मुक्काम इव्हेंटफुल दिल्ली

अजित कानिटकर

जून २००१ च्या कडक उन्हाळ्यात छत्तीस तासांचा रेल्वेचा प्रवास करून पुण्याहून हजरत निजामुद्दिन या रेल्वे स्टेशनवर मी, ज्योती व पार्थ पोचलो. दिल्लीला उतरताच ४०-४५ डिग्रीच्या उन्हाळ्याचा त्रास सहन न होऊन माझा ६ वीत शिकणारा मुलगा स्टेशनवरच भडाभडा ओकला. २००१ ला दिल्लीत पोहोचल्यावर त्या शहरात पुढची १४ वर्षे सलग राहू आणि त्या शहराच्या प्रेमात पडू अशी कोणतीच कल्पना नव्हती.

त्याआधीच्या दिल्लीभेटींमुळे देशाच्या राजधानीत निदान काही वर्षे कामासाठी राहिले पाहिजे असं वाटू लागलं होतं. दिल्लीतील स्वित्झर्लंड देशाच्या दूतावासातील विकासकामांना साहाय्य करणार्‍या  विभागात नोकरीची संधी मला चालून आली. विविध चाचण्या, मुलाखतींतून चाळणी होत माझी नियुक्ती झाली. पुण्यातील १९९५ ते २००१ या सहा वर्षात बसलेली घडी विस्कटून दिल्ली मुक्कामी गेलो.

२००१ ते २०१५. चौदा वर्ष. दिल्लीतल्या बर्‍याच चांगल्या-वाईट बदलांचे आम्ही साक्षीदार झालो. एनडीए, युपीए, एनडीए अशी राजकीय स्थित्यंतरे, प्रमोद महाजनांपासून वाजपेयींपर्यंतच्या रथी-महारथींचा उदयास्त. शीला दीक्षित कारकीर्दीचा अस्त, अरविंद केजरीवाल सरकारचा उदय. कॉमनवेल्थ खेळांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे, शीलाजींच्या काळात बांधलेले अजस्त्र उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते व श्रीधरन्‌च्या मेट्रोचा भरधाव वेग, २००१ साली एम्स चौकातल्या रहदारीतून जीव मुठीत धरून १५-२० मिनिटे सिग्नलची वाट पाहण्यापासून ६-८ वर्षातच त्याच गर्दीच्या चौकात एक क्षणभरही न थांबता लवंगेच्या आकाराच्या उड्डाणपूल-रस्त्यांवरून सरळसुलभपणे होणारा प्रवास, सीएनजीमुळे प्रदूषण कमी होणं आणि पुन्हा भरमसाठ चार चाकी वाहनांनी तो चिंतेचा विषय बनणं अनुभवलं. एका वृत्तानुसार दिल्ली महानगरातल्या (नोइडा व गुडगावसह) चारचाकी वाहनांची संख्या ( ६२ ते ६५ लाख) मुंबई, कलकत्ता व चेन्नईमधील एकूण चारचाकी वाहनांपैक्षा जास्त आहे.

महिलांची सुरक्षितता हा दिल्लीबाबत नेहमी चर्चेत असलेला विषय. सुरुवातीच्या ६-८ वर्षात अक्षरशः अपवाद म्हणूनच महिला-मुली दोन चाकी स्वयंचलित वाहने चालविताना दिल्लीत दिसायच्या. माझी पत्नी व तिच्या दोन मैत्रिणी स्कूटी चालविताना अनेक पुरुषांची आश्चर्यकारक नजर असायची. गेल्या तीन-पाच वर्षात हे चित्र थोडेसे बदललेले दिसतेय. पण पुणे-अहमदाबाद-बंगलोर या शहरापर्यंत पोचायला दिल्ली तो बहुत दूर है! २०१३ मधील निर्भया घटनेतून दिल्लीतील वातावरणाची कल्पना येऊ शकेल. आमच्या सुदैवाने चौदा वर्षात आमच्या व परिचित वर्तुळात असे प्रसंग वाट्याला आले नाही. पण दिल्लीत वावरताना महिलांना सततच अतिशय सावध राहावे लागते, हे खरंच.

12373223_1053708068004004_8034581277141217867_n
राष्ट्रपती भवन

करोलबाग, सरोजिनी नगर, लाजपत नगर या तीन मुख्य बाजारांच्या बरोबरीने उभे राहिलेले काचेचे चकचकीत मॉल्स याच काळातील आणि दिल्लीचा घेरा गुडगाव-नोइडा-द्वारका-रोहिणी अशा चहूबाजूस वाढण्याचा वेग याच दहा-पंधरा वर्षाचा. दिल्लीच्या सामाजिक वातावरणातील स्थित्यंतरेही तशी याच पंधरा-वीस वर्षातील. मुख्यतः पंजाबी संस्कृतीचे प्राबल्य असलेली दिल्ली व्यापार-उद्दिमातील अनेकांच्या स्थलांतरामुळे, माहितीतंत्रज्ञानाच्या नोकरींच्या संधीमुळे जास्त बहुभाषिक झाली, तो हाच कालखंड. अशा या बदलत्या दिल्लीत आम्ही जणू काही योग्य वेळी राहण्यासाठी आलो.

दिल्लीत गेल्यावर पहिल्या महिन्या-दोन महिन्यांतच आम्हाला ‘फुकटेगिरी’ची सवय लागली! या शहरात विशेषतः संगीत-नाटक-चित्रपट हे कार्यक्रम कधीही तिकिट काठून, पैसे खर्च करून बघायचे नसतात.  हा फुकटेगिरीचा धडा दिल्ली शिकवते. फुकट पासेस बंद  किंवा फ्री पास मागून संयोजकांची अडचण करू नये ही पुणेरी शिकवण. तिकडे गेल्यानंतर ‘जे जे फुकट ते ते पौष्टिक’ या संस्काराची लागण झाली! पहिलाच प्रसंग ठळकपणे आठवतोय.

हैद्राबादच्या निजामाचा मालकीच्या मौल्यवान दागिन्यांच्या प्रदर्शनाचे पास एका परिचितांकडून मिळाले. हे प्रदर्शन दिल्लीतल्या सुप्रसिद्ध राष्ट्रीय संग्रहालयात होते. फुकट पास मिळाल्यामुळे आपण कोणीतरी खास आहोत अशा भ्रमात तरंगतच आम्ही प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो. प्रदर्शनाच्या जागी पोहोचल्यावर भ्रमाचा भोपळा फुटला. आमच्यासारखेच सुमारे ५००-७०० खास लोक रांगेमध्ये प्रदर्शन पाहण्यासाठी ताटकळत उभे होते.

दिल्लीमधील वास्तव्यात अनेक संस्मरणीय कार्यक्रम पाहण्याचे भाग्य लाभले. पं. भीमसेनजी, पं.रविशंकर यांचे निधनापूर्वीचे सिरी फोर्ट सभागृहातील कार्यक्रम. महाराष्ट्र व देशभरातील अनेक ख्यातनाम गायक-वादकांना जवळून पाहण्याची-ऐकण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात गाजलेले अनेक मराठी चित्रपट प्रथम दिल्लीत पाहण्यास मिळाले. तालकटोरा स्टेडियममध्ये रशियन सर्कसचा एक अद्‌भूत कार्यक्रम पाहिला. त्या सर्कसचे फुकट पास घेण्यासाठी अर्थातच तासभर रांगेत उभे राहण्याचीही तपश्चर्याही क्रमप्राप्त होती.

फुकटेगिरीचा आम्हांला बसलेला एक वेगळाच तडाखा.  दिल्लीत गेल्याच्या पहिल्या वर्षातच ‘आनंदओवरी’ या दि. बा. मोकाशी (माझे सासरे) यांच्या कादंबरीवर आधारीत दीड तासाचा नाट्यप्रयोग दिल्लीमध्ये आम्ही आयोजित केला. अतुल पेठे यांचे दिग्दर्शन व किशोर कदम यांनी साकारलेली तुकारामांच्या भावाची भूमिका. एक दिवस अगोदर एनएसडीने हा प्रयोग त्यांच्या वार्षिक महोत्सवात योजला होता. त्याला जोडून दिल्लीतील मराठी भाषिकांसाठी आणखी एक प्रयोग दिल्लीच्या आंध्र भवनच्या सभागृहात ठेवण्याचा आम्ही घाट घातला. फार काही ओळखी नसताना सभागृहाच्या बुकींगपासून निमंत्रणांच्या वाटपापर्यंची कामे पार पाडली. प्रयोग अर्थातच उत्तम झाला. आंध्रभवन सभागृहात १५०-२०० मराठी भाषिकांची उपस्थित होते. दिल्ली संकेताप्रमाणेच हाही कार्यक्रम निःशुल्क होता. कार्यक्रमाच्या शेवटी सभागृहाच्या दरवाजात ऐच्छिक देणगी देण्याचे आवाहन आम्ही केले. १५०-२०० प्रेक्षकांमधून फक्त ७५०रु. जमा झाले!

16473212_1463101707064636_1872794171507678017_n
दिल्लीतला चहा

हे सर्व कार्यक्रम ‘फुकट’ होण्याचे कारण देशाच्या राजधानीचे शहर असल्यामुळे प्रायोजकांची मुबलक उपलब्धता! एअर इंडिया, ओएनजीसी, भेल यासारख्या सार्वजनिक उद्योगधंद्यांना गळ घालून त्यांचे खिसे कापण्याची युक्ती संयोजकांना अवगत असते. या कंपन्या वर्षानवर्षे तोट्यात जाण्याचे जाहिरातींची उधळपट्टी हेही एक कारण असू शकते! ‘आनंदओवरी’ च्या कार्यक्रमातही आमचे तारणहार एक-दोन प्रायोजकच होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मराठी मंत्र्याच्या कार्यालयातून दोनतीन कंपन्यांना फोन केल्यावर त्यांनी काही रक्कम देऊ केली. सुमारे २५ हजाराच्या निधीतून कलाकारांना जुजबी मानधन व प्रवास खर्च देता आला.

या प्रायोजित कार्यक्रमांचा भपकाच जास्त! दिल्लीच्या वर्तुळात आपापले नाव पुढे रेटण्याच्या ‘राजकारणाचाच’ एक भाग हे कार्यक्रम असतात. अनेक संगीतमहोत्सवातील भपका विद्रूप वाटावा असाच असायचा. संध्याकाळी ६.३० चा  कार्यक्रम ७ ते ७.१५ शिवाय सुरू होणार नाही हे ठरलेले. कारण उपस्थित व्हीव्हीआयपी कधीही वेळेवर येत नाहीत, हेही ठरलेलंच. त्यानंतर लांबलचक भाषणे-हारतुरे सत्कार. मग कलाकाराला कितीसा वेळ पुरणार? अशा कार्यक्रमातील दिल्ली शैली म्हणजे पहिल्या दोन तीन रांगांमधील ‘कार्यमग्र’ अतिमहत्त्वाचे (श्रीमंत) पाहुण्यांनी निर्लज्जपणे, कार्यक्रमाच्या ऐन मध्यातही सभागृह सोडून निघून जाण्याची प्रथा. सुरुवातीस आम्हाला त्यांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटायचे व रागही यायचा. नंतर लक्षात आले की या शहराचा तो स्वभाव आहे. सत्ता व पैसा यांच्या सहवासात वाढलेल्या व्यक्तीच असे ‘धाडस’ करू शकतात. असा प्रकार फक्त दिल्लीतच होऊ शकतो.

अशा कार्यक्रमांतला एक ह्रुद्य अनुभव. कमानी सभागृहातला कार्यक्रम. कार्यक्रमाच्या काळात सभागृहातील दिवे मंद होते. कार्यक्रम संपल्यावर सर्वांना उभे राहून राष्ट्रगीत म्हणण्याचे आवाहन करण्यात आले. दिवे प्रकाशमान झाले. आमच्या पुढच्याच रांगेत राष्ट्रपती अब्दुल कलाम उपस्थित होते. सर्वांबरोबर तेही राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले! राष्ट्रपतींसमवेत राष्ट्रगीतगायनाचा त्या संध्याकाळचा अनुभव आजही अंगावर रोमांच उभे करतो.

सत्ता, पैसा व प्रसिद्धीच्या वलयात राहणार्‍या अनेक व्यक्ती दिल्लीच्या वास्तव्यात सहजपणे भेटायच्या, निदान दिसायच्या तरी. दिल्लीत गेल्यावर पहिल्याच महिन्यात इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये अमृता प्रीतम यांना माझी पत्नी भेटू शकली. त्यांच्या एका पुस्तकावर आनंदाने सहीही करून दिली. २०१५ ला निघण्याच्या महिन्यात ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे सहकुटुंब इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये जेवायला आले असताना अचानक भेटले. ज्योतीने त्यांच्याशी तिचे वडील दि.बा.मोकाशी यांच्याबद्दल गप्पा मारल्या. उमा भारती आणि भाजपातून निलंबित झालेले गोविंदाचार्य फॅब इंडियाच्या ग्रेटर कैलाश मार्केटमधील दुकानात झब्बा खरेदी करताना तर अरुण जेटली, अझरुद्दिन, आनंद शर्मा, अभिषेक सिंघवी ही मंडळी लोदी गार्डन-सिटी फोर्टच्या मैदानात चालण्याच्या व्यायामासाठी दिसणे. जास्त पोलिसांचा बंदोबस्त खान मार्केट परिसरात दिसला की बहुधा फारुख अब्दुल्ला असणार याची खात्री. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांच्यासारखे माध्यमांत चमकणारे पत्रकार खान मार्केटच्या बाहरी अ‍ॅड सन्स या प्रसिद्ध पुस्तकांच्या दुकानात असणार हेही सवयीचे झाले.

दिल्ली वास्तव्यात तीन पंतप्रधानांना जवळून पाहता आले. मनमोहन सिंग विरोधी पक्षनेते असताना एका पुस्तक प्रकाशनास इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आले होते. या संपादित पुस्तकात माझाही एक निबंध असल्याने मलाही या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. दुसरी भेट पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची त्यांच्या रेसकोर्स कार्यालय-घरामध्ये. विवेकानंद केंद्र इंटरनॅशनल संस्थेच्या दिल्लीतील वास्तुच्या बांधकाम समारंभाची ती छोटीशी सुरुवात. कन्याकुमारी येथील कार्यकर्ते प्रवीण दाभोळकर यांच्या परिचयामुळे तिथे जाता आले. पण त्या कार्यक्रमात बाजपेयी पूर्वीचे राहिले नव्हते, हे जाणवले. लिहून दिलेले भाषणच त्यांनी वाचून दाखविले. तिसरी भेट म्हणजे ‘दर्शन’ इंद्रकुमार गुजराल यांचे इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये. हे दर्शन चुकीच्या सभागृहात शिरल्यामुळे घडलं. ज्या कार्यक्रमास जायचे होते त्याऐवजी गुजरालसाहेब सहभागी झालेल्या रटाळ चर्चेत काही काळ का होईना, सभादाक्षिण्य म्हणून ताटकाळत बसावे लागले. इंडिया इंटरनॅशनल सेंटरची आणखी एक ओळख म्हणजे सदानकदा पुस्तकांच्या गठ्‌ठ्यांसमवेत वाचन-लेखन करीत बसलेले जगमोहन. माझ्या दुसर्‍या एका पुस्तकाच्या प्रकाशनाला जयराम रमेश यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. नंतर ते मंत्री झाल्यावरही चार-पाचदा भेटी झाल्या. त्यांचा व माझा मुलगा एकाच महाविद्यालयात एक वर्ष पुढे-मागे शिकत होते. तर मॅगसेसे पारितोषिक विजेते दीप जोशी शाळेच्या पालक-शिक्षक बैठकीत पालक म्हणून उपस्थित. कारण त्यांची मुलगी व माझा मुलगा एका शाळेत! दिल्लीतील ‘वनिता समाजात’ माझी पत्नी अनेक वर्षे सक्रिय असल्याने उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या अर्धांगींची ओळख व त्यातून अधिकारपदावरील व्यक्तींच्या ओळखी होणे हेही घडले. सध्याच्या सभापती सुमित्रा महाजन, योजना आयोग सदस्य डॉ. जाधव, मंत्री निर्मला सीतारामन्‌ यांच्याशी माझ्या पत्नीची ओळख होती. शाम जाजू (सध्याचे भाजपाचे उपाध्यक्ष) यांच्या पत्नी प्रतिभाताई व ज्योतीची घट्ट मैत्री. त्यामुळे ज्योतीचा प्रवेश (पक्षात नव्हे!) थेट प्रतिभाताई यांच्या घरी. आणि प्रत्येक वेळी घरी येताना भाजपा कार्यालयामागील प्रचंड मोठ्या कढिपत्त्यांच्या झाडाच्या काही डहाळ्या आमच्याही घरच्या सांबारासाठी! राष्ट्रीय पक्षांच्या सार्वजनिक मालमत्तेचे दुरुपयोगाचे हे घरगुती उदाहरण जाजू कुटुंबियांवर शेकू नये हीच इच्छा.

10968457_10153109564309446_1920397498705578072_n
केजरीवालांच्या विजयाचं अमूलनं केलेलं पोस्टर

ही नावे लिहिण्याचे कारण नेम ड्रॉपिंग नसून दिल्लीमध्ये अनेक व्यक्ती सहजपणे संपर्कात येऊ शकतात, असे सांगण्याचा प्रयास आहे. कदाचित मी ज्या संस्थांमध्ये काम करत होतो त्या व माझ्या कामाच्या स्वरूपामुळेही अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती भेटू शकणे सहज होते.

ही आठवण जरा वेगळी आहे. त्यातील एक व्यक्ती आज हयात नाहीत व दुसरी व्यक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या आहेत. दिवंगत वसंत साठे व डॉ. प्रा. शेषराव मोरे. साधारण २००३-०४ च्या सुमारास घडलेली घटना. वसंत साठे यांच्या पुढाकाराने दिल्लीतील विचारवंतांचा अड्डा समजला जाणार्‍या इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये चर्चेचा कार्यक्रम होता. त्याच सुमारास डॉ. शेषराव मोरे यांचे ‘मुस्लीम मनाचा शोध’ हे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक महाराष्ट्रात भरपूर चर्चेत होते. याच पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर दिल्लीतील एका प्रकाशकाने केले होते. त्या निमित्ताने वसंत साठे यांनी या पुस्तकाच्या मध्यवर्ती विचारावर चर्चा योजिली होती. स्वतः डॉ. मोरे उपस्थित होते. साठे यांनी सौदी अरेबियाच्या किंवा अशा राजदूतापैकी ज्यांचा या विषयावर अभ्यास होता असा पुरुष वक्ते व जेएनयू किंवा तत्सम विद्यापीठातील एक विदुषी यांना पुस्तकाबद्दल बोलण्यास सांगितले होते. तपशीलाशिवाय मी हे आज लिहितो आहे. कारण कार्यक्रमाचे मला निमंत्रण नव्हते. पण हा खुला कार्यक्रम असल्याने मी गेलो, पण उशीराने. त्यामुळे प्रा. मोरे यांचे भाषण मी ऐकू शकलो नाही. त्यानंतर या दोन तज्ज्ञांची चर्चेत भाषणे झाली. दोघेही मुस्लीम धर्मीय, मुस्लीम धर्माचे अभ्यासक. दूतावासातील परदेशी व्यक्तीने डॉ. मोरे यांच्या मांडणीबद्दल सहमती न दाखविता वेगळे मुद्दे मांडले. तेही माझ्या लक्षात नाहीत. पण विदुषींनी मात्र डॉ. मोरे यांच्या प्रतिपादनावर कडाडून टीका केली. ती कोणत्या मुद्यावर हेही लक्षात नाही पण शेवटी त्या म्हणाल्या की ही सर्व “Scholarship is nothing but TRASH.” TRASH हा शब्द माझ्या नक्की लक्षात राहिला आहे. वसंत साठे यांनी समारोप केला. उपस्थितांची (२५-३५ श्रोते- त्याहून जास्त नाही) निरोपानिरोपी होऊन पांगापांग झाली. साठेही निघून गेले. पोर्चमध्ये प्रा. मोरे व त्यांचे नांदेडचे Ph.D. करणारे विद्यार्थी वाट पाहात उभे होते. त्यांना घेऊन आमच्या गाडीने घरी नेलं.  आमटी-भाताचे जेवण होऊन ते त्यांच्या राहण्याच्या जागी गेले. “तुम्ही त्या विदुषींना प्रतिवाद का केला नाहीत” असे विचारताच “वेळेची मर्यादा होती म्हणून बोललो नाही” असे मोरे सर म्हणाले. ज्या पुस्तकाला-त्यातील मांडणीला-त्या मागच्या संशोधन परिश्रमांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, त्याची तासाभराच्या चर्चेत इंग्रजी भाषिक परिसंवादात, २५-३० जणांच्या उपस्थितीत TRASH म्हणून अक्षरशः कस्पटासमान वासलात लावली गेली, याचा माझ्याच मनात ओरखडा उठला, तो आजपर्यंत कायम आहे. एका दीर्घ संशोधनाची अशी फुटकळ म्हणून केलेली संभावना मला आवडली नाही.

दिल्लीतील १४ वर्षांच्या वास्तव्यात आम्ही चार भाड्याची घरे बदलली. घरमालकांच्या काही चित्रविचित्र आठवणी असूनही दिल्लीतील आमचे वास्तव्य भरपूर पाहुणे, मित्रमंडळी, परदेशातील माझे मित्र व नातेवाईक यांच्यामुळे संस्मरणीय झाले. मला व ज्योतीलाही अशी उठबस हवीहवीशी वाटायची. सुरुवातीची पाच वर्षे माझा मुलगा पार्थ (इतिहास हा त्याचा आवडीचा व अभ्यासाचा विषय असल्याने) अशा पाहुण्यांबरोबर कुतुबमिनार, ताजमहाल-आग्रा, लाल किल्ला अशा ठिकाणी अनाधिकृत होतकरू पर्यट्न मार्गदर्शक म्हणूनही जायचा ! आमच्या चारही घरांमुळे अनेकजण नव्याने जोडले गेले. नातेवाईक-मित्रांबरोबरचं नाते सुदृढ झाले. आमच्या मनाचे विश्व व्यापक झाले. यातील एक विशेष आठवण म्हणजे आमच्या घरी होणार्‍या गणपती उत्सवातील छोट्याशा मेळाव्याची. गणेशोत्सवातील आठवड्यात सोयीचा शुक्रवार-शनिवार पाहून आमच्या घरी ५०-६० मित्रांचा आनंदमेळा आम्ही योजत असू. नव्या-जुन्या घरमालकांपासून, गाडीचालक, घरात काम करणार्‍या महिला, माझ्या व ज्योतीच्या कामांच्या जागचे सर्वभाषिक-सर्वधर्मीय सहकारी, दिल्लीतील परिचय झालेल्या मराठी कुटुंबीय, शासकीय अधिकारी असा छान संगम वर्षानुवर्षे आमच्या घरी व्हायचा. आजही आमच्याकडे काम करणारे गाडीचालक विजय रावत व ताजबीर विश्त ‘सहज आठवण झाली म्हणून’ वाढदिवसाला शुभेच्छा देण्यास आवर्जून फोन करतात. गणोशोत्सवाच्या निमित्ताने आमचे असे अनेकांशी ऋणानुबंध जुळले व ते टिकून राहिले.

सर्व दिल्लीकरांसारखी काही कर्मकांडे आम्हीही प्रामाणिकपणे पार पाडली. २६ जानेवारीस प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणारे संचलन. चौदा वर्षांत आम्ही दरवेळेस नव्या उत्साहाने या सोहळ्यात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचो. नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागल्यावर राजपथाच्या दोनही बाजूंना मांडव घालण्याची तयारी चालू व्हायची. हे सर्व काम सैन्यदलाकडे असल्याने ते शिस्तबद्ध पद्धतीनेच होणार यात काही शंका नसायची. पहाटे कडाक्याच्या थंडीत संचलनात भाग घेणार्‍या सैन्याच्या पथकांचा संचलनाचा सरावही सुरू व्हायचा. दाट धुक्यात समोर एक फुटापलिकडचेही काही दिसत नाही अशा २५-३० डिसेंबरच्या आठवड्यातही हा सराव चालू असताना मी सायकलने राजपथावर जाऊन अनेकदा पाहिला. ‘सारे जहाँ से अच्छा’ चे स्वर मग दिवसभर घोळत. याच काळात आम्ही सरकारी अधिकारी कोणी परिचितांमध्ये आहे का याच्या शोधात ! कारण प्रेक्षक म्हणून पास आवश्यक पण त्याचबरोबर गाड्या ठेवण्यासाठी कार पार्क स्टिकर मिळणे अत्यावश्यक. २६ जानेवारीला सकाळी लवकर पोचण्याची उत्कंठा असायची. सैन्याकडे व्यवस्था असूनही आमच्यासारखेच शेकडो उत्साही नागरिक रांगांमध्ये उभे असायचे. एक दोन वर्षी चेंगराचेंगरी व धक्काबुक्कीही झाली. २०१५ च्या जानेवारीत तर ओबामा-मोदी यांच्याप्रमाणे पावसानेही उपस्थिती लावली. दोन तास भिजतच कार्यक्रम पाहिला. संसदेच्यावरील हल्ल्यानंतरच्या २६ जानेवारी कार्यक्रमास मात्र फार तुरळक उपस्थिती होती. सैन्याच्या कडक शिस्तीतील पथकांपाठोपाठ अनेक राज्यांचे शोभारथ बघण्यात फार गंमत यायची. सर्वांत शेवटी वायुदलाच्या अनेक विमानांच्या आकाशातल्या कसरती म्हणजे कळसच !

सूरजकुंडची वारीही बहुतेक दरवर्षी व्हायची. दिल्लीच्या सीमापार १५-२० किमी अंतरावर हरियाणातील सूरजकुंड येथे दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी या काळात हस्तकला व हातमाग प्रदर्शन असते. देशभरातील सर्व राज्यांतून निदान १००-१५० तरी कलाकार उत्पादन केलेल्या वस्तू त्या प्रदर्शनात विक्रीसाठी आणणार हे ठरलेले. फेब्रुवारी महिना म्हणजे दिल्ली-उत्तर भारतातील सुखद थंडी. सूर्यप्रकाश अंगावर घेत, या जत्रेत फिरणे, त्यापेक्षा तेथे असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांनाही भेटी देणे यात एकतरी शनिवार/रविवार नक्की जायचा!

दिल्लीतील आणखी एक आठवण ही नेहरू पार्कमध्ये होणार्‍या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांची. ‘म्युझिक इन द पार्क्स’ याच नावाने दिल्ली सरकारच्या पुढाकाराने सप्टेंबरपासून मार्चपर्यंत दरवर्षी हे कार्यक्रम होत असतात. चाणक्यपुरी-शांतीपथ परिसरातील भरपूर मोठ्या नेहरू पार्क परिसरात थंडीच्या महिन्यांमध्ये होणारे हे कार्यक्रम केवळ श्रवणीय नाही तर प्रेक्षणीयही होतात. नेहरू पार्कच्या मध्यभागी कलाकारांसाठीचा मंच व समोर खुर्च्या, गाद्या व त्याही पुरल्या नाहीतर हिरवळ आहेच. अशा मोकळ्या सभागृहात किशोरीताई, अश्विनीताई, कलापिनीताई यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचे गाणे ऐकण्याचा विलक्षण अनुभव अनेकदा आला. या कार्यक्रमापूर्वी जणू काही दिल्लीकर नागरिकांना व्यक्तिगत निमंत्रण असावे इतके आकर्षक फलक मोठ्या चौकांमध्ये लावले जात असत.

19602_916379171736895_4140401131445531018_n
आम्ही दोघे

दिल्लीतली मेट्रो ही आमच्यासाठी अभिमानाचा विषय. श्रीधरन्‌ व त्यांच्या सहकार्‍यांनी उभारलेली मेट्रो ही स्वतंत्र भारतातील एक नवे तीर्थक्षेत्र आहे, ज्याचा खरोखर सविस्तर अभ्यास व्हायला हवा. ज्या भागात मेट्रोची उभारणी होणार तेथे फलक दिसायला लागले की समजायचे की कामाची गती वाढणार ! मेट्रोच्या बांधकामाच्या काळात रस्त्यांवर वाहनांची गर्दी अतोनात वाढायची, ठिकठिकाणी वाहतूक दुसर्‍या रस्त्यांमार्गे वळवलेली असायची. पण नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल याचे भान त्या व्यवस्थेने ठेवले असावे. इतके की हजारो ट्रक माती-राडारोडी वाहताना कधीही दिवसा दिसले नाहीत. रात्री शहरातील वाहतूक कमी झाल्यावर या सामानाची वाहतूक व्हायची. या मातीमुळे निसरडे झालेले रस्ते पाणी मारून, साफ करून, धुतले जाताना मी अनेकदा सकाळी पाहिले. त्यामुळेच की काय, दिल्लीत आलेल्या आमच्या प्रत्येक पाहुण्याला ‘मेट्रोसफर’ घडवून आणणे, हे आवडीचे काम आनंदाने अनेकदा केले. आज दिल्ली मेट्रोचा मोठा विस्तार झाल्यावरही ती स्वच्छ-सुंदर आहे, त्यात कोणीही थुंकत नाही, भरगच्च गर्दी असतानाही अनेकदा वयस्कर, महिला, छोट्या कुटुंबाला बसायला आपणहून जागा देणारे सज्जन मेट्रोत सापडतात. नाही म्हणायला मुंबई लोकलचा एक गुण मात्र काही दिल्लीकरांनी उचलला आहे. मेट्रोत ‘हस्तकौशल्य’ दाखविणारे काही पाकीटमार मात्र मोजक्या संख्येने आहेत !

मार्च-एप्रिलच्या महिन्यात गुलाब आणि वेगवेगळ्या फुलांनी बहरलेले राष्ट्रपती भवनातील ‘मुगल गार्डन’ बघण्यास जाणे, हा आणखी एक परिपाठ! रायसीना टेकडीवरून राजपथ-इंडिया गेटचे दर्शन हाही फार छान अनुभव असतो. अशा कार्यक्रमांना दिल्लीकरांचाही उत्साह बघण्यासारखा असतो. कितीही लवकर, जावे असे ठरविले तरी आपल्या पुढे शाळांच्या सहलीची २००-३०० मुले-मुली, आजूबाजूच्या राज्यांमधील १००-२०० शेतकरी, महिलांचे गट असणारच ! एका वर्षी मुगल गार्डन पाहून परतणार्‍या प्रत्येक व्यक्तीस एका झाडाचे रोप देण्याची सुंदर कल्पना अंमलात आणलेली होती. कल्पनेचे जनक अर्थातच माजी राष्ट्रपती कलाम ! त्यांच्याच पुढाकाराने मुगल गार्डनच्या एका छोट्या भागात हर्बल गार्डन तयार करण्यात आले, प्रत्येक वनस्पतीची माहिती देणारे फलकही होते.

दिल्लीतलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वार्षिक सेल ! दिल्लीत कडक थंडी व कडक उन्हाळा व या दोन ऋतुंच्या मध्ये कधीतरी येणारा, ‘पावसाळा’ म्हणावयासाठी जीभ अडखळावी, असा तिसरा ऋतु. मार्च-एप्रिलच्या सुमारास या सेलच्या पाट्या सर्वत्र ठळकपणे झळकत. ऐन थंडीत मिळणारे ३ ते ६ हजार रुपयांपर्यंतचे सुंदर स्वेटर्स व त्यासारखे कपडे साहित्य थंडी पळताच ८००-१०००-१५००अशा किंमतीत विक्रीसाठी काढायचे हा इथल्या दुकानदारांचा जणू नियम. त्यामुळे यावर्षीच्या मार्च-एप्रिलमध्ये पुढच्या थंडीच्या सोयीसाठी ऊबदार कपडे खरेदी करून साठवायचे. तसंच उन्हाळा संपताना ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उन्हाळ्यात वापरण्याच्या कपड्यांचे सेल. हे चक्र पहिली तीन-चार वर्षे आम्हीही नियमितपणे केले. कालांतरांने घरातील कपाटे उबदार व अन्य कपड्यांनी खचाखच भरली तेव्हा मात्र या सेल प्रकरणाचा आम्ही धसका घेतला.

10407632_875975012443978_961837904929792417_n
दिल्लीतले सेल

राजधानीचे शहर असल्याने येथे दररोजच काही ना काहीतरी घडतच असते. रशियाचे किंवा जपानचे पंतप्रधान/राष्ट्राध्यक्ष भेटीस येणार असले तर नेहमी हक्काने, हवे तेव्हा जाण्यासारखे असलेले लोधी गार्डन पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे ओकेबोके होते. राजघाट समाधीकडे कोणी व्हीव्हीआयपी दर्शनास जाणार असला की रस्त्यावर ५०-५० फुटांवर सशस्त्र पोलीस उपस्थित दिसतात आणि जाणायेणार्‍यांना रस्त्याच्या जवळपासही फिरकू देत नाहीत. सरावाने याही गोष्टींची सवय झाली. सुरुवातीस मात्र कुतुहलाने कोणाचा ताफा किती मोठा व त्यात कोणत्या गाड्या याची रसभरीत वर्णने व चर्चा आम्हीही करत गेलो !

साधारणपणे १५ डिसेंबर ते २० जानेवारी हा दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा कालखंड. विशेष म्हणजे कमाल व किमान तापमानातील अगदी कमी फट. म्हणजे पुण्यात रात्रीचे तापमान ६-७ डिग्रीपर्यंत झाल्यावर सर्व वर्तमानपत्रांत ‘पुणे गारठले’ असा मथळा यायचा. पण हे गारठणारे तापमान मध्यरात्री/ पहाटे कधीतरी एक तास असणार ज्यावेळेस सर्वजण दुलईत शांत झोपलेले असतात ! आणि दिवसा याच तापमानात २२-२५ डिग्रीपर्यंत वाढ झाला की ती थंडी आल्हाददायक होते. या २२-२५ ते ६-७ च्या पुण्याच्या अनुभवानंतर ५-६ डिग्री रात्रीचे व १५-१८ डिग्री दिवसाचे तापमान दिल्लीत अनुभवल्यावर ‘खरी थंडी’ काय असते, ते नीटच समजायचे. अंगावर कमीतकमी दोन तीन स्वेटर जाकीट कोट यांचे थर घातल्याशिवाय वावरणे शक्यच नसायचे. आणि याच्या जोडीला दाट चकवणारे धुके. इतके दाट की अक्षरशः दोन फुटावरचे दिसू नये. त्याच रस्त्याने वर्षानुवर्षे जाऊन एक-दोनदा माझ्या कार्यालयाकडे वळणार्‍या छोटा रस्त्याचाही मला अंदाज आला नाही.

408598_10151327720893559_1398190387_n
दिल्लीतली सायकल सफर

दिल्लीतील संस्मरणीय अनुभवांपैकी एक माझा सायकल चालविण्याचा व्यायाम ! आणि तोही जवळपास १२ वर्षे नित्यनेमाने सकाळी ६ ते ७ यावेळात. सायकलीने मला भरपूर आनंद दिला. एखाद्या भाविकाने मंदिरात परमेश्वराच्या दर्शनाला न चुकता जावे इतपत शिस्तीने मी घर ते इंडिया गेट-राजपथ-राष्ट्रपती भवन व परत अशी १०-१२ किमीची सायकलरपेट प्रत्येक दिवशी केली. उन्हाळा, जेमतेम असलेला पावसाळा, थंडीची सुरुवात, कडक थंडी-धुके, फेब्रुवारी-मार्चमधील प्रसन्न हवा आणि त्यानंतर एप्रिल-मे चा व सप्टेंबरपर्यंत लांबणारा कडक उन्हाळा-दमट हवामान-असे दिल्लीचे वर्षभराचे ऋतुचक्र नव्या नवलाईने प्रत्येक दिवशी सकाळी सायकलवर अनुभवण्यास मिळे.

सुरुवातीचे काही दिवस घरातून सायकल काढून एक दिशा ठरवून लांबपर्यंत जाऊन परत यायचो. त्यामुळे आमच्या घराच्या आजूबाजूचा सर्व परिसर परिचयाचा झाला. नंतरची अनेक वर्षे साऊथ एकस्टेशन ते इंडिया गेट-राजपथ हा रस्ता ठरविला. अनेक दिवशी सकाळी-विशेषतः थंडीच्या दिवसात रस्त्यावर फारसे कोणी नसे. तो एकांत मला खूप आवडत असे. या सायकलप्रवासात चाकाच्या गतीबरोबर जुनी गाणी, प्रार्थना, प्रबोधिनीत शिकलेली राष्ट्रभक्तीपर गीतं मोठमोठ्याने गात असे. घरी परतल्यावर धडधडणारी छाती, घामाने निथळणारे कपडे. मग पत्नी (व कधी घरी आलेल्या पाहुण्यांबरोबरच्या) समवेत चहा-गप्पा अशी दिवसाची सुरुवात खूप छान व्हायची. It was my private time and sacred space! मी अंधारात सायकल चालवू नये अशी ज्योतीची कुरकुर असायची पण सुदैवाने पंधरा वर्षांत कोणताही अपघात न होता मी सुखरूप परतलो. ऐकण्याच्या वयात असेपर्यंत माझा मुलगाही बर्‍याचदा माझ्या बरोबर रपेटीत यायचा.

दिल्लीच्या या सकाळी तासभराच्या प्रवासात दिल्लीत कोणते ‘वारे’ वाहते आहे, याचेही दर्शन व्हायचे.  चौकाचौकात लागलेले बॅनर-झेंडे राजकीय तापमानाची चाहूल देणारे. नेत्यांच्या वाढदिवसाचे फलक कोण कोणाची चमचेगिरी करतो, हे सांगणारे. ल्युटेन्स दिल्लीतल्या घरांच्या पाट्या निवडणुका-सत्ताबदलाबरोबर ताबडतोब बदलायच्या. कालपर्यंत सत्ताधीश असलेले मंत्री-खासदार-न्यायाधीश-नियोजन मंडळाचे सदस्य राजकीय बदलानंतर अक्षरशः रस्त्यावर कसे येतात, म्हणजे त्यांना त्यांची घरे कशी सोडावी लागतात,  हे अशा सकाळीच कळायचे. आणि लटपटी खटपटी करून वर्षानुवर्षे कोणकोण या मोठ्या बंगल्यांमध्ये ठाण मांडून राहिले आहेत तेही. इंडिया गेट परिसरात सकाळी होणारी सैनिकपथकांची अदलाबदल, राजपथावर स्केटिंग करणारी मुले-मुली, व्यायामास आलेले पोलीस, राष्ट्रपती भवनातून चक्कर मारण्यासाठी बाहेर निघालेले देखणे घोडे व त्यावर स्वार झालेले सैनिक.  कधी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जमलेल्या कलाकारांचा ताफा. कधीतरी नट-नट्या, मिलिंद सोमण, रेसिंग करणारा कार्तिकेयन, मॅरेथॉन धावण्याचा सराव करणारे अनिल अंबानीही…!

या तासभराच्या सायकल प्रवासात माझ्या मनात दिवसभराच्या कामांची यादी तयार व्हायची, नवीन कल्पना सुचायच्या, रेगांळलेल्या विषयांवर काही उत्तरे दिसू लागायची, कधी प्रसन्न, कधी दाहक सूर्योदयाचे दर्शन डिफेन्स कॉलनीच्या उड्डाणपुलावरून व्हायचे आणि कडक थंडीत धुक्यामुळे अंगावरच्या कपड्यांवर जमलेले थोडेसे बर्फाळ दव, फॉर्स्ट असे सुंदर क्षण या सायकल व्यायामात लाभायचे. आणि हे २००१ पासून! हे अशासाठी लिहिले की गेला ४-५ वर्षात नवश्रीमंत वर्गात सायकल चालविणे हा जणु काही आज आलेला नवाच व्यायामप्रकार समजला जातो.  आताच्या सायकलच्या किंमतीही ५ हजार ते १ लाख रूपयांपर्यंतच्या ! मी मात्र माझ्या वडिलांच्या तगड्या जुन्या अ‍ॅटलास सायकलीशी एकनिष्ठ राहून दिल्ली बघितली.

13450206_1187410407967102_7586427011540417799_n
मित्राबरोबर

या सायकल व्यायामामुळे दिल्लीत एक नवा मित्र भेटला व दोन वर्षांत आमची घट्ट मैत्री झाली. इंडिया गेटहून एकदिवस परतताना सकाळी रिंग रोडवर अ‍ॅन्ड्रज गंज पुलाच्या खाली गगनदीप सिंग सप्रा व त्याची पत्नी हरप्रीत सिंग – हे शीख दांपत्य एकाच सायकलवर कोणाची तरी वाट पाहात उभे होते. सायकल लांबलचक, नवराबायको एकामागोमाग एक दोन सीटवर, प्रत्येकाने आपले पेडल मारायचे पण सायकलचे नियंत्रण (भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणे!) पुढच्या सीटवर बसलेल्या गगनच्या हातात. हरप्रीतने शब्दशः नवर्‍याच्या पावलावर पावले टाकल्यासारखी पायडल मारत राहायचे! असो. गगन भरभक्कम तर हरदीप नाजुक. कुतुहलाने थांबून आमच्या गप्पा सुरु झाल्या आणि लगेचच आमची तार जुळली!

नंतरची दोन वर्षे गगनबरोबर आम्ही पाचसहाजणांनी एकत्र सायकल चालवण्यास सुरुवात केली. गगन पुण्यात इंजिनिअर असल्याने, त्याचे अनेक नातेवाईक पुण्यात असल्याने तोडकोमोडके मराठीही बोलत असे. गगनमुळे मला शेवटच्या दोन वर्षात वेगळी दिल्ली समजली. गगनचा स्वतःचा मोठा व्यवसाय होता. त्याला अनेक विषयात गती होती.  संगणक, राजकारण, इतिहास, व्यवसाय, जागतिक घडामोडी अशा अनेक विषयावर सकाळी सत्संग होत असे. संताबंता विनोद एकमेकांना सांगणे हाही त्या सत्संगाचा भाग. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सहा-आठ सायकली होत्या त्यामुळे त्या सायकलींबद्दल चर्चा. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्याला दिल्लीच्या इतिहासात रस होता. दिल्लीत जवळपास ४००-५०० ऐतिहासिक स्मारके आहेत त्यामुळे दररोज नवीन कोणते तरी स्थळ शोधून तेथपर्यंत रपेट, ती स्मारकं (बहुतांशी मोडकळीस आलेली, दुर्लक्षित, अतिक्रमण झालेली) बघणे. त्यामुळे अनेक जागा, त्यांचा इतिहास याची छान ओळख व्हायची. हा उत्साही गृहस्थ लगेच घरी जाऊन त्या दिवसाच्या सहलीचे फोटोही फेसबुकवर टाकायचा. तो दिल्लीवासी असल्याने राजकारण्यांसंबंधी त्याला खास आतल्या गोटीतील बातम्या असायच्या. त्या गॉसिपचीही देवाणघेवाण व्हायची! शीला दीक्षित यांच्या घरावरून जाताना ‘शीला की जवानी’ मोठ्याने गात जाणे हाही त्याचा आवडता छंद. तो एक नंबरचा खवैय्या. दिल्लीतील रात्री, पहाटे उघड्या असणार्‍या पाव आम्लेट, भज्यांच्या टपर्‍यांच्या जागाही त्याला नेमक्या माहिती. बर्‍याचवेळा सत्संगाचा मध्य वा शेवट अशा खादाडीने संपन्न होई! गगनबरोबरच्या मैत्रीमुळे खास ‘दिल्लीकरांचे’ भावविश्व  समजायचे.

दिल्ली शहरातील खेळाच्या उत्कृष्ट साधनसुविधांविषयी लिहायलाच हवं. १९८२ च्या आशियायी खेळांसाठी बांधलेले सिरी फोर्ट क्रीडांगण देशभरात उत्कृष्ट सोयींसाठी प्रसिद्ध आहे. कॉमनवेल्थ गेम्सनिमित्ताने पुन्हा नव्याने येथील खेळांची क्रीडांगणे देखणी करण्यात आली आहेत. सिरी फोर्टमध्ये पोहणे, बॅडमिंटन, चालण्यासाठीचा मातीचा ट्रॅक, फुटबॉल-हॉकीची क्रीडांगणे अशा छान सुविधा आहेत. सिरी फोर्टच्या पोहण्याच्या तलावात ज्योती, पार्थ अनेक वर्षे नियमितपणे पोहले. सिरी फोर्टच्या क्रीडांगणावर सायना नेहवाल-सिंधु यांच्या खेळांना उपस्थिती लावू शकलो. फेडरर व अन्य टेनिसपटुंच्या उपस्थितीमुळे गाजलेल्या इंडियन टेनिस लीगचाही आस्वाद घेता आला.

300771_10150281308013559_982248_n
मित्रांबरोबरचं चहापान

मी, ज्योती व पार्थ दिल्लीत चौदा वर्षे भरभरून जगलो. या अनुभवांमुळे आमचे आयुष्य खूप समृद्ध झाले. २००१ ते २०१५ अशी चौदा वर्षे आम्ही दिल्लीत राहून पुण्याला परतलो. पुण्यात सहा वर्षे जम बसलेला, भरपूर आर्थिक स्रोत असणारा माझा प्रशिक्षण सेवा देण्याचा व्यवसाय शांतपणे बंद करून, वेगळा अनुभव घेण्यासाठी आम्ही सदाशिव पेठेतून एकदम दिल्लीतच गेलो. हा निर्णय धाडसी होता. अर्थात, यापूर्वीही मी बरीच वर्षे कुटुंबासमवेत गुजरातमध्ये सहा वर्षे, व देशाच्या अन्य राज्यांतही वास्तव्य केलं होतं.

दिल्ली वास्तव्यात आम्ही तिघेही ‘मोठे’ झालो. आमचे भावविश्व विस्तारले, समृद्ध झाले. छोट्या डबक्यातून विहिरातून बाहेर पडून मोठे जग बघण्यास मिळाले. विविध माणसं, त्यांचे स्वभाव, अनेक भाषा, संस्कृती यांचा परिचय झाला. राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक घटनांचे व्यापक सामाजिक अर्थ समजण्यास मदत झाली. ‘भारत माझा देश आहे’ व ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ म्हणजे काय हे जवळून पाहण्यास मिळाले. चौदा वर्षांनंतर जन्मगावी म्हणजे पुण्याला परतल्यावर आज मागे वळून पाहताना, बरोबरच्या समवयस्क मित्रपरिचितांचे नेमके-कोते-जिथल्यातिथे राहिलेले विश्व पाहताना आपण बर्‍याच अर्थाने वेगळ्या अनुभवांतून जाऊन वेगळी व्यक्ती म्हणून वावरू शकतो, याची सुखद प्रचिती वरचेवर येते. परतून जवळपास वर्ष होऊनही आमचे एक मन दिल्लीमध्येच अजून घुटमळते आहे. दिल्लीतील धुक्याच्या बातम्या, ‘आप’ नाट्यमंचावरचे राजकीय प्रयोग, मोदी-सोनिया राजकारण, सम-विषमचा रंगलेला प्रदूषण-वाहतूक वाद असे सर्वच विषय जिव्हाळ्याचे वाटतात.

दिल्ली वास्तव्यामुळे मला माझ्या ग्रामीण विकसन या कामाच्या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या मायक्रोफायनान्स व लाइव्हलीहूड या अभ्यासविषयातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या भेटी घडत गेल्या. अशा विषयातील राष्ट्रीय परिषदांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती म्हणून भाषणांची खूप निमंत्रणेही मिळाली, चर्चासत्रात सहभाग घेता आला. पुण्यातल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने शिकता आले, समवयस्क तज्ज्ञांबरोबर स्वतःची मते तपासून घेता आली. माझ्या पत्नीनेही १४ वर्षांत महिलांच्या प्रश्नावर विशषतः समुपदेशनाच्या अंगाने महत्त्वाचे काम केले.

सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीबद्दल आम्ही दिल्ली वास्तव्यानंतर अधिक सजगपणे विचार करू लागलो. डाव्या-उजव्या विचारसरणींच्या त्या त्या वेळच्या अतिरेकी भूमिकांमधून मध्यममार्गी विचाराकडे आम्ही दोघेही सरकत गेलो. वृत्तपत्रांतून ठळकपणे दिसणार्‍या घटनांमागचे कार्यकारणभाव-सूत्रधार कोण याचेही राजकारण व अर्थकारण आम्हाला दिल्लीमुळे समजले. सरकारी-खाजगी-स्वयंसेवी यंत्रणा कशा चालतात, नागरिकांना कशा नाडतात याचाही, कोणी गॉडफादर पाठीशी नसल्याने, थेट अनुभव घेतला. १४ वर्षातील ६ वर्षे मतदारयादीत आमची नावे यावीत, यासाठी झगडण्यात गेली. त्यानंतर तीन वेळा निवडणुकीत मतदानाचा हक्क मात्र बजावला. एरवी निद्रिस्त असलेल्या यंत्रणेने दिल्ली वास्तव्य संपतानाच मतदारयादीतून तुमचे नाव काढून टाकण्यात आले आहे,  असे प्रेमपत्र दिल्ली सोडून दोन महिने व्हायच्या आतच अत्यंत चपळाईने पाठविले. ते पत्र हातात आल्यावर मात्र खरंच लक्षात आले की दिल्लीचं दानापानी सरकारी यादीतूनही नाव वगळल्याने आता संपलं आहे ! माझे कामही संपले. त्यामुळे काहीशा अनिच्छेने दिल्लीचा मुद्दाम आम्ही आवरता घेतला !

दिल्लीतला काळ फक्त आनंदाचा, सुखाचा नव्हता.  सर्वसाधारण नागिरकाला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्या त्या सर्व अडचणी आम्हालाही आल्या. त्यांना सामोरे जात जात आम्ही जास्त खंबीर झालो. तिथे गेल्या गेल्या जून महिन्यातच ४५-४७ डिग्रीचे भाजणारे तापमान हा कधीही न अनुभवलेला विषय होता. पुण्याहून दिल्लीस जाताना खर्चही बराच झाल्याने तो व पुढच्या वर्षीचा कडक उन्हाळा आम्ही फक्त पंख्यावर काढला. सहनशक्तीची परिसीमा गाठल्यावर मग क्रमाक्रमाने कूलर व नंतर निदान झोपण्याच्या खोलीत वातानुकूलीत व्यवस्था बसवून घेतली. पहिल्या वर्षीच्या थंडीत माझा मुलगा आजारी पडला. सुदैवाने जवळच डॉ. सात्विक पती-पत्नी भेटले. नंतर ते आमचे फॅमिली डॉक्टरसारखेच झाले.

दिल्लीतील सुरुवातीची चार-सहा वर्षे ज्योती नोकरी करत होती. तिच्या नोकरीच्या जागा प्रथम गुरगाव व नंतर नोएडा अशा लांब अंतरावरच्या. त्यामानाने माझे कार्यालय १५-२० मिनिटांच्या अंतरावर होते. गेल्यागेल्या पहिल्या महिन्यातच तिने दणकट डिझेल इंडिका चालवण्यास सुरुवात केली. दिल्लीच्या रस्त्यावर इंडिका गाडी चालविणार्‍या त्या काळात मोजक्या स्त्रिया असाव्यात. माझा प्रवास दुचाकीवरचा असे. चार चाकी चालविण्याची, तीही दिल्लीचे रस्ते व ट्रॅफिक यांना सामोरे जात, हिंमत माझ्यामध्ये यायला दोन-तीन वर्षे लागली.

सर्वसाधारण नागरिकांना येतात तशा आजारपण – एकटेपणा याही अडचणींतून आम्ही गेलो. पहिल्या काही वर्षांत – मदतनीस नव्हते. आजारी पडल्यानंतर भारंभार चाचण्या व औषधांचा भडिमार न करणारा असा विश्वासाचा डॉक्टर दिल्लीत सापडेल अशीही खात्री नसायची. हवामान बदलाने सतत दोन-तीन वर्षे मी श्वसनाच्या आजाराने आठवडाभर बेजार व्हायचो. ज्योतीचीही दोन मोठी आजारपणे झाली. आजारपणाबरोबर पुण्याला वर्षातून दोन-तीन वेळा जाण्यायेण्यात प्रवास, नातेवाईकांना भेटी देणे यातही पुष्कळ खर्च व्हायचा. पण पहिल्या तीन-चार वर्षानंतर जेव्हा मी नोकरी बदलली तेव्हा आमची सांपत्तिक स्थितीही पालटली, बचतही वाढली. पुण्याला येण्याजाण्याचे प्रमाणही काहीसे कमी झाले. पाहुण्यांचा ओघ मात्र १५ वर्षे सतत चालू असायचा. ज्योतीच्या ‘द्रौपदीच्या थाळी’ मुळेही अनेकांना आमचे दिल्लीचे घर आपलेसे वाटायचे.

वृद्ध आई-वडिलांपासून दूर असल्याने कोठे तरी अपराधीपणा-खंत-दुःख अशा संमिश्र भावना कायमच सोबतीस असायच्या. ते दोघेही आमच्याकडे सर्व घरांमध्ये महिनाभर येऊनही गेले पण काही दिवसांनंतर दोघांनाही कंटाळा यायचा, दिल्लीचे टोकाचे हवामान त्यांना झेपायचे नाही. वडिलांच्या वृद्धत्वाचा व विसरण्याच्या आजाराचाही ताण आईच्या अंगावर यायचा.

दिल्ली सोडून तीन वर्षे होऊन गेली. पण तेथील उबदार थंडी, जवळचे मित्र, प्रशस्त लोदी गार्डन, भव्य इंडिया गेट, आमची मेट्रो आणि या शहराच्या श्वासाश्वासात असेलेले राजकारण पुण्यात आल्यावर आम्ही पूर्ण हरवून बसलो. पुण्याचा  कोतेपणा, तेच तेच पुणेरीपणावरचे, पाट्यांवरचे विनोद, नको तितका अहंभाव व खुजेपणा. या सर्वांना कंटाळून गेलो. पण पर्याय नसल्याने रुळण्याचा प्रयत्न करतो आहोत. कामासाठी दिल्ली प्रवासाची संधी चालून आली की आनंद होतो. चार-सहा दिवस दिल्लीला जाऊन पुन्हा तीच जुनी वर्षे जगून परततो !

अजित कानिटकर

422254_491112360930247_1914455939_n

इ-मेल – kanitkar.ajit@gmail.com

ग्रामीण विकास तज्ज्ञ. फोर्ड फाऊंडेशनचे प्रोगाम ऑफिसर म्हणून काम केले आहे. अनेक वर्षांच्या दिल्लीतल्या वास्तव्यानंतर आता पुण्यात परतले आहेत. सध्या टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टबरोबर काम करत आहेत.

5 thoughts on “मुक्काम इव्हेंटफुल दिल्ली

 1. मस्त लिहिलय…सध्या दिल्लीतच आहे। त्यामुळे अजुनच छान वाटल!

  Like

 2. खूपच सुरेख झाला आहे हा लेख…
  मस्त मजा आली वाचताना..
  आणि​ शेवटचा टोला अत्यंत मार्मिक

  Like

 3. अजित कानिटकर, प्रशिक्षणाच्या निमित्ताने राहण्याचा योग आला होता. सगळ्या आठवणी जशाच्या तशा आहेत. छान लिहीलयत.

  Like

 4. मस्त… दिल्ली खूप जवळून पहायला मिळाली…!

  Like

 5. दिल्लीला बऱ्याच वेळा जायला मिळाले आणि दर वेळेस नवीन गोष्टी समजत गेल्या. दिल्लीबद्दल आकर्षण नेहमीच अधिक राहिले आहे. लेखात मांडलेल्या मतांशी पूर्ण सहमती आहे. लेख मनापासून आवडला.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s