आत्मशोधाचा प्रवास: धर्मानंद दामोदर कोसंबींचं ‘निवेदन’

राहुल सरवटे

धर्मानंद_ चरित्र आणि आत्मचरित्र - ज स सुखठणकर (प.आ. १९७६)
धर्मानंद चरित्र आणि आत्मचरित्र – ज स सुखठणकर (प.आ. १९७६)

सन १८६७. धार्मिक दडपशाहीचे चटके सोसणारं, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्याही काहीसं मागासलेलं गोवा. तिथला सासष्ठ हा प्रांत. सांखवाळ नावाचं खेडं. सारस्वत ब्राह्मणाच्या घरी जन्मलेल्या एकूण सोळा मुलांमध्ये पंधरावा मुलगा जन्मतो. प्रकृतीने अशक्त. सर्वसामान्य मुलांपेक्षा मंदमती मानला गेलेला. हा मुलगा एका लहानशा मासिकात बुद्धाविषयी वाचतो. भारावून जाऊन वयाच्या २३ व्या वर्षी घरदार, बायको आणि ३ महिन्यांची तान्ही मुलगी सोडून बौद्धधर्माच्या शोधात सारं भारतीय उपखंड पालथं घालतो. अथक आणि अकल्पित कष्ट सोसून पाली भाषेचा आणि बौद्ध धर्माचा जग्नमान्य अभ्यासक म्हणून अमेरिकेत आणि रशियात नावाजला जातो. अखेरीस महात्मा गांधींच्या आश्रमात मारणांतिक सल्लेखनाद्वारे (प्रायोपवेशन अथवा आमरण उपवास ) देह ठेवतो. सगळंच असामान्य आणि अद्भुत.

कोसंबींनी पाली भाषा आणि बौद्धधर्माच्या शोधात अफाट प्रवास केला. अन्नपाण्याविना दिवस काढले. पुढे श्रीलंकेत भिक्षू झाल्यानंतर पुढच्या संपूर्ण प्रवासात जवळ पैसा ठेवायचा नाही आणि दुपारी बारानंतर जेवायचं नाही या नियमांचं कठोर पालन केलं. म्यानमारच्या दुसऱ्या फेरीनंतर १९०६ साली पुन्हा गृहस्थाश्रमात आल्यावरदेखील अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि अस्तेय ह्या चातुर्यामांचं व्रत अक्षय ठेवलं. या प्रवासाला सुखासीनता किंवा रोमांचित करणारी हुरहूर ह्यांचा स्पर्शही नाही. धर्मानंदांची शैलीसुद्धा निसर्गसौंदर्याची विस्तृत वर्णनं किंवा काव्यात्मक डूब दिलेले चिंतनात्मक गद्य यांत न रमता केवळ थेट निवेदन करण्यातच गुंतलेली दिसते. आणि ह्याचं मुख्य कारण या प्रवासाचा उद्देश हेच आहे. आत्मशोध, आत्मोन्नती ह्यापलीकडे ह्या भटकंतीला तिचं म्हणून स्वतंत्र मोल नाही. ही आत्मोन्नतीसुद्धा भौतिक अर्थानं अजिबातच नाही. त्यामुळे, हा प्रवास मुख्यत: आत्मशोधाचा आहे.

धर्मानंद कोसंबी (१८७६-१९४७) यांच्या या मनस्वी आणि यादृछिक वाटणाऱ्या, एक सखोल संगती असणाऱ्या प्रवासाचं प्रामाणिक, काहीसं अलिप्त आणि त्रोटक वर्णन त्यांनी ‘निवेदन’ ह्या नावानं गोव्याच्या ‘भारत’ नावाच्या साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध केलं. ‘भारत’ साप्ताहिकात (संपा. हेगडे-देसाई) ही लेखमालिका १९१२ ते १९१६ ह्या दरम्यान अनियमितपणे प्रकाशित झाली.  निवेदन पुस्तकरुपानं प्रसिद्ध व्हायला १९७६ साल उजाडलं. ज. स. सुखठणकरांनी संपादित आणि संस्कारित केलेली आणि त्याला कोसंबींच्या चरित्राची जोड दिलेली पहिली आवृत्ती दी गोवा हिंदु असोसिएशन या संस्थेनं प्रकाशित केली. या लेखासाठी वाचलेली निवेदनाची दुसरी आवृत्ती २०१६ साली पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने काढलेली आहे. लेखात दिलेले सगळे पृष्ठ क्रमांक याच दुसर्‍या आवृतीतले आहेत.

धर्मानंदांचा बुद्धाच्या शोधातला प्रवास
धर्मानंदांचा बुद्धाच्या शोधातला प्रवास

अत्यंत पारदर्शक आणि तरीही अनासक्त अशा ‘निवेदन’चा मराठीतील पहिल्या प्रतीच्या आत्मकथनांत समावेश व्हायला हवा. रवींद्र पिंगे ‘निवेदन’बद्दल लिहितात: “धर्मानंदांचं निवेदन हे मराठी साहित्याचं अफलातून भूषण आहे. जेव्हा सर्व भपकेबाज झुंबरं आणि हंड्या काळाच्या फुंकरीनं विझून जातील, तेव्हा बाळबोध वळणाचं ‘निवेदन’ एका कोपऱ्यात कायमचं तेवत राहील, ही दगडावरची रेघ!” (सर्वोत्तम पिंगे, २०१३:८९) निवेदनाची शैलीसुद्धा काहीशी असंस्कारित, अनलंकारिक पण वाचकाशी प्रांजळ संवाद साधणारी आहे. निवेदनाचा मुख्य उद्देशच आपण हा दीर्घ आणि अथक प्रवास करायला का उद्युक्त झालो, गोवा सोडताना आपली मनस्थिती कशी होती, आपली सामाजिक आणि धार्मिक मते काय होती आणि ह्या सगळ्या प्रवासाचा एकंदर परिणाम काय झाला हे गोव्याकडच्या मंडळींना सांगण्याचा आहे. “मी वैतागून घर सोडून निघालो आणि केवळ दैवबलाने पुढे आलो, अशी कित्येकांची समजूत आहे. दुसऱ्या कित्येकांना, गोवे सोडल्यावर माझी धार्मिक आणि सामाजिक मते बदलली असे वाटते. या व दुसऱ्या काही गैरसमजुती नष्ट करण्यासाठी…” (पान ४२)

या निवेदनात आत्मप्रौढी किंवा स्तुतीचा लवलेश नाही हे फारच विस्मयकारक आहे. अशी अलिप्तता साहित्यिक आत्मनिवेदनात अभावानेच आढळते. कोसंबींच्या निवेदनातच त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातले दोन निरनिराळे आवाज ऎकू येतात: स्वतःच्या सामान्य असण्याबद्दल, अशक्त असण्याबद्दल आणि कमकुवत असण्याबद्दलचा एक धागा दुर्दम्य, मनस्वी आणि प्रगल्भ अश्या व्यक्तिमत्वाबद्दलच्या दुसऱ्या धाग्यात बेमालूमपणे गुंफला गेलाय. त्यामुळे, हे निवेदन मी अमुक अमुक घडवलं, मिळवलं असं न होता थोडं त्रयस्थ – असं असं घडलं – असं काहीशा अलिप्तपणे सादर झालंय.

कोसंबींच्या आयुष्याचे चरित्रकार सुखठणकरांनी चार टप्पे पाडलेत:

जन्मापासून घर सोडेपर्यंतचा २३ वर्षांचा काळ, हा पूर्वतयारीचा कालखंड. १८९९ ते १९०६ हा दुसरा कालखंड – सात वर्षांचा आत्मोन्नतीसाठीच्या दीर्घ प्रवासाचा, बौद्धज्ञान संपादण्याच्या स्वप्नाची पूर्ती होण्याचा.  पुढचा १९०७ पासून ते १९३२ साली अमेरिकेची आपली चौथी आणि शेवटची सफर संपवून परत आले तो बौद्धधर्म आणि पाली भाषा ज्ञानप्रसाराचा तिसरा टप्पा. तर बुद्ध, मार्क्स आणि गांधी यांच्या एकत्रित परिशीलनातून विकसित झालेली आपली जीवनदृष्टी निरनिराळ्या पुस्तकांतून, अध्यापनातून मांडण्याचा शेवटचा १५ वर्षांचा परिपक्व कालखंड. यापैकी आपण ह्या लेखाच्या मर्यादेत केवळ दुसरा ७ वर्षांचा सततच्या प्रवासाचा टप्पाच पाहण्याचा प्रयत्न करू.

मी या लेखात कोसंबींच्या ‘निवेदनाचं’ जरासं बारकाईनं वाचन करण्याचा आणि त्यांच्या एकूण प्रवासातल्या, केवळ सात वर्षांच्या (सुमारे १८९९-१९०६) आत्मशोधाच्या भटकंतीची ओळख, शक्य असेल तिथे त्यांच्याच शब्दांत देण्याचा एक लहानसा प्रयत्न केलाय. याचं कारण दुहेरी: एक म्हणजे कोसंबींचं हे अतिशय पारदर्शक आणि अभिनिवेशरहित आत्मवृत्त मराठीत फारसं वाचलं गेलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या गद्यलिखाणाच्या शैलीचा आपल्याला जरा जवळून परिचय व्हावा. आणि दुसरं म्हणजे, उपयोगिता तत्व सोडून, स्वतःच्या संकुचित भौतिकतेपलीकडे पाहण्याची कोसंबींची दृष्टी – बौद्ध परंपरेत म्हणतात तसं – स्वतःच स्वतःचा दिवा उजळायला कदाचित सहाय्यभूत ठरू शकेल ही आशा.

तर आपण आधी कोसंबींच्या आत्मनिवेदनातून उलगडणारे स्वतःच्या आणि बुद्धाच्या शोधाच्या प्रवासातले तपशील पाहूया. त्यांच्या प्रवासाचा आढावा घेताना आपल्या सोयीसाठी स्थळ-काळाचा एक साधारण नकाशा तयार करू आणि शेवटी या सगळ्यातून साधलंच तर भारतीय आधुनिकतेच्या इतिहासाच्या आकलनाच्या काही नव्या शक्यता निर्माण होतात का ते पाहण्याचा आपण प्रयत्न करु.

धर्मानंदांचे प्रवास (१८९९-१९०६)
धर्मानंदांचे प्रवास (१८९९-१९०६)

कोसंबींचा हृद्रोग (हृदयरोग)

कोसंबी आपल्या निवेदनात त्यांच्या सर्वव्यापी अस्वस्थतेबाबत सतत लिहितात. संसाराविषयीची अनासक्ती किंवा एकूणच परिस्थितीविषयी असमाधान हे कदाचित त्यांच्या मनस्थितीचा भाग बऱ्याच पूर्वीपासूनच बनलं असावं. १८९१ साली – म्हणजे त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी – त्यांचं लग्न झाल्यावर देखील त्यांच्या मानसिक अस्वस्थतेत भरच पडलेली दिसते. याच दरम्यान तुकारामबुवांच्या अभंगाची गाथा त्यांच्या हाती लागली. ती वाचून त्यांना काहीसं समाधान वाटलं असावं.

“…ती (गाथा) मी सहज वाचावयाला घेतली. अभंग त्यावेळी मला फारसे आवडले नाहीत. पण आरंभीच्या तुकारामबुवांच्या चरित्राने माझ्या मनावर इतका पगडा बसवला की, ते चरित्र मी कित्येक वेळा वाचले व त्यातील काही अभंग पाठ केले. या चरित्रवाचनाने माझा रोग बरा झाला. मी निर्धन म्हणून शोक करतो, पण तुकारामबुवांचे तर दिवाळेच निघाले होते! मी अविद्वान म्हणून शोक करतो, पण तुकोबांना तर माझ्या दशांशाने देखील विद्येची साधने उपलब्ध नव्हती! माझे लग्न झाले म्हणून मी शोक करतो, पण तुकोबांची तर दोन लग्ने झाली होती!…मग मी शोक करत का बसावे? वैराग्याचे कवच घालून सत्यनिष्ठादी सद्गुणशस्त्रांनी षड्रीपूंशी संग्राम मांडला असता, आज ना उद्या मला जय मिळेल अशी आशा वाटू लागली. नाव नको, कीर्ति नको पण तुकोबासारखे सात्विक व्हावे, असे मला वाटू लागले. एकांतात बसून माझ्या विचारांना मी दृढता आणू लागलो व तेणेकरून माझा हृद्रोग समूळ बरा झाला.” (पान ३२)

मात्र हा हृद्रोग कोसंबींना वाटलं, त्याप्रमाणे काही बरा झाला नाही. पुढे, काही काळाने एका जवळच्या मित्राच्या मृत्यूची बातमी मिळाली आणि धर्मानंद आणखीच अस्वस्थ झाले. “माझ्या मित्राच्या मरणानें तर मी इतका गांगरून गेलों होतों, कीं, यापुढें गोव्यांत रहाणें नको असें मला वाटावयाला­­­­ लागले. कर्जाचा सारा हिशोब लिहून ठेवून दोन रुपये बरोबर घेऊन तारीख ३० मे १८९८ या दिवशीं घर सोडून तारीख ३० मे १८९८ या दिवशीं घर सोडून मीं गोकर्णापर्यंत प्रवास केला पण अशा अपरिचित प्रदेशांत निर्वाहाचें कांहींच साधन न सांपडल्यामुळें तारीख १६ जून रोजी मला पुनः घरीं यांवें लागले. घरीं आलों, तरी पण माझा मतिभ्रम कमी झाला नाहीं. एक दिवस तर मी जंगलांतच बसून राहिलों, व पुढें कोणाशीं भाषण न करतां खोलींतच कोंडून घेतलें. गांवांत मीं वेडा झालों अशी बातमी पसरली. पण तिची मला मुळीच पर्वा वाटली नाही.” (पान ३९)

धर्मानंदांची ही अस्वस्थता नेमकी कशामुळे उद्भवली असावी? की तो त्यांचा स्वभावच होता? काही प्रमाणात त्यांचं वाचनही कारणीभूत असावं. वाचनाविषयी कोसंबी म्हणतात: “संस्कृत शिकण्याची अतिशय आवड; पण शिकण्याची सोय नसल्यामुळें व घर सोडून फार दिवस दूर राहतां येत नसल्यामुळें तें शक्य नव्हतें. डॉ. भांडारकरांच्या संस्कृत पुस्तकांचें मराठी भाषांतर आणून वाचलें व रघूच्या दुसर्‍या सर्गाचे २५।३० श्लोक पाठ केले पण एवढ्यानें संस्कृताचें ज्ञान कितीसें होणार ? मराठी वाचन मात्र सारखें चाललें होतें. निबंधमाला, आगरकरांचे निबंध, मोरोपंतांचे भारत, ज्ञानेश्वरी, वर्तमानपत्रें, मासिक पुस्तकें, कादंबर्‍या, मरे आणि लानमन यांच्या साकरावगुंठीत गोळ्यांच्या जाहिराती, एवंच जे मिळेल ते वाचावें हा क्रम मी चालविला. त्याकाळी एव्हढेच काय ते आत्मोन्नतीचे साधन माझ्या हाती होते”. (निवेदन, पान ३६) त्यांच्या स्वतःच्याच सांगण्याप्रमाणे, विनायक कोंडदेव ओक यांनी चालवलेल्या ‘बाळबोध’ मासिकाच्या १८९७ सालच्या एका अंकात, भगवान बुद्धाचं छोटंसं चरित्र कोसंबींच्या वाचनात आल्यानंतर त्यांची बुद्धावर श्रद्धा जडत चालली. अर्थातच कोसंबींची अस्वस्थता हे बुद्धचरित्र वाचनात येण्यापूर्वीचीच आहे. पण त्याच्या वाचनाने त्यांच्या अस्थ्वस्थतेला एक वाट मिळालेली दिसते.

“प्रपंचाचा जसं जसा वीट येत गेला, तसतशी माझी बुद्धावरील श्रद्धा दृढ होत गेली. माझे सर्वस्व बुद्ध आहे असे वाटू लागले…बुद्धाची मूर्ती कल्पून तिचे ध्यान करावे व बालबोधांतील चरित्र पुन्हापुन्हा वाचावे असा क्रम सुरु ठेवला व यापुढे जगलो तर दुसरे काही न करता बुद्धधर्माचे ज्ञान संपादावे असा निश्चय केला. कितीही संकटे येवोत, कितीही विपत्ती भोगाव्या लागोत, बुद्धोपदेशाचे मला ज्ञान झाले म्हणजे माझ्या जन्माचे साफल्य झाले असे मला वाटू लागले.” (पान ४०)

१८९८ साली धर्मानंदांचे वडील वारले आणि त्यांची देशत्याग करण्याची ऊर्मी पुन्हा जोर करू लागली. २६ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची पहिली मुलगी माणिक हिचा जन्म झाला. त्यानंतरही धर्मानंदांची संसारत्यागाची भावना तशीच राहिली. त्यानंतर महिन्याभरातच धर्मानंदांनी महाराष्ट्राचं केंद्र पुणे, तिथे आपली काहीतरी सोय लागेल अशा विचाराने गोवा सोडलं. “शेवटीं एका खाणावळींत जेवून मडगांवांतच कोठेंसा निजलों व दुसर्‍या दिवशी म्हणजे ता. २ डिसेंबर रोजीं मडगांवाहून प्रयाण केले. श्रीयुत विष्णू नाईक यांनी दिलेला एक तांब्याचा तांब्या व एक सतरंजी एवढेंच काय तें सामान माझ्या बरोबर होतें.” (पान ४१)

पाऊले चालती…

पुण्याला आल्यानंतर कोसंबींनी प्रख्यात भारतविद्यातज्ञ डॉ. रा. गो. भांडारकरांची भेट घेतली आणि त्यांची चिट्ठी घेऊन ते वासुदेवशास्त्री अभ्यंकरांच्या संस्कृत पाठशाळेत दाखल झाले. महादेवशास्त्री जोशी तिथे त्यांना शिकवत असत. भांडारकरांचाही त्यांच्याबद्दल अनुकूल ग्रह होऊन कोसंबी प्रार्थना समाजाचे प्रचारक होतील, अशी आशा त्यांना वाटू लागली. पण कोसंबींना बौद्ध धर्माचा अभ्यास करायचा असल्यामुळे, प्रार्थना समाजाचे सभासद व्हायला त्यांनी नकार दिला. बौद्धधर्माचे ज्ञान संपादण्याची कोसंबींची तीव्र इच्छा समजल्यावर भांडारकरांनी त्यांना विचारले, “अहो, पण बौद्धधर्माचा आमच्या देशाला काय उपयोग? आणखी या देशांत बौद्धधर्माचें ज्ञानहि मिळणें कठीण आहे. तुम्हांला नेपाळास किंवा सीलोनास जावे लागेल!” त्यावर कोसंबी त्यांना म्हणाले, “देशाला उपयोग होवो वा न होवो; मला त्याचा उपयोग होईल अशी माझी खात्री आहे. नेपाळास किंवा सिलोनास जाण्यास मी तयार आहे  किंवा मला कितीहि हाल सोसावे लागले, तरी त्याची मला काळजी वाटत नाहीं. बौद्धधर्माचें ज्ञान संपादावें हें माझें जीवितकर्तव्य आहे असें मी समजतो.”

धर्मानंद अमेरिकेत (१९१९)
धर्मानंद अमेरिकेत (१९१९)

या संवादानंतर पुण्यात राहणे फोल आहे, असं कोसंबींना वाटू लागलं आणि ते पुढच्या मार्गाचा विचार करू लागले. “आता पुण्यांत राहण्यांत अर्थ नाहीं याबद्दल शंका राहिली नाहीं. पण जावें कोठें? हा प्रश्न पुढें उभा राहिला. सिलोनला जावें कीं नेपाळला जावें? सिलोनची भाषा, रीतरिवाज सर्व कांहीं चमत्कारिक असणार. शिवाय दक्षिणेकडील कानडी वगैरे भाषा मला मुळींच माहीत नाहींत, तेव्हां सिलोनला जाण्याची नुसती कल्पनादेखील अशक्य वाटूं लागली. नेपाळास जाणेहिं कमी अवघड नव्हते. उत्तर हिंदुस्थानातील भाषाही मला माहित नव्हती पण ती श्रमसाध्य होती शिवाय काशीपर्यंत महाराष्ट्र लोकांची वस्ती होती, अर्थात तेथपर्यंत तरी भाषेची विशेष अडचण पडणार नाही इत्यादी विचार करून मी उत्तर दिशेलाच जाण्याचा बेत ठरविला. प्रार्थनासमाजाचे शिपाई बळवंत पवार यांच्यामार्फत दोन कपडे पिवळे करून आणले होते ते परिधान करून, व शिखासूत्राचा त्याग करून गुरुवार ता १ मार्च १९०० मिती माघ कृष्ण ३० शके १८२१ या दिवशीं रात्रीं बारा वाजल्यावर मीं पुणें सोडलें.” (पान ५२)

पुढे इंदूरहून झांसीमार्गे ग्वाल्हेर आणि तिथून अखेरीस २० सप्टेंबर १९०० रोजी कोसंबी काशीला येऊन पोहोचले. या सगळ्या प्रवासातल्या कष्टांचं वर्णनही निवेदनात आलं आहे. विशेषतः निष्कांचन असणं आणि अन्नपाण्याचे हाल होऊन सतत आजारपण येणं या बाबी हातात हात घालून वावरत होत्या. काशीला शेणव्यांच्या मठात त्यांना आश्रय मिळाला आणि ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत जयाजीराव यांनी स्थापन केलेल्या एका अन्नछत्रात त्यांची जेवण्याची सोय झाली. काशीमध्ये तेव्हा सारस्वत शेणव्यांचे तसंच दक्षिणी ब्राह्मणांचे आणि उत्तरी ब्राह्मणांचे मठ, अन्नछत्रे निरनिराळी असत. जातिव्यवस्थेअंतर्गत व्यक्तीचं नियमन होतानाच काही आधाराच्या रचनादेखील कार्यरत होत्या आणि इंग्रजी वसाहतकालातही ज्ञाति आणि गावकीचे संबंध यांची वीण किती घट्ट होती, हे धर्मानंदांच्या आख्यानात नीट दिसतं.

आणखी एक धर्मानंदांच्या निवेदनात दिसतं. मराठी भाषेचं उत्तर भारतातलं महत्वाचं स्थान. अर्थात याला मुख्य कारण अठराव्या शतकातलं मराठ्यांचं मध्यभारतावरचं प्रभुत्व आणि त्याद्वारे मराठी भाषेला आलेलं प्रशासकीय महत्व. पण ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातही टिकून राहिलेलं दिसतं. काशीच्या अन्नछत्रातल्या एका अन्यायकारक प्रसंगात, त्यावेळी धर्मानंदांसोबत शिकत असणारे गायतोंडे नावाचे एक शास्त्री त्यांना म्हणाले, “तुम्ही फारच बोटचेपी भूमिका घेता. तुमच्याइतकं चांगलं मराठी मला येत असतं तर मी ह्या मंडळींची चांगली खोड मोडली असती.” आणखी, काशीत, इंदूरकडे अथवा ग्वाल्हेरला मराठी भाषा उत्तम आली की किमान मध्यम दर्जाच्या नोकरीची शाश्वती होत असल्याचे अनेक दाखले निवेदनात आढळतात. (इतरही अनेक आत्मचरित्रात्मक आणि ऐतिहासिक लिखाणांमध्ये मराठी भाषेच्या मध्य-उत्तर भारतातील प्रभुत्वाची उदाहरणं आढळतील. उदा. प्रबोधनकार ठाकरे यांचं ‘माझी जीवनगाथा’ किंवा वि. द. घाट्यांचे ‘दिवस असे होते’)

धर्मानंद माणिक आणि दामोदर (अमेरिकेत)
धर्मानंद माणिक आणि दामोदर (अमेरिकेत)

व्यवस्थेतली जातीय उतरंड आणि कर्मकांडीय वृत्ती, सनातनी कर्मठपणा देखील कोसंबी नोंदवतात. मात्र त्याबद्दल ते नाखूष असले, तरी संस्कृत शिकण्याच्या जिद्दीसाठी असल्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करायला त्यांची तयारी आहे. त्यांच्या जिद्दीचा एक नमुना म्हणून हा पुढचा संवाद उद्बोधक आहे. संस्कृत शिकण्याच्या उद्देश्याने काशीतले प्रख्यात पंडित वे. शा. सं. गंगाधरशास्त्री तेलंग यांचा पत्ता धर्मानंद शोधत होते. तेव्हा त्यांची भेट गंगाधरशास्त्रांकडे बारा वर्षांहून अधिक काळ अध्ययन करत असलेल्या जमखिंडीच्या सरदार घराण्यातल्या बाबासाहेब यांच्याशी झाली. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की संस्कृत शिकायला धर्मानंदना सुमारे बारा वर्षे लागतील सांगितलं. “या वयांत तुम्ही शास्त्र शिकून काय करणार? मला वाटतें तुमचें वय जवळ जवळ पंचवीस वर्षाचें असेल. आतां कौमुदीस तुम्ही आरंभ करणार, आणि त्याचा तुम्हांला उपयोग काय होणार? त्याऐवजीं तुम्ही रेल्वेमध्यें किंवा इतर ठिकाणीं नोकरी धराल, तर त्याचा तुम्हास विशेष उपयोग होईल” असा सल्ला त्यांनी दिला.

त्यावरचं कोसंबींचं उत्तर मासलेवाईक आहे. ते त्यांच्याच शब्दांत पाहूया: “मी म्हणालो, ”अहो, बारा वर्षे म्हणजे कांहीं जास्त नाहींत; वीसपंचवीस वर्षे लागलीं तरी हरकत नाहीं, पण संस्कृत भाषेचें ज्ञान अवश्यमेव संपादावें, असा माझा विचार आहे.” बाबासाहेबांचा अचंबा दुणावल्यासारखा दिसला. ते म्हणाले ”काय म्हणतां? वीस वर्षे? अहो, वीस वर्षांनीं तुमच्या अध्ययनाचा तुम्हांस काय उपयोग होणार आहे?” मी हंसत हंसत म्हणालों, ”हें पाहा, तुम्हीं हिंदु आहांत. त्या अर्थी तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असेलच. अहो, मी जी येवढी मेहनत करणार आहें, ती या जन्मीं फळ मिळावें म्हणून नव्हे. या श्रमांचें फळ मला पुढील जन्मी मिळेल. पुढल्या जन्मीं शास्त्राभ्यास सुलभ होईल. कां, तुम्हाला नाहीं का असें वाटत?” बाबासाहेब नुसते थक्क होऊन गेले.

एकूणच एखाद्या गोष्टीची – विशेषतः ज्ञानाची – संसारिक उपयोगिता हे मापन धर्मानंदांच्या खिजगणतीत नव्हतं. जीव ओवाळून टाकण्याची ही वृत्ती आणि सर्वस्व पणाला लावण्याची जिद्दच धर्मानंदांना एका अकल्पित अनिश्चित यात्रेचा यात्रेकरू बनवू शकली.

बुद्धाच्या शोधात

धर्मानंद_दामोदर_कोसंबी
धर्मानंद दामोदर कोसंबी

प्लेगची साथ, उपासमार, आजारपण आणि इतर आर्थिक अडचणी सोसून धर्मानंदांनी काशीला काही काळ संस्कृतचं अध्ययन केलं. पण भांडारकरांनी सुचवलेला नेपाळ अथवा सिलोनचा मार्ग त्यांना खुणावत होताच. आपल्या पाठशालेतल्या दुर्गादास नावाच्या नेपाळी ब्राह्मणासोबत त्यांनी नेपाळला जाऊन बौद्धधर्माचा शोध घ्यायचं ठरवलं. अर्थात बौद्धधर्म हे तत्कालीन धार्मिकतेच्या दृष्टीनं पाखंड मानलं जात असल्यामुळे, हा बेत त्यांनी दुर्गादासापासून गुप्तच राखला.

नेपाळला जाण्याचा कोसंबींना बौद्धधर्माच्या शोधार्थ काही उपयोग झाला नाही, उलट नेपाळातले पर्वत पायी चढण्याचे कष्ट आणि इतर आजारपणामुळे आलेला अशक्तपणा यामुळे प्रकृतीचे मात्र पुष्कळ हाल झाले. शिवाय काठमांडूतल्या बौद्ध स्तूपाच्या आसपास काही बौद्ध साधू फासे खेळत बसलेले आणि शेजारी एक अख्खा बकरा मारून तो विकायला ठेवलेला दिसल्यानंतर कोसंबींची अतीव निराशा झाली. तरीही या प्रसंगी ग्वाल्हेरमध्ये राहताना ‘काशीयात्रा’ ह्या पुस्तकात गयेच्या दक्षिणेस बौद्धांचे एक मंदिर असल्याचं वाचलेलं त्यांना आठवलं. तिथे जाण्याचा त्यांनी निश्चय केला. बोधगयेला पोहोचल्यावर मात्र ते मंदिर बौद्धांच्या ताब्यात नसून शैवांच्या अखत्यारीत असल्याचं त्यांना दिसलं. मात्र इथे त्यांना धर्मपाल नावाच्या सिलोनी भिक्खूबद्दल कळलं. शिवाय सिंहली लिपीत लिहिल्या जाणाऱ्या पाली भाषेच्या संस्कृतभाषेशी असलेल्या साधर्म्याविषयी कळल्यावर कोसंबीं फारच आनंदित झाले आणि त्यांना आता सिलोनचे वेध लागले.

खिशात एक पै नसताना सिलोनला जायचं कसं? कलकत्याच्या महाबोधीसभेकडून या संदर्भात मदत मिळू शकेल असं कळलं. मात्र लुच्च्या लोकांचा भरणा झालेल्या गयेवरून कलकत्याला पोहोचणं कोसंबींना जडच गेलं. अनेकांकडे याचना करून पै पै गोळा होईना, तेव्हा काशीतल्या नीलकंठशास्त्री गायतोंडे यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून ३ रुपयांची मनीऑर्डर मिळवून शेवटी कोसंबी कलकत्यात पोचले. तिथे महाबोधीसभेच्या चारुचंद्र बोस यांच्याशी विचारविनिमय करून असं ठरलं की, सभा कोसंबींना ३ रुपये देईल, त्यात पुरीपर्यंत जाता येईल, पुढे भिक्षेवर निर्वाह करत मद्रासपर्यंत जावं आणि तेथील महाबोधी सभेने मदत दिल्यास तुतीकोरीनपर्यंत आगगाडीने अथवा न दिल्यास पायी प्रवास करावा आणि पुढे कसेतरी पैसे मिळवून आगबोटीतून सिलोन गाठावं.

हा सगळा विचारच जीव वाऱ्यावर सोडलेल्या मनुष्याच्या उतावीळ कल्पकतेचा परिपाक होता. पण महाबोधी सभेच्या इतर काही जणांनी त्यांना वर्गणी जमवून थेट कोलंबोपर्यंतचं आगगाडीचं तिकीट काढून दिलं. २ फेब्रुवारी १९०२ या दिवशी काशीहून निघालेले कोसंबी अशा रीतीने नेपाळहून कलकत्ता आणि तिथून मद्रासमार्गे २१ मार्च रोजी श्रीलंकेला पोचले.

धर्मानंदांचे कुटुंब (पत्नी बाळाबाई, मुली माणिक, मनोरमा आणि मुलगा दामोद
धर्मानंदांचे कुटुंब (पत्नी बाळाबाई, मुली माणिक, मनोरमा आणि मुलगा दामोद

कोसंबींचं निवेदन केवळ त्यांच्या वैयक्तिक संदर्भात असल्यामुळे महाबोधी सभा आणि तिचे काही सदस्य यांचा उल्लेख येतो. ह्या संस्थेच्या कार्याचा व्यापक परिचय किंवा भारतीय उपखंडातल्या बौद्धधर्मीय नेटवर्क्सविषयी सविस्तर विश्लेषण किंवा येत नाही. पण त्यांच्या निवेदनावरून आडाखा बांधायचा तर कलकत्त्यातल्या महाबोधी सभेच्या सदस्यांमध्ये बंगाली भद्रलोकांत गणना होणारे उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या उच्चवर्गीय बहुसंख्येने दिसतात. ह्या वर्तुळात बौद्धधर्माची दीक्षा घेतलेले लोक फारसे नसून त्याकाळी अतिशय प्रचलित असलेल्या भारतविद्येचे (इंडॉलॉजी) किंवा पौरात्यवादाचे (ओरीएनटलिजम) अभ्यासक अश्या मंडळींचा भरणा अधिक दिसतो. उलटपक्षी मद्रासमधल्या महाबोधी सभेत पंडित अयोथिदास यांच्या सारखे पराया या अस्पृश्य जातींमधून आलेले विचारवंत बौद्ध तत्वज्ञानातल्या सामाजिक समतेच्या आणि मुख्यत: अवैदिक आणि जातविरोधी असण्याच्या संदेशाला प्राधान्याने महत्व देत होते. मद्रास शहरांत त्या वेळीं मद्रास महाबोधिसभा या नांवाची एक बौद्ध संस्था होती. तिचे प्रो. लक्ष्मीनरसू हे अध्यक्ष व सिंगारवेलू हे सेक्रेटरी होते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाला बुद्धपदाचा लाभ झाला. हा दिवस साजरा करण्यापलीकडे ही सभा दुसरं काही करत नसे. या उत्सवाला लागणारा खर्च ब्रह्मदेशांतील प्रसिद्ध व्यापारी मोंगश्वे हे देत असत. मद्रास शहरात पाराया जातीच्या (अतिशूद्र) पुष्कळ लोकांनी बौद्धधर्म स्वीकारला होता. त्यांचे पुढारी पंडित अयोधीदास हे होते परंतु महाबोधीच्या मेंबरांचं आणि पंडित अयोधीदास यांचं जुळत नसे. (अयोथिदास आणि तमिळ अस्पृश्य जातींचा बौद्धधर्म स्वीकार यांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी पहा: गजेन्द्रन अय्यादुराई यांचं पीएचडी साठीचं संशोधन. http://dissertationreviews.org/archives/3540)

सिंगारवेलू यांनी मद्रासेत कोसंबीचं आदरातिथ्य केलं आणि त्यांना कोलंबोसाठी काही पत्रे दिली तरीही, पुढे ते स्वतः श्रीलंकेत आले असता, त्यांनी तिथल्या विद्योदय आश्रमातल्या आचार्यांकडून कोसंबींचं कौतुक ऐकल्यावरदेखील “हिंदुस्तानातील ब्राह्मण फार लबाड असतात, त्यांचा विश्वास धरू नये. हा मनुष्य जरी साधाभोळा दिसत असला तरी तो ब्राह्मण आहे हे विसरू नका” (पान ११५) असा सल्ला दिला, ही घटना ह्या व्यापक पार्श्वभूमीवर पाहायला हवी.

श्रीलंकेत पोहोचून कोसंबींनी पाली भाषेचं अध्ययन सुरु केलं. श्रीलंकेतल्या बौद्धधर्माचा इतिहास अभ्यासताना आणि त्याची श्रीलंकेतील तत्कालीन पिछेहाट पाहताना कोसंबींना एका ऐतिहासिक विडंबनेची आठवण झाली. ते लिहितात: “पोर्तुगिजांच्या कारकीर्दीत सिलोनांत रोमन क्याथोलिक पंथाचा प्रसार करण्याचा सेंट फ्रांसिस्क झेवियरच्या मागोमाग ज्यांनीं जीवापाड मेहनत केली ते फादर जुजे वास, हे, मी ज्या गांवीं जन्मलों त्याच गांवीं जन्मले होते. (जन्म. १६५१) गोव्यांत रोमन क्याथोलिक पंथाचा उत्तम अभ्यास करून धर्मप्रसारार्थ ते सिलोनला गेले परंतु ज्या धर्माचा उच्छेद करण्यासाठीं त्यांनीं इतकी मेहनत केली, भयंकर संकटें सोसलीं, त्याच धर्माचा अभ्यास करण्यासाठीं विसाव्या शतकाच्या आरंभीं आपल्या गांवचा एक तरुण होतकरू अतोनात क्लेश सहन करून सिलोनला जाईल, हें त्या वेळीं त्यांच्या स्वप्नीं तरी आलें असेल काय? कालचक्राची गति विलक्षण आहे.” (पान १०६)

सिलोनात असताना, कोसंबींनी पाली भाषेचं उत्तम ज्ञान मिळवलं. कित्येक पाली पुस्तकांच्या अध्ययनातून बौद्ध धर्माच्या अनेकानेक पैलूंचा सखोल अभ्यास केला आणि श्रामणेराची दीक्षा घेतली. पण श्रीलंकेत झालेल्या थोड्या बहुत गौरवाने आणि कौतुकाने त्यांच्या वृत्ती पुन्हा प्रपंचाकडे वाहू लागल्या आणि तिथेच स्थायिक व्हावं असंही त्यांना काही काळ वाटत राहिलं. पण पुण्याहून निघताना केलेले दोन निश्चय,  कुडीत प्राण असेपर्यंत बौद्धधर्माचें ज्ञान संपादण्याचा प्रयत्‍न करायचा. आणि दुसरा, जर या धर्माचं ज्ञान संपादता आलं, तर त्याचा आपल्या महाराष्ट्र देशबांधवांस फायदा करून द्यावयाचा,  त्यांच्या चांगलंच स्मरणात असल्याने, त्यांनी श्रीलंकेत स्थायिक होण्याच्या विचाराकडे पाठ फिरवली. पुढे अनेक कारणांनी त्यांची प्रकृती फार बिघडली. तेव्हा त्यांनी कुशिनारा म्हणजे, बुद्ध भगवान जिथे परीनिर्वाण पावले (तत्कालीन गोरखपूर जिल्ह्यात कसया तालुक्यात) तिथे महावीर नामक भिक्षूने स्थापन केलेल्या धर्मशाळेत राहून बौद्ध पद्धतीच्या योगसाधनेचा अभ्यास करण्याचं ठरवलं.

ते लिहितात, “ह्या महावीर भिक्षूचा धर्मदास नांवाचा एक पंजाबी शिष्य बौद्धधर्माचा अभ्यास करण्यासाठीं सिलोनला आला. त्यानेंच मला महावीर भिक्षूची आणि कुशिनारा येथील धर्मशाळेची बातमी दिली. तेथें गेल्यास माझी सर्व सोय होऊन ध्यानभावनेला मला चांगला अवकाश मिळेल असें त्याचें म्हणणें होतें; आणि म्हणूनच प्रथमतः कलकत्त्याला जाऊन मग तेथें जावें, असा माझा विचार होता.” सुमारे एक वर्ष श्रीलंकेत व्यतीत करून बौद्ध धर्म आणि पाली भाषेसोबतच थोडं इंग्रजीचं ज्ञान मिळवून २३ मार्च १९०३ रोजी श्रामणेर धर्मानंद श्रीलंकेहून निघाले.

मद्रासेत आल्यानंतर मात्र अनेक कारणांनी थेट कुशिनारेला जाण्याचा विचार रहित करून धर्मानंदांनी ब्रह्मदेशात जायचं ठरवलं. एक तर पुढल्या खर्चाची मिळवणी होईना, शिवाय, नेमकं ह्याचं काळात मद्रासच्या महाबोधी सभेत सर्व बौद्धांची एकी घडून येऊन, त्यांनी बौद्धाश्रमाची स्थापना केली. तिथं कोसंबींची व्याख्यानं, प्रवचनं होऊ लागली. त्यामुळे, कोसंबींनी तिथेचं राहावं असं त्या मंडळींना वाटू लागलं. ह्याच सुमारास, मद्रासमध्ये राहत असलेल्या काही ब्राम्ही विद्यार्थ्यांनी त्यांना मद्रासमध्ये इतर भिक्षू नसताना एकटे राहण्यापेक्षा म्यानमारला येऊन बौद्ध विहारात अध्ययन करणं अधिक चांगलं असा आग्रह केला मद्रासहून म्यानमारपर्यंत आगबोटीचे भाडे मिळवून देऊ असं वचन दिलं. पर्यायानं, १९०३ च्या ऑक्टोबर महिन्यात कोसंबी मद्रासहून ब्रह्मदेशाकडे रवाना झाले.

ब्रह्मदेशात बौद्ध हा अधिकृत धर्म असला आणि बहुसंख्य लोक बौद्ध असले तरी कोसंबींना तिथे बौद्धधर्माबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल चांगलंच अज्ञान आढळून आलं. शिवाय बहुसंख्य लोक गोमांसभक्षक असल्याने, धर्मानंदांसाठी अवश्य असणारं शाकभूक (शाकाहारी) अन्न मिळणं अवघड होत असे. त्यामुळे, कुशिनारेला जाण्याचा आपला निश्चय कायम ठेऊन, साधारणपणे १९०४ सालच्या जानेवारी महिन्यात कोसंबी कलकत्याला पोहचले आणि महाबोधी सभेत उतरले.

गोवा सोडल्याला आता किमान चार वर्षं झाली होती आणि कोसंबींची भ्रमंती शेकडो मैल आणि कित्येक भाषा, पंथ आणि धर्मांचं अंतर कापून परिपक्व झाली होती. प्राचीन बौद्धधर्माची दीक्षा घेतलेला, पाली भाषेचा अभ्यासक असा श्रामणेर धर्मानंद मात्र स्वतःच्या भवितव्याविषयी तितकाच बेफिकीर होता. निवेदनात ह्या काळातल्या आपल्या मनस्थितीविषयी ते लिहितात:

“हिंदुस्तानी, संस्कृत आणि इंग्रजी या तीन भाषांचें व्यवहारापुरतें ज्ञान असल्यामुळें उत्तर हिंदुस्तानांत कोणत्याहि ठिकाणीं प्रवास करण्याला मी तयार होतों, व भिक्षेवर निर्वाह करण्याची माझी तयारी असल्यामुळें मार्गांत पोटापाण्याची अडचण पडणार नाहीं, अशी माझी खात्री होती; आणि यदाकदाचित् उपासमाराची पाळी आली तरी ती सहन करण्यास मी सज्ज होतों. तेंव्हां कलकत्त्यांतील श्रीमंत लोकांशीं याचना करण्याच्या भरीस न पडतां दुसर्‍या कीं तिसर्‍या दिवशीं कलकत्ता सोडून पायवाटेनें मुंबईपर्यंत प्रवास करण्याचा मीं बेत केला. वाटेंत कोणी तरी तिकीट काढून दिल्यास आगगाडीनें प्रवास करावा, नाहीं तर पायीं चालावें असा विचार होता. अमुक एक  ठिकाणी इतक्याच दिवसांनीं पोंचावें असा निश्चय मुळींच नव्हता. जातां जातां लोकांच्या रीतिभाती आपणास समजाव्या, आणि हिंदुस्थानाच्या निरनिराळ्या प्रांतांची माहिती व्हावी हाच हेतु होता.” (पान १२५)

ह्या विचाराने, कोसंबींनी दोन दिवसांनी पहाटे कलकत्ता सोडून हावरा स्टेशनच्या मार्गाने बंगाल-नागपूर रेल्वेच्या बाजूने पायी चालायला सुरुवात केली. ह्या प्रवासात रात्री जागा सापडेल तिथे निजावे, जवळ पैसे बाळगू नये आणि दुपारी बारा वाजल्यानंतर काहीही खाऊ नये ह्या नियमांचं कोसंबी पालन करत असत. प्रवास पायी सुरु झाला मात्र मिदनापूरपासून पुढचा जवळपास सगळा प्रवास रेल्वेमार्गाने झाला. त्यांच्या प्रवासाची नागमोडी रेघ काहीशी अशी दिसते: हावरा – आन्दुल – मिदनापूर – नागपूर – अमरावती – मुंबई – बडोदा – उज्जैन – देवास – इंदूर – ग्वाल्हेर – काशी – सारनाथ आणि अखेरीस कुशिनारा.

ह्या दरम्यान त्यांच्या महाराष्ट्रीय मंडळींशी गाठीभेटी झाल्या, बौद्धधर्माविषयी मराठीत व्याख्यानं झाली आणि महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या लोकांपर्यंत कोसंबींच्या बौद्धधर्माच्या शोधातल्या प्रवासाची विलक्षण हकीकत पोहचली. खरं तर कलकत्याकडून गोरखपूरकडे येण्याचा हा एक उफराटा मार्ग होता. पण यामुळे, कोसंबींचा लोकांशी परिचय व्हावा आणि त्यांच्या चालीरीती समजाव्यात हा मूळ उद्देश पुरेसा सफल झाला असं मानायला हरकत नाही.

एवढ्या कष्टानं श्रीलंकेहून मद्रास, रंगून, कलकत्ता, नागपूर, मुंबई आणि काशीमार्गे कुशिनारेत पोहचल्यावर मात्र कोसंबी या मठात केवळ २/३ आठवडेच राहिले. ह्या गोष्टीचं कारणही काहीसं विनोदी म्हणायला हवं. महावीर भिक्षूने त्यांना राहायला जी खोली दिली होती, त्यात राजा रविवर्माकृत विश्वामित्र मेनकेचं एक चित्र होतं. त्याकडे पाहून येणारे जाणारे खदाखदा हसत राहत. त्यामुळे चित्त विचलित होऊन धर्मानंदांनी ती धर्मशाळा सोडण्याचा निर्णय घेतला. बुद्धमंदिराच्या मागल्या बाजूस मोडक्या इमारतीवर वाढलेलं एक रानटी झाड होतं. त्याच्याखालीं एक लहानशी जागा तयार केली आणि बौद्धसूत्रांवर लक्ष केंद्रित करून साधना करत ते तिथे राहू लागले. ते लिहितात, ““कुसिनारेला मी १९०४ सालच्या जानुआरीच्या २५ तारखेला पोहोंचलों. एक दोन आठवडे धर्मशाळेंतील खोलींत घालविले व बाकी दोन अडीच महिने त्या झाडाखालीं गेले. माझ्या आयुष्यांतील एकांतवासांत घालविलेले हेच पहिले दिवस होत.  भगवान्बुद्धानें भयभैरवसूत्रांत सांगितलेल्या भयभैरवाचा मीं प्रथमतः याच ठिकाणीं अनुभव घेतला.” (पान १३४)

पण अनेकानेक कारणांनी ह्या एकांतवासात विघ्न येऊ लागली, तेव्हा कुशिनारेतल्या चंद्रमुनी नावाच्या एका ब्राह्मी भिक्षूने त्यांना सल्ला दिला की ब्रह्मदेशातल्या मंडालेजवळ सगाई नावाचा पहाड असून तेथे पुष्कळ गुहा आहेत. अनेक भिक्षू तिथे ध्यानधारणा करीत असतात, तिथे जावं. कोसंबींनी मग जवळच्या राजगृह, श्रावस्ती, कपिलवस्तू, नेपाळातील लुम्बिन्देवी इत्यादी बौद्धक्षेत्रांची यात्रा करून पुढे ब्रम्हदेशात जाण्याचं ठरवलं. १९०४ सालच्या डिसेंबर महिन्यात कोसंबी ब्रम्हदेशातल्या सगाईला आले. पुढे उन्हाळा वाढल्यावर मार्च १९०५ च्या सुमारास ते मंडालेला येऊन राहिले आणि तिथून मग मे महिन्यात रंगूनजवळच्या मोलमीन इथल्या विहारात त्यांनी वास्तव्य केलं. मात्र शाकभूक अन्नाची समस्या पूर्वीप्रमाणेच भेडसावत राहिली. अखेरीस, हिंदुस्थानास परत जाण्याचं ठरवून कोसंबींनी बौद्धधर्मात योग्य तजवीज असलेल्या गृहस्थाश्रमात परतण्याची परवानगी स्थविरांकडून मिळवली आणि १९०६ साली ते गृहस्थाश्रमी बौद्ध होऊन कलकत्याला परतले. ते लिहितात, “निर्मासमत्स्य जेवण मिळणें दूरापास्त असल्यामुळें उकडलेल्या मुगांवर, भातावर आणि डब्यांत सांठविलेल्या लोण्यावरच निर्वाह करावा लागे. तात्पर्य, ब्रह्मदेशांत भिक्षु होऊन वास्तव्य करणें जवळजवळ अशक्य आहे, असा मला अनुभव आला. भिक्षूला आपलें अन्न शिजवितां येत नाहीं, आणि दुसर्‍यानें दिलेल्या अन्नावर मला निर्वाह करितां येत नाहीं, अशी स्थिति प्राप्‍त झाली तेव्हां हिंदुस्तानांत राहिलेले दिवस कोठें तरी कंठावे असा मीं बेत केला. तेंव्हा आता आणखी भिक्षुत्व संभाळण्यांत अर्थ नाहीं, असें दिसून आल्यामुळें मला ते सोडून देण्यास मोकळीक द्या, अशी स्थविरांला विनंती केली. मला बरोबर पैसे ठेवावे लागतील; कधीं कधीं स्वतःचे अन्न स्वतःच तयार करावें लागेल; कधीं बारा वाजून गेल्यावर जेवण्याचा प्रसंग येईल; तेव्हां भिक्षूचे सर्व नियम माझ्याकडून पाळले जाणार नाहींत; म्हणून योग्य मार्गानें मला भिक्षुत्व सोडून जाऊं द्या, असें मी म्हणालों.” (पान १६०)

गांधीजींच्या गुजरात विद्यापीठात (१९२३)
गांधीजींच्या गुजरात विद्यापीठात (१९२३)

इथून पुढचा धर्मानंदांचा प्रवास हा तुलनेने स्थिर आणि निश्चित योजलेल्या बिंदूंवरचा आहे. अर्थात इथेही मनात एक योजावं आणि दुसरंच काही घडावं असं चालूच राहिलेलं दिसतं. कारण मुळात कलकत्यात आल्यानंतर पुढे उमरावतीस जाऊन, तिथून पुण्याकडे जाऊन, बौद्धधर्माच्या ज्ञानाच्या प्रसाराची खटपट करावी असा त्यांचा बेत होता. पण हरिनाथ दे या विद्यार्थ्याला अट्ठमालिनी हा पाली ग्रंथ शिकवण्याच्या कारणास्तव मार्च १९०६ पर्यंत त्यांचं कलकत्यात वास्तव्य झालं. त्याच दरम्यान कलकत्याच्या प्रख्यात प्रेसिडन्सी कॉलेज मधले इंग्रजीचे प्राध्यापक आणि अरविंद घोषांचे वडील बंधू मनमोहन घोष ह्यांच्याशी त्यांचा परिचय वाढून मैत्री झाली. घोषबाबूंच्या आग्रहास्तव कोसंबींना लोकप्रवाहात पुन्हा परतावं असं गांभीर्यानं वाटू लागलं. “आजपर्यंत रानावनांत आणि बौद्धविहारांत दिवस घालविले तेवढे पुरे झाले; यापुढें तरी कांहीं स्वदेशसेवा होण्यासारखी असेल तर ती अवश्यमेव करावी, असा मी अंतःकरणपूर्वक विचार करूं लागलों.” (पान, १६७)

मग १९०६ च्या ऑगस्ट महिन्यात राशबिहारी बोसांनी सुरु केलेल्या न्याशनल कॉलेज मध्ये केवळ महिना ३० रुपये पगारावर कोसंबी पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आणि ऑक्टोबर १९०६ मध्ये साधारण ७ वर्षांनी आपल्या कुटुंबाच्या भेटीसाठी नागपूर-मुंबई मार्गे गोव्यात आले. मुंबईत प्रार्थना समाजाच्या वार्षिक उत्सवानिमित्त त्यांची पुन्हा एकवार डॉ. भांडारकरांची भेट झाली. यावेळी कोसंबींनी बुद्धचरित्रावर जाहीर व्याख्यान दिलं. अध्यक्षीय भाषणात डॉ. भांडारकरांनी त्यांच्या चिकाटी व साहस आणि अथक परिश्रम करण्याची वृत्ती यांचं फार कौतुक केले. काही वर्षांनी कोसंबींनी पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या घरासाठीची जागा भांडारकरांनी स्वतःच्या राहत्या जागेतून काढून दिली. दोहोंचा सहवास एकमेकांच्या वैचारिक अभिवृद्धीत कायम सहाय्यभूत ठरला.

फर्गुसन कॉलेज १९१७-१८
फर्गुसन कॉलेज १९१७-१८

पुढे गोव्याला आल्यावर त्यांची पत्नी व मुलगी ह्यांच्याशी पुनर्भेट घडली. मात्र कोसंबींची लेखणी इथे फारच कोरडी पडलेली दिसते. आपण ३ महिन्याची तान्ही मुलगी आणि पत्नी यांना सोडून ७ वर्षे घराबाहेर होतो. त्या अवधीत त्यांची वास्तपुस्त काय झाली किंवा इतक्या वर्षांनी आपल्या पत्नीला आपल्याला भेटून काय वाटलं ह्याबद्दल ते निवेदनात संपूर्ण मौन बाळगतात. त्या काळच्या सार्वजनिक संवादाच्या संकेतात ह्या बाबी बसत नव्हत्या हे खरंच. पण तो एकूण त्यांच्या संसारालिप्ततेच्या वृत्तीचाही परिणाम असावा. असो.

पुढे कोसंबीं कलकत्ता विद्यापीठात मोठ्या पदावर गेले. त्यानंतरही ते कलकत्ता विद्यापीठातली २५० रु/महिन्याची नोकरी सोडून बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांनी देऊ केलेल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात राहून मराठीतून बौद्धधर्म आणि पालीभाषेबद्दल लिखाण करण्यासाठीच्या महिना ५० रुपयांच्या शिष्यवृत्तीचा स्वीकार करून मुंबईला राहू लागले. इथेच त्यांचा हार्वर्ड विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक असणारे जेम्स वूड्स यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्या आमंत्रणामुळे १९१० साली हार्वर्ड येथे पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून कोसंबी रुजू झाले. दरम्यान त्यांना एक जगद्विख्यात पुत्र झाला, ज्याला त्यांनी आपल्या वडलांचं दामोदर कोसंबींचं नाव दिलं. पुढे ते रशियाला ही जाऊन आले. ह्या काळात कोसंबींची एक अभ्यासक म्हणून कीर्ती, यथोचित प्रसिद्धी झाली आणि त्यांचं लिखाणही ह्याच काळात बहरलं.

कोसंबींच्या निवेदनात जसा विस्मृतीत गेलेल्या बौद्धधर्म आणि पाली भाषेच्या शोधाचा प्रवाह आहे तसाच एक खोलवर रुजलेला आणि सतत वाहता असलेला, मराठी भाषेशी असणाऱ्या बांधिलकीचा, देशबांधवांच्या उन्नतीविषयीच्या सजगतेचा एक प्रवाहही आहे. ह्या वृत्तीमुळेच ते अमेरिकेहून परत आल्यावर विठ्ठल रामजी शिंद्यांच्या सल्ल्यावरून पुण्यात पाली भाषेच्या अभ्यासाचं केंद्र निर्माण व्हावं म्हणून निव्वळ ७५ रुपये महिना वेतनावर फर्ग्युसन कॉलेजात काम करू लागले. आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांचं मराठीत लिखाण सुरूच होतं. नंतर गांधीजींच्या पुढाकारानं सुरु झालेल्या गुजरात विद्यापीठातल्या प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी सुरु झालेल्या पुरातत्व मंदिरात अध्यापन करण्याचा, एवढंच नाही तर, पुढे गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत आपल्या स्वभावाविपरीत असूनही कोकणात शिरोड्याच्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व करण्याचाही त्यांचा निर्णय त्यांच्या व्यापक समाजभानाची पुरेशी साक्ष देतो. धर्मानंदांनी १९३६-३७ दरम्यान मुंबईत पाली भाषा आणि बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी ‘बहुजन विहार’ नावाच्या वास्तूची निर्मिती केली. अर्थात २६ जानेवारी १९३७ रोजी त्याचं उद्घाटन झालं तेव्हा त्यावरच्या शिलालेखात मात्र कोसंबींना जागा मिळाली नाही. त्यावर लिहिलंय: “जुगलकिशोर बिर्ला यांनी जमिनीकरता १९००० रुपये दिले, शं दा प्रभावळकर यांनी स्तूप बांधून दिला, आ भा पंडित यांनी टेबल, खुर्च्या वगैरे सामान दिले; आणि कोरा आणि भट इंजिनिअर्स यांनी आपली फी घेतली नाही.”

गोव्यात कन्याशाळा सुरु करावी यासाठी धर्मानंद स्वतःचं पुण्यातलं राहतं घर विकून १४ हजार रुपये देऊ करत होते. परंतु ती योजना अनेक कारणांनी सफल होऊ शकली नाही.

धर्मानंदांची अंत्ययात्रा
धर्मानंदांची अंत्ययात्रा

शेवटचे दोन शब्द

कोसंबींच्या आत्मनिवेदनाचं वैशिष्ट्य केवळ एका मुमुक्षुच्या कष्टांची कहाणी एव्हढंच नाही. हे निवेदन आधुनिक काळातल्या वसाहतिक व्यवस्थेमुळे अखिल भारतीय जीवनात चालू असणाऱ्या व्यापक अशा मंथनाच्या कहाणीचा भाग आहे. या वसाहतिक व्यवस्थेतून घडणाऱ्या बदलांविषयी नवशिक्षित, नवजागृत वर्ग साशंक होता. उत्सुकही होता. नव्या शक्यतांचं स्वागत करताना जमेल तसं जुनं टिकवण्याचाही त्याचा प्रयत्न चालू होता. आपलं हिंदुत्व/इस्लामित्व/भारतीयत्व/ब्राह्मणत्व/क्षत्रियत्व टिकवून आधुनिक कसं व्हायचं ह्या गुंतागुंतीच्या प्रश्नाला प्रत्येक भारतीय सामूहिक आणि वैयक्तिक पातळीवर उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता.

आधुनिक भारताच्या वैचारिक इतिहासात वसाहतिक कालखंडातल्या भारतीय जीवनात अनेकानेक पातळ्यांवर जे खोलवरचे बदल घडले त्यांची कहाणी साधारणपणे इंग्रजी किंवा युरोपीय अवकाशातून वाहत आलेल्या वाऱ्यांमुळे घडलेल्या गोष्टी अशी सांगितली जाते.  मात्र कोसंबी, राहुल सांकृत्यायन किंवा विनोबांसारख्या इंग्रजी शिक्षणाच्या परिघाबाहेर पूर्णतः देशी भाषेत वाढलेल्या मंडळींनी घेतलेला भारतीय परंपरांचा शोध, भारतीय आधुनिकतेच्या इतिहासाची काही निराळीच भूमिती सांगतो. उदा. राहुल सांकृत्यायन यांनी लिहिलेल्या मार्क्सचरित्रात ते मार्क्सचा उल्लेख त्याचे दोन्ही आजोबा ज्यू धर्मोपदेशक असल्याकारणाने जर्मनभाषिक ब्राह्मण असा करतात. अभारतीय अवकाश भारतीय परिभाषेत उतरवून घेण्याचा हा लक्षणीय प्रयत्न आहे. याउलट इंग्रजीतून लिखाण करत असलेले जवाहरलाल नेहरू आपल्या भारतीय इतिहासाच्या पुस्तकाला एक ‘डिस्कवरी’ मानतात. हा फरक उल्लेखनीयच नाही तर मूलभूत आहे, आणि त्याचा भारतीय इतिहास लिखाणाच्या परंपरेवर खोल परिणाम झाला असं मला वाटतं. या समस्येचं मूळ आपण कोणासाठी आणि कुठल्या भाषेत लिहितो यात आहेच. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अवकाशच अभारतीय होत गेल्यामुळेही हे घडतं.

या काळात जुन्या भारतीय धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक परंपरांचे नवे अन्वयार्थ लावले गेले. सतत आणि अनेक पातळ्यांवर चालणारा ‘प्रवास’ हे तर या काळाचं महत्वाचं वैशिष्ट्य मानायला हवं. ह्या काळातला जवळपास प्रत्येक महत्वाचा भारतीय विचारवंत काळ आणि अवकाश ह्यांच्यात अनेक पातळ्यांवर प्रवास करताना दिसतो. म्हणजे, विवेकानंद सर्वधर्मपरिषदेसाठी अमेरिकेत जातात तेव्हा ते केवळ भौतिक अवकाशात एका देशातून दुसऱ्या देशात जातात असं नाही. तर प्राचीन भारतीय परंपरेच्या शोधात स्वतःच्या सामूहिक भूतकाळातही प्रवास करत असतात. युरोपीय तत्वज्ञान जागतिक चर्चेची परिभाषा बनल्यामुळे युरोपीय इतिहासातही त्यांच्या येरझाऱ्या चालत असलेल्या दिसतात.

आपलं भारतीयत्व म्हणजे काय हे शोधण्याचा अनेकपदरी प्रयत्न ह्या काळात भारतीय विचारवंत करू लागले. मग ती टिळकांनी केलेली शंकराचार्यांच्या निवृत्तीमार्गावरची टीका असेल किंवा, नारायणशास्त्री मराठ्यांनी सुरु केलेली धर्माच्या परिवर्तनीयतेची मांडणी असेल. एका बाजूला जेव्हा वैदिक/ब्राह्मणी धर्माची पुनर्रचना होऊ लागली होती तेव्हा दुसरीकडे विठ्ठल रामजी शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकर अवैदिक परंपरेच्या शोधात गुंतलेले दिसतात. धर्मानंद कोसंबी हे तर आधुनिक भारतातल्या बौद्धधर्माच्या पुनरुत्थानाच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक मानायला हवेत. डॉ. सुंठणकरांनी त्यांच्या चरित्रात आधुनिक भारतातल्या बौद्ध धम्मासंदर्भात ‘धर्मानंदे रचिला पाया’ असंच वर्णन केलंय. त्यात कदाचित ‘भीमराव झालासे कळस’ अशी भर घालता येईल.

कोसंबींचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य हे की त्यांनी बौद्ध परंपरेसारखी सर्वस्वी अपरिचित परंपरा अत्यंत उत्कटतेने आपली मानली आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी अपार कष्ट घेतले. पुढे मार्क्सवाद, समाजवाद आणि गांधींशी परिचय झाल्यावर त्यातल्या सामाजिक उत्थानाला अनुकूल ठरतील अशा गोष्टीसुद्धा मोकळेपणाने स्वीकारल्या. त्यामुळेच हे निवेदन कोसंबीच्या वैयक्तिक निर्वाणाच्या शोधाची कहाणी नाही किंवा ते एखाद्या फेरारी विकणाऱ्या योग्याचं आत्मचरित्रही नाही. तर करुणा आणि संवेदनशीलता ह्यातून जन्मलेल्या खोल वेदनेतून उमलणाऱ्या कमळाची ती गोष्ट आहे. बुद्धाच्या शोधात आयुष्य वेचलेल्या माणसाकरिता कमळाखेरीज आणखी कशाची उपमा द्यावी?

धर्मानंद कोसंबी यांचं संपूर्ण साहित्य आता इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्याची लिंक –  http://dharmanandkosambi.com/

राहुल सरवटे

Rahul Sarwate

इ-मेल –  rahul.sarwate@gmail.com

न्यूयॉर्क इथल्या कोलंबिया विद्यापीठात आधुनिक भारताच्या इतिहासावर पीएचडी करतो आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेल्या आणि अजूनही महाराष्ट्राच्या स्वजाणीवेत रुतून बसलेल्या पुरोगामित्वाच्या गुणधर्माचा अनेकपदरी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न. शिवाय, आधुनिक भारतीय भाषांतली कादंबरी आणि सर्व प्रकारचा दक्षिणी सिनेमा हे अतिशय आवडीचे विषय.

सर्व फोटो –

7 thoughts on “आत्मशोधाचा प्रवास: धर्मानंद दामोदर कोसंबींचं ‘निवेदन’

 1. Hi….This article is really informative and intriguing.I especially liked the ending paragraphs where you have summarised a gist in a broader context.

  Like

 2. अतिशय सुंदर लेख. लेखाचा विषय अवघड असूनही ओघवत्या भाषेमुळे वाचतांना क्लिष्ट वाटला नाही. आजवर अपरिचित असलेल्या धर्मानंद कोसंबींचा व त्यांच्या प्रवासाची परिचय करून दिल्याबद्दल आभार.

  Like

 3. लेख फार आवडला. कोसंबिंचे तळमळीचे जीवन त्याच तळमळीने आणि अभ्यासू वृत्तीने तुम्ही लिहिलेत यासाठी अनेक धन्यवाद आणि अभिनंदन. मोठ्या लोकांची नवे आणि थोडेफार कार्य माहित असते पण तुम्ही ते कार्य आमच्यापर्यंत नीटच पोहोचवलेत. लेखाच्या मांडणीमुळे धर्मानंदांची शैली आणि तुमचे अभ्यासपूर्ण भाष्य याचा चांगला मिलाफ झाला. पुन्हा एकदा धन्यवाद!

  Like

 4. फारच छान लेख. धर्मानंदांबद्दल छान माहिती दिलीत.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s