हृषीकेश कुलकर्णी
“मला हे कळत नाही, इंडियन लोकांना परदेशात जेवणाचे इतके प्रॉब्लेम का येतात?” माझा बॉस मला विचारत होता. पुण्याहून बदली होऊन मी नुकताच हाँगकाँगला रुजू झालो होतो. वयाच्या सदतिशीशीपर्यंत ‘पुणेऽपि जननम् पुणेऽपि मरणम्’ करणारा, परगावच्या नोक-या पटापट सोडणारा, पुण्याबाहेरच्या प्रत्येक ऑफरला, विशेषत: मुंबईच्या, निकराने विरोध करणारा पक्का पुणेकर मी. शेवटी जास्त पगारासाठी हाँगकाँगला जायला तयार झालो होतो. तिथे गेल्यावर, सुरुवातीच्या बावचळलेल्या दिवसांत, शिकायला मिळालेल्या गोष्टींपैकी महत्त्वाची म्हणजे भारतीय माणूस जेवणाचे हाल करून घेतो.
जगात असंख्य लोक कामानिमित्त दुस-या देश-प्रदेशात जाऊन राहतात आणि जातील तिथलं अन्न विनातक्रार आवडीनं खातात, पण भारतीय लोकच या बाबतीत पराकोटीचे नखरेल, असा काहीतरी माझ्या बॉसचा रोख होता. त्यातही, जर इतर देशांचे लोक भारतीय जेवण मिटक्या मारत जेवतात तर भारतीयांना इतर देशीय अन्न खाताना ऊर्ध्व का लागावा असाही बॉसचा उपप्रश्न होता. हे म्हणजे, “मी जर विश्वसुंदरीबरोबर आनंदाने डेटवर जायला तयार आहे तर तिला माझ्याबरोबर यायला काय प्रॉब्लेम आहे?” असं मी विचारण्यासारखं आहे असं मी (अर्थातच मनातल्या मनात) म्हणालो. अरे, सकाळी सकाळी बैलाच्या नाहीतर डुकराच्या दळलेल्या मांसाच्या, प्रिझर्व्हेटिव्हनं भरलेल्या चकत्या बेचव चीजबरोबर घशात तोठरे बसवणा-या पावात खुपसून लचके तोडणा-या कमनशिब्यांना गरमगरम इडल्या नाहीतर कांदेपोहे न आवडायला काय जातंय? पण परतफेड म्हणून काय मी त्या शुष्क पुठ्ठ्यांसारख्या दिसणा-या अन् लागणा-या लाह्यांमध्ये गारढोण दूध घालून गिळून तृप्तीची ढेकर देऊ? असले बाणेदार विचार करत “आय विल ट्राय” असं बॉसला सांगितलं आणि कामाच्या गोष्टींकडे विषय वळवला.

नंतरच्या बारातेरा वर्षांत हाँगकाँग आणि जर्मनीत राहताना, अठरापेक्षाही जास्त पगड देशांना कामासाठी भेटी देताना, संस्कृतींमध्ये मिसळताना मुद्दाम नाही, पण आपोआपच खूप बदललो. जगात आपणच एकमेव महान नाही आहोत, हे अनेक पातळ्यांवर शिकताना खाण्यापिण्याच्या बाबतीतही, मूळ भारतीय शाकाहारी पिंड तसाच ठेवूनही पुष्कळसा उदारमतवादी झालो. आपण कधीही न घेतलेल्या चवींतसुद्धा काही चांगले स्वाद सापडू शकतात हे शिकलो. विशेष करून, हे करताना अफाट मजा आली, त्यातले काही अनुभव मांडीन म्हणतो.
एकदा असाच स्टॉकहोम (स्वीडन) मध्ये भुकेने तळमळत हिंडत होतो. बरेच दिवस मांसाहार करून करून वैताग आला होता. काही करून शाकाहारी काहीतरी मिळाले तर बरे होईल असं स्वत:शीच म्हणत फिरत होतो. या वेळी हॉटेल जरा गावाबाहेर होते त्यामुळे मनासारखं ठिकाण काही मिळत नव्हतं. एक ’इंडियन रेस्टॉरंट’ अशी पाटी बघून आत गेलो तर ते निघालं बांग्लादेशी. तसाच तिरीमिरीत बाहेर. आज भारतीय म्हणजे भारतीय, नो सब्स्टिट्यूट….. असं मनात घोळवत फिर फिर फिरलो. कुठेच काही नाही. हॉटेलच्या आसपासची सर्व ठिकाणं धुंडाळून पाहिली. सगळीकडे पाश्चात्य अन्न. मला कधीच न आवडणारं. बेचव मांसखंडांनी भरलेलं. निराश होऊन हॉटेलला परतलो. जाताजाता रिसेप्शनकडे नजर टाकली तर ज…रा बरं वाटलं. तिथे असलेल्या सुवर्णकेशी गौरांगना नेत्रसुखद होत्याच. पण मला आणखी बरं वाटलं ते त्यांच्या मागच्या चकचकीत काचकपाटात पाहून. तिथे लहानसेच असे दोन सिंह ठेवलेले होते. सर्व चिनी देवळांत दिसतात तसे. अरेच्चा, म्हणजे या हॉटेलचा मालक चिनी आहे तर! म्हणजे इथे एकतरी चिनी स्वयंपाकी सापडणार. निदान चिनी तरी खायला मिळेल आणि एखादवेळेस शाकाहारी पण. वा वा वा. तेव्हा मला हाँगकाँगमध्ये राहायला लागून काही वर्षं झाली होती. अन् मी ऐकूनऐकून मोडकंतोडकं चिनी (कॅन्टोनीज् आणि मँडरीन) बोलत ऑर्डर द्यायला शिकलो होतो. एका परीने ते आवश्यकच होतं. कारण तेव्हा कामानिमित्त चीनमध्ये खूप फिरायला लागायचं. तेव्हा चीनमध्ये ना भारतीय खायला मिळायचं (आता सहज मिळतं), ना आपण ज्याला ‘चायनीज्’ म्हणतो ते. आपले “शेझवान्, चॉपसुई, हाका नूडल’ इत्यादी शब्द तर चिन्यांनी तेव्हा बापजन्मात ऐकले नव्हते (आताही नसतील). लोकल चिनी अन्न म्हणजे भूचर, जलचर, उभयचर, सरपटणारे, वळवळणारे, उडणारे….. समस्त प्रणिमात्र, ना कुठली जात वर्ज्य, ना कुठलाच अवयव, शिवाय मेलेले, अर्धमेले, जिवंत कसेही, आणि एकदम मसालाविरहित, मीठविरहित…. पण त्यातूनही, सहकार्यांबरोबर जेवून जेवून, सवयीने, त्यांची वाक्यं कॉपी करत त्यातल्या त्यात मसालेदार, त्यातल्या त्यात शाकाहारी अन्न मागायला आणि मिळवायला शिकलो होतो. ‘लँग्वेजेसवर आपली भलतीच कमांड!’ अशी स्थिती अजिबातच नव्हती, पण वेटरांना कळेल इतपत बोलायला जमायला लागलं होतं.

तीही सुरुवातीला एक मजाच झाली. बेजिंगमध्ये ऑफिसच्या जवळच एक ’फे थांग यू श्यान” नावाच्या स्सच्वान (आपण ज्याला मराठीत शेझ्वान म्हणतो) रेस्टॉरंटात वारंवार जाऊन तिथली स्टाफमंडळी ओळखायला लागली होती. विशेषत: चांग यू नावाची एक वेटरीण तर खूपच. मला बघितलं की पटकन् माझा ताबा घेऊन तिच्या टेबलवर बसवायची. माझ्या ऑर्डरी सवयीने तीच म्हणून दाखवायची, मी नुसती मुंडी हलवायचो, ती गोड हसत आणून द्यायची. सगळाच सौहार्दपूर्ण प्रकार. बरोबरचे सहकारीसुद्धा हे सगळं चवीनं बघायचे. मधेच काहीतरी चिनी चावट डायलॉग मारायचे. चांग यू लाजून लाल व्हायची. पण एकूणच माझा ‘कुलकर्ण्याची धाव कुंपणापर्यंत’ आवाका सगळ्यांच्याच ध्यानी येण्यासारखा असल्यामुळे ‘तसलं’ काही होणार नाही या खात्रीने हसतहसत ती माझे खाण्यापिण्याचे लाड पुरवायची. मीही मनातल्या मनात ” काश, मैं पुणे का कुलकर्णी नहीं होता….” असा कधीकधी विचार करायचो. पण दरवेळी मला झेपणारं चिनी जेवण मिळवून खूष व्हायचो.
एकदा असाच संध्याकाळी काही कलिगांना आणि कलिगिणींना घेऊन फेथांगयूश्यान मध्ये गेलो. त्यांना, (विशेषत: कलिगिणींना)। इम्प्रेस करायला म्हणून त्यांना सांगितलं, आज ऑर्डर मी करतो. तेही (आणि त्याही) कौतुकाने आणि उत्सुकतेने पाहू लागले. मी त्यांना सांगितलं, काळजी करू नका, अपना इधर एक सॉलिड काँटॅक्ट है. ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या सुंदरीला सांगितलं, “मुली, तू खूप सुंदर आहेस, पण (हे इतकं अर्थातच मनातल्या मनात), जा, माझ्यासाठी चांग यू ला घेऊन ये (हे उघड)”. ती बावचळलीच. माझे सहभोजनार्थीही किचित दचकले. “पण…. खायला, प्यायला….?” ती म्हणाली. मीही ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ स्टाईलमध्ये “खायचंप्यायचं नंतर, आधी चांग यू!” असं ठणकावून सांगितलं. आपला वट होता ना चांग यूपाशी. सुंदरी गोंधळून परत गेली. एका कलिगिणीला (हीही सुंदरच, पण तिच्याबद्दल नंतर कधीतरी) सगळा प्रकार माहीत होता. ती खुदूखुदू हसायला लागली. इतरांना तिनं चिनीमध्ये काहीतरी खुसुरफुसुर करत सांगितलं, तेही आधी खुदूखुदू, आणि नंतर खदाखदा हसायला लागले. मी म्हणालो, हसा लेको, आता माझी मैत्रीण येईल मग बघा तुम्हाला चवदार आणि शाकाहारी चिनी कसं खायला घालतो ते. दोन मिनिटांनी मघाचीच सुंदर वेटरीण आली, अन् माझ्यासमोर एक छोटीशी, नाजुकशी, सुबकशी सोयासॉसची बरणी ठेवून म्हणाली, हे घे चांग यौ. आतातरी खायचंप्यायचं सांग! मामला सरळ होता.

चिनी भाषेत नुसतेच शब्द नाही, तर त्यांच्या उच्चाराच्या हेलाला पण अर्थ असतो. एकाच शब्दाचे वेगवेगळ्या हेलात उच्चारल्यावर मँडरीनमध्ये तीनचार (कँटनीजमध्ये तर कधीकधी नऊ) वेगवेगळे अर्थ होतात. उदाहरणार्थ ‘मा’ या एकाच शब्दाचे हेल बदलू तसे ’का?’ (प्रश्नार्थक), किंवा ’घोडा’, किंवा ’झिणझिण्या’ असे वेगवेगळे अर्थ होतात. माझा ‘चांग यू’ चा हेल चुकल्यामुळे त्याचा अर्थ सोयासॉस असा झाला होता….. अर्थातच आतापर्यंत कलीग आणि कलिगिणींची भरपूर करमणूक झाली होती. त्यांनी ऑर्डरचं काम स्वत:वर घेतलंच आणि मला उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून खास चिनी रेस्टॉरंटात वापरायला एक वाक्य शिकवलं.
“श्यावचिए, शुइज्याव् दुओश्याव् च्येन् यीवान्?” याचा एक अर्थ होते, ’हे मुली, वाटीभर चिनी मोदक केवढ्याला?’ आणि तेच, एक्झॅक्टली तेच शब्द, पण किंचित हेल बदलला तर, ’हे मुली, माझ्याबरोबर एक रात्र घालवायचे किती घेणार?’ अर्थातच मी हे वाक्य कधीच, कोणत्याच अर्थानं वापरलं नाही. वेटरिण मागितल्यावर सोयासॉस मिळणं वेगळं, अन् मोदक मागितल्यावर….. जाऊ दे.
तर तेव्हा स्टॉकहोममध्ये, प्रचंड भुकेलेला, भारतीय अन्न मिळण्याची सुतराम शक्यता नसलेला, पण तरीही युरोपीय मांसखंडयुक्त चवहीन, किंवा उकडलेला अळणी पालक म्हणजेच व्हेजिटेरियन अशा समजुतीने दिलेलं कदान्न खायला अजिबात तयार नसलेला असा मी, तिथे चिनी सिंह बघून सुखावलो. जर चिनी मालकाचं हॉटेल असेल, तर इथे एकतरी चिनी स्वयंपाकी असणार, म्हणजे चवदार चिनी तरी खायला मिळेल. माझा तर्क खरा निघाला. रिसेप्शनिस्ट म्हणाली की हो, आहे आमच्याकडे एक चायनीज् शेफ. ‘मग बोलवा ना त्याला प्लीज!’ म्हणून मी वाक्यांची जुळवाजुळव सुरू केली.

काही महिन्यांपूर्वीच पोर्तुगालमध्ये आसपास कोणालाच इंग्लिश येत नसताना रस्त्यावर भेटलेल्या चिनी जोडप्याशी मँडरीन गप्पा मारून मी जवळचं भारतीय रेस्टॉरंट शोधून काढल्यामुळे तो आत्मविश्वास गाठीशी होता. शिवाय आज मी चिनी मोदक, सोयासॉस यापैकी काहीच मागवणार नव्हतो. थोड्या वेळाने चिनी स्वयंपाकी डुलतडुलत आला आणि रिसेप्शनिस्टने (हीही सुंदरीच, पण तिच्याबद्दल नंतर बोलण्यासारखं काहीच नाही) स्वीडिश भाषेत बरंच काही सांगितल्यावर माझ्याकडे वळून काही न बोलता उभा राहिला. मी माझ्याच्याने होईल तेवढ्या चिनीत त्याला सांगितलं की बाबा, मी भारतीय आहे, मला इथलं जेवण आवडत नाही, पण चिनी चालेल, मात्र ते शाकाहारी हवं आणि तिखट, तर माझ्यासाठी काहीतरी कृपया बनवशील का? एवढं सगळं बोलून मी नेहमीच्या “ओह, किती छान मस्त फाडफाड चिनी बोलता तुम्ही” या प्रतिक्रियेची वाट पाहात, “कसचं कसचं” वगैरे म्हणायच्या तयारीत त्या चिनी शेफाकडे पाहू लागलो. तसं काहीच घडलं नाही. शेफबुवा थंडपणे माझ्याकडे बघतच राहिला. दहाएक सेकंद गेले. “याला चिनी येतं ना?” मी मनातल्या मनात.
“आप महारास्ट्र से आया क्या?” थंडपणे चिन्या म्हणाला आणि मी जागेवरच थिजलो. या मुखातून- हे शब्द? चिन्या एकदम हसला आणि हिंदीत म्हणाला, मी चिनी आहे, पण कलकत्त्याचा. मुंबईतसुद्धा काम केलंय मी. माझे आजोबा कधीकाळी चीनमधून पळून कलकत्त्यात आले. माझ्या वडिलांचा, इतकंच काय, माझाही जन्म तिथलाच. सांग तुला काय खायचंय, चायनीज्, इंडियन, इंडियन-चायनीज्…. सगळं बनवता येतं मला. नंतरचे दोन दिवस फार मजेत गेले. चिन्या जेवायलाही घालायचा आणि हिंदीत भरभरून बोलायचा. स्टॉकहोमची सफर अगदी सुफळ संपन्न केली त्याने.
भारताबाहेर भारतीय खाताना काही गोष्टी मी अनुभवातून शिकलो. तिथे पाकिस्तानी, बांग्लादेशी, नेपाळी हेही लोक स्वत:च्या रेस्टॉरंटाला ‘इंडियन’ म्हणवतात. कदाचित स्वत:च्या राष्ट्रीयत्वाच्या रेस्टॉरंटात कोणीच येणार नाही असं वाटत असणार. तसंच- दक्षिण भारतीय ठिकाणी पंजाबी खराब मिळतं, पंजाबी जागेत कधी डोसा मागवायचा नाही, आत गेल्यावर कुठे देव्हारा दिसतो का बघायचं. दिसला तर(च) दाल तडका मागायचा, नाही दिसला तर(च) बिर्याणी मागवायची, कुठल्याही भाजीत क्रीम घातलंत तर खबरदार हे आधीच सांगायचं, चिकन टिक्का मसाला, मँगो लस्सी असले पदार्थ फक्त गो-यांसाठी असतात, आपण त्यांच्या वाटेला जाऊ नये- हे असे अनेक प्रकार टक्केटोणपे खाऊनच समजले.

खाताखाता आणखी एक गोष्टही कळली, की रेस्टॉरंटचं नाव जरी दाक्षिणात्य (क्रिश्ना, सर्वण्णा भवन, वुडलँड्स), पाकिस्तानी (कॅश्मीर, प्राइड ऑफ इंडिया, कोहिनूर), नेपाळी (हिमालय, एव्हरेस्ट, शेर्पा), किंवा पंजाबी (तंदूर, तंदूर्स किंवा तंदूरी) काहीही असलं, तरी कितीतरी वेळा आतला स्वयंपाक-कलाकार कोणीतरी वेगळाच असतो. तेव्हा असंच शिकतशिकत शेफचं नाव विचारून, असोक असेल तर काय मागवायचं, हरदीप असेल तर काय, कण्णन असेल तर काय किंवा रशीद असेल तर काय ऑर्डर द्यायची याचेही आराखडे तयार झाले. एकूण माझी सोय व्हायचीच, पण कामातही फायदा व्हायचा. एखाद्या देशात दिवसभर मीटिंग-मीटिंग खेळून झालं आणि जेवायला कुठं जायचं ही चर्चा सुरू झाली, आणि मी जर एकटाच भारतीय असलो तर मी भारतीय ठिकाणी जायचा आग्रह धरायचो. सगळेच आनंदाने हो म्हणायचे कारण ‘इंडियन’ खायला सगळ्यांनाच आवडतं, पण काय मागवायचं, कसं खायचं याचं ज्ञान यथातथाच असतं जसं आपण इटालियन, चायनिज वगैरे ठिकाणी जाऊन तेच तेच तीन ठरलेले पदार्थ आलटून पालटून मागवतो तसंच.
मी अशावेळी सगळा कंट्रोलच स्वत:कडे घ्यायचो. कोणतं रेस्टॉरंट आहे, शेफ कोण आहे वगैरे विचार करून सगळ्यांची ऑर्डर द्यायचो, आलेलं अन्न कसं खायचं ते शिकवायचोही, नाहीतर ते लोक भात नुसता खातात, चिकन वेगळं नुसतं खातात, रोटी टेबलवर ठेवून तिचे दोन हातांनी तोडलेले (अरारारा!) तुकडे नुसतेच खातात आणि हे सगळं करताना मधेमधे मँगो लस्सीचे घुटके घेतात! त्यामुळे त्यांना समजावून सांगता सांगता वेळही चांगला जायचा, त्यांनाही मजा यायची, आणि माझा भाव भलताच वधारायचा. विन-विन-विन सिच्युएशन!

असाच एका संध्याकाळी ऑस्ट्रेलियात एक मोठा ऑस्ट्रेलियन घोळका बरोबर घेऊन एका ‘तंदूर’ मध्ये घुसलो. कोणी काही शहाणपणा करायच्या आधीच मी म्हणालो, हे पहा, ऑर्डर मी करतो. कोणाचीच तक्रार नव्हती. मीही त्यांना कसं फॉरिनरांना (आणि फॉरिनारींना) इंडियन ऑर्डर करायचं जरा कमीच कळतं हे मुद्दाम, सोदाहरण समजावून सांगितलं. हो, एक भारतीय या नात्याने खरोखरीची सुपीरिऑरिटी दाखवायची संधी सतत मिळत नाही, मिळतेय तर का सोडा, हा विचार. माझी “Who is your chef?” ची कल्पनाही समजावून सांगितली. मंडळी भरपूर इंप्रेस झाली. “नुसत्या नावावरून तुम्हाला तो शेफ कुठून आलाय अन् त्या भागात चांगलं काय बनतं हे कळतं? कम्माल आहे बुवा” असे भाव सोबत्यांच्या आणि सोबतीणींच्या चेह-यांवर उमटले. मीही त्या अबोल कौतुकवर्षावन्हाणीच्या तृप्तीने वेटरला खूण केली. हायहॅलो झाल्यावर मग मी माझा लाख मोलाचा प्रश्न बाहेर काढला. “कृपया सांगा मला, काय आहे तुमच्या स्वयंपाक्याचे नाव? ते करेल मदत मला ठरवायला काय ऑर्डर करू…” मी अस्खलित इंग्रजीत म्हणत उत्तर ऐकायला थांबलो. साउथवाला असेल तर काय, पंजाबी असेल तर काय, गढवाली, गुजराती, नेपाळी, मुसलमान असेल तर काय वगैरे सर्व याद्या तयार ठेवल्या. बरोबरच्यांनीही कान टवकारले.
“क्रिस रॉबिन्सन, सर. ही इज फ्रॉम सिडने.” वेटर शांतपणे म्हणाला. माझा चेहरा एकदम ९/११ नंतरच्या शेअरबाजारासारखा पडला. आता काय सांगणार कपाळ! ” दाऽऽल, नाऽऽन्, चिकन टीकामस्साला अँड मँगो लस्सी प्लीज्…..” अशी अत्यंत पोपट ऑर्डर दिली मग.
भारतीय सोडून इतर अन्नांतही खूप चवदार प्रकार असतात हे कळायला बरीच वर्षे जावी लागली. हळूहळू त्यात चोखंदळपणाही आला. चिनी, जपानी, कोरियन, इंडोनेशियन, मलेशियन, थाई, व्हिएतनामी, तैवानी, इटालियन, स्पॅनिश, स्वीडिश, जर्मन, अमेरिकन, इथिओपियन, श्रीलंकन, फ्रेंच, मेक्सिकन….सर्व सर्व खायला, अन ते खाताना मजा घ्यायलाही शिकावंच लागलं. पण तरीही भारतीय लोकांना इतरांचं अन्न खायला अडचण का येते हे कळायचंच.
एकदा असाच चीनमधे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत होतो. सकाळी ब्रेकफास्टला एका मोठ्या ग्रूपमधे मी आपला नुसताच ब्रेड आणि लोणी घेऊन गप्प चावत बसलो होतो. बाकी काहीच खायला मन धजत नव्हतं. बरोबरचे इतर भारतीयही वैतागलेलेच होते. एका चैन्नैच्या बाईंची तर फारच पंचाईत होती. बाई होत्या कडक शाकाहारी. तिथे चीनमधे पदार्थ नक्की कोणता ते कळायचेच नाही. बरं एक तर सगळीकडे शाकाहा-यांच्या पोटात ढवळवणारा असा एक वास भरून रहिलेला. विचारावं तर तिथे कोणाला इंग्लिश येत नाही, आणि चैन्नैकरीण बाईंचं इंग्लिश समजायची आम्हालाच मारामार होती तिथे बिचा-या चिन्यांची काय कथा? बाई पार रडकुंडीला यायच्या. नुसतीच फळं खायच्या. “युन्नो डॉक्टर कुलकर्णी, आय्यम नाट्ट ग्विंटु इट्ट वाट्टर्मेलन फॉर्रऽय्यऽर वेन्नाय गोब्बॅक्क!” असं मला तीनदा ऐकवून झालं होतं तोपर्यंत. तर मी असा गरीबपणे ब्रेडबटर खात बसलेला पाहून एक बंगलोरचा डॉक्टर गडी सुखावला. नुकताच तो आणि त्याची बायको हे कुठल्यातरी टूर कंपनीबरोबर युरोपची टूर करून आले होते, ते त्याला सगळ्यांना सांगायचं होतं. त्यामुळे त्याने मला पकडून सर्वांनाच, त्याने कसे युरोपात सर्व ठिकाणी युरोपीय अन्न बिनतक्रार खाल्ले, आणि भारतीयच कसे नखरेल असतात, पण तो कसा टिपिकल भारतीय नसल्यामुळे त्याला कसे जीवनात फायदे होतात.. वगैरे ऐकवायला सुरुवात केली. मी काय करणार? घेतलं ऐकून.

कॉन्फरन्सच्या तिस-या दिवशी मात्र हाच बंगलोरकर मला भेटला तर जरा हरवल्यासारखा, जरा हवालदील दिसत होता. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या एखाद्या कार्यक्रमाला बरोबर हिशेब करुन एखाद्याने प्रसादाच्या वेळेला पोचावे, आणि पोचल्यावर त्याला कळावे की, अजून तर विविध गुणदर्शनच चालू आहे, यानंतर पंधरावीस आरत्या होऊनच मग प्रसाद मिळेल- असं काहीतरी ऐकल्यासारखा भाव होता त्याच्या चेह-यावर. मला बघून एकदम हळूच पण आर्ततेने कुजबुजला, “ए…. हृषी…..!, इधर……. इंडियन खाना कीधर मिलेगा रेऽ?”. मी मंदस्मित केलं ‘अब आया ना ऊँट पहाड के नीचे!’ अर्थाचं, आणि त्याला ‘इंडियन’ खायला घेऊन गेलो. सच्चा भारतीय बाहेर कितीही उड्या मारेल, पण बाहेरख्याली व्यक्तीचं जसं एखादं हृदयाच्या कोपर्यात जपलेलं ‘ट्रू लव्ह’ असावं, तसं बाहेरखाणी भारतीयाच्या मनात आस असते ती भारतीय जेवणाचीच.
तसंच एकदा एका भारतीय प्लास्टिक सर्जन बाईंबरोबर एका युरोपीय कॉन्फरन्समधे पोस्टर केलं होतं ते सादर करायला गेलो होतो. कॉन्फरन्स बरेच दिवस होती आणि बाईंचे खाण्यापिण्याचे बरेच हाल झाले. तेही त्यांनी शांतपणे सहन केले पण चहा पिताना त्यांचा चेहरा एकदम कसनुसा व्हायचा. भारताबाहेर मिळणारा चहा ही म्हणजे शिक्षाच असायची. आजकाल मिळणारे “चाय टी” नामक रसायनही तसे बोअरच असते, पण तेही बरे, असा तो चहा असतो आणि असायचा. कोमट पाण्यात चहाची पिशवी जिवाच्या आकांताने बुचकळूनही अत्यंत फुळकवणी राहणारा असा तो सपक काढा, आणि त्यात ओतायला वरून थंडगार दूध! तोंड दाबून बुक्क्यांचा मार. मी बाईंची तगमग पाहात होतो पण करु काहीच शकत नव्हतो. खरं तर त्यांचं शोधनिबंध-सादरीकरण खूपच छान झालं होतं. एका स्टील फॅक्टरीत झालेल्या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर भाजलेल्या अनेक कामगारांची उत्कृष्ट काळजी घेऊन त्यांनी सर्वांचे जीव वाचवून अविश्वसनीय असे रिझल्ट्स दिले होते. सर्व श्रोत्यांनी त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक केलं होतं. त्यामुळे तशा त्या समाधानी होत्या पण म्हणून रोज रोज फिक्कट चहा कसा गोड लागणार? भारतीय माणसाला (आणि बाईमाणसालाही) चहा हा चहासारखाच हवा असतो, रंगीत गरम पाण्याने ना तहान भागते ना तलफ.
आठेक दिवस बाईंनी युरोपात तसे तळमळतच काढले. त्यांना परतीच्य़ा विमानात बसवून त्यांच्या मुलीला क्षेमकुशल कळवायला मी फोन केला. ती आईला आणायला दिल्ली विमानतळावर जाणार होती. मला एकदम एक आयडिया सुचली. “प्लीज एक काम करशील का?”, मी तिला सांगितलं “विमानतळावर जाताना बरोबर थर्मासमध्ये मस्त गरमगरम आणि कडक असा मसाला चहा घेऊन जा”. ती घेऊन गेली. बाई मुलीला बघून अत्यंत खूश झाल्या, आणि वाफाळलेला मसाला चहा बघून तर त्यांना डायरेक्ट अनावर उत्स्फूर्त उत्कट वगैरे असा हुंदकाच आला असं नंतर कळवलं त्यांनी.
नोकरीमुळे खूप देश फिरायला मिळाले, अजूनही मिळतात. नाना प्रकारची माणसं भेटतात आणि चित्रविचित्र अनुभव येतात. “अरे, पण तू खाण्याचं कसं करतोस?” हा प्रश्न मला अजूनही विचारला जातो. सुरुवातीला खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदीच नखरेल आणि सदाशिवपेठी असणारा मी पुढे खूपच बदललो. इतरांच्या संस्कृतींबरोबरच त्यांच्या चवदार जेवणांचाही आस्वाद घ्यायला शिकलो. नेहमीनेहमी चांगलंच खायला मिळायला पाहिजे हा हट्ट भारताबाहेर विसरून जायलाही शिकलो. पण पर्याय उपलब्ध असेल, तर हटकून भारतीय अन्नच खाल्लं जातं. पूर्वी मी पंजाबी, मोगलाई वगैरे पदार्थांनाही वाळीत टाकायचो, आता मात्र परिस्थितीमुळे काहीही, पण भारतीय आहे ना, मग चालेल हा सर्वप्रांतसमभाव माझ्यात पुरेपूर भिनलाय.
तेराचौदा वर्षांपूर्वी बॉसने विचारल्या प्रश्नाचं उत्तर मला कधीच मिळालंय. इतरांना भारतीय खाताना त्रास होत नाही पण भारतीयांना इतरांचं खाताना का होतो? अहो, झोपडपट्टीतून राजमहालात जायला कोणाला त्रास होईल? उलट करणं सोपं नसतं महाराजा! मी बॉसला म्हणालो (अर्थात मनात). शेवटी कितीही जग फिरलो, तरी भारतीय ते भारतीयच. वेळ आली तर चीज़-सलामीची न्याहरी करूही. पण दिवसाच्या सुरुवातीला सुखावणारी खरी सलामी ती इडलीचीच. कधी धीर आणि वेळ झाला तर त्या बॉसला शोधून पकडून ऐकवीनही –
नूडल-पास्ता तुमचाआमचा, केवळ माझा मेदुवडा
पिझ्झा-बर्गर उभ्या जगाचा, मनात पूजिन पाव-वडा
जेलो-ऐस्क्रिम तुमचेआमचे, केवळ माझी सोन् पापडी
प्यार मला इथला सामोसा, प्यार मला इथली रबडी
एग्-बेकन लखलाभ तुम्हाला, कांदेपोहे प्यार मला
मीठ-मिरी विश्वाची चवढव, लोणच्याचा आधार मला
धिक् तुमचा कॅमोमिल-टी इथली भुरकिन मी आमटी
या डाळींचे कण सोन्याचे बासमतीचा स्वाद खुळा
(मस्त चापुनी वामकुक्षि मग का नच लागावा डोळा?)
हृषीकेश कुलकर्णी
इ-मेल – hrishikul@hotmail.com
पुण्यात जन्म आणि शिक्षण. फार्मास्यूटिकल कंपनीत नोकरी. सध्या नोकरीनिमित्त जर्मनीत वास्तव्य.
Absolutely awesome…Indian food simply heaven..😘 Hrishi very well expressed..loved it
LikeLike
खुमासदार झाला आहे लेख डॉ. कुलकर्णी 👌
LikeLiked by 1 person
Fantastic!
LikeLike
खूप सुंदर लेख !!
LikeLike
फारच interesting
LikeLike
एकदम छान लेख
LikeLike
Khupch chan
LikeLike
सुंदर ,वाचून मला माझी दुबई ट्रीप आठवली, खूपच छान आणि ओघवता लिहिलेत
LikeLike
Really enjoyed reading your article. Very well written!
Even after telling myself and trying to do so, I could never “enjoy” anything other than Indian food, wherever we went. Not a good trait though….but what to do!
LikeLike
खूपच खरं लिहीलंय आणि चक्रवर्ती काका कडून आलंय म्हणून डोळे झाकून सहमत ! निश्चितच अभ्यासपूर्ण आणि अनुभवाअंती आलेला निष्कर्ष आहे की भारतीय रेसिपीज सुग्रास आहेत आणि खूप मोठी संस्कृती त्यातून चाखता येते.
मला अजून खूप जग तेथील खाद्यसंस्कृती पहायची आहे पण हे वाचून नक्कीच आपले मसाले , पाककृतींचा आदर दुणावतो.
मसाले, धान्यभाज्यांची विविध रेलचेल , फोडणी ची जादू आणि मोहनाची माया हे जे काही अजब रसायन भारतीय स्वयंपाक कलेने जगाला दिलंय ना ते अद्भूतच आहे !!
LikeLike
अतिशय सुंदर लेख! भारतीय खाद्य संस्कृती वरील प्रेम दर ओळीगणिक जाणवतंय! सारं काही खुसखुशीत, चटपटीत, चविष्ट आणि चटकदार👌 Bdw काही नवीन शब्दही आवडले…..वेतरीण, कलीगिणी….एकूण भट्टी मस्त!
LikeLike
वाचताना खूप हसले… मजा आली!!
LikeLike
Super article sir … Loved both the perspective and the interesting narration !!
Sir aapki likhne ki pratibha amazing hai … kaha corporate job main phas gaye 😀
LikeLike
Loved it.
LikeLike
अप्रतिम लेख , खूप आवडला. माझ्या Stockholm मधील वास्तव्यात तो चिनी Chef भेटला असता तर बरे झाले असते..
LikeLike
वा वा मस्तच! अगदी एखाद्या लज्जतदार जेवणासारखाच लेख!!
LikeLike
Ekdum Masta! Maja aali vaachtana! 😀 😀
LikeLike
abhyaspurna ani khumasdar lekh !!
LikeLike