माझ्या  युरोप  प्रवासाची नांदी – सेविल

राजस साने

मी ‘सेविल’चा  प्रवास  जरी  ह्या  मे  महिन्यात  केला  असला  तरी  त्याची  नांदी  मात्र  दोन  वर्षांपूर्वीच  झाली  होती. उच्च  शिक्षणासाठी  आयर्लंडमध्ये  आल्यावर ‘मे टाईम  ४५,  कॉर्क’  हे  घर  बघायला  गेलो,  तेव्हा  मोहॉक  फॅशनचे  केस  आणि  हातावर  एक  मोठ्ठा  टॅटू  असलेला  मुलगा  किचनमध्ये  नाश्ता  करत  होता. यथावकाश  ह्या ‘गिये’ / ‘गिजे’ / ‘गिजलेरीअल’  अशा  नावाच्या  स्पॅनिश  मुलाशी ओळख,  मैत्री  अशा  टप्प्यावरून  प्रवास  करताना  त्याचा  डीजे  कधी  झाला  कळलंच नाही. हे  नाव  सोप्पं  होतं, आमच्या  मैत्रीसारखंच  सुटसुटीत. पुढचे  आठ  महिने आम्ही  मायमराठी  आणि  स्पॅनिश मावशीची  एकमेकांना  ओळख  करून  देत  होतो. सैन्य  पोटावर  चालतं  तशी  मैत्रीपण  चवीपरींनी  घट्ट  होत  असावी  बहुतेक. माझ्या  पोहे, पोळीभाजीची  जोडी  त्याच्या  पाएया,  पास्ताशी  घट्ट  जमूनच  गेली.

माझ्या  युरोप  प्रवासाचं बीज  या  मित्राने  माझ्या  मनात  रुजवलं. इतकंच  नाही  तर त्याच्या  नजरेतून  भारताकडे बघताना आपल्याच संस्कृतीची एक वेगळीच ओळख मला झाली. आम्ही आपापल्या देशाबद्दल इतक्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या की त्याला भारतात आणि मला स्पेनला जाण्याची प्रचंड ओढ लागली.

मे महिन्यात माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी स्पेनमधल्या ‘मलागा’ विमानतळावर उतरलो.

युरोपच्या दक्षिणेला असणारा स्पेन हा तसा गरीब देश. डीजे राहतो ते सेविल किंवा सेविया ही स्पेनच्या ‘आन्दालुसिया’ या दक्षिण प्रांताची राजधानी. कडक ऊन आणि जेमतेम पाऊस असं वातावरण असणारा हा प्रांत शेतीसाठी प्रसिद्ध आहे. मालागाहून सेविलला जातानाही धान्य पिकं, ऑलिव्हज, सूर्यफुलं यांची बरीच शेती दिसते. मधूनच काही विनयार्ड डोकं वर काढतात. डीजेने सांगितलं की इथे सूर्यफुलाचं पीक फक्त त्याच्या बियांसाठी घेतात आणि फुलं निर्यात करतात. बियांचा उपयोग खाण्यासाठीच जास्त करून होतो. सध्या जैविक शेतीच्या वापरासाठी आन्दालुसिया खूप प्रसिद्ध आहे. पोर्क आणि बीफला अधिक मागणी असल्यामुळे पशुपालन हाही मुख्य व्यवसाय.

5
मुस्लिम वास्तूशैलीचा प्रभाव

सेविलचा इतिहास आणि संस्कृती यावर ग्रीक, रोमन, बायझेन्टाईन, ज्यू, ख्रिस्ती, मुस्लीम अशा अनेक संस्कृतींचा प्रभाव आहे. बरीच वर्ष सेविल अलमोहद राजवटीखाली असल्याने इथल्या इमारतींवर हा प्रभाव जास्त जाणवतो. सेविलचं कथिड्रल हा मुस्लिम वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. सेविलमध्ये काही ठिकाणी रोमन लोकांनी बांधलेल्या भिंती आणि पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या रचना जतन करून ठेवल्या आहेत.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील ‘सिन्योरिता’  हे सुंदर नृत्य आठवून पहा जरा !हे सुंदर ‘फ्लमेंको’ नृत्य ही सेविलची देणगी. टाळ्यांच्या ठेक्यावर पाय आपटून आणि भान हरपून नाचणाऱ्या सिन्योरितांना पाहिलं की आपले पाय पण आपोआप थिरकायला लागतात.

सेविलमध्ये जिप्सी लोकांची पण वस्ती आहे. अगदी गवताच्या काडीपासून ते कोणतीही क्षुल्लक वस्तू तुमच्या हातात टेकवून त्यासाठी पैसे मागणे हा त्यांचा आवडता उद्योग. त्यांच्या लबाडीचे अनेक किस्से डीजेने मला सांगितले व ‘कुणी काही द्यायला आलं तर हात मागे करून ठेव’ अशी सूचनाही दिली.

सेविल हा तसा स्पेनमधला गरीबप्रांत. बाकीचे स्पेनियार्ड सेवियानोस किंवा आन्दालुशियन लोकांकडे जराशा तुच्छतेनेच बघतात. खेडूताकडे बघावं तसं. अर्थात याचं मोठ्ठ कारण म्हणजे त्यांच्या भाषेचा लहजा. आन्दालुशियन स्पॅनिश हे थोडे अशुद्ध आणि गमतीशीर मानले जाते. पण तिथल्या लोकांना त्याचं फारसं वैषम्य वाटत नसावं. त्यातूनही एकंदरीतच स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकन लोकांच्या स्पॅनिश बोलण्याची टिंगल करतात. दक्षिण अमेरिकन लोक शंभर वर्षांपूर्वीचं स्पॅनिश वापरतात हा त्यांचा मुख्य दावा. पण त्यामुळे भाषेचा अभिमान उणावत नाही.

सेविलला पोहोचल्यावर या नव्याने झालेल्या जुन्या मित्राला भेटण्याच्या आनंदात त्याने कुरकुरत केलेला पास्ता खाण्याचा आनंद पण मिसळलेला होता. हा माझा आळशी मित्र कुरकुरला नसता तरच नवल होतं.

तो राहतो त्या भागाला ‘माकारेना’  म्हणतात. ते गाणं आठवतंय ना ‘ए माकारेना’,  त्यातलं माकारेना ते हेच. ह्या नावाचा उगम त्या भागात असलेल्या ‘लेडी ऑफ होप माकारेना’ ह्या बॅसिलीका आणि त्यातल्या त्याच नावाच्या मूर्तीशी आहे.

सेविलच्या या भागात  फिरताना उगीचच  गजबजलेल्या  मुंबईची  आठवण  मनात  डोकावून  गेली. हा  भाग  डीजेचा  लाडका  तर  त्याच्या  मैत्रिणीला  म्हणजे  रोसियोला  आवडतो  त्रियाना ! दोघांमध्ये  माकारेना  श्रेष्ठ  की  त्रियाना  ह्यावरून  अधनंमधनं  चकमकी  झडत  असतात. इथे  रोसियोबद्दल  थोडं  सांगायला  हवं. रोसियो,   डीजेची  मैत्रीण. आजच्या  भाषेत  गर्लफ्रेंड!! डीजे  आयर्लंडमध्ये  असताना  ती  जेव्हा  त्याला  भेटायला  आली  होती  तेव्हा  आमची  ओळख  झाली  आणि  मग  मैत्री. तिच  इंग्रजी  कच्चं  आणि  माझं  स्पॅनिश  शून्य  त्यामुळे  साहजिकच  डीजेला  आमच्या  दुभाष्याचं  काम  करावं  लागतं  होतं. गप्पा  मारताना  डीजेची  टिंगल  करण्याची  एकही  संधी  आम्ही  सोडली  नाही. स्वतःबद्दलच्या  टवाळकीचं भाषांतर करून बिचारा पार वैतागला होता. स्पेनमध्ये पण ह्याचीच पुनरावृत्ती झाली. रोसियो तिची परीक्षा संपवून आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटणार होती.

11
स्पॅनिश मित्रमंडळीबरोबर

सेविल शहरात रस्ते आखणी करताना सायकलींसाठी वेगळ्या लेन्सची व्यवस्था केली आहे. डीजेसाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की सुरूवातीला त्याच्या वडिलांनी सायकल लेनच्या मागणीसाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी लोकमत तयार केले. मोर्चे काढले. आता सेविल cycle friendly  शहर बनण्याच्या मार्गावर आहे. इतर शहरांमध्ये असणारं गाड्यांचं वाढतं प्रमाण पाहिलं की ही गोष्ट सुखावून जाते.

हे असं गल्ल्यांमधून सायकली दामटत बघत असताना सेविल किती जवळचं वाटत होतं. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा अगत्याचा पाहुणचार घेताना अगदी घरातलंच एक होऊन जावं,  काहीसं तसं.

मेट्रोपोल पॅरासोल हे सेविलच एक आधुनिक आकर्षण. पॅरासोल म्हणजे छत्री. एखाद्या छत्रीसारखा किंवा मश्रूमसारखा आकार असणारी ही वास्तू ही जगातील सर्वात मोठी लाकडी रचना म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सेविलचा बाजार भरत असे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला शहराची आखणी करत असताना ती बाजाराची इमारत पाडली. पण तरीही १९७३ पर्यंत इथे बाजार भरतच राहिला. १९७३ ते १९९० पर्यंत ही जागा ओसाड पडून होती.  पुढे १९९० मध्ये ह्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग करण्याचं ठरवलं. पण त्यासाठी खोदकाम करत असताना त्या जागी रोमन आणि अल-अंदालुस काळाचे अवशेष सापडले. मग ते बांधकाम थांबवून त्या जागी आजची मेट्रोपोलची वास्तू उभारली. याची रचना प्रसिद्ध जर्मन वास्तुरचनाकार यर्गन मेयर यांनी केली आहे. खोदकाम थांबल्यावर अनेक वर्षे ही जागा अशीच पडून होती पुढे २००५ मध्ये आजच्या पॅरासोलचे बांधकाम सुरू झाले. पण गंमत अशी की काम सुरू झाल्यावर काहीजणांना ते तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असण्याची शंका वाटली म्हणून परत एकदा ते तसच अर्धवट पडून राहिले. पुढे मग त्याच्या रचनेत थोडे तांत्रिक बदल करून ते काम शेवटी २०११ मध्ये पूर्ण झालं. आज जरी ‘पॅरासोल ‘ सेविलच आकर्षण असलं तरी ते पूर्ण होईपर्यंत स्पेनच्या आर्थिक मंदीच्या काळात त्याने स्पेनच्या अर्थकारणाला चांगलाच धक्का दिला होता. सहा पॅरासोल मिळून ही रचना तयार झाली आहे. स्पॅनिश लोक ह्याला ‘ ला सेतास देलाइन्कर निसियॉन’  म्हणजे इन्कर निसियॉनचे मशरूम अस म्हणतात.

3

इमारतीच्या तळमजल्यावर या ठिकाणी सापडलेले रोमन आणि अंदालुस अवशेष जतन करून ठेवले आहेत ते पाहायला मिळतात. पहिल्या मजल्यावर एक छोटासा बाजार भरतो तर ह्याच्या वर असणाऱ्या छतावर एक पॅरासोलने झाकलेला प्लाझा म्हणजे चौक आहे जिथे सार्वजनिक कार्यक्रम होतात. सगळ्यात वरच्या मजल्यावर असलेल्या सज्जातून सेविलचा सुंदर नजारा दिसतो. पुढे इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आम्ही त्याच्या कॉलेजच्या मित्रांना भेटायला गेलो. या सगळयांनी त्यांच्या ग्रुपचं नाव ‘लिटिल चीक्स फॅमिली’ ठेवलं आहे. त्याच्या या मित्रमैत्रिणींनी माझ्याशी एवढया मोकळेपणाने गप्पा मारल्या की मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो आहे असं वाटलंच नाही. भरपूर गप्पा मारुन आम्ही घरी परत आलो आणि या लिटिल चीक्सचा विचार करत मी कधी झोपून गेलो हे कळलंच नाही.

स्पेनमध्ये दिवस आरामात सुरु होतो. नाश्ता आटपून बाराच्या सुमारास आम्ही अल्काझारला पोहोचलो. अल्काझार हे सेविलचं राजगृह. हे काळाच्या ओघात वेगवेगळ्या राजवटीखाली आलं. त्याची छाप आजही अंगाखांद्यावर बाळगून आहे. अलमोहद राजवटीच्या काळात सिरॅमिक टाईल्स वापरून केलेलं नक्षीकाम अप्रतिम आहे. ख्रिश्चन राजवटीच्या अगोदरच्या काळात बांधलेल्या राजवाड्यात बदल करणं हे ख्रिश्चन वास्तूशास्त्रज्ञांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे त्यांनी ती शैली तशीच जतन करून जमेल तसे बदल केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजवाड्यातील चर्च. राजवाडा,  त्यातील शयनकक्ष,  राण्यांचं स्नानगृह, सजवलेले बगिचे हे सर्व बघताना वेळ कुठे गेला कळलंच नाही. त्यांच्या स्नानगृहाला तर पोहण्याचा तलावच म्हणायला हवं. संपूर्ण युरोपमध्ये आढळून येणारी गमतीची गोष्ट म्हणजे जरा कुठे कारंजे,  नदीकाठ,  हौद दिसले की त्यात नाणी टाकायची. प्रत्येकामागे काही ना काही कथा असतेच. रोमच्या ट्रेवीच्या कारंजात लोकांनी एवढी नाणी टाकली की पाणी जायच्या सगळ्या वाटाच बुजून गेल्या. त्या मोकळ्या करणं हे नगरपालिकेला एक कामच झालं होतं.

6

राजवाड्याच्या शेजारी सेविलचं कथिड्रल आहे. हे कथिड्रल म्हणजे खरं तर बाराव्या शतकात अलमोहद राजवटीत बांधलेली मशिद आहे. सेविलचा कथिड्रल मुस्लिम वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. बाराव्या शतकात बांधलेल्या या मशिदीचं पुढे कथिड्रलमध्ये रुपांतर झालं खरं, पण ते करत असताना या सुंदर मुस्लिम वास्तूशास्त्राची नजाकत मात्र हरवू दिली नाही. ह्या कथिड्रलमध्ये अमेरिकेचा शोध लावणारा ख्रिस्तोफर कोलंबस चिरनिद्रा घेतो आहे. अर्थात हे थडगं नक्की कोलंबसचं आहे का ह्यावरून वाद आहेतच.

सेविलची आणखी एक ओळख म्हणजे ‘प्लाझा दी इस्पान्योल’ (Plaza de Espanol)  हा मोठा चौक विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतर बांधला आहे ह्यावर चटकन विश्वास बसत नाही. इतका हा त्या वातावरणात बेमालूम मिसळून गेला आहे. आज सेविलमध्ये कथिड्रल बरोबर हा प्लाझा सर्वात जास्त पर्यटक खेचून घेतो. सध्या ह्या प्लाझामधील बऱ्याच इमारती सरकारी कार्यालयांसाठी वापरल्या जातात. पण बाहेर मात्र सुंदर बागेत,  कारंजाजवळ पर्यटक,  फ्लेमेंको नाचणाऱ्या सिन्योरिता, लोकांना लुबाडण्यासाठी टपून बसलेले जिप्सी यांची बरीच गर्दी असते. ब-याच सिनेमांचं चित्रीकरण सुद्धा इथे झालं आहे. उत्तम उदाहरण म्हणजे स्टारवॉर्स.

7

डीजेच्या घरच्यांच्या शाकाहारी हॉटेलमध्ये चवदार बीटरूट सूप आणि कुसकुसचं सारण भरलेल्या भोपळी मिरचीवर ताव मारून आम्ही मोर्चा वळवला रोसियोच्या लाडक्या त्रियानाकडे. त्रियाना हा सेविलचाच भाग असूनही सेविलपेक्षा पुष्कळच वेगळा आहे. इथल्या उंच इमारती,  रुंद रस्ते, कमी रहदारी ह्या बांद्र्याच्या कार्टर रोडची किंवा रेक्लेमेशन एरियाची आठवण करून देतात. त्रियानात डीजेच्या आवडत्या पबमध्ये गेलो. नदीच्या काठावर असलेला हा पब दुपारच्या उन्हात अनेकांसाठी विसावा आहे. बियरबरोबर पब मालकाने मक्याच्या दाण्यासारख्या कसल्याशा बिया आणून ठेवल्या. जरा वेळाने तो स्पॅनिशमध्ये डीजेशी काहीतरी बोलला आणि त्याला प्रत्युत्तर देत डीजेही हसला. त्या बिया सोलून खायच्या असतात हे मला माहितच नव्हते. म्हणून दोघेही गमतीने हसत होते.

माझ्या या मित्राने मला नंतर स्पेनमधल्या एका आगामी प्रगतीचा नमुना दाखविला. आगामी अशासाठी की एका विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी म्हणून बांधलेला ‘कार्तुजा ९३’  हा भाग नंतर वापरलाच नाही. पैशाची चणचण आणि दुर्लक्ष या कारणांमुळे हा भाग आज दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. आज इथे फक्त युनिव्हर्सिटीच्या काही इमारती,  काही संशोधन केंद्र एवढेच आहे. मनाशी हळहळत हे सगळे बघत असतानाच आम्हाला रोसियो भेटली आणि आम्ही ‘टापास’ खायला गेलो. मासे, चिकन,  पोर्कपासून बनवलेले टापास हे स्टार्टरसारखा स्नॅक्सचा प्रकार. आपल्यासाठी जसा वडापाव,  समोसा,  चाट तसच स्पनियार्ड्ससाठी टापास!! टापास हे चिकन बीफ पोर्क किंवा मासे भरून बनवलेले असतात. त्यामुळे अर्थातच शाकाहारी डीजेची फारच पंचाईत होती. डीजेच्या आई-वडिलांनी जाणीवपूर्वक शाकाहार स्वीकारला आहे. डीजेने पण तोच निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आणि रोसियोने चिकन आणि हडॉक मासा वापरून केलेल्या टापासवर मस्तपैकी ताव मारला आणि डीजेने बटाटे वापरून केलेले टापास खाऊन क्षुधाशांती केली. खाताना एकीकडे तोंडाची बडबड सुरू होतीच. तो मला त्याच्या पुढच्या आखलेल्या प्रवासाबद्दल सांगत होता. आणखी दोन आठवड्यांनी तो रोसियोबरोबर त्यांची कॅम्पर व्हॅन घेऊन स्पेनच्या सीमेवर प्रवास करणार होता. दोन आठवड्यात तीन हजार किमीचा पल्ला पार करायचा त्याचा उत्साह अगदी सांसर्गिक होता. क्षणभर मला हेवाच वाटला त्याचा!! जग बघताना आधी आपल्या घराची माहिती आपल्याला असायला हवी असं तो मला सांगत होता. किती खरं आहे हे! आणि ते ऐकताना आता भारतात घरी गेल्यावर आपल्या देशातील एकतरी ठिकाण जाणून घेण्याचा मी माझा विचार पक्का करत होतो.

डीजेच्या त्या सहज फिरण्याचं जसं मला अप्रूप होतं तसंच त्याला पण माझ्याकडच्या एका गोष्टीचं कौतुक होतं. कशाचं माहीत आहे? आपल्या स्वयंपाकघरात मिसळणाचा डबा असतो ना त्याचं!  आयर्लंडमध्ये माझ्याकडचा डबा बघून तो अगदी चकितच झाला होता म्हणून मग स्पेनला जाताना मी मुद्दाम त्याच्यासाठी म्हणून एक मिसळणाचा डबा आणि मसाल्यांची पाकिटं घेऊन गेलो होतो. डबा पाहिल्यावर तो एकदम हरखून गेला.  एखाद्या लहान मुलांच्या उत्साहात त्याने ती पाकिटं फोडून त्या डब्यातून भरून टाकली. प्रत्येकावर त्याच्या त्याच्या नावाचं लेबल लावून टाकलं.  त्याला जे माहीत नव्हतं त्याचे उपयोग विचारून घेतले. रात्री त्याचे आईवडील आल्यावर कौतुकाने त्यांना सगळं दाखवलं.

4

डीजेच्या वडिलांना इंग्रजी येत नसल्याने माझ्या सगळ्या गप्पा त्याच्या आईशीच रंगल्या. आश्चर्य म्हणजे त्याच्या आईला आपल्या भारतीय मसाल्यांची व्यवस्थित माहिती होती. अगदी युरोपमध्ये फारशा न वापरल्या जाणाऱ्या हिंगाची सुद्धा!  डीजेच्या घरची दोन शाकाहारी हॉटेल्स आहेत. “पूर्वी आमच्याकडे एक भारतीय शेफ म्हणून कामाला होता. त्याच्यामुळे मला हे सगळे मसाले माहीत आहेत.” त्याची आई अभिमानाने सांगत होती.

एव्हाना आमच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. तुमच्याकडे कसं, आमच्याकडे काय ह्याचे दाखले दिले जात होते. मधेच त्याच्या आईने प्रश्न टाकला,” आता तुझे आईवडील तुझ्यासाठी गर्लफ्रेंड शोधतील ना?” मी अवाकच झालो. हे काय आता?  “आमचा तो शेफ होता ना, तो भारतात जाऊन एकदाही न भेटलेल्या मुलीशी लग्न करून आला. त्याच्या घरच्यांनी ठरवलं अस म्हणाला. तुझ्या घरचे पण अंसच करतील का? तेच तुझ्यासाठी गर्लफ्रेंड शोधतील?”

“मी सांगितले तर शोधतीलही. पण शक्यतोवर तशी वेळ येऊ नये.”  मी हसत त्यांना सांगितले. “पण तू तयार होशील असं न बघितलेल्या मुलीशी लग्न करायला? ” आता हा विषय लांबण्याची स्पष्ट चिन्हं दिसायला लागली. एकंदरीतच भारताबद्दल काय काय कल्पना असतात ह्या लोकांच्या! मग मी त्यांना समजावले की आता अशी परिस्थिती नाही. खेड्यात असेलही थोडीफार कदाचित पण आता मुलं मुली एकमेकांना भेटतात, डेटवर जातात आणि मगच ठरवतात लग्न करायचं की नाही ते. शिवाय नाही म्हणण्याचा अधिकार असतोच ना. भारताबाहेर भारतीयांची प्रतिमा अजूनही जुनाट आहे का,  असं मला वाटायला लागलं. पुढे डीजेने संधी साधून विषय बदलला आणि आम्ही दोघांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

आज स्पेनमधला शेवटचा दिवस होता म्हणून जरा उदासच वाटत होतं. मूड बदलण्यासाठी डीजे आणि रोसियो मला नाश्त्यासाठी ‘चुरोस’ खायला घेऊन गेले. चुरोस खाऊन सेविलपासून २-३ तासावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जायचं आणि समुद्रस्नान करण्यात दिवस घालवायचा आणि तिथूनच थेट विमानतळ गाठायचं असा बेत ठरला. घरातून निघताना ज्या माऊलीने तीन दिवस अखंड माया केली, त्या डीजेच्या आईला मी आपल्या पद्धतीने वाकून नमस्कार केला आणि येतो म्हणून माझं सामान घेऊन आम्ही तिघंजण निघालो.

घराजवळच्याच एका उपाहारगृहात आम्ही चुरोस खायला गेलो तेव्हा साडेनऊ-दहाच्या सुमारास तिथे गर्दी पाहून मी तर अवाक झालो. कशीबशी त्या गर्दीतून वाट काढत डीजेने चुरोस मागवले आणि आम्ही ते येण्याची वाट बघत बसलो. हे चुरोस म्हणजे बेसनाच्या पिठापासून तळलेली खुसखुशीत भजी. अर्थात त्यांचा आकार लांब सळीसारखा असतो. चुरोस दोन प्रकारात मिळतात. एक नुसतेच बेसनाचे तळलेले आणि एक बेसन आणि शिजवलेला बटाटा एकत्र करून तळलेले. चुरोस इकडे साखरेबरोबर खातात. बेसनाची भजी आणि साखर या कल्पनेनेच माझ्या भारतीय मनावर शहारे आले आणि मन घट्ट करून मी त्याचा तुकडा मोडला. खाल्ल्यावर जाणवलं की अरेच्चा हे combination  पण काही वाईट नाही लागत आहे. पण तरीही हे चुरोस कसली तरी झणझणीत चटणी किंवा ठेचा यांच्या संगतीने किती छान लागतील हे सांगून मी माझ्या मनावर आलेल्या शहाऱ्याची परतफेड केलीच.

भरपेट चुरोस खाऊन आम्ही सेविलपासून ३ तासांवर असणाऱ्या समुद्राकडे आमचा मोर्चा वळवला. आयर्लंड आणि स्पेनला वेढणारा अटलांटिक एकच असला तरी आयरिश किनाऱ्यावरच्या थंडगार पाण्यापेक्षा स्पेनच्या किनाऱ्यावरचे पाणी पुष्कळ उबदार आणि सुखकारक होते. मनसोक्त पोहून दुपारी जेवणानंतर वाळूत एक मस्त झोप काढून आम्ही विमानतळाच्या दिशेने निघालो. दीड वर्षांपूर्वी डीजेच्या नजरेतून आणि माझ्या कल्पनेतून सुरु झालेली ही सेविलयात्रा आता संपत आली होती. स्पेन आणि सेविलच्या सुंदर आठवणी मनात भरून घेताना डीजे मध्येच स्पेनच्या प्रसिद्ध बैलांच्या शर्यतीतले बैल नंतर कसे मारून टाकले जातात, टॉमेटीना फेस्टिव्हलमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कसे वाढले आहे हे सांगून धक्के देत होता. पण माझ्या मनात मात्र मित्राच्या प्रेमाने हे सगळं झाकून टाकलं होतं. आन्दालुशियाच्या त्या जगप्रसिद्ध शेतीसारखेच ह्या सेवियानोर्जनी माझ्या मनात मैत्रीचे हिरवेगार मळे फुलविले होते. सेविलच्या या जादूमुळे सेविलमध्ये आणखी एका भारतीय सेवियानोची भर पडली.

राजस साने

12
डीजे आणि रोसियाबरोबर लेखक

इ-मेल – rajassane@gmail.com

आयर्लंडमध्ये बायोटेक्नोलॉजी क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन तिथेच नोकरी करत आहे. प्रवासाची आवड आणि जग  फिरून बघणं हे स्वप्न.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s