इस्त्रायल डायरी

सायली राजाध्यक्ष

For centuries the Jewish people asked in prayer: Will there be a state for the people? No one ever imagined the terrifying question: Will there be a people for the state when it comes into being…?

वरचं विधान इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचं आहे. हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी ज्यूंचा जो नरसंहार केला त्या पार्श्वभूमीवरचं हे विधान आहे. हिटलरनं ज्या ज्यू वंशाला संपवण्याचा विडा उचलला होता तो ज्यू वंश आज कुठे आहे आणि कसा आहे? आजचं इस्त्रायल हे हिटलरला खणखणीत उत्तर आहे.

सगळ्या बाजूंनी पाण्यात पाहणा-या अरब राष्ट्रांनी वेढलेलं इस्त्रायल आज जगातलं एक संपन्न, लोकशाही राष्ट्र आहे. पण संपन्नतेकडे जाण्यासाठी इस्त्रायलच्या नागरिकांनी अपार कष्ट घेतलेले आहेत. आणि धर्माच्या पायावर निर्माण झालेलं राष्ट्र असूनही तिथे लोकशाही टिकून आहे.

इस्त्रायलची निर्मिती वैशिष्ट्यपूर्ण का आहे? तर इस्त्रायलचे बहुसंख्य नागरिक हे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधून आलेले आहेत. अनेक वर्षांसाठी मातृभूमीची आस बाळगलेले हे लोक आपापले देश, आपापल्या भाषा, आपापली संस्कृती हे सगळंसगळं मागे सोडून आले आणि त्यांनी इस्त्रायलला आपलंसं केलं, हिब्रू ही भाषा आपलीशी केली, नवीन संस्कृती आपलीशी केली. हे किती विलक्षण आहे! आपल्याला साधं एखाद्या गावाहून दुस-या गावाला जाताना असंख्य प्रश्न पडतात. पण मग असं काय झालं की ज्यूंना इथे यावंसं वाटलं? आपल्या स्वतःच्या देशात जाण्याची ओढ हे तर मुख्य कारण होतंच, जिथून कुणीही आपल्याला हाकलू शकणार नाही, आपली परवड करणार नाही अशी जागा त्यांना मिळणार होती. इस्त्रायलच्या निर्मितीमध्ये ज्या झायोनिस्ट नेत्यांचा सहभाग होता त्यांना भाषेचं महत्त्व माहीत होतं. भाषा हा माणसांना एकमेकांशी बांघून ठेवणारा मुख्य दुवा आहे हे त्यांना कळलं होतं. त्यामुळे त्यांनी हिब्रूचं पुनरूज्जीवन केलं. जे ज्यू वेगवेगळ्या देशांमधून आले होते त्यांना आपली भाषा सोडून द्यावी लागली आणि हिब्रू शिकावी लागली. त्यासाठी उल्पान हा उपक्रम असतो. आजही इस्त्रायलमध्ये जर स्थायिक व्हायचं असेल तर उल्पानमध्ये राहून हिब्रू शिकणं सक्तीचं आहे. आज संपूर्ण इस्त्रायल हिब्रूमध्ये बोलतो, त्यांचे सगळे व्यवहार हिब्रूमधून चालतात. भाषेमुळे आज देशाचे नागरिक एकमेकांशी बांधले गेलेले आहेत.

IMG_0353
जेरूसलेम

या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा इस्त्रायल कसा आहे? आजचा इस्त्रायल स्वतंत्र, निर्भर, मुक्त, व्हायब्रंट आहे. इतिहासाच्या खुणा अजूनही जागोजागी आहेत. कारण देश निर्माण होऊन फार काळ लोटलेला नाहीये. पण आताची पिढी या सगळ्या विचारांचं ओझं मागे टाकून मुक्तपणे आयुष्याला सामोरं जातेय. इस्त्रायलमधल्या बहुसंख्य लोकांचे कुणी ना कुणी नातेवाईक होलोकॉस्टला बळी पडलेले आहेत. त्यामुळे आज जे लोक साठीत किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांच्या मनावर त्याचे ओरखडे अजूनही आहेत. पण त्याचा त्यांनी आपल्या समाजावर परिणाम होऊ दिलेला नाही. जर्मन वंशाच्या हिटलरनं आपला वंश संपवायचा प्रयत्न केला म्हणून इस्त्रायली माणूस सूडाची भावना घेऊन जगताना दिसत नाही.

मला इस्त्रायलला का जावंसं वाटलं असा प्रश्न मला अनेक मित्रमैत्रिणींनी विचारला. मी आणि माझा नवरा निरंजन या दोघांनाही दुस-या महायुद्धाच्या काळाबद्दल, घटनांबद्दल फार कुतूहल आहे. त्याबद्दल आम्ही दोघेही मिळेल ते वाचत असतो, त्या पार्श्वभूमीवरच्या अनेक फिल्मही आम्ही बघितल्या आहेत आणि बघत असतो. दुस-या महायुद्धानंतर इस्त्रायलची ज्या पार्श्वभूमीवर निर्मिती झाली ते आम्हा दोघांनाही विलक्षण वाटतं. त्यामुळे कधी ना कधी या देशात जायचं असं आम्ही मनोमन ठरवलेलं होतं. म्हणूनच निरंजनला इस्त्रायली दूतावासाकडून सेमिनारसाठी बोलावल्यावर लगेचच मीही त्याच्या मागोमाग तयारच होते.

होलोकॉस्ट म्युझियम बघताना आपल्या मनात संताप, दुःख, असहायता, वेदना आणि सुन्नपणा अशा वेगवेगळ्या भावना उमटत राहतात. हे इतकं भयानक वास्तव आहे याची मनाला पुन्हापुन्हा जाणीव करून द्यावी लागते. जेरूसलेममध्ये असलेलं हे म्युझियम बघायला जगभरातून लोक येत असतात. हे सगळे लोक एका समान भावनेनं जोडले जातात. तो काळ रिवांइड करून बदलता आला तर किती बरं असं प्रत्येकाच्या मनात येत असणार…ज्यू लोकांच्या शरीर वैशिष्ट्यांचं वर्गीकरण करून हिटलरनं ज्यू शोधण्यासाठी काही मोजमापं तयार केली होती. म्हणजे डोक्याचा विशिष्ट आकार, उंची, हाडांची रचना हे बघून ज्यूंना शोधून काढण्याची एक पद्धत त्यानं तयार केली होती. त्यासाठी काही उपकरणं तयार केली होती. ती या म्युझियममध्ये मांडलेली आहेत. ती बघताना आपल्या जीवाचा संताप होतो. कुणी माणसाशी असं वागू शकतं? हा विचार आपला पिच्छा सोडत नाही.

पण नंतर इस्त्रायलमध्ये फिरताना मला एक गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटली. जगभरात जे ज्यू विखुरलेले होते त्यातल्या ब-याच जणांनी ज्यू नसलेल्या व्यक्तीशी लग्न केलं. अर्थातच त्यांची मुलं संपूर्ण ज्यू नाहीत. हे ज्यू जगभरातून आलेले आहेत. आणि आता या ज्यूंची मुलं आपापसात लग्न करताहेत. लग्न करताना तो माणूस रशियन आहे, जर्मन आहे की पोलिश याचा विचार ते करत नाहीत तर त्यांच्यासाठी ती व्यक्ती इस्त्रायली असते. आणि त्यामुळेच आता इस्त्रायलमधली नवीन पिढी ही हिटलरनं ज्यूंच्या मोजमापासाठी जी अघोरी पद्धत काढली होती त्यापेक्षा फार वेगळी झाली आहे. मिश्र संकरामुळे या पिढीची शरीरवैशिष्ट्यं निराळी झाली आहेत. आणि हिटलरच्या अघोरी पद्धतीचा हा पूर्ण पराभव आहे असं मला वाटलं. मनात कुठेतरी या गोष्टीचा आनंद झाला.

IMG_0875
याड वाशेम – होलोकॉस्ट म्युझियम

इस्त्रायलमध्ये आज ज्यू आणि अरब लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही ज्यू हे इथले मूळचे रहिवासी, बरेचसे बाहेरून आलेले तर अरब मात्र इथलेच मूळ रहिवासी आहेत. अरबांना लोकशाहीत असतात त्याप्रमाणे सगळे हक्क समान आहेत. त्यांना अल्पसंख्य असल्याची वागणूक देताना निदान आम्हाला तरी दिसलं नाही. उलट अरब आणि ऑर्थोडॉक्स ज्यूंना लष्करी प्रशिक्षण सक्तीचं नाही जे सामान्य नागरिकांना आहे. वयाच्या १८ वर्षानंतर मुलींना २ वर्षं तर मुलग्यांना ३ वर्षं लष्करी प्रशिक्षण सक्तीचं आहे. याचं कारण देशाची लोकसंख्या कमी आहे आणि चहुबाजूंनी देश शत्रूंनी घेरलेला आहे. त्यामुळे तेल अवीवमध्ये रस्त्यावर कोवळी मुलंमुली लष्करी गणवेशात दिसतात.

हा देश जरी धर्माच्या पायावर अस्तित्वात आला असला तरी प्रत्यक्ष व्यवहारात कुठेही धर्माचा पगडा दिसला नाही. बरेचसे ऑर्थोडॉक्स ज्यू रस्त्यावर दिसतात. पण जागोजागी सिनेगॉग आहेत किंवा लोक वेळोवेळी जाऊन प्रार्थना करताहेत असं काही कुठे दिसलं नाही. त्याउलट मुसलमानांच्या अजान मात्र ऐकू येत होत्या. जेरूसलेममध्ये शबाथच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी २ लाच सगळं बंद झालं. रात्री फिरायला बाहेर पडलो तर रस्त्यावर अगदी शुकशुकाट होता. पण एकेकट्या बायका निर्भरपणे फिरत होत्या. अगदी सुरक्षित वाटत होतं. जेरूसलेम थोडं जुन्या चालीरिती पाळणारं शहर वाटलं. आम्ही दोघे रात्री फिरायला बाहेर पडलो तेव्हा एक माणूस आमच्याकडे आला आणि निरंजनला, माझ्या नव-याला तुम्ही ज्यू आहात का असं विचारायला लागला. नाही म्हटल्यावर त्यानं आम्हाला त्याच्या बरोबर घरी यायची विनंती केली. झालं असं होतं की त्याच्या फ्रीजचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि शबाथमध्ये वीजेच्या उपकरणांना हात लावता येत नाही. त्यामुळे तो रस्त्यावर ज्यू नसलेली व्यक्ती शोधत होता!

इथे जे अरब आहेत ते मात्र आपली लोकसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण मुलांचा खर्च सरकार करतं. जितकी जास्त मुलं तितका सरकारकडून मिळणारा पैसा जास्त. शिवाय लोकसंख्या वाढली तर त्यांचं संख्याबळ वाढणार. जेरूसलेममधला आमचा गाइड अल्लादीन हा अरब होता. त्यानं मला तुला किती मुलं आहेत विचारलं. जेव्हा मी त्याला मला २ मुली आहेत असं सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला, माझ्या आईला हे कळालं तर ती तुला एक थप्पड देईल. मी विचारलं – का? तर तो म्हणाला – जितकी जास्त मुलं तितकी कुटुंबाची सत्ता अधिक. त्याच्या कुटुंबात ११ भावंडं होती.

जेरूसलेममध्ये केवळ अर्ध्या किलोमीटरच्या परिसरात ज्यू, ख्रिश्चन, अरब, मुस्लिम आणि आर्मेनियन क्वार्टर आहेत. इतक्या जमातींचं जेरूसलेम हे पवित्र शहर आहे. पॅलेस्टाइनची आणि इस्त्रायलची राजधानीही जेरूसलेमच आहे. ज्यू आणि अरबांमध्ये पूर्वापार यावरून संघर्ष होत आलेले आहेत. पण आता इस्त्रायलची जेरूसलेमवर चांगलीच पकड दिसली. बेथलेहेम हे पॅलेस्टाइनच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये आहे. तिथे जायला अरब गाइडला परवानगी आहे आणि परदेशी नागरिकांनाही. आम्ही गेलो होतो. इस्त्रायलचंच चलन इथे वापरलं जातं. संरक्षणही इस्त्रायलकडेच आहे. आता वेस्ट बँक आणि इस्त्रायलमध्ये भिंत बांधलेली आहे. पॅलेस्टाइन सतत संघर्षात गुंतलेलं असूनही तिथली रेस्टॉरंट्स, त्यांचे बाजार, रस्ते हे आपल्यापेक्षा स्वच्छ होते. फारसा गलथानपणा कुठेही जाणवला नाही.

IMG_0804
पॅलेस्टाइन आणि इस्त्रायलमधली भिंत

जेरूसलेमला इस्त्रायल म्युझियम आहे. इथे जगभरातल्या प्रसिद्ध चित्रकारांची, शिल्पकारांची कला बघायला मिळते. ज्यूंचा पवित्र मिनारा, ज्यात ते मेणबत्त्या लावतात, त्याच्या विविध देशांमधल्या प्रतिकृतींचं दालन तर अफलातून आहे. त्या-त्या देशातल्या संस्कृतीप्रमाणे मिनारांचं रंगरूप बदललेलं आहे. शिवाय इथे जगातल्या चार प्रमुख सिनेगॉगच्या प्रतिकृती आहेत, ज्यात कोचिनच्या सिनेगॉगचीही प्रतिकृती आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये जे ज्यू वसले होते त्यांच्या संस्कृतीचं एकत्रीकरण इथे बघायला मिळतं.

मला इस्त्रायलचं अजून एक वैशिष्ट्य जाणवलं. जगातल्या अनेक ज्यूंनी आपल्याकडची चित्रं, शिल्पं म्युझियमला दान केलेली आहेत. जगभरात अनेक श्रीमंत ज्यू होते आणि आहेत. त्या सगळ्यांचा या तसंच इतर म्युझियमच्या उभारणीत महत्त्वाचा हातभार आहे.

जेरूसलेममध्ये बघण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होलोकॉस्ट म्युझियम. हे म्युझियम मनावर दगड ठेवून बघावं लागतं. पण ते टाळून चालणार नसतं कारण कितीही नकोसं वाटलं तरी ही गोष्ट घडलेली आहे हे स्वीकारावं लागतं आणि जगातल्या प्रत्येक माणसानं त्याचा अनुभव घ्यायलाच पाहिजे. आपला दुरान्वयानंही होलोकॉस्टशी संबंध नसून आपल्याला ते सगळं बघणं इतकं कठीण जातं तर ज्यांचे जिवलग यात मारले गेले त्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

म्युझियम पाहताना काय झालं याचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. सतत डोळे पाझरत होते. म्युझियमच्या माहिती पुस्तकातला उल्लेखही लक्षणीय – दुस-या महायुद्धात ज्यूंवर जे बेतलं ते ज्यूंच्या दृष्टिकोनातून इथे दाखवलेलं आहे असं म्हटलं आहे…
१९३३ मध्ये हिटलर सत्तेवर आल्यापासून ते इस्त्रायलच्या निर्मितीपर्यंतच्या घटनांचं डॉक्युमेंटेशन इथे आहे. हिटलर सत्तेवर आल्यापासून वंशशुद्धतेच्या नावाखाली त्यानं पद्धतशीरपणे ज्यूंच्या विरोधात आघाडी उघडली. त्याच्या या वेडेपणात त्याला गोअरिंग, गोबेल्स, हिमलरसारख्या लोकांनी साथ दिली. शिवाय जर्मन नागरिकही चेकाळले, इतकंच नव्हे तर युरोपभर ज्यूंच्या विरोधात वातावरण तापलं. जेव्हा ज्यूंच्या हत्या व्हायला लागल्या, ज्यू लोक अचानक गायब व्हायला लागले तेव्हा ज्यूंनी निर्वासित होणं पत्करलं. दुर्दैवानं इथेही त्यांना कुणीही स्वीकारलं नाही. त्यांना परतावं लागलं आणि पुढे जे काही घडलं ते वेगळं सांगायला नको.
या सगळ्या नरसंहारातून जे बचावले त्यांच्या कहाण्या जेव्हा जगासमोर आल्या तेव्हा माणुसकीला मान खाली घालावी लागली. आधी घेट्टोंमधलं एकाकी आयुष्य, तिथली उपासमार, आजार आणि मृत्यू. त्यानंतर त्यातून बचावल्यावर छळछावण्यांमध्ये रवानगी, तिथले अपरिमीत कष्ट, असहायता, जिवलगांचे डोळ्यांदेखत झालेले मृत्यू, पोटच्या मुलांच्या हत्या या सगळ्यांमधून चिवटपणे तगून राहिलेल्यांच्या कहाण्या ऐकताना मन सुन्न होतं, पोटात खड्डा पडतो, हातापायातलं त्राण जातं. एका माणसानं सांगितलेली कहाणी अशी – त्यानं थंडीपासून बचाव करण्यासाठी युनिफॉर्मखाली गोणपाट घातला. ते कळल्यावर नाझी सैनिकांनी त्याला उणे १०-१२ तापमानात तारेच्या दोन कुंपणांच्यामध्ये उभं केलं. कुंपणामधून वीजपुरवठा वाहात होता. त्या माणसानं सांगितलं – अंगावर एक पातळ युनिफॉर्म घालून मी त्या कडाक्याच्या थंडीत उभा होतो. अशी शिक्षा झाल्यावर थंडी असह्य होऊन समोरच्या तारेला स्पर्श करून स्वतःहून मृत्यूला कवटाळलेले लोक मी बघितले होते. पण मला तसं करायचं नव्हतं. मी डोळे मिटले आणि लहान असताना माझ्या वडलांच्या उबदार बिछान्यात शिरायचो ते पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला, मनातल्या मनात बुद्धिबळ खेळलो. काही वेळानंतर थंडीनं मला लघवी लागली, पण मनाचा निग्रह म्हणून मी ती धरून ठेवली. पण मी फार काळ ती धरून ठेवू शकलो नाही. ती माझ्या पायांवरून खाली ओघळली तेव्हा त्या थंडीत तो उष्ण स्पर्श मला हवाहवासा वाटला. पण पुढच्याच क्षणी त्याचा बर्फ झाला…
एका माणसानं सांगितलं की घेट्टोमध्ये इतकी उपासमार सुरू होती की मी घराच्या मागच्या अंगणातून पळ काढला आणि कच-याच्या ढिगात खाणं शोधलं, त्यात मला पावाचा तुकडा मिळाला. तो घेऊन मी घरी आलो. माझे वडील उपासमारीमुळे संपूर्ण सुजले होते. काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला…
या वानगीदाखलच्या दोन घटना मी नमूद करते आहे. अशा अनेक घटना सांगणारे या नरसंहारातून वाचलेले इथे भेटतात. एका माणसाच्या मुलाखतीत तो म्हणाला – अनेक लोक म्हणतात की इतकं भोगल्यावर तू अजून कसा हसू शकतोस, त्यावर मी त्यांना सांगतो की तसं केलं नाही तर मी आयुष्यभर केवळ रडतच बसेन…
या कहाण्या सांगताना या लोकांचे डोळे असहायता, अपमान आणिकही कितीतरी कायकाय सांगतात…
महायुद्धाच्या आधीपासून ते इस्त्रायलच्या निर्मितीपर्यंतच्या सगळ्या घटनांचं अतिशय वास्तव डॉक्युमेंटेशन इथे आहे. त्या काळाची वातावरण निर्मिती कमालीची आहे. ज्यूंना ट्रेनमधून भरून नेतानाच्या काळातल्या घटना ज्या दालनात आहेत तिथे रेल्वेचे रूळ, लँपपोस्ट, रेल्वेचा तो डबा हे सगळं आहे. शिवाय पार्श्वभूमीवर रेल्वेचा आवाजही. छळछावण्यांची मॉडेल्स आहेत, कैद्यांचे गणवेश आहेत, त्यांचे टुथब्रश आहेत, कंगवे आहेत, मग्ज आहेत. असंख्य फोटो आहेत. जगभरातून ज्यूंच्या नातेवाईकांनी दिलेल्या वस्तू आहेत.
ऑस्ट्रियातल्या इमॅन्युअल रिंगेलब्लम या माणसाला हिटलर काहीतरी भयानक करतोय याची जाणीव झाली आणि त्यानं गुप्तपणे त्याविरोधातले पुरावे गोळा करायला सुरूवात केली. शिवाय लहान मुलं, माणसं या सगळ्यांनी कथा, कविता, डाय-या, चित्रं यामधून या नोंदी केल्या. काहीजणांनी फोटो काढले. या सगळ्या गोष्टींमधून जगाला निदान झालेल्या भयाण प्रकाराची माहिती मिळाली. तोपर्यंत सगळ्यांनी डोळ्यांना झापडं लावलेली होती. जगातल्या महासत्ताही मूग गिळून गप्प होत्या.
जगात अनेक संघर्ष होत असतात, यादवी होत असतात, वंशसंहारही होत असतात. पण एका जमातीचं उच्चाटन करण्यासाठी पद्धतशीरपणे त्यांना संपवण्याची योजना आखणं आणि ती तडीला नेण्याचा प्रयत्न करणं ही मानवी क्रौर्याची परिसीमाच. म्युझियमधले फोटो बघताना जर्मन आणि इतरही देशांतल्या नागरिकांच्या डोळ्यांमधला उन्माद, ज्यूंना त्रास देतानाचा क्रूर आनंद बघताना हताश वाटतं. जगातले इतके लोक एकाच वेळी इतके वेडे कसे काय झाले असतील याचं राहूनराहून आश्चर्य वाटत राहातं.
एका उथळ हौदात छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्यांच्या चपलांचा खच आहे. ते बघितल्यावर हमसून हमसून रडायला यायला लागलं म्हणून तोंडावर रूमाल धरला. बाजूला एक बाईही रडत होती. तिचा ११-१२ वर्षांचा मुलगा तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसत होता. माझं रडणं बघितल्यावर तिनं मला टिश्यू पेपर देऊ केला. मी तिला Thank you म्हटलं आणि ती कुठल्या देशाची आहे हे विचारलं. ती अर्जेंटिनाची होती. तिनंही मला तोच प्रश्न विचारला. जगाच्या दोन टोकांवरून इस्त्रायलमध्ये भेटलेल्या आम्हा दोघींची भावना तेव्हा किती सारखी होती…

 

——————

मृत समुद्र अर्थात डेड सी मला ओव्हररेटेड वाटला! कदाचित पोहण्याची आवड आणि इच्छा दोन्ही नसल्यानं असेल. पण पाण्यात न बुडता तरंगता येणं इतकंच करण्यासाठी इतका प्रवास करणं मला तरी काही विशेष वाटलं नाही. पण त्या भागातलं वाळवंट आणि निसर्ग बघण्यासारखा. एकही झाड नसलेले बोडके डोंगर, टेकड्या बघणं वेगळंच होतं. आणि समुद्राच्या काठावरून जाणारा रस्ता जसा वळत जातो तसा निळाशार समुद्र आणि त्यातल्या खनिजांमुळे त्याला लाभलेली मोरपंखी किनार. जणू एखादी रेशमी साडी वा-यावर लहरतेय असं वाटत होतं.

——————————-

तेल अवीव हे शहर जगातल्या कुठल्याही कॉस्मोपॉलिटन शहरासारखं. सतत जाग असणारं, चैतन्यानं मुसमुसणारं. हे गाव समुद्रकिना-याला लगटून अगदी चिंचोळं असं पसरलेलं आहे. परदेशातले लोक खूप चालतात. त्यामुळे त्यांना सगळं काही जवळच वाटतं. आपल्यासारख्या लोकांना दारात गाडी आणि रस्त्यावर बाहेर पडलं की टॅक्सी-रिक्षाची सवय असते. त्यामुळे आपल्याला टॅक्सी किंवा बस घ्यावीशी वाटते. पहिल्या दिवशी जाफा बंदर जवळच आहे म्हणून चालत निघालो. अंगात थर्मल्स, वर लोकरीचा टीशर्ट आणि त्यावर जाड स्वेटर. समुद्रावर चालायला सुरूवात केली आणि जीव नकोसा झाला. कडकडीत ऊन लागत होतं. तशात ५ किलोमीटर चालत गेलो. जाफाला पोचल्यावर मात्र डोळ्यांचं पारणं फिटलं. रोमनांनी बांधलेलं सुंदर बंदर. आजही त्या अवशेषांच्या खुणा बाकी आहेत. दगडी रस्ते, जागोजागी दगडी कमानी, क्लॉक टॉवर, मशीद, वेगवेगळी रेस्टॉरंट्स या सगळ्यांमुळे हे बंदर फार देखणं दिसतं. शिवाय बंदराच्या अगदी वरच्या पातळीवरून तेल अवीव शहराचं विलोभनीय दृश्य दिसतं, इथेही निळाशार समुद्र आपली सोबत करतोच. इथे एक माणूस गिटारवर सुंदर इस्त्रायली संगीत वाजवत होता.

IMG_2183
जाफा

इस्त्रायलमध्ये टॅक्सी महाग आहे पण आम्ही तिघी होतो त्यामुळे आम्ही अनेकदा टॅक्सी घेत असू. टॅक्सी ड्रायव्हरबरोबर बोललं की त्या गावाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल कळतं असं मला वाटतं. आम्हाला जेरूसलेमला एक टॅक्सी ड्रायव्हर भेटला तो फॉक्स टीव्हीचा कॅमेरामन होता. ती टॅक्सी त्याच्या आईवडलांच्या मालकीची होती आणि त्या दिवशी ड्रायव्हर आला नाही म्हणून हा पठ्ठा टॅक्सी चालवायला बाहेर पडला होता. दुसरा एक टॅक्सी ड्रायव्हर भेटला त्याला इंग्लिश अजिबात कळत नव्हतं. त्याला काही विचारलं की तो आम्हाला हिब्रूत काहीतरी विचारे. आणि मेधाताईला टॅक्सी ड्रायव्हरकडून माहिती घेण्यात खूप रस! ती त्याला प्रश्न विचारायला लागली. शेवटी त्यानं त्याच्या मुलाला फोन लावला. त्याला इंग्रजी येत होतं. मग आम्हाला नक्की कुठे जायचं आहे हे त्याला कळलं, त्यानं त्याच्या वडलांना ते समजावून सांगितलं. नंतर बाप आणि मुलगा मनमुराद हसले. मला तेल अवीवमध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर भेटला त्यानं भारतात स्त्रियांना वाईट वागणूक मिळते ना असं विचारलं. मग त्याचं शंकानिरसन केल्यावर तो मला म्हणाला की स्त्रियांना आदराची वागणूक द्यायला हवी. पुढे त्यानं मला विचारलं की तुमच्या देशात खूप स्ट्रीट फूड मिळतं ना? हो म्हटल्यावर तो पुढे म्हणाला – Is it clean? मी म्हटलं की तुमच्या देशाइतकं स्वच्छ नसतं. तर मला म्हणाला – You are honest! त्याला म्हटलं, खरं तर बोलायलाचच हवं ना. सगळे टॅक्सी ड्रायव्हर मुंबईबद्दल कुतूहलानं विचारायचे. इस्त्रायलमध्ये तुमचं स्वागत असंही आवर्जून म्हणायचे.

इस्त्रायलमध्ये स्त्रीपुरूष समानता समाजात भिनलेली आहे. इस्त्रायलच्या निर्मितीपासून सगळ्या कामांमध्ये स्त्रियांचा पुरूषांच्या बरोबरीनं सहभाग आहे. मग ती शेती असो किंवा लष्कर. अगदी जुन्या काळापासून स्त्रियांचा लष्करात प्रत्यक्ष सहभाग आहे. आपल्याकडे अजूनही स्त्रियांना लष्करात अमुक स्थान पहिल्यांदा सारख्या बातम्या येत असतात त्या पार्श्वभूमीवर तर मला हे खूपच जाणवलं.

IMG_1945
आमचं तेलअवीवचं घर

इथे अतिस्थूल व्यक्ती जवळपास दिसतच नाहीत. कदाचित सक्तीचं लष्करी प्रशिक्षण आणि तब्येतीची घेतली जाणारी काळजी हे कारण असावं. समुद्रकिना-यावर जागोजागी व्यायामाची साधनं दिसतात, नुसती साधनं दिसत नाहीत तर लोक व्यायाम करताना दिसतात. सायकलिंग करणा-यांचं प्रमाणही भरपूर आहे. धावणारे लोकही बरेच दिसले. शिवाय आमच्याकडे खेळाला फार महत्त्व दिलं जातं असं एका माणसानं सांगितलं. त्यामुळे बांधेसूद शरीराचे स्त्रीपुरूष बघणं खरोखर नयनरम्य होतं. खाण्याबद्दलही मी बघितलं, इतर अनेक देशांमध्ये दिसतं तसं लोक सर्रास चिप्स किंवा जंक फूड खाताना दिसले नाहीत. भरपूर भाज्या आणि फळांच्या तसंच मांसाच्या वापरावर भर दिसला. तरी भारतीय ज्यूंच्या एका गेटटुगेदरमध्ये मला एकानं सांगितलं की, अमेरिकेनं नवीन पिढीची वाट लावली आहे. हल्ली आमच्याकडे खूप जंक खातात. मी मनात म्हटलं, बाबा, आमच्याकडे बघ, केवळ जंकच खातात!

दुस-या दिवशी हैफा आणि अको उर्फ एकर अशी दोन गावं बघण्याचा बेत होता. जमलंच तर एनहॉद हे आर्टिस्ट व्हिलेज आणि एक वायनरीही बघायची होती. हैफा प्रसिद्ध आहे ते तिथल्या बहाई गार्डन्ससाठी. इस्त्रायल हे बहाई पंथाचंही उगमस्थान. बहाईंचं एक मंदिर इथे आहे. शिवाय या बागा. या बागा डोंगरमाथ्यापासून ते खाली मंदिरापर्यंत पाय-यापाय-यांवर वाढवलेल्या आहेत. खरं सांगायचं तर हेही जरा ओव्हररेटेडच होतं. बहाईंचं मंदिर त्यांच्या इतर मंदिरांप्रमाणेच होतं. फक्त तिथे एक हिंदी बोलणारी इराणी बाई भेटली इतकंच नाविन्य. ती बल्गेरियात राहाते. तिचा नवरा भारतीय आहे आणि ती सेवेसाठी तिथे आली होती. बहाई मंदिरात शिरताना सुरक्षारक्षकांनी सांगितलं – This is holy place, please don’t smoke inside. मी त्याला सांगितलं – We Indian women don’t smoke. तो म्हणाला – In public? म्हटलं – No usually we don’t smoke at all! तो आश्चर्यानं बघतच राहिला.

इस्त्रायलचं मला जाणवलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गाव दुस-याहून वेगळं आहे. जेरूसलेम अगदी पुरातन काळातलं गाव वाटतं. तिथल्या इमारती, आर्किटेक्चर हे अगदी जुन्या पद्धतीचं आहे, पण जुनाट नाहीये. सुरेखशा पिवळट पांढ-या दगडांमधून बांधलेल्या इमारती फार सुंदर दिसतात. तेल अवीव हे जगातल्या कुठल्याही मोठ्या कॉस्मोपॉलिटन शहरासारखं आहे. काही गगनचुंबी इमारती, सतत वाहणारे रस्ते, कोप-याकोप-यांवर रेस्टॉरंट्स आणि कॅफेज. हे शहर रात्रीही तितकंच गजबजलेलं असतं. तर जेरूसलेम संध्याकाळी सात वाजताच झोपून जातं. रस्त्यावर तुरळक वाहतूक आणि दुकानं बंद असतात. हैफा हे डोंगरउतारावर वसलेलं गाव आहे. डोंगरपायथ्यापासून सुरू होणारं हे गाव वळणावळणाच्या रस्त्यांवरून पुढे जात डोंगरमाथ्यापाशी बहाई गार्डन्सला संपतं. मी उत्तरेकडच्या नाझरेथला गेले नाही पण पण ते गावही या गावांपेक्षा एकदम वेगळं असेल याची मला खात्री आहे.

अको किंवा एकर हे जुनं रोमनकालीन गाव. हे गाव आता वाढलं आहे आणि नवीन वस्ती कुठल्याही आधुनिक शहरासारखीच आहे. पण जुनं गाव अतिशय देखणं आहे. कुठल्याही प्राचीन गावासारखंच एका किल्ल्यामध्ये हे गाव वसलेलं आहे. छोट्याशा टुमदार गल्ल्या आणि इमारती आणि तसेच मला आवडणारे दगडी रस्ते. या गावात अरबांचं प्राबल्य आहे. त्यामुळे इथली बरीचशी रेस्टॉरंट्स अरब लोक चालवतात. त्यामुळे इथे मेझे प्लॅटर – फलाफल, बाबा गनूश, हुमस, पिटा ब्रेड आणि अर्थातच ऑलिव्हज आदी उत्तम मिळतं. शिवाय अख्ख्या सुक्यामेव्याची अगदी कमी साखर घालून केलेली चिक्की ही या गावाची खासियत. इथे पाय तुटेपर्यंत फिरलो. एका लहानशा रेस्टॉरंटमध्ये उत्तम जेवलो. मग फिरताना एक अरब माणूस भेटला. त्यानं तुम्ही भारतीय आहात का असं विचारलं. हो म्हटल्यावर आपल्या मुलाला बोलावून ओळख करून दिली आणि याला भारतात जायचंय असं सांगितलं. मग मला भारतात किती धर्म आहेत ते विचारलं. मी आपल्या देशातल्या धर्मांची लांबलचक यादी वाचल्यानंतर तो म्हणाला – नो अरब? म्हटलं – नो. आणि मराठीत म्हटलं – बाबा, आता वाचली ती यादी कमी वाटली की काय तुला?

IMG_20170206_184253475
एनहॉदमधली डच आर्टिस्ट. हिचं नाव विसरले पण हिनं फार प्रेमानं स्वागत केलं.

परतीच्या वाटेवर एनहॉद नावाचं आर्टिस्ट व्हिलेज बघायला थांबलो. या मुद्दाम वसवलेल्या गावात फक्त कलाकार राहतात. शिल्पकार, चित्रकार, पॉटर्स, म्युरल्स करणारे असे अनेक कलाकार या गावात राहतात. हे गाव मुद्दाम वसवलेलं असलं तरी अतिशय देखणं आहे. एका घराचा दुस-या घराला त्रास होणार नाही अशा रितीनं बांधलेलं. भरपूर झाडं लावलेली. ठिकठिकाणी म्युरल्स केलेली. गाव दरीच्या उतारावर खाली वळत जातं. मागे मोठी दरी आणि दरीत घनदाट जंगल. मी आणि शर्मिला गावात फिरत होतो. अतिशय शांतता होती. रस्त्यावरही शुकशुकाट होता. एका घराच्या दाराशी एक तरूण मुलगा दिसला. लगेचच त्या घरात येऊ का म्हणून त्याला विचारलं. तो होता ओम्री नावाचा सेट डिझायनर. सर्व्हायवरसारख्या कार्यक्रमांचं सेट डिझाइन, प्रॉडक्शन डिझाइन तो करतो. त्यानं आम्हाला घरात बोलावलं. लहानसं स्टुडिओ अपार्टमेंट होतं ते. पण अगदी कलात्मकरित्या सजवलेलं. ओम्री आणि त्याची गर्लफ्रेंड तिथे राहतात. ओम्री भारतात येऊन गेलाय, मोडकं हिंदी बोलला तो आमच्याशी. मागे दरीत काय सुंदर जंगल आहे म्हटल्यावर म्हणाला – भारतात मनाली, धरमशाला किती सुरेख आहे. त्यापुढे हे काहीच नाही. नाही म्हटलं तरी ऐकून बरं वाटलं! पुढे गेल्यावर एक चित्रकार बाई भेटली. तिनं आपल्या स्टुडिओत बोलावलं. ती हॉलंडमध्ये शिकून आलेली होती. आपल्या पेंटिंगसाठी ती शाईचा वापर करत होती. तिनं आम्हाला कॉफी तर पाजलीच पण मी फूड ब्लॉगर आहे म्हटल्यावर आपल्या एका मैत्रिणीला भेटायचं सुचवलं, लगोलग तिला मेसेज केला. तिची ही मैत्रीण इस्त्रायलमधल्या सगळ्यात मोठ्या फूड मॅगेझिनची संपादक आहे. पण वेळेअभावी मला तिला भेटायला जमलं नाही. एकूण हे आर्टिस्ट व्हिलेज बघणं हा एक आनंददायी अनुभव होता.

—————————-

तेल अवीवमध्ये डेव्हिड बेन गुरियन या पहिल्या पंतप्रधानांचं घर बघायचंच होतं. आम्ही जिथे राहात होतो तिथून ते अगदी जवळ होतं. म्हणून सकाळीच चालत निघालो. अक्षरशः १० मिनिटांमध्ये बेन गुरियन स्ट्रीटला पोहोचलो. पण घर काही सापडेना. बरं नकाशात शोधतोय तर घर तिथेच दाखवलेलं. शेवटी तिथल्या बागेत बसलेल्या लोकांना विचारलं. त्यांनी सांगितलं की पुढे ५ घरं सोडून डाव्या बाजूला आहे. मग मिळालं. पहिल्या पंतप्रधानांचं घर म्हणजे काहीतरी भव्यदिव्य असेल, खूपशी सुरक्षा व्यवस्था असेल अशी आपली भारतीय कल्पना घेऊन गेलो होतो त्यामुळे ते सापडलं नव्हतं. पोचलो तर साधंसं बैठं घर. त्याच्या बाहेर फक्त एक पाटी. डेव्हिड बेन गुरियन हाऊस, इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन या घरात राहात होते आणि त्यांनी इथून देशाचं काम पाहिलं. साधंसं घर, तुमच्या आमच्यासारख्या कुठल्याही सामान्य माणसाचं वाटावं असं ते घर. बेडरूम्समध्ये साधे बिछाने, अगदी कमीत कमी जामानिमा असलेलं स्वयंपाकघर, लहानसं चार माणसं बसू शकतील असं डायनिंग टेबल. जिथे बैठका होत तिथे दोन सोफे आणि काही खुर्च्या. त्या घराचं एकमेव वैभव म्हणजे तिथे असलेली हजारो पुस्तकं. बेन गुरियन भरपूर वाचत, वेगवेगळ्या विषयांवर वाचत. त्यामुळे या घरात पुस्तकंच पुस्तकं होती. त्यांच्याबद्दलची माहिती वाचल्यावर स्तिमित व्हायला होतं. बेन गुरियन मूळचे पोलिश ज्यू. अगदी लहान वयातच ते पॅलेस्टाइनला राहायला आले. झायोनिस्ट चळवळीत सक्रिय भाग घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ज्यू दहशतवादी गटांना एकत्र करून इस्त्रायलच्या संरक्षण दलाची बांधणी केली. इस्त्रायलच्या निर्मितीनंतर अरब राष्ट्रांनी केलेले हल्ले परतवून लावणा-या इस्त्रायली संरक्षण दलाचं नेतृत्व त्यांनी केलं.

तेल अवीवमध्ये माझी नव्यानंच झालेली इस्त्रायली मैत्रीण सिबील राहाते. मी इस्त्रायलला येण्याच्या आदल्या दिवशी सिबील मला मुंबईत भेटली. ती तिच्या परिचितांकडे आली होती. त्यांनी सुचवलं म्हणून आम्ही भेटलो. सिबील ६६ वर्षांची म्हणजे माझ्या आईच्या वयाची आहे. तेल अवीवमधल्या भारतीय दूतावासात अनेक वर्षं नोकरी केल्यानंतर ती आता निवृत्त झाली आहे. पण जणू उत्साहाचा झराच. सिबीलनं आमचं इस्त्रायलमधलं पालकत्व पत्करलं होतं. आम्हाला जास्तीत जास्त कायकाय बघता येईल याची यादीच तिनं केली होती. शिवाय रोज सकाळी फोन करून ती त्या-त्या दिवसाच्या कार्यक्रमाची आठवण करून देई. तिच्या ओळखीतल्या शाय नावाच्या ड्रायव्हरची तिनं आमची ओळख करून दिली होती. आम्ही या शायबरोबर बरंच फिरलो.

शाय आणि आमचं संभाषण मनोरंजक असायचं. शायला मोडकंतोडकं इंग्रजी यायचं. फक्त त्याला आम्ही काय म्हणतोय हे कळायचं ते महत्त्वाचं. आम्हा तिघींपैकी शर्मिला त्याच्याशी कमीतकमी बोलायची. मेधाताईनं त्याला काहीही सांगितलं तरी तो माझ्याशी बोलून खातरजमा करून घ्यायचा. बहुधा मी टूर ऑपरेटर आहे अशी त्याची खात्री होती. मी आणि सिबील फोनवर इंग्रजीत बोलतो हे बघितल्यावर त्यानं मला विचारलं – Why you and Sybil don’t talk India? म्हणजे तू आणि सिबील हिंदीत का बोलत नाही! त्यावर मी त्याला उत्तर दिलं – Sybil doesn’t know India much! एकदा सिबीलनं खास आमच्यासाठी तिच्या घरी भारतीय ज्यूंचं एक गेट टुगेदर केलं. शाय आम्हाला न्यायला आला होता. आम्ही तिघी साड्या नेसलो होतो. मी आणि मेधाताईनं टिकली लावली होती. मेधाताईची टिकली मरून तर माझी निळी होती. मग शायचे प्रश्न – याचं महत्त्व काय? मग वेगवेगळे रंग का? अर्थात त्याच्या या सगळ्या प्रश्नांचं माझ्या दृष्टीनं फॅशन हे एकच उत्तर असल्यानं थोडक्यात निभावलं. नाहीतर सौभाग्याचं लक्षण वगैरे सांगावं लागलं असतं तर माझ्या समजावण्यानं आणि त्याच्या समजण्यानं दुर्धर प्रसंग ओढवला असता!

IMG_1575
शायबरोबर मेधा कुळकर्णी, शर्मिला फडके, निरंजन

————————

सिबीलनं तिच्या काही मित्रमंडळींना आमच्याशी गप्पा मारायला बोलावलं होतं. ही तिची मित्रमंडळी होती भारतातून गेलेले ज्यू. त्यात मुख्यतः कलकत्त्याहून गेलेले बगदादी ज्यू आणि कोचिनहून गेलेले ज्यू होते. काही मुंबईहून गेलेलेही होते. आम्ही तिघीही शाकाहारी आहोत म्हणून या सगळ्या मित्रमंडळीनं आमच्यासाठी एकेक शाकाहारी पदार्थ करून आणला होता. सगळ्यात वयस्कर बाई होत्या ८३ वर्षांच्या. त्या मुंबईहून ५० च्या दशकात इस्त्रायलला गेल्या होत्या. पण अजूनही त्यांना भारतीय पदार्थ, भारतीय चालीरिती, भारतीय दागिने या सगळ्याची मनापासून आवड आहे. त्या रोज भारतीय पद्धतीचा स्वयंपाक करतात असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

आम्ही भारतात परतणार होतो त्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला ज्यूंचा टू बेश्वाथ हा सण होता. ज्यू कॅलेंडरप्रमाणे शवाथ म्हणजे आपला वसंत ऋतू. हिवाळ्यात सुस्तावलेल्या झाडांना या दिवसांमध्ये नवीन पालवी फुटते आणि त्यांना फळं यायला लागतात म्हणून ज्यू हा सण साजरा करतात. आम्ही आलो म्हणून सिबील आणि तिच्या मित्रमंडळीनं ३ दिवस आधीच हा सण साजरा केला. या सणाच्या दिवशी वेगवेगळ्या खाद्यपेयांच्या प्रार्थना म्हणतात. त्यानुसार पहिली प्रार्थना ब्रेडची झाली. मिठामध्ये ब्रेडचा तुकडा घोळवून तो खाल्ला. त्यानंतर वाईनची प्रार्थना झाली, मग वाईन प्यायलो. त्यानंतर खजूराची झाली. अशा प्रार्थना केल्यानंतर आम्ही सगळे मिळून अतिशय चवदार असं जेवलो.

हे सगळे ज्यू वयानं पन्नाशीच्या पुढचे होते. त्यातल्या अनेकांचे जोडीदार परदेशी होते. म्हणजे ज्यूच पण कुणी पोलंडहून आलेला तर कुणी रशियाहून आलेला. भारतातून इस्त्रायलला जाऊन त्यांना किमान पंचवीस वर्षं झालीच होती. काही लोक ५० च्या, काही साठच्या तर काही अगदी ९० च्या दशकात इस्त्रायलमध्ये स्थायिक झाले होते. प्रत्येकाची कहाणी वेगळी. काहीजण झायोनिस्ट चळवळीकडे आकर्षित होऊन गेले. काहीजण नवीन संधीच्या शोधात गेले, काहीजण आपल्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्यानं बोलावलं म्हणून गेले. सिबीलनं फार मजेशीर गोष्ट सांगितली. तिला कलकत्त्याला एक ज्यू नसलेला मुलगा आवडत होता. ती त्याच्याशी लग्न करेल या भीतीनं तिच्या आईनं तिला तिच्या बहिणीकडे इस्त्रायलला पाठवलं. सिबीलनं पुढे इस्त्रायलला एका भारतीय ज्यूशी लग्न केलं. नंतर तिचा घटस्फोट झाला. भारतीय ज्यू मुलाशी लग्न करूनही संसार टिकला नाही असं ती गमतीनं म्हणते. भारतीय आईवडलांची विचार करण्याची खास पद्धत असंही गमतीनं म्हणते.

रूथ नावाची बाई कलकत्त्याहून वयाच्या सतराव्या वर्षी इस्त्रायलला पोचली ती झायोनिस्ट चळवळीच्या आकर्षणानं. आपल्या कुटुंबात कुणालाही झायोनिस्ट चळवळीचं आकर्षण नव्हतं असं ती सांगते. पुढे तिनं लग्न केलं ते पोलिश ज्यूशी. म्हणजे तिच्या नव-याचे आईवडील पोलंडहून इस्त्रायलला आले होते. नव-याचा जन्म इस्त्रायलमधलाच. तो आता जवळपास ७० वर्षांचा आहे. माझ्याशी बोलताना तो सांगत होता – गेली ४० वर्षं मी भारतीय ज्यूंच्या गेटटुगेदरमध्ये असतो. मी दुरून त्यांच्याकडे बघत असतो, त्यांचं बोलणं ऐकत असतो. हा एकमेव ज्यू समुदाय आहे जो आपल्या भूतकाळाबद्दल इतक्या प्रेमानं बोलतो. भारतातल्या जुन्या आठवणींमध्ये हे सगळे रमून जातात. कारण भारतात त्यांना त्रास झालेला नाहीये. या माणसाला भारतीय जेवण आणि भारत खूप आवडतो. हे दोघेही दरवर्षी भारतात येतात.

आयझॅक हा कलकत्त्याचाच. तो उशीरा म्हणजे ऐंशीच्या दशकात भारतातून आला. त्याची बायको अर्जेंटिनीयन आहे. आयझॅकच्या मुलाचा एक डोळा एका दहशतवादी हल्ल्यात गेला आहे. आयझॅक आणि त्याचा मुलगा एका रेस्टॉरंटमध्ये गेले असताना दहशतवाद्यानं केलेल्या बेछूट गोळीबारात त्याच्या मुलाचा एक डोळा गेला आहे. त्याचा मुलगा आता सायकॉलॉजिस्ट आहे आणि अशा दुर्घटनांचा सामना करावा लागणा-या व्यक्तींच्या समुपदेशनाचं काम तो करतो.

मिनाश मूळचा ब्रह्मदेशातला. त्याचे वडील ब्रिटिश आर्मीत होते. तेव्हा ब्रह्मदेश भारताचाच भाग होता. पुढे ते कलकत्त्याला स्थायिक झाले. मिनाशला दोन आया होत्या. या दोन्ही आया बर्मीज होत्या आणि त्या गुण्यागोविंदानं समोरासमोरच्या घरात नांदत. जेव्हा त्यांना मिनाशच्या वडलांबद्दल बोलायचं असेल तेव्हा त्या त्यांना न कळणा-या बर्मीज बोलीभाषेत बोलत असत. मिनाशला एकूण ११ भाऊ. इस्त्रायलची निर्मिती झाल्यानंतर इस्त्रायल लष्कराला माणसांची गरज आहे म्हणून आपण इस्त्रायलला गेलं पाहिजे असं मिनाशच्या वडलांनी ठरवलं आणि ते आपल्या दोन्ही संसारांसह इस्त्रायलला आले. सरकारनं दोन्ही आयांना समोरासमोर घरं दिली. मिनाशचा मुलगा लष्करात होता. लेबननमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात त्यानंही एक डोळा गमावला आहे. पण हे इथलं वास्तव आहे. याची तयारी ठेवलीच पाहिजे असं हे लोक सांगत होते. मिनाशची बायको फ्रेंच ज्यू आहे. तिला भारतीय स्वयंपाक येत नाही ते मी मिस करतो असं मिनाश म्हणाला.

या अशा एक ना अनेक कथा. सगळ्यांना भारताबद्दल खूप प्रेम आहे, आदर आहे, पण इस्त्रायलचा त्यांना अभिमान आहे. भारतातले अनेक ज्यू इस्त्रायलमध्ये स्थलांतरित झाले. खरं तर भारतात ज्यूंवर अजिबात अत्याचार झाले नव्हते. ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले होते. तरीही जेव्हा इस्त्रायलच्या नवीन सरकारनं जगभरातल्या ज्यूंना नवीन देशात यायचं आमंत्रण दिलं तेव्हा भारतातले कित्येक ज्यू इस्त्रायलला गेले. वर म्हटलं तसं मातृभूमीची आस ही गोष्ट होतीच. पण त्याचबरोबर नवीन देशातल्या संधी त्यांना खुणावत होत्या. सुरूवातीला म्हणजे १९५० आणि ६० च्या दशकात स्थलांतर केलेल्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यांच्यासाठी आयुष्य सोपं नव्हतं कारण इस्त्रायल म्हणजे तेव्हा केवळ वाळवंट होतं, पाण्याचं दुर्भिक्ष होतं. पण ते चिकाटीनं तिथे स्थिरावले. त्यांनी पडेल ते काम केलं.

ते भारतातून इथे आले तेव्हा इस्त्रायलनं त्यांना चांगल्या संधी दिल्या याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता आहे. भारतातून आल्यामुळे त्यांना उत्तम इंग्रजी येत होतं, म्हणून त्यांना बँका, एअरलाइन्स, सरकारी नोक-या पटापट मिळाल्या कारण इंग्रजी येणारे लोक कमी होते. त्यामुळे त्यांची आयुष्यं सुकर झाली. शेवटी मिनाश आणि आयझॅकनं छान गाणी म्हटली.

—————–

किबुत्झ किंवा सामुदायिक वास्तव्य हे इस्त्रायलचं एक खास वैशिष्ट्य. कम्युन्सच्या धर्तीवरच्या या वसाहती इस्त्रायलमध्ये आजही काही प्रमाणात टिकून आहेत. कम्युन्सचा प्रयोग ब-याच देशांमध्ये झाला पण कम्युनिस्ट देशांमध्ये जास्त झाला. सामूहिक मालकीचा प्रयोग आजच्या काळात तसा म्हटलं तर कालबाह्यच ठरावा. इस्त्रायलमधले जे किबुत्झ टिकून आहेत ते मुख्यतः श्रीमंत किबुत्झ आहेत. त्यांचे स्वतःचे मोठे उद्योग आहेत. आम्ही जे किबुत्झ बघितलं त्याचं नाव होतं मागान मिखाइल. हे किबुत्झ इस्त्रायलच्या उत्तर भागात आहे. या किबुत्झच्या मालकीची एक प्लॅस्टिक बनवणारी मोठी कंपनी आहे. शिवाय जेनेटिक इंजिनियरिंगचा वापर करून इथे ऑर्नमेंटल  फिश म्हणजे शोभेचे मासे बनवले जातात. गोल्डफिशमध्ये जेनेटिक बदल करून जपानच्या ध्वजाच्या रंगांच्या (पांढरा आणि लाल) माशांची पैदास करून ते जपानला निर्यात केले जातात. याशिवाय सामुदायिक शेतीही केली जाते. मासळीची पैदास करून ती बाजारात विकली जाते.

सिबीलचा मित्र शिमशॉन (सॅमसन) इथे राहतो. तो गेली ५० वर्षं इथे राहतो आहे आणि खूश आहे. या किबुत्झशिवाय मी कुठेही राहण्याचा विचार करू शकत नाही असं तो म्हणतो. किबुत्झ माझ्या सगळ्या गरजांची काळजी घेतं, मला हवं, नको ते पुरवतं, मला म्हातारपणाची काळजी नाही असं तो म्हणतो. त्याच्या मते किबुत्झ म्हणजे नंदनवन आहे. त्याची मुलंही या किबुत्झमध्येच राहतात. शिमशॉन घटस्फोटीत आहे. आम्ही शिमशॉनबरोबर सामुदायिक डायनिंग हॉलमध्ये जेवलो. उत्तम प्रतीचे पदार्थ अतिशय वाजवी किंमतीत उपलब्ध होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून जेवण घरी घेऊन जाऊ शकता किंवा हवं असेल तर घरीही स्वयंपाक करू शकता असं शिमशॉननं सांगितलं.

IMG_2954
किबुत्झमधलं जेवण

ज्यूंना दीर्घायुष्याचं वरदान आहे. किबुत्झमध्ये काही लोक शंभरीच्या वर आहेत असं शिमशॉन सांगत होता. अगदी वयस्कर लोकांसाठी पंचतारांकित हॉटेलसारख्या सोयीची वसतिगृहं आहेत. पण मला मात्र पंचाहत्तरीनंतर आयुष्य नको आहे असंही तो म्हणाला. किबुत्झमध्ये आठवड्याला ठरावीक तास काम करणं सक्तीचं आहे. वर्षातून २ महिने सुटी घेता येते. मागान मिखाइलमध्ये छान बागा होत्या, सायकलिंग ट्रॅक होते, मुलांना खेळायला विशेष जागा होत्या. शिमशॉननं आम्हाला किबुत्झच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये नेलं. सगळी ऑरगॅनिक झाडं होती, सुंदर चवीच्या फळांनी लगडलेली. जगभरातून विविध प्रकारची फळझाडं लावलेली होती. या बागेत फिरणं हा फार सुरेख अनुभव होता.

मी मनात विचार केला – मी कधी किबुत्झमध्ये राहू शकेन का? तर लगोलग उत्तर आलं, नाही. सगळं सामुदायिक मालकीचं आपल्याला मान्य होणार नाही असं मला वाटलं. आणि आजच्या काळात हे कितपत सयुक्तिक आहे असंही. दिवसभर फिरवून हे सगळं दाखवल्यावर अतिशय प्रेमळ अशा शिमशॉननं आम्हाला दीड तासाचा प्रवास करून तेल अवीवला आणून सोडलं. शिवाय त्याच्या घरी त्यानं स्वतः बेक केलेला उत्तम केक आणि कॉफी दिली ते वेगळंच.

IMG_3012
शिमशॉन आणि मेधाताई, शर्मिला, सिबील

बघता बघता इस्त्रायलमधला शेवटचा दिवस आला आणि एका दिवसात काय करू आणि काय नको असं प्रत्येकाला झालं. निरंजन शेवटचा दिवस आमच्याबरोबर राहणार होता. त्यामुळे तो दिवस त्याच्याबरोबर घालवायचा ठरवलं. पण सकाळी त्याला तेल अवीव युनिव्हर्सिटीमध्ये मिटींग होती. मग मी सकाळीच निरूद्देश भटकायला बाहेर पडले. अर्थातच बाहेर पडल्यापडल्या डाळिंबाच्या रसाचा स्टॉल शोधला. तिथे बसून निवांत घुटके घेत रस्त्यावरच्या माणसांना न्याहाळत राहिले. मग भटकत भटकत खूप पुढे चालत गेले आणि वेळ होता तर लेविन्स्की मार्केटला जाऊ म्हटलं. तशी टॅक्सी घेतली आणि लेविन्स्की मार्केटला पोहोचले. या मार्केटनं मात्र निराशा केली. आपल्या क्रॉफर्ड मार्केटसारखं मार्केट होतं ते. मग तिथे एका बसस्टॉपवर बसून लोकांना बघत राहिले. काहीवेळानं एक बस आली तेव्हा आता निघूया असा विचार केला. बस ड्रायव्हरला मला जिथे जायचं होतं ते ठिकाण या बसमधून गेल्यावर मिळेल का असं विचारलं. तेव्हा त्यानं मला बसमध्ये यायला सांगितलं आणि ही बस तिथे जात नाही पण मी तुला जवळपास सोडतो, तिथून दुसरी बस घे असं म्हणाला. बसमध्ये चढल्यावर तिकिट काढायला गेले तर ड्रायव्हरनं माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. मला त्यानं वाटेत सोडलं.

Screenshot_20171014-164446_01
मी आणि रूथ

पुढे चालत निघाले तर एक सुंदर गल्ली दिसली. तिथे लावलेल्या बोर्डवर गल्लीत प्रसिद्ध चित्रकार रूवेन रूबीनचं घर आहे असं लिहिलेलं दिसलं. मग गल्लीत शिरले. गल्लीत फार सुरेख घरं होती. एका घराचा फोटो काढायला थांबले. तिथे बाजूलाच दुसरी बाईही त्याच घराचा फोटो घेत होती. तिनं आणि मी एकमेकींकडे बघितलं आणि दोघीही आनंदानं हसलो. ती रूथ होती, जी मला होलोकॉस्ट म्युझियममध्ये भेटली होती. आम्ही दोघीही तिथे रडत होतो. तिनं मला डोळे पुसायला टिश्यू देऊ केला होता. आज आम्ही अचानकपणे तेल अवीवमध्ये भेटलो होतो आणि गेल्या चार दिवसातल्या इस्त्रायलच्या अनुभवामुळे दोघीही भारावून गेलो होतो. आनंदानं दोघींनी एकमेकींना मिठी मारली. तिच्या मुलानं आमचा एक फोटो काढला. रूथ अर्जेंटिनाहून आपल्या कुटुंबासह सुटीसाठी आली होती. जेरूसलेममधल्या आमच्या दुःखी करणा-या अनुभवानंतर पुढच्या चार दिवसांत आम्ही दोघींनीही इस्त्रायलमध्ये कितीतरी आनंददायक अनुभव घेतले होते. त्या समाधानात आम्ही आपापल्या देशात परतणार होतो.

सायली राजाध्यक्ष

IMG_20170617_192124_01.jpg

इ-मेल – sayali.rajadhyaksha@gmail.com

फूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर. अन्न हेच पूर्णब्रह्म (www.shecooksathome.com) आणि साडी आणि बरंच काही (www.sareesandotherstories.blog) हे दोन ब्लॉग लिहिते. डिजिटल दिवाळी या अंकाचं संपादन करते.

8 thoughts on “इस्त्रायल डायरी

 1. सुंदर ,अगदी डोळ्यासमोर इस्रायल उभा केलाय, अाता नक्की जाणार, शेतकरी दृष्टीतून दिसणार इस्रायल चे वर्णन मी (माझ्या नवरा)राजेंद्र कदम ऐकले होते पण ,कलासक्त इजरायल बघायला येणार

  Like

 2. मी इस्राइल ला कामानिमीत्त गेले होते आणि एक महीना होते. Tel-Aviv मधेच रहात होते. मी पण या सगळ्या जागांवर जाऊन आले आहे. लेख वाचून पुन्हा आठवलं सगळं . खूप छान वाटलं.

  Like

 3. Khup sundar lihilayes Tai.
  Mala tuzi pravas varnan nehemich awadatat. Sopi sundar tarihi abhyaspurn. ☺☺

  Like

 4. खूप छान लेख आहे. भाषा सहज आणि सोप्पी. वाचन करताना आपण खंरच इस्त्रायल मध्ये फिरत आहे अस भासत.

  Like

 5. छानच ! किबुत्झ पहायला जावं लागेल !

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s