सेवा देणारे लोक इथे होते.  प्रत्येक अधिका-याला त्यांच्याकडे काम करण्यासाठी एक मोलकरीण असे. या मोलकरणीलाही सरकारी क्वार्टर मिळायचे. काही लोकांना हमालही मिळत. अगदी नावाप्रमाणे राजयोग होता. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल होते डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर! त्यांच्या नावाचा फार दबदबा होता. त्यांनी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधीबरोबर काम केले होते. अफाट बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन कौशल्य आणि अभिजात वकृत्व असा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात होता.

एकदा त्यांच्या वाढदिवसाला इतर लोकांबरोबर मीही त्यांना शुभेच्छा द्यायला गेले. इथे प्रोटोकॉलला फार महत्व असते असे मला सांगण्यात आले होते -मोठ्या  आवाजात बोलायचे नाही, हातवारे करायचे नाहीत वगैरे,वगैरे ! आधीच पंतप्रधानांचा सेक्रेटरी राहिलेल्या माणसाला भेटायचे त्यात ह्या दबक्या आवाजात दिलेल्या सूचना त्यामुळे मी मनातून घाबरून गेलेली होते.  सर्वांनी दिला तसा मीही गुलाबाच्या फुलांचा गुच्छ राज्यपाल महोदयांना दिला.  ‘हॅपी बर्थडे,  सर.’ असे पुटपुटले. ती त्यांची माझी पहिलीच भेट होती. श्रीनिवासने परिचय करून दिला. त्यांनी विचारले, ‘तुम्ही काय करता?’ त्यावर मी सांगितले, ‘मी उपमुख्यमंत्र्यांची पी.आर.ओ. आहे.’  त्यांनी शेकहँडसाठी हात पुढे गेला. मी संकोचून तशीच उभी होते. आपण राज्यपालांशी सरळ हस्तांदोलन करणे प्रोटोकॉलमध्ये बसते की नाही, कळत नव्हते. राज्यपाल म्हणाले, ‘यंग लेडी, लेट अस शेक हँडस !’ मी कसनुसे हसत शेकहँड केला.

त्यानंतर अनेक प्रसंगात त्यांच्या भेटी होत असत. त्यांनी दिलेल्या पार्टीच्या  वेळी कधी ते राजभवनच्या अधिका-यांना लोकांमध्ये मिसळायला सांगत. मेजवानीला आमंत्रित केलेल्या  पाहुण्यापैकी कुणाला एकटे वाटू नये असा त्यांचा कटाक्ष होता. माझ्यासाठी हा वेगळाच अनुभव होता. अशा प्रकारच्या  पार्ट्या  यापूर्वी मी कधी बघितलेल्या  नव्हत्या. मला देशविदेशातील लोकांना भेटण्याचे अप्रूप वाटायचे.

बेस्टच्या १०८ नंबरच्या  बसने उतरले की वाळकेश्वरला बसस्टॉपसमोर अनेक भाजीवाल्या बसलेल्या असत मी त्याच्याकडून भाजी, फळे खरेदी करत असे.  पुष्कळ वेळा ओझे जास्त झाले तर मी माझ्याकडे काम करणा-या बाईला भाजी आणायला पाठवत असे.  त्या बायका मला चांगल्या ओळखू लागल्या. एका बाईकडे एक छोटे दोनअडीच वर्षाचे मूल होते. मी त्याला खाऊ देत असे. तेही जाता येत ओळखीचे हसू देत असे. नकळत माझा जीव त्या मुलात गुंतला. रोज भेटण्याचा लळा  लागला होता. काही दिवसांनी ते मूल अचानक दिसेनासे झाले. मी विचारले तर ती बाई तुटक उत्तर देऊ लागली.

एक दिवस बस न मिळाल्यामुळे मी टॅक्सीतून येत होते. गाडी सिग्नलवर थांबली. एक भिकारीण भिक मागत होती.  तिच्या कडेवर एक मूल होते. मूल सारखे रडत होते. मी सहज बघितले. अरे हा तर त्या भाजीवालीचा  मुलगा होता! त्याच्या अंगातला शर्ट माझ्या ओळखीचा होता. मुलाची आणि माझी नजरानजर झाल्यावर त्याने माझ्याकडे झेप घेतली. मग मी त्या बाईला, ‘मूल कुणाचे?’ असे विचारले. तर ती, ‘तुमको क्या करनेका?’ असे उलट उत्तर देवून झपाझप चालू लागली. मी तिला थांबवून आवाज चढवला. तिला पोलिसांची भीती दाखविल्यावर कळले की खुद्द भाजीवालीनेच आपले मूल त्या भिकारणीला  ‘भीक मागायला’ भाड्याने दिले होते. मला काही ते पटेना. तिला पोलिसातल्या तक्रारीच्या भीतीने मी सरळ केले आणि तो मुलगा व भिकारीण यांना घेऊन वाळकेश्वरला आले. स्वत: मूल आईच्या ताब्यात दिले. माझ्यासाठी हा मोठा मानसिक धक्का होता. कारण अशा गोष्टी कानावर पडलेल्या असतात पण ख-या वाटत नसतात. मूल भाड्याने देणे हे मी आयुष्यात प्रथमच बघत होते. मुंबईत येण्यापूर्वी धुळे येथे आदिवासी लोक बघितले होते. पावसापाण्यात चालताना मोठ्या माणसाबरोबर २/३ वर्षांची मुलेसुद्धा आईबापाबरोबर पायी अनवाणी चालतात. मात्र बकरीची नवजात पिल्ले आदिवासी बाईच्या कडेवर असतात. पण मुंबईतील हा विचित्रपणा प्रथमच पाहत होते.

इथे येण्यापूर्वी मी नाशिक आणि धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करीत होते. माझे छोटे का होईना स्वतंत्र आफिस होते. ७-१० लोकांचा स्टाफ होता. माझ्यासाठी जीप होती. माझ्या ऑफिसचे निर्णय मी स्वत: घ्यायची. ड्रायव्हर सतत बरोबर असे कारण जिल्ह्यात कुठेही दौ-यावर जावे लागे. कधी सरकारी विश्रामगृहात राहावे लागे. कधीकधी सरकारी विश्रांतीगृह अगदी गावाबाहेर असायचे. अनेकदा भीती वाटायची. त्यावेळी आमचे मोरेदादा नावाचे वाहनचालक मी न सांगता म्हणायचे, ‘मॅडम, काळजी नका करू, मी इथे जवळच आहे.’ तो माझ्या रुमच्या बाहेर  गादी टाकून दरवाज्याजवळ झोपायचा.  इथे मंत्रालयात आल्यावर मात्र सब घोडे बारा टक्के! सगळेच  ‘सहायक’  बनलेले असतात. आमचे खाते तर कायम मुख्यमंत्र्यांकडे असते. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना १० लोकांकडून फाईल फिरत जाते आणि तशीच परत येते.  आधीआधी याचा खूप त्रास झाला.  मग सवय होत गेली.  माझ्या  खात्यातील ४ वरिष्ठ अधिकारी, ४० सचिव, ४० मंत्री, एक मुख्यमंत्री, एक राज्यपाल आणि २०० पत्रकारांबरोबर तारेवरची कसरत करीत काम करावे लागे. मंत्रालयाची कार्यपद्धती फार वेगळी आहे.  इथे प्रत्येक  गोष्टीचा निर्णय कागदावर व्हावा लागतो. साधी एक दिवसाची रजा  घ्यायची असेल तर तीन लोकांची मंजुरी घ्यावी लागते.

मी नव्याने रुजू झाले. आमचा ४-५ अधिका-यांचा एक ग्रुप  तयार झाला.  माझ्या तडकफडक  स्वभावामुळे ते लोक मला सौदामिनी म्हणत. एक दिवशी बराच उशीर झाला.  मी म्हटले, ‘चला माझ्या घरी जेवायला’.  ‘का? आज काय पूजा आहे का?’ त्यांनी विचारले. मी म्हटले, ‘काही विशेष काही.’ आम्ही घरी गेलो. माझ्या बाईने उत्तम स्वयंपाक  तयार केला होता. सगळेजण मस्त गप्पा मारीत जेवलो.  नंतरच्या गप्पांत कळाले या लोकांनी २०-२५ वर्षे बरोबर काम केले होते पण कुणी कुणाच्या घरी गेलेले नव्हते. त्यामुळे माझ्या सरळ  घरी बोलावण्याचे त्यांना आश्चर्य वाटलेले होते. ऑफिसमध्ये लॉबिंग चाले. तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये सामील नसला तर मात्र तुमचे काही खरे नसते. मी कोणत्याच कोंडाळ्यात सामील होत नाही असे कळल्यावर बदनामी करण्याचाही प्रयत्न झाला. पण मी पुरून उरले. मग माझी बदली उपमुख्यमंत्री कार्यालयात केली.

तिथले दिवस खूप त्रासाचे आणि तणावाचे होते. कारण आमचे साहेब कधीच वेळ पाळत नसत. साधारण रेल्वे जशी २ तास ४ तास लेट धावते तसे आमचे साहेब साधारण ४ तास लेट असत. त्यांचे दिवसाचे कार्यक्रम किमान ४ ते कमाल १० वेळेस बदलत असत.  प्रत्येक कार्यक्रमासाठी  घाईघाईत भाषण लिहून द्यायचे असे. संदर्भग्रंथ  बघण्यासाठी किंवा वृत्तपत्रीय टिपणे काढण्यासाठी मुळीच वेळ मिळत नसे. मग स्वत:चे वृत्तपत्रवाचन, अवांतर वाचन आणि आठवणीतील ज्ञानावरच सगळा भर ठेवणे भाग पडे. माहिती खात्यात काम करताना खूप तणावाचा सामना करावा लागतो.  पण महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी तुमचा कस लागतो. विविध क्षेत्रातील नामवंत लोकांशी परिचय होतो. चांगली माणसे भेटतात. मी तर नेहमी संवादाची भुकेली होते. त्यामुळे माझे काम मला नेहमी आपोआप आवडायचे.

पुढे मला राज्य निवडणूक आयोग आणि एसटी महामंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करता आले.

विविध मुख्यमंत्र्यांचे शपथविधी बघितले तसेच २६/११चा पूर आणि दहशती हल्ला बघितला. आपत्कालीन परिस्थितीत रात्री बेरात्री आफिसमध्ये जाऊन काम केले.  माहिती खाते हे नेहमी २४/७ चालत असते. सुटीच्या दिवशीही आमचे काम सुरूच असते. इथे रोज काही तरी वेगळे घडत असते. त्यामुळे कायम ताजेपणा अनुभवायला मिळाला. मंत्रालयात  २० वर्षे काम केल्याने अनुभवात समृद्धी आली. विविध मुख्यमंत्र्यांचे शपथविधी बघितले तसेच २६ जुलैचा पूर आणि २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला बघितला. आपत्कालीन परिस्थितीत रात्री बेरात्री ऑफिसमध्ये जाऊन काम केले. माहिती खाते हे नेहमी २४/७ चालत असते. सुटीच्या दिवशीही आमचे काम सुरूच असते. इथे रोज काही तरी वेगळे घडत असते. त्यामुळे कायम ताजेपणा अनुभवायला मिळाला.

मुंबईत आल्यावर मला नेहमीच उत्तम  घरे मिळाली.  पहिले घर राजभवनमधील ‘बीच बंगलो’ मग तिथेच दुसरे ‘नीर-वंदन’.  मग वरळी येथे ‘धनवटे निवास’ आणि ‘दर्शना’ आणि शेवटी चर्चगेटचे ‘तुषार’. ‘तुषार’ हे शासकीय निवासस्थान एक नितांत सुंदर घर होते. अगदी ऐसपैस. पाचही खोल्यांमधून समुद्र दिसत असे. १० व्या मजल्यावर असल्याने घरात कायम वारा येत राहायचा. खालच्या रस्तावर दुतर्फा मोठी झाडी होती.  ही झाडे तब्बल तीनचार  मजल्यापर्यंत उंच वाढलेली होती. खिडकीतून खाली बघितले की वाटायचे खाली हिरवागार गालिचा अंथरलेला आहे.

मराठवाड्यातून मुंबईला  स्थायिक होणे, इथल्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक,  जीवनात टिकणे फार अवघड असते.  कधीकधी ते मला जिकीरीचेही  गेले. ऑफिसमधल्या राजकारणाचा  बराच त्रास झाला. पण या शहराची  मोहिनी अजूनही आहे. या शहराने मला पायाखालची वाळू कशी सरकते  हे दाखवून दिले आणि त्याचवेळी या वाळूत पाय घट्ट रोवून कसे उभे राहायचे तेही शिकवले. जगण्याला नवा आयाम दिला. उडण्याची  आकांक्षा दिली आणि पंखात बळही दिले. माझ्या मराठवाड्याने कितीही वर गेलो तरी जमीन आपली आहे आणि तिला धरून राहिले पाहिजे हा संस्कार दिला. मुंबई अनेकांची असते तशी माझीही स्वप्ननगरी होती.  मला या  शहराने माझी स्वत:ची ओळख दिली.  इथल्या सागराने मला सर्व काही सामावून घेण्याची वृत्ती दिली. गर्दीने आपण फार कुणी मोठे नसतो त्यामुळे कधीही आणि कसलाही गर्व सोडून जमिनीवर राहायला  शिकवले.  टोकाचे दारिद्र्य  बघितले तसे टोकाची श्रीमंतीही दाखवली. राजकारणाचे क्षणोक्षणी  बदलणारे चेहरे बघितले. खरे तर माझ्यामधल्या मराठवाड्यातल्या मुलीसाठी हे सगळे खूपच जास्त होते. औरंगाबाद ते परभणी, मग धुळे, मग नाशिक आणि शेवटी मुंबईतही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्यात राहायला मिळाले. खूप अनुभवून झाले. हे स्थलांतर केवळ भौगोलिक नव्हते, ते सांस्कृतिक होते, सामाजिक होते, मानसिकही होते !

इथे सर्व भाषा बोलल्या जातात. मराठीचीही गंमत आहे.  मी आलेली मी गेलेली, असे माझी सहकारी म्हणायची पण मी यायलीस का ? काय करायलीस असे म्हटले की त्या हसायच्या मग आम्ही मराठवाडा ग्रुप  करून खास मराठवाडी भाषेत बोलायचो. खूप मजा यायची .

मागे वळून बघताना मला मनापासून पटले आहे की कोणतेही स्थलांतर नेहमी आपल्या चांगल्यासाठीच होत असते. ते आनंदाने स्वीकारण्यात अनेक फायदे असतात. शेवटी काय तर आपले अनुभवविश्व व्यापक होणे, आपल्या जाणीवेच्या  कक्षा रुंदावणे, समाजाची वेगवेळी रूपे पाहायला मिळणे त्यातून आपण शिकणे हीच तर खरी प्रगती असते. शिवाय सगळा भोवताल बदलत असताना आपणही आतून बदलत नसतो का? स्थितीशीलता सुरक्षित वाटली तरी ती हमखास प्रगती थांबविते. स्थलांतर नेहमीच प्रगती शक्य करते. आणि तसे पाहिले तर आपण कायम स्थलांतरच करीत नसतो का? गावाकडचे छोटेसे घर, सगळे सवंगडी माहीत असलेली लहानपणची चिमुकली शाळा, कॉलेज, मग नोकरीसाठी स्वीकारलेले दुसरे गाव, मग बदलीमुळे आणखी तिसरेच गाव !पण आता मुंबई सोडवत नाही. समुद्र असलेल्या या गावाशी काहीतरी माझे नाते आहे हे नक्कीच .

श्रद्धा बेलसरे -खारकर

19225719_10213015099881081_3864544082318005438_n

इ-मेल – shraddhabelsaray@yahoo.com

One thought on “माझी मुंबई

  1. सहज साधं, ओघवतं आणि प्रामाणिक लिहिलं आहे. खूपच आवडले.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s