परकेपण सरता सरत नाही

 शिल्पा केळकर

आमच्या  वाड्यातल्या दोन खोल्यांच्या घरासमोर छोटं अंगण होतं. उन्हाळ्यात आम्ही बाहेर अंगणातच गाद्या घालून झोपत असू. चांदण्याचं छत न्याहाळताना मधेच दिवे चमकवत एखादे विमान जात असे. ते दिसताच मी कुतुहलाने खाड्कन उठून बसे. हे कुठे चालले असेल,  त्या लोकांना खालचे काही दिसत असेल का, काय वाटत असेल विमानात बसल्यावर, असे सगळे विचार येत असत. त्या विमानाबरोबर माझ्या कल्पनाशक्तीचे विमानही उंच उडू लागे.

किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी ।

पहा जाऊन विमानांतूनी, दिसेल शोभा अपूर्व वरुनी

डोंगर, राने, ओहळ, तटिनी, आणि कुठे सागरलहरी ।।

ही कविता मनाशी म्हणत कधीतरी डोळा लागत असे. पण विमानात बसल्याचे स्वप्न मात्र कधीच पडत नसे. आपण कधी विमानात बसू किंवा देश सोडून कुठे दुसरीकडे जाऊ हे स्वप्नातही बघण्याची शक्यता नव्हतीच त्यावेळी. मात्र पुढच्या आयुष्यात आखून दिल्याप्रमाणे घटना घडत गेल्या.

सिंगापूरला घेतलेल्या नोकरीतून माझी अमेरिकेत बदली झाली आणि मी जगातल्या एका अजब संस्कृती असलेल्या बलाढ्य देशात येऊन दाखल कधी झाले हे समजलेदेखील नाही. खरं तर देश सोडून बाहेर गेले पहिल्यांदा ते सिंगापोरमधे. पण तिथे मात्र एक भाषा सोडली तर आपण फार परक्या ठिकाणी येऊन राहात आहोत असे मात्र जास्त वाटले नाही. नाही म्हटले तरी अशिया खंडातल्या या चिमुकल्या देशात भारतीय वंशाचे बरेच लोक असल्याने तिथे कधीच “एलिअन” किंवा परकेपणाची भावना शिवली नाही. मात्र अमेरिकेत पाऊल टाकले आणि नुसते माझ्या मनानेच नाही तर अमेरिकन इमिग्रेशनने पण “एलिअन रेसिडंट” असे ऑफिशिअल शिक्कामोर्तब केले. आणि पुढचे कित्येक महिनेच नाहीत तर कित्येक वर्षे सगळीकडे ते वागवत फिरावं लागलं.

Colorado River
कोलोरॅडो नदी

सगळ्यात पहिल्यांदा जाणीव झाली ती आपल्या गावात, देशात असताना मी किती गोष्टी गृहीत धरुन चालले होते याची. वातावरण सुरक्षित वाटायचं. नुसती माणसंच नव्हेत तर रस्त्यावरच्या खाणाखुणा, झाडं, पक्षी  त्यांचे विशिष्ट आवाज हेही  सगळं रोजच्या जगण्याला आणि वातावरणाला दिलासा देणारं होतं. आपली पाळंमुळं खोलवर इथंच रूजलेली आहेत याची सुखदायी जाणीव करून  देणारं.  हेही खरं की भारतात राहात असताना याचा कधीच जाणीवपूर्वक विचारही केलेला नव्हता. मात्र देश सोडून बाहेर आले आणि सगळ्यात पहिल्यांदा तीव्र जाणीव झाली ती ही सुरक्षितता गमावल्याची.

अचानकपणे माणसेच काय, पण एकही  झाड, पक्षी, माणसांची नावे,  दुकाने काहीही ओळखीचे नाही. इतके दिवस खोलवर रूजलेलं आणि रूतलेलं,  हे सगळं माझं आहे, आणि हे असंच राहाणार आहे ह्या सगळ्या समजूती एका फटकार्‍यात मूळापासून उखडून निघाल्या आणि असुरक्षित वाटू लागलं.  देश-वेश-भाषा यानं तर परकेपण जाणवलंच. पण त्याबरोबरच त्रास झाला तो तो इथल्या एकाही झाडाला अन पक्षाला नावानं हाक न मारता यावी याचा. सह्याद्री बघितल्यावर मनात जी तार झंकारत असे तीच इथलाही डोंगर बघताना  झंकारत नाही, याचाही. कित्येक दिवस रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि माणसांच्या चेहऱ्यामध्ये दिलासा शोधायचा निष्फळ प्रयत्न करत राहिले. स्वतःचीही ओळख विसरायला लावणारी, एक परकेपणाची जाणीव आतपर्यंत खोलवर पोचली.

पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ. कम्युनिकेशनची साधने जास्त प्रगत न झाल्याने मागे सोडून आलेल्यांशी सतत संपर्कात राहाणेही शक्य नव्हते. शिवाय अमेरिकेत समाजजीवनाचे स्वालंबन आणि सर्व प्रकारचे वैयक्तिक स्वातंत्र्य हे दोन महत्वाचे पैलू आणि आधारस्तंभ. मी तर महाराष्ट्रातल्या लहान गावात वाढलेली.  जिथे शेजारपाजार हाही एक कुटुंबाचा भाग असतो. नुसती आपल्या घरची-जवळची माणसेच नाहीत तर इस्त्रीवाला, दूधवाला,  दुकानदार, दारावर येणारा भाजीवाला हे सगळेही असलेल्या वातावरणात मी लहानाची मोठी होत गेले. अशा वातावरणातून एकदम इथे आल्यावर आपले शेजारी कोण आहेत हेही माहित नाही हे पचनी पडायला फारच जड गेले. पहिल्यांदा वाटले की या लोकांना माणूसकीच नाही. कुणी कुणाची कदर करत नाही. एकेकटे राहणारे वृद्ध बघून त्यांची दयाही आली.

मग मात्र मनाला हळूहळू समजवावे लागले. जर मार्ग आपणच निवडलेला आहे तर मार्गक्रमणही आपल्यालाच आणि तेही आनंदाने करायला हवं. खरंतर आजूबाजूला नंदनवन फुलले होते. मीच ते पाहायचे नाकारत होते. मात्र नंतर जे होते ते सांभाळत, जिथे गेले होते आहे तिथलं व्हायला सुरुवात केली. स्थानिक लोकांशी परिचय झाला. इथले विविध पदार्थ, विविध प्रांत, त्यांची खासियत कळू लागली. वृद्ध लोक मुलांनी टाकून दिल्यामुळे नाही तर आपखुषीने, आरोग्य साथ देईपर्यंत कोणावर आपला भार टाकत नाहीत हेही समजले.  इथला समाज कसा बनला आहे हे उमगलं. सभोवतालाशीही नातं तयार होऊ लागले. इथेही चिमण्या कावळे दिसले तेव्हा आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांच्या सोबतीनं  इथल्या कार्डीनल, क्वेल, कॅक्टस व्रेन या स्थानिक पक्ष्यांशीही मैत्री करुन घेतली. त्यांना त्यांच्या शिळेवरून ओळखायला यायला लागल्यावर अगदी धन्यच वाटलं. ओळखीची झाडं आणि माणसांचे चेहरे, रस्त्यावरच्या खाणाखुणा दिलासा देऊ लागले. आणि चार-पाच वर्षांत परकेपणा जाऊन मायदेशातली सुरक्षिततेची  भावना मनाच्या घरात हळूहळू परतायला लागली.

माझ्यासारखेच बरेच आजूबाजूला सापडले. फक्त भारतीयच नाही, तर इतर देशांतून आलेलेही. कोणत्याही देशातून आलेले, कोणतीही भाषा बोलणारे असोत. प्रत्येकाची आंतरिक धडपड एकच – नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याची. परदेशी आलं की तिथल्या स्वच्छतेची, चकचकीतपणाची, सर्व मुबलक उपलब्ध असण्याची नवलाई सुरुवातीला वाटते. आणि ती लवकरच संपते. मग सुरु होते  ते रोजचे जगणे.

Fall Colors in Verde Valley
वर्दे व्हॅलीतले शिशिररंग

भारतीय म्हणून स्थलांतर करून आपली पाळेमुळे परदेशी मातीत रूजवू पाहाणार्‍या भारतीय, विशेषतः माझ्यासारख्या लहान गावातल्या मराठी मनात चालणारी घालमेल. सणवार, लग्नसमारंभ यावेळी तिकडे नसल्याचे वाटणारे शल्य. भारतातल्या पावसाची आठवण आल्यावर येणारं व्याकुळपण.. हे आणि बरेच काही. मग हळूहळू त्यातून बाहेर येण्यासाठी काढले जाणारे मार्ग. मित्र-मैत्रिणींनाच कुटुंबीय मानून, एकत्र येऊन साजरे केले जाणारे सण. इथे जन्मलेल्या मुलांसाठी मराठी शाळा. आवर्जून केली जाणारी डोहाळजेवणे, बारसे आणि आपापले मराठीपण जपण्याचा केला जाणारा प्रयत्न. इथले रोजचे आयुष्य, सणवार, दुखणीखुपणी, लग्नसमारंभ या सार्‍यातून जाताना  एकमेकांच्या हळूहळू जवळ येत जाणारे,  एकमेकांना धरुन राहाणारे अनिवासी भारतीय.

कित्येकदा उदात्त माणुसकीचं लोभसवाणं दर्शन घडते ते या अशा स्थलांतरित होऊन आलेल्या आणि एकमेकांना धरून राहणाऱ्या समूहांमध्ये. इथे एकमेकांना केलेल्या मदतीचं मोलच करता येणार नाही. केली जाणारी मदत अगदी निरलस असते. कधी कुणाची बदली होईल आणि कोण कुठल्या गावाला जाईल याचा काहीच भरवसा नसतो. कुठलीही परतफेडीची भावना नसते. माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी भारतातून कोणीच येऊ शकलं नव्हतं. मात्र माझे डोहाळजेवण करण्यापासून ते बारशापर्यंत मदत करणारे लोक माझ्या आयुष्यात आले नसते तर मी काय केले असते?  छे!  विचारही नाही करवत. त्यातले अर्धे लोक तर आज या गावातही नाहीत. मात्र इथला एक अलिखित नियम आहे. तुम्हाला जे चांगले मिळाले ते दुसऱ्याला द्या. मला जे प्रेम मिळाले ते मी आज कुणी गर्भवती असेल त्यांना वाटते. त्यांचे कौतुकाचे डोहाळजेवण करते.

१९६० सालात पहिल्यांदा भारतीय मोठ्या संख्येने अमेरिकेत आले. नेमकी त्याच सुमारास अमेरिकेत आर्थिक मंदी आल्याने या पिढीने सर्व प्रकारच्या हालअपेष्टांना तोंड दिले. परदेशात जाणे आणि तिथले आयुष्य हे सुख आणि चैनीचे असते या भारतीयांच्या  कल्पनेला धक्का देणारा तो काळ होता. त्या काळातल्या लोकांनी संघर्ष केला आणि आपली मुळं अमेरिकेतल्या मातीत रुजवण्याचा प्रयत्न केला. आता त्यांची मुले इथेच जन्मली असल्याने ती इथल्या भूमीत रुजूनच वाढताहेत. त्यामुळे इथल्या भारतीयांची प्रतिमादेखील बदलू लागली आहे. आता इथला भारतीय समाज जास्त वैश्विक होवू लागला आहे. आणि या बदलाला आधीच्या पिढीनेही स्वीकारलं आहे.

Halloween Festival
हॅलोवीन

गेल्या दहाबारा वर्षात खुल्या झालेल्या जागतिक बाजारपेठेमुळे देश सोडून कायमचे किंवा काही काळापुरते स्थलांतरित होणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. २१व्या शतकात झालेल्या जागतिकीकरणाने  देशाबाहेर पडणार्‍या तरूण पिढीला आर्थिक ओढाताणीला फारसं तोंड द्यावे लागत नाही. परदेशागमनाविषयीचं  कुतूहल, त्याभोवतीचं वलयही आता कमी होऊ लागलंय. अनेक भारतीय शिकायला, कुतूहलापोटी, आवडीने, कधी कंपनीने पाठवले म्हणून किंवा निव्वळ पैसे कमवायच्या उद्देशाने भारताबाहेर पाश्चिमात्य देशातून स्थलांतरित होत आहेत. भारतातले लोक ज्या देशांत स्थलांतरित होतात त्यात अमेरिकेचा नंबर वरचा आहे. माझ्याही आजूबाजूला गेल्या काही वर्षात भारत सोडून आलेल्यांची भर पडली आहे. एक मात्र खरे की आता मानसिकतेत मात्र बराच फरक पडला आहे. आता येणारे भारतीय इथल्या भूमीत रूजायचा किती प्रयत्न करतात याबद्दल मात्र माझ्या मनात मोठे प्रश्नचिन्ह आहे.

काही गमवावे लागते, काही मिळते हे सगळ्याच बाबतीत खरे आहे. तसेच इथल्याही संसारातून घडू लागले आहे. बाहेर पडून, सगळ्याशी जुळवून घेताना होणारी कसरत, आणि त्यासाठी दिली जाणारी किंमत हा अजूनही फारसा न बोलला जाणारा विषय आहे. भारत सोडून आलेली याआधीची पिढी आणि आताची यामध्ये एक मोठा फरक आहे. पूर्वी येणारे लोक तसे वयाने मोठे असत. मुले झालेली असत. संसारात थोडेफार मुरलेलेही असत. मात्र अलिकडे स्थलांतरीत होणाऱ्यांचे वय लहान असते. बरेचदा आधी इकडे येतात, मग भारतात जाऊन लग्न करून बायको किंवा नवरा इकडे येतो.  लग्न कसेही झालेले असो, प्रेमविवाह किंवा पारंपरिक पद्धतीचे असो. अजून एकमेकांबरोबरची बैठक पक्की झालेली नसते. अचानकपणे वेगळ्या वातावरणात येऊन पडायला होते. भारतात आजूबाजूला असणारा कुटुंबाचा, मित्रांचा आधारही नसतो. मनातले मोकळे करण्यासाठी पटकन मैत्रिणीला बोलावलं, असेही होत नाही. घरातली कामे करायची सवय नसेल किंवा आवडत नसेल तर आणखीन अवघड होते.  यातून तावून सुलाखून बाहेर पडताना मात्र परीक्षाच द्यावी लागते.

Monument Valley
मॉन्युमेंट व्हॅली

तडजोड करणे स्वभावात नसेल तर संसारांमधे कुरबुरी सुरु होतात. शिवाय इथल्या  स्वतंत्र आणि मुक्त सामाजिक जीवनात पटले नाही तर बाजूला व्हायचं, अशी रीत. तशी उदाहरणंही आजुबाजूला बघितली जातात. संसारात अशी वादळं उठली तर ती संसार उध्वस्त करूनच शांत होतात. खरंतर बरेचदा कारणे क्षुल्लक असतात. जर कुणी लहान गावातून किंवा वेगळ्या वातावरणात लहानाचे मोठे झाले असेल तर या नवीन वातावरणाशी जुळवून घेणे अवघड पडते. बोलायलाही कुणी नाही. शिवाय नवीन लग्न झाल्याने त्यातली जुळवाजुळव. अशी दुहेरी कसरत. नव्याने ओळख झालेल्या लोकांशी कसे बोलायचे ही भीड. हे सगळे प्रकार आताशा वाढत चालले आहेत. आणि ते बघताना अतिशय वाईट वाटते. मला सांगावसे वाटते की, इकडे येताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच यावे.  परदेशी जायचे आहे म्हणजे केवळ छानच असणार या विचाराने येऊ नये.

अलिकडे मी बऱ्याच नवीन लोकांशी अगदी स्पष्ट बोलते या विषयावर.  कधीही बोलावेसे वाटेल तर मला फोन करा, असे काही घडत असेल तर त्याला एकटेच तोंड देऊ नका अशी विनंती करते. थोडा प्रगल्भपणा आला आणि यशस्वी  संसार उभा केला तर त्यासारखे दुसरे काही मोलाचे नाही. हे करताना आपल्या जोडीदाराच्या रूपाने जिवाभावाचा मित्र मिळू शकतो. मात्र थोडी सबुरी आणि तडजोड करण्याची इच्छा हवी. आपला देश सोडून बाहेर पडल्यावर तडजोडीची, संयमाची किती गरज असते हे आणखीन प्रकर्षाने जाणवते.

अलिकडे आणखी एक संस्कृती अमेरिकेत उदयाला येते आहे. आपल्या आजूबाजूला एक छोटा भारत उभा करुन त्या कोशात राहाण्याची. सतत इकडचे-तिकडचे, आमच्याइथलं- यांच्याइथलं अशी तुलना करत राहिल्याने “न घर का न घाट का”, असे होऊन जातात भारतीय. मग ज्या देशात राहातो त्या देशाच्या अंतरंगाची ओळखच होत नाही. इथली संस्कृती, इथले जगण्या-राहाण्याचे ताणेबाणे याचा कुठलाच वारा स्वतःला लागू देत नाहीत. राहातो त्या देशाशी ओळख होते, पण ती तोंडदेखलीच राहाते. त्यामुळे मला कायम वाटत आले आहे की कुणालाही देश सोडून बाहेर पडायचे असेल तर आधी मानसिकता बदलायला हवी. तुम्ही शिक्षणाच्या निमित्ताने जा किंवा नोकरीच्या, पण ज्या देशात जाल त्याला आपले म्हणायचे असे ठरवून जा. आणि ते करायची तयारी असेल तरच भारत सोडा.

Homemade Ganpati
घरचा गणपती

मी अमेरिकेतले नागरिकत्व घेण्यामागचे मागचे दोर कापून टाकणे हेच कारण होतं. एकदा मी इथेच राहायचे ठरवल्यावर माझ्या निर्णयाशी प्रामाणिक राहाण्यासाठी तसे करणे गरजेचे होते. नाहीतर मनात एक परतीचा मार्ग, एक पळवाट सतत असे. काहीही मनाविरुद्ध झाले की वाटे – चला जाऊ भारतात परत. कशाला राहायचे इथे. मात्र भारतीय नागरिकत्व सोडल्यावर ती पळवाट बंद झाली.  स्थलांतरित होण्याचा निर्णय  कुठल्याही कारणासाठी घेतला असला तरी जिथे जाल तिथल्या मातीवर झाडापक्षांवरही तितकेच प्रेम करायला हवं, असं माझं सांगणं आहे.

प्रत्येक देशात, समाजात घेण्यासारखे चांगले बरेच असते. मात्र त्या देशाच्या अंतरंगात शिरल्याशिवाय खाचाखोचा समजत नाहीत. “अमेरिकेतील लोकांना कसलाच धरबंद नाही, काहीच कशाचे वाटत नाही”, अशी सरसकट केली जाणारी भारतीयांची शेरेबाजी ऐकून वाईट वाटते. आणखी एक महत्वाचं. अमेरिकेत समरस होऊन राहाण्यासाठी आपले मूळचे भारतीयत्व गमवावे लागते असे नक्कीच नाही. परक्या भूमीत रूजून आणि आपले भारतीयत्वदेखील जपून, तिथल्या स्थानिक लोकांना आपलेसे करु शकण्याची लवचिकता भारतीय मनात आहे हे मात्र मी स्वानुभवावरुन म्हणेन.

मी जितकी वर्षं भारतात राहिले त्यापेक्षा जास्त बाहेर राहिले. भारताच्या भेटीही आता कमीवेळा होऊ लागल्या आहेत. मी सोडला तो भारत आता उरला नाही. आणि जो आहे त्यात बरेच बदल झाले आहेत. अर्थात जितके बदल भारतात झालेत तितकेच माझ्याही जीवनपद्धतीत आणि विचारसरणीत झाले आहेत. त्यामुळे खरं तर चांगलं-वाईट, गुण-दोष महत्वाचं राहात नाही. तटस्थपणाच येऊन जातो आपल्या दृष्टिकोनात. भारतात प्रगतीचे वारे झपाट्याने आणि जोरदार गतीने वाहात आहेत. संगणकीकरणाने भारतातल्या युवा पिढीला जगाची दारे उघडी करुन दिली आणि एक वेगळेच विश्व खुले झाले. टप्प्याटप्प्याने का होईना पण हा बदल काहींनी अतिशय सहजरित्या अंगिकारला तर काहींची बरीच मानसिक ओढाताण झाली.

Horton Creek
हॉर्टन क्रीक

मात्र काही वेळा तटस्थ राहाणं अवघड जाते. एका बाजूला होणारी प्रगती आणि बदल पाहून आनंद होतो. मात्र बरेचदा पाश्चात्यांच्या केल्या जाणार्‍या अंधानुकरणाचा त्रासही होतो. प्रगतीची व्याख्याच चुकीची केली गेली.  इतरांचे चांगले जरुर घ्यावे पण त्यासाठी आपले मूळचं असलेले सोडू नये असे वाटते. आपल्याकडच्या बऱ्याच पद्धती खरं तर काहीतरी विचार करून आखल्या गेल्या होत्या. त्या सगळ्यालाच धुडकावून लावून जे बाहेरचे तेच चांगले हे अंगिकारण्याची मनोवृत्ती पाहून अतिशय वाईट वाटते. विशेषतः आपल्याकडची खाद्यसंस्कृती,  हवामानाला अनुसरून असलेलं आहारशास्त्र. ह्या सार्‍यामागचा शास्त्रीय दृष्टिकोण,  बुरसटलेले विचार म्हणून धुडकावला जातो आहे. पाश्चात्य फास्ट फूडचे प्रस्थ वाढत आहे. त्यामुळे डायाबिटीस आणि वाढते वजन ह्यामुळे उद्भवणारे आजार एखाद्या रोगराईसारखे चाळीशीतच लोकांना ग्रस्त करू लागले आहेत. प्रत्येक बदलाची किंमत त्या त्या पिढीला मोजावी लागते. परंतु काही बाबतीत “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हे जर आचरणात आणले तर कितीतरी हानी टळेल असे वाटते.

इथे ६०-७० साली भारत सोडून बाहेर पडलेले लोक आता ज्येष्ठ नागरीक झाले आहेत. माझ्या आजूबाजूला असलेल्या अशा ज्येष्ठांच्या जेंव्हा जेंव्हा मी संपर्कात येते त्यावेळी मात्र जाणवते की  ५०-६० वर्षे भारताबाहेर राहूनही या पिढीची आंतरिक व्याकूळता कमी झालेली नाही.  देश सोडायचा निर्णय जरी अगदी स्वखुशीने घेतला असला, तरी आपले सोडून परक्या भूमीत परत सगळे शोधणे ह्या दिव्यातून जाताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल! त्यांच्या डोळ्यात डोकावल्यावर हे दिसल्याशिवाय राहात नाही. खोलवर झालेले संस्कार सतत मुळाशी धाव घेत राहिले आहेत हे स्पष्ट दिसते. प्रत्येक गोष्टीत यांनी कित्येक वर्षे फक्त भारतातलेच ओळखीचे संदर्भ शोधले आणि जोडले. तरीही परक्या भूमीत रूजत, आपले भारतीयत्व जपत, तिथल्या स्थानिक लोकांना आपलेसे करण्याचे दिव्यही त्यांनी यशस्वीपणे केलं.

आता एखादा हिरवागार ओला प्रदेश बघितला कोकणची आठवण न येता सॅनडिएगोची आठवण येते. भारतभेटीतून परत आल्यावर इमिग्रेशन ऑफीसरने वेलकम होम म्हटल्यावर  घरी आल्याची भावना दाटून येते. भारतात येऊन २-३ आठवडे झाले की ‘घरी’ जावेसे वाटते. हवाईच्या पर्ल हार्बर म्युझियमची माहीती देताना परवा नवर्‍याने कोणाला तरी आपलं शिप इथे बुडालं हे सांगितलं तेव्हा “आपलं” ह्या शब्दाचे नवल वाटलं नाही.

Palo Verde Tree
पालो वर्दे

हे सगळे खरे असले तरी  एक प्रश्न मला मात्र कायम सतावतोच. मी आता इथली झाले आहे? की इथलीही झाले आहे? ही मनाची ग्वाही आहे की  हाही एक आभासच आहे? पंचवीस वर्षं झाली. पण हे सगळं वाटणं खरंच आहे का? की या सगळ्यामधे मी अजूनही खुणा शोधतेय त्या माझ्या पूर्वीच्या ओळखीच्याच?  इथल्या ग्रोसरी स्टोअरमधल्या बॅगरमधे मला तो दारावर येणारा भाजीवालाच दिसतो?  का त्या बॅगरला बघून होणारा आनंद खरंच त्याला पाहून होणारा आहे? इथली पालो वर्दि जेव्हा फुलते, त्यावेळी मला त्या झाडातही बहरलेला गुलमोहरच दिसत असतो ? इथं राहून होणारे  आनंद निखळ-निर्मळ आहेत की त्यांना कायमच माझ्या पूर्वीच्या ओळखी-आठवणींच्या सावलीत राहावं लागणारे? माझी पाळंमुळं मग शोध घेताहेत तो कशाचा? कुठंतरी स्थिर होण्याचा-रुजण्याचा, का जे हातून सुटून गेलंय तेच शोधत राहणार आहेत ती?

मूळचे पिंड जसेच्या तसे राहते, असं म्हणतात. “आहे मनोहर तरी…” अशा अवस्थेत मग वाटते,

बेसिलच्या मंजिर्‍या तोडताना रेंगाळतेच चव

परीक्षेच्या दिवशी खाल्लेल्या

तुळशीच्या पानांची!

वसंतात मोहरलेल्या संत्र्याचा गंध

नाकात भरभरुन घेताना

नकळतपणे मोगर्‍याचाही वास

सूक्ष्मपणे मिसळतोच त्यामधे!

सॉल्ट नदीच्या ओसाड काठावर

भास होतच राहतात

कळसाच्या सावलीचे आणि घंटानादाचे!

पिंडाचं ‘स्वत्व ‘ सुटता सुटत नाही

माझं ‘परकेपण’ सरता सरत नाही!

शिल्पा केळकर

ShilpaPhoto

इ-मेल – kelkarshilpa@gmail.com

मूळची सांगलीची. मग सिंगापुर आणि आता अमेरिकेत राहते. भारताबाहेर राहून आता २५ वर्षे झाली. व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टन्ट आहे. वाचन-नाटक-कविता-लिखाण याची आवड. इथे अक्षयभाषा ह्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेत बरेच काम करते. इथल्या स्थानिक तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळातही कार्यरत आहे. प्रवास करताना सर्वसाधारण पर्यटनापेक्षाही त्या देशाला आणि तिथल्या स्थानिक गोष्टींमध्ये जास्त रस वाटतो. त्यामुळे वेगळ्या प्रकारे प्रवास करतो. स्थानिक पदार्थ आणि लोक हे अनुभवण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न असतो.

One thought on “परकेपण सरता सरत नाही

  1. अनुक्रमणिकेत हे नांव ओळखीचे दिसलं…आपल्या सांगलीचं ! प्रथम तुमचाच वाचला लेख…छान आलेख ! अमेरिकातील स्थलांतरितांच्या मानसिकतेवर नेमकं बोट ठेवलंयत…मागच्या दोर कापावा लागतो तरच हे रोप तिकडं रुजतं….नाही तर तळ्यात मळ्यात करायच्या खटाटोपात कुठलेच रहात नाही….योग्य निर्देश केलायत….नवीन जाणार्या विशेषत: मुलींनी वाचावाच…तुम्ही सगळे आमचेच असता…इथलेही ! शेवटची कविता कळसाध्याय !! सुरेख…..

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s