स्वनियोजन करून केलेला प्रवास

केतकी कोकजे

प्रत्यक्ष प्रवासाइतकीच गंमत आणि आनंद प्रवासाची संपूर्ण आखणी करण्यामध्येही असतो. तसे पाहिले तर हे थोडे वेळकाढू काम आहे. त्याकरता बसले आणि उरकले असे होत नसल्याने थोडे मांडी ठोकून चिकाटीनेच करावे लागते. त्यात, बजेट संभाळून आखणी करताना प्रत्यक्ष प्रवासाचे निरनिराळे पर्याय शोधावे लागतात, किंबहुना तसे ते शोधावेच. किंबहुना आखणी करतानाच तीन, चार वेगवेगळे प्लॅन तयार करून ठेवायचे. पण अशी कितीही नीट आखणी केली तरी प्रत्यक्षात मात्र कधी कधी कुठेना कुठे काहीतरी फसते. मग त्यातून होणारी चिडचिड आणि मनस्ताप, ‘बघ, तरी तुला आधीच सांगितलं होतं’ हे काहीवेळा घरच्यांचे वा सोबत्यांचे शेरे, हे त्रासदायक होते. पण ते सर्व तात्पुरते. परत येऊन काही महिने झाल्यावर परत एकदा पुढच्या ट्रीपचा बेत शिजू लागला (तो ही बहुधा मीच शिजवायला सुरूवात करते) की पुन्हा एकदा वही, पेन, लॅपटॉप, टूर कंपन्याच्या पुस्तिका (प्रवासाचे बजेट आणि कालावधी ठरवायला ब-या पडतात), प्रवासावरची इतर पुस्तके ही सर्व आयुधे घेऊन पुढच्या प्रवासाच्या आखणीची सुरूवात होते. प्रवासाची आवड असेल तर त्याच्या आखणीच्या अनुभवातील आनंद कळू शकतो.

या आनंदात अनेक पाय-या असतात. सर्वप्रथम कुठे कुठे जायचे आहे, तेथे बघण्यासारखे काय काय आहे त्याचा अभ्यास करून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी किती दिवस रहायचे ते ठरवायचे. मग, कुठुन कुठे जाणे अधिक सोयीस्कर ठरेल ते नकाशावरून बघून संपूर्ण ट्रीपची आयटरनरी निश्चित करायची. अर्थात ती निश्चित केली तरीही कळत जाणा-या नव्या माहितीनुसार ती पुढे बराच काळ बदलत रहाते. मग त्या त्या ठिकाणी पोचण्याचे वाहन कोणते असेल ते ठरवायचे आणि त्यानंतर तेथील हॉटेल्सचा धांडोळा घ्यायचा. सर्वात मुख्य म्हणजे हे सर्व आपल्या बजेटमध्ये बसते का सतत तपासत राह्यचे (ज्यांना बजेटची चिंता नाही ते किती सुखी!) आणि त्यानुसार बदल करत रहायचे. शेवटी मग त्यानुसार सर्व आरक्षणे करायची.

ही एक प्रदीर्घ काळ करावी लागणारी प्रक्रिया आहे. इंटरनेमुळे ती आता प्रचंड सोपी झाली आहे. पण सुरूवातीला इंटरनेटचा वापर फक्त काही थोडीफार माहिती मिळवण्याकरता, अंतरे माहिती करून घेण्याकरता आणि काही थोडक्या हॉटेल्सची माहिती मिळवण्याकरता व्हायचा कारण अनेक हॉटेल्सची संकेतस्थळेच नव्हती. हॉटेल्स, रेल्वे, विमानप्रवास या कशाचीच आरक्षणे इंटरनेटवर होत नसत.

     या सर्व अडचणी असल्या तरी तेव्हापासून मी आमच्या कौटुंबिक ट्रीपची आखणी करत आले आहे. २००१ साली केरळला आम्ही गेलो ती आमची चौघांची (मी, नवरा आणि दोन मुले) पहिली मोठी ट्रीप. सर्वसाधारण पद्धतीप्रमाणे एकदा ट्रीप करायची ठरल्यावर लगेचच मी  टूर कंपन्यांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली असता आमच्यासोबत आमचे कुक असतात आणि सर्व ठिकाणी आम्ही मराठी जेवण देत असल्याचे त्यांनी सांगीतले. परंतु, ट्रीपमध्ये स्थळदर्शनाबरोबर तिकडच्या स्थानिक क्युझिनचा आनंद घ्यायला आवडेल असे सांगितल्यावर एक दिवस पेरियारला नाईलाजाने तिकडचे जेवण दिले जाते पण लोकांना ते आवडत नसल्याचे त्यांच्याकडून कळले. तुमच्यासारखे स्थानिक क्युझिनचा आनंद घेऊ इच्छिणारे फारच थोडे लोक असतात हेही त्यांनी सांगितले. पण अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली आहे की स्थानिक पदार्थ खाल्ल्याने पैसे व वेळ हे दोन्ही ही खूप वाचतात (नाहीतर ब-याचदा खूप वेळ भारतीय रेस्टॉरंट शोधण्यात जातो). शिवाय स्थलदर्शन म्हणजे जर आपण तेथील संस्कृती बघायला जात असू तर स्थानिक क्युझिन हा त्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि त्याचाही आस्वाद व आनंद आपण घेतला पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या या माहितीनंतर मग मी संपूर्ण ट्रीप आपल्या इच्छेप्रमाणे आखून देणा-या कंपनीकडे गेले. त्यांनी माणशी दिवसाला साधारणपणे १००० रूपये हॉटेलकरता व १००० रूपये टॅक्सीकरता (२००१ साली) खर्च येईल असा अंदाज दिला. पण तेही काही मला फार पटले नाही.

शेवटी स्वतःच सर्व निश्चित करायचे ठरवले. आधी टूर कंपनीच्या आयटरनरीचा अभ्यास केला. त्यात आपल्याला आणखी काय अधिक बघायचे आहे आणि आपल्याचा कुठे अधिक वेळ द्यायला आवडेल ते बघून त्याप्रमाणे आखणी  केली. (माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी तर नाहीच पण आजही केरळच्या टूरमध्ये कोणतीही टूर कंपनी हाऊस बोटचा पर्याय देत नाही. पण आम्ही स्वतंत्रपणे गेल्याने त्यावेळी हा सुंदर अनुभव आम्हाला घेता आला. अगदी आवर्जून सांगावेसे वाटते की अल्लेपीतील हाऊस बोटीवरचा एक दिवस व रात्रीचा मुक्काम आणि बोटीवरील केरळी पध्दतीचे जेवण हे केवळ स्वर्गसुख आहे.) इंटरनेटवरून हॉटेल्सचा शोध घेतला. मग रोज रात्री जवळच्या एसटीडी बूथवर जाऊन वेगवेगळ्या हॉटेल्सशी संपर्क साधून त्यांच्याकडून बँकेचे तपशील घेऊन पैसे भरल्याच्या स्लिप्स फॅक्सवरून परत हॉटेलला पाठवून एक एक हॉटेल निश्चित करत गेले. पहाटे उठून रांगेत उभे राहून रेल्वेची तिकीटे आरक्षित केली. (हे सर्व खूप पुराणकालीन वाटेल. पण केवळ सतरा वर्षांपूर्वीची हे इतके सगळे सव्यापसय करावे लागत. तेव्हा आमच्याकडे फोन होता पण त्याला एसटीडी नव्हता.)

 प्रत्यक्षात आमची ट्रीप टूर कंपनीच्या किंमतीच्या निम्म्या खर्चात झाली, तीही त्यांच्यापेक्षा जास्त चांगली हॉटेल्स निवडून, हाऊसबोटवर एक दिवस राहून आणि खरेदीसकट. आपण स्वतः आखणी केल्यास काहीवेळा अचानक कल्पना नसताना खर्च वाचतो असा अनुभव आला. अलेप्पी ते ठेक्केडी (पेरीयार) टॅक्सीने १८०० ते २००० रूपये होतील असा अंदाज टॅक्सीवाल्यांनी दिला. प्रत्यक्षात टॅक्सी ठरवण्यापूर्वी अलेप्पी बस स्टँडसमोरच हॉटेल असल्याने तेथे काही मिळते का ते बघू म्हणून  गेलो तर तिथला कंडक्टर म्हणाला थेट बस नाही, पण पाच मिनिटात कोट्टायमची बस सुटेल त्याने कोट्टायमपर्यंत जा. तेथून पुढे काहीतरी मिळेल. कोट्टायमपासून टॅक्सी केली तर बरेच पैसे वाचतील म्हणून तेथपर्यंत बसने जाऊ असा विचार केला. कोट्टायमला स्टँडवर उतरलो तर समोर ठेक्केडीची बस उभी होती. तेथील राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उत्तम होत्या. १८०० ते २००० रूपयांचा प्रवास केवळ सव्वाशे दीडशे रूपयात झाला. गुरूवायूरला एका अगदी साध्या रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो तर भरपूर खाऊनही केवळ ८०, ९० रूपये बिल झाले. खाण्यासोबत रस्समचा अख्खा जग दिला होता. बघितले तर केवळ हळदीचे पाणी दिसत होते. पण टेस्ट लाजबाव होती. स्वतः आखणी करून ट्रीप केल्याने असे अचानक आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतात. टूर कंपनीबरोबर गेल्यास त्याला तुम्ही मुकता.

स्वतःच सर्व ठरवून जाण्यात हे असे अचानक आनंदाचे क्षण मिळत असले तरी फक्त आपण एकट्यानेच ट्रिप करण्यात, विशेषतः बरोबर लहान मुले असताना, अचानक कल्पना न केलेल्या अडचणी येतात, थोडीशी भीतीही असते. त्याचा अनुभव घेतला तो पुढच्या उत्तर भारतातील ट्रीपच्या वेळी. केरळच्या ट्रीपच्या अनुभवामुळे आत्मविश्वास वाढल्याने याही ट्रीपची आखणी मीच केली. प्रत्यक्षात दिल्लीहून अमृतसरला जाण्याकरता पहाटेची गाडी पकडण्यासाठी स्टेशनवर आलो आणि धुक्यामुळे गाडी रद्द झाल्याची घोषणा ऐकावी लागली. दिल्लीतील डिसेंबरमधल्या त्या प्रचंड थंडीत पहाटेच्या अंधारात नवरा रिफंडच्या रांगेत उभा राहीला, तेथेच जवळ सामान ठेवून मुलांना सामानाजवळ बसवले आणि मी स्टेशनपासून जवळच असणा-या बुकिंग ऑफिसला दुस-या दिवशीचे बुकिंग करायला गेले. सर्व बुकिंग झाल्यावर रेल्वे स्टेशनवर रिटायरींग रूम मिळवून तेथे एक दिवस रहायची व्यवस्था करूनच आले. तोपर्यंत माझा ११ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी दिल्लीसारख्या स्टेशनवर सामानासहीत दोघेच होते. थँक गॉड ते सुखरूप होते, पण हा आपला किती मोठा मूर्खपणा होता अशी रूखरूख नंतर कितीतरी दिवस मला लागून राहीली होती.

Husband trying his skill in fishing on Thames Lechlade
थेम्स नदीतली मासेमारी

याच ट्रीपमधे पुढे अमृतसरहून डलहौसीला जाताना आधी हॉटेल आरक्षित न करता थेट तेथे गेलो आणि हॉटेल शोधत असताना वरून (रस्ता वर आणि हॉटेल खाली होते) एक छान लाल रंगाचे छत असलेले हॉटेल दिसले. वरून ते आकर्षक वाटले म्हणून बघितले तर आतही खोल्या वगैरे उत्तमच होत्या. नुकतेच रंग वगैरे लावून ते रिनोवेट केले होते. रिनोवेशन नंतर हॉटेल परत सुरू झाल्यावर जाणारे आम्ही पहिलेच गि-हाईक असल्याने मॅनेजरने  मी मागितलेल्या दराने खोली दिली. त्यामुळे तेथेही वाटले होते त्यापेक्षा खूपच पैसे वाचले.

परंतु, दिल्लीचा गाडी रद्द होण्याच्या अनुभवाचा धडा घेऊन पुढच्या काश्मीर आणि अलीकडेची  लेह लडाख या ट्रिप्स मात्र आम्ही टूर कंपनीबरोबर केल्या. पण मधल्या काळात काही ट्रिप्सची आखणी केली त्यात एक हिमाचलची होती. काही वेळा ही आखणी करताना अचानक काही छान माणसं भेटतात. हिमाचल/पंजाबची ट्रीप ठरवताना नागरोटा येथे धरणाच्या प्रचंड मोठ्या जलाशयात फिरताना खूप वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात अशी माहिती मिळाली. पण तेथे फिरायचे कसे, बोटी असतात का वगैरे काहीच कळत नव्हते. शेवटी खूप खटपटी करून तिथल्या स्थानिक फॉरेस्ट ऑफिसचा नंबर मिळवला आणि फोन लावला. परंतु एकूणच सरकारी खात्यांचा अनुभव माहीत असल्याने त्यातून फार काही हाती लागेल अशी आशा नव्हतीच. पण फोनवर आलेले वन अधिकारी चक्क प्रचंड उत्साही निघाले आणि ‘तुम्ही याच, इथे कसे सुंदर पक्षी बघायला मिळतात, मी तुमची सर्व बघायची व्यवस्था करतो’ या त्याच्या प्रतिसादाने चक्क चकितच केले.

प्रत्यक्षात आम्ही तेथे पोचलो तेव्हा नेमके ते अधिकारी तेथे नव्हते, कुठेतरी लांब मिटींगला गेले होते. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी चक्क त्यांच्या स्टाफकडे आणि रेस्ट हाऊसवर निरोप ठेवला होता. त्यांचा एक माणूस चक्क आमच्या दिमतीला होता. रेस्ट हाऊसवर उत्कृष्ट जेवण झाल्यावर मग तो आम्हाला बोटीतून पक्षी दाखवायला आला. त्या अधिका-यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे खरंतर त्यांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. पण ते दुस-या दिवशी परतणार असल्याने भेट शक्य नव्हती. याच ट्रीपमध्ये संपूर्ण प्रवासात आमच्या टॅक्सीचा ड्रायव्हर एक वेगळाच वल्ली निघाला. मुंबईहून गाडीने जालंधरला दुस-या दिवशी संध्याकाळी पोचलो आणि तेथेच स्टेशनवर टॅक्सी मागवली होती. त्या टॅक्सीत बसून चिंतपर्णीकडे निघालो आणि सगळ्यात पहिले जे मोठे शहर लागले तेथे शहराबाहेरचा बायपास न घेता, बायपास समजून त्या टॅक्सी चालकाने चक्क शहरातूनच गाडी घेतली. त्यात त्याला बाहेर पडण्याचा रस्ता नीट माहीत नव्हता. तो रस्ता चुकला आणि मुंबईपासूनच्या दोन दिवसांच्या सलग प्रवासानंतर केव्हा एकदा चिंतपर्णीला हॉटेलमध्ये पोचतोय असे झाले असताना एक दीड तासाने आमचा प्रवास लांबवला. पुढच्या संपूर्ण प्रवासात त्याला आम्ही बायपासवरून प्रत्येक ठिकाणी प्रचंड छळले. अगदी आजही आम्ही आमचे गाडीने कुठेही पुणे, कोल्हापूर असे जवळपास प्रवासाला निघालो आणि कुठेही बायपास आला की त्यावरून आमचे विनोद सुरू होतात आणि त्याची आठवण निघते.

Thames river in Lechlade 2
लेच्लडमधली थेम्स नदी

सिक्किमची आमची ट्रिप देखील अशीच संस्मरणीय झाली. त्या ट्रीपमध्येही टूर कंपन्यांच्या आयटरनरीत नसलेले नामची नामक छोटे खेडे (हे सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांचे गाव) आमच्या आयटरनरीत मी घेतले होते. तेथील टेकडीवरील लाकडी व बांबूचे ट्विन बंगलो असलेले हॉटेल, हॉटेल रूमबाहेर फिरणारे ढग, हे सर्व (एक जेवण सोडले तर) फार अप्रतिम होते. याच ट्रिपमध्ये गुरू दोंगमार हे तिबेटजवळील एक स्वर्गीय तळे बघता आले, तेही केवळ स्वतः ट्रिप प्लॅन केली असल्यामुळे कारण आम्ही गेलो तेव्हा फारशा कोणत्याही टूर कंपन्या सिक्किम दार्जिलिंगच्या टूरमध्ये गंगटोकव्यतिरीक्त सिक्किममध्ये इतरत्र कोठे नेतच नव्हत्या.

 मधल्या काही छोट्या मोठ्या ट्रिपची आखणी केल्यानंतर मागील वर्षी परदेशातील ख-या मोठ्या ट्रिपची आखणी करण्याचे आव्हान माझ्यापुढे आले. मुलीच्या कॉनव्होकेशनकरता नोव्हेंबरमध्ये यूकेला जाण्याचे आणि मग त्याला जोडूनच दोन आठवड्यांची ट्रिप करण्याचे ठरवले. ईशा तिची परीक्षा संपवून ऑगस्टमध्ये परत आली आणि तिच्या मदतीने ऑपरेशन यूके सुरू केले. फक्त यूके का त्यासोबत युरोपमधलेही काही देश हे द्वंद मनात होते. पण ट्रिपला खरेच न्याय द्यायचा असेल तर फक्त यूकेच, युरोप परत केव्हातरी पुढे असा कौल दिला. हे एकदा नक्की ठरल्यावर खर्च कमी करण्याच्या दृष्टीने इथून लंडनला जायचे आणि लंडनहूनच परतायचे हे निश्चित करून ते दोन्ही दिवस आधी पक्के करून ताबडतोब विमानाची तिकीटे काढली. ईशा यूकेला गेल्यापासून वर्षभरात केव्हातरी तिकडे जायचेच हे निश्चित असल्याने काय काय बघायचे याची यादी केव्हापासूनच तयार करत होते.

ही यादी करताना सर्वात कसोटीची गोष्ट असते ती म्हणजे मोह टाळणे. प्रत्येकच गोष्ट आपल्याला बघायची असते. उपलब्ध वेळात इतके सगळे बघणे शक्य नसते. (आमच्या एका स्नेह्यांनी यावर उपाय सुचवला आहे. ते म्हणतात पहिली ट्रिप टूर कंपनीबरोबर करायची आणि त्यांच्या कार्यक्रमानुसार घाईघाईत सर्व पाहून घ्यायचे. मग त्यातले आपल्याला काय नीट पहायचे आहे ते ठरवून परत आपण आखणी करून दुसरी ट्रिप करायची. अर्थात मला हे पटले नाही.) त्यामुळे प्रेक्षणीय स्थळांमध्ये डावे उजवे करावे लागते आणि काळजावर दगड ठेवून काही ठिकाणांना भेटीची योजना न करताच राम राम म्हणावे लागते. काही ठिकाणे अगदी वरवरच्या भेटीची ठेवावी लागतात. (अनेक ठिकाणी प्रत्यक्षात गेल्यावर मात्र अरे अजून इथे रहाण्याचा प्लॅन करायला हवा होता असे हमखास वाटते.)

बघण्याच्या स्थळांची यादी निश्चित करत असतानाच एकीकडे इंटरनेटवर नकाशे आणि अंतरे पाहून वहीमध्ये आमच्या फिरण्याचे नकाशे काढून जे ठरवत आहे ते शक्य आहे का ते तपासून बघत होते. य़ूकेतल्या एका मैत्रीणीला आयटरनरीची मेल टाकली तर तिने खूप पाऊस आणि थंडी असेल म्हणून अख्खे स्कॉटलंड उडवून लावले. चार दिवस संभ्रमात गेले, स्कॉटलंड करावे का नाही. पावसाचा किती त्रास होईल. अखेर मनाने कौल दिला बिनधास्त पुढे जाण्याचा. मुंबईच्या माणसाला पावसाचे इतके काही नाही. फारतर काय खूप पाऊस असेल तर काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे बघून होणार नाहीत. थंडी तर अशीही लंडनमध्ये पण खूप असणार, त्याकरता गरम कपडे घेतोच आहोत.

Scene from Train Edinbura to Glasgow 2
एडिंबरा-ग्लासगो ट्रेनमधून काढलेला फोटो

‘ते लोक प्रवासाचा फार बाऊ करतात. आपल्या आणि त्यांच्या प्रवासाच्या कल्पनांमध्ये खूप फरक आहे. पाऊस असेल, पण इतका काही नाही, जाऊयाच’ या ईशाच्या बोलण्याने अजूनच धीर आला आणि मैत्रिणीचा सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्षात, पावसाचा इतका काही त्रास झाला नाही आणि स्कॉटलंड हाच आमच्या संपूर्ण ट्रिपचा ग्रँड फिनाले ठरला.

या ट्रिपच्या वेळेपर्यंत एअर बीएनबी लोकप्रिय झालेले असल्याने काही ठिकाणी हॉटेलएवजी घरांचा पर्याय निवडला. स्टोनहेंजजवळ एम्सबरीला एखाद्या चित्रपटातील गावातल्या घरासारख्या घरात रहायला मिळाले. प्रचंड पानगळ झाल्याने पुढच्या यार्डमध्ये परसलेली भरपूर पाने, ब-यापैकी झाडे आणि यात टिपिकल दगडी इंग्लिश घर. त्याच्या आऊटहाऊसमध्ये आमची रहायची सोय होती. आऊटहाऊस असले तरी प्रशस्त. आत एखाद्या हॉटेलप्रमाणेच सर्व सोयी. अतिशय स्वच्छ, नीट. सर्व प्रकारच्या ब्रेकफास्ट्ची सोय (अर्थात तो आपणच करून घ्यायचा). तेथे रहाणे हा एक प्रसन्न अनुभव होता.

प्रवासात चांगले हॉटेल मिळणे आणि छान रहाण्याची व्यवस्था होणे हा बरेचदा एक मटका असतो. लागला तर लागला. एम्सबरीप्रमाणेच लेच्लेड या ऑक्सफर्ड जवळच्या ३, ४ हजार लोकवस्तीच्या छोट्याश्या गावातही हा मटका आम्हाला लागला. तेथील सर्वात जुन्या, सतराव्या शतकातल्या केवळ पाच सहा खोल्या असलेल्या एका इन (Inn) मध्ये मुक्काम करायला मिळाला. तिथे मस्त फायर प्लेस होती (कडाक्याच्या थंडीमुळे त्याची गरजही भासत होती.) एखाद्या इंग्रजी चित्रपटात बघतो त्याप्रमाणे गावातील लोक बार काऊंटरसमोर असलेल्या खुर्च्यांवर बसून बियर पीत गप्पा मारत होते. ब्रिटीश पबची ऐकलेली सर्व वर्णने तेथे अनुभवायला मिळाली. बारमध्ये दोन शतकांपूर्वीच्या बंदुका, खूप जुना रेडीयो, ट्रंपेट, फोनोग्राम अश्या जुन्या पुराण्या वस्तू ठेवल्या होत्या. हॉटेल ठरवताना हे असे काही इतके जुने हॉटेल असेल, छान असेल अशी काही कल्पना आली नव्हती, पण प्रत्यक्षात मात्र ते गावही आणि हॉटेलही फारच सुंदर छोटेसे निघाले. एक रात्र समोरच्या दुस-या एका हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो तर ख्रिसमस जवळ आल्याने उत्साही वातावरण होते. जवळजवळ ६०, ७० लोक तेथे पबमध्ये बियर पीत होते, गाणी सुरू होती, गप्पांचा आवाज होता. नवरा आणि मुलगी दोघांनाही या प्रकारच्या युरोपीय रहाणीमानाचे फारच आकर्षण व आवड असल्याने ते तर या हॉटेलवर बेहद खूष झाले. नवरा तर परत कधी युकेला आलो तर आयटरनरीत या गावाचा परत समावेश करायचाच आणि इथे रहायचेच (शक्य झाले तर रिटोयरमेंटनंतर इथेच येऊन राहू) इथपर्यंत जाऊन पोचला.

एडिंबराला एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सर्विस अपार्टमेंट कॉलेजेसना सुट्ट्या असल्याने बीएनबीमधून मिळाले. एक बेडरूम, मोठ्या किचनमध्ये एक डबल बेड. अगदी एखाद्या छोट्या फ्लॅटप्रमाणे. किचनमध्ये अतिशय छान भांडी, क्रोकरी, कटलरी चे सर्व सेट्स (अगदी व्हिस्की, वाईन ग्लासेसपासून सर्व काही). त्यामुळे ब्रेकफास्ट तर आम्ही रोज रूमवरच तयार करत होतो. पण ती सर्व क्रोकरी, कटलरी बघून स्वयंपाक करायचा मोह झाला म्हणून एक दिवस चक्क जवळच्या स्टोअरमधून सामान आणून उत्कृष्ट कॉंटिनेंटल जेवणाचा बेत केला आणि एखादे ब्रिटीश कुटुंब आपल्या घरात जेवेल त्या स्टाईलमध्ये जेवलो. हाच प्रयोग नंतर एकदा लंडनमध्येही केला. एक दोन ठिकाणी ब्रिटीश पबचा अनुभव घेता आला. हे सर्व शक्य झाले ते ट्रिपची आखणी स्वतः केल्याने. मुळात एम्सबरी, लेच्लेड ही लहान गावे कोणत्याही टूर कंपनीच्या आयटरनेरीत नसतातच. ती केवळ मी स्वतः आखणी केल्यामुळे आमच्या आयटरनरीत घेता आली.

हे जरी छान अनुभव आले असले तरी स्वतः प्रवासाची आखणी करताना हमखास गंडण्याची जागा म्हणजे हॉटेल. इंटरनेटवरच्या छायाचित्रांमध्ये ब-याचदा उत्कृष्ट दिसणारे हॉटेल प्रत्यक्षात बेकार निघते किंवा त्याचा आजूबाजूचा परिसर फारसा चांगला नसतो. याबाबत इतक्या वर्षांच्या अनुभवावरून माझा एक ढोबळ ठोकताळा म्हणजे खूप लाईट वगैर लावून जर हॉटेलचे फोटो काढले असतील तर त्याबाबत जरा जपूनच विचार करायचा. ती छायाचित्रे ब-याचदा फसवी असतात. आता नेटवर रेटींग, लोकांचे अनुभव वगैरे असल्याने हॉटेल निवडायला जरा मदत होते. पण आमच्या केरळ ट्रिपच्या वेळी मी नेटवरचे फोटो पाहून अलेप्पीचे हॉटेल निवडले आणि प्रत्यक्षात त्या हॉटेलमध्ये खाली देशी दारूचा बार होता आणि हॉटेलही अगदीच सामान्य होते. पण नेटवरच्या छायाचित्रात मात्र ते अगदी मोहात पडावे इतके छान दिसत होते.

यूकेमध्येही ब्रिस्टॉलला आम्ही एअर बीएनबीतर्फे एक घर बुक केले. ते ठीक होते पण बेडरूम्स वर असताना बाथरूम मात्र खाली तळमजल्यावर अशा गैरसोयी होत्या. दरवाजाला इलेक्ट्रॉनिक लॉक होते व त्याचा कोड मालकाने आम्हाला मेलने कळवला होता. ते लॉक बरोबर तीन वाजता एक्टिवेट होणार होते. आम्ही एक तास आधी पोचल्याने चक्क बाहेर थंडीत एक तास उभे रहावे लागले. शिवाय आजूबाजूचा परिसर फार चांगला नव्हता. खाण्याची बरी सोय नव्हती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्थानिक पदार्थच खायचे हा आमचा नियम जरा बाजूला ठेवून त्या दिवशी दुपारी चक्क बाजूच्या दुकानातून सामान आणून पोहे करावे लागले. दुस-या दिवशी चक्क टॉयलेट तुंबले. अखेर कंटाळून आम्ही एक दिवस आधीच पुढच्या ठिकाणाकडे प्रस्थान ठेवले. सिक्किमच्या ट्रीपमध्ये गंगटोकला हॉटेल बुक केले आणि नंतर कार्यक्रमात काही बदल करावा लागल्याने ठरल्यापेक्षा एक दिवस आधीच आम्ही तेथे पोचणार होतो. परंतु त्या दिवशी मात्र त्या हॉटेलमध्ये जागा नव्हती. पण तेथील मॅनेजरने दुस-या हॉटेलमध्ये एक दिवसाकरता बुकिंग केले आणि आम्हाला कळवले काळजी करू नका तुमचे एका रात्रीचे बुकिंग जवळच दुस-या हॉटेलमध्ये केले आहे. प्रत्यक्षात रात्री आठ वाजता तेथे पोचलो तर निरोपाचा काहीतरी घोळ झाला होता आणि त्या हॉटेलचे म्हणणे त्यांच्याकडे काही आमचे बुकिंग नाही. अखेर मूळ हॉटेलला परत येऊन त्या मॅनेजरला घरी फोन केला, त्याने परत त्या हॉटेलला फोन केला आणि परत आम्ही तिकडे गेलो तेव्हा त्याने रूम दिली.

टूर कंपनीबरोबर गेल्यावर हे ताप डोक्याला नसतात. एकदा पैसे भरले की आपण मोकळे. मग फक्त ट्रिपला निघायचे. ब-याचदा अगदी सामानही आपल्याला उचलावे लागत नाही. पण मग अनेक गोष्टी त्यांच्या शिस्तीत घाईघाईने बघाव्या लागतात. आणि स्थळदर्शन, रहाणे, खाणे, पिणे याबाबतच्या अचानकपणे समोर येणा-या अनेक चांगल्या अनुभवांना मुकावे लागते. तसे होऊ नये म्हणून तर हा सर्व खटाटोप मी गेली काही वर्षे करत आले आहे. त्यामुळे आता नवरा आणि मुले तर सतत मला सांगत असतात की निवृत्त झाल्यावर तू लोकांच्या ट्रिपचे प्लॅनिंग करून देण्याचा व्यवसायच सुरू कर.

ते करेन का माहीत नाही पण सध्या मात्र मी मुलगी जर्मनीत शिकायला असल्याचा फायदा घेऊन तिला भेटायच्या निमित्ताने युरोप स्वस्तात कसा बघता येईल याच्याच प्लॅनिंगमध्ये गुंतले आहे.

केतकी कोकजे

Ketki7

 इ-मेल – ketkikokje@gmail.com

फिरायला, प्रवास करायला आवडते. लांबच्या प्रवासांची नीटसपणे काटेकोर आखणी करणे हा छंद.

4 thoughts on “स्वनियोजन करून केलेला प्रवास

  1. ketaki tai, mast varnan. mala dekhil ase pravas karaychi khup ichcha aahe. pan hi sagali info (which places to visit) tumhi kuthun milavata ? i follow the tourist companys package info.

    Like

  2. छान लिहिले आहे. मी स्वतःही कधी टूर कंपन्यांबरोबर तर अनेकदा स्वतः आखून बराच प्रवास केला आहे. तुम्ही म्हणता ते आनंद अचानक गवसणे तर अगदी वैताग असे दोन्ही अनुभव येतात पण मोकळ्या मानाने आणि या शक्यता लक्षात घेऊन टूर केल्यास चिडचिड कमी होते. अर्थात मुले लहान असताना असे प्रवास अधिक त्रासाचे ठरू शकतात. काही वेळेस अचानक सहप्रवाशांबरोबर होणाऱ्या मैत्र्या टूर बरोबर गेल्यास होऊ शकतात. दोन्हीचे प्लस मायनस points आहेत. ते आपल्या परिस्थिती आणि मनास्थितीनुसार ठरवायचे!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s