पॅकिंग पॅकिंग!

सायली राजाध्यक्ष

पॅकिंग करताना काय काय लक्षात घ्यावं लागतं?

१) तुम्ही प्रवासाला कुठे चालला आहात? म्हणजे देशात की परदेशात, डोंगराळ भागात की समुद्र किना-यावर, थंड प्रदेशात की उष्ण प्रदेशात, सहलीला की कामासाठी अशा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं ठरतं.
२) देशात प्रवास करत असाल तर मग बहुतेक गोष्टींची फार काळजी करायची गरज नसते. कारण एखादी गोष्ट विसरलीच तर ती विकत घेता येऊ शकते. परदेशात ब-याच गोष्टी over the counter मिळत नाहीत. त्यामुळे परदेशात जाताना जास्त काळजीपूर्वक पॅकिंग करावं लागतं. आम्ही काही वर्षांपूर्वी बेल्जियमला गेलो होतो. इथून जातानाच मला थोडं इन्फेक्शन झालं होतं. माझ्या औषधाचा कोर्स संपत आला होता. तिथे गेल्यावर ते इन्फेक्शन परत बळावलं, मला परत अँटिबायोटिक घ्यायची वेळ आली. तेव्हा फार्मसीमध्ये प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे पासपोर्ट कॉपी वगैरे सोपस्कार करून औषध घ्यावं लागलं.
३) डोंगराळ भागात जातानाचे कपडे आणि समुद्र किना-यावर घालायचे कपडे वेगवेगळे असतात. ब-याचदा डोंगराळ भागात थंड हवा असते. तिथे जरासे उबदार कपडे लागतात. तर समुद्र किना-यावर दमट हवा असते, शिवाय समुद्र किना-यावर वाळू असते, हे सगळं लक्षात घेऊन कपडे घ्यावे लागतात. या दोन्ही भागात घालायचं फूटवेअर (चपला-बूट) हेही वेगवेगळं असतं. वाळूत चालायला स्लीपर्स लागतात. डोंगराळ भागात शक्यतो वॉकिंग शूज वापरावेत.
४) अति थंड भागात प्रवासाला जात असाल तर तिथलं तापमान कसं असणार आहे हे जाणून घेऊन (इंटरनेटवर ही माहिती सहज मिळते) मग कपडे भरा. अशा भागात जाताना वुलन स्वेटर्स हवेत. अॅक्रिलिक स्वेटर्स आपल्या साध्या थंडीत उपयोगी पडतात पण इतक्या कडाक्याच्या थंडीत व्यवस्थित प्युअर वुलनचे कपडे हवेत. शिवाय एकच खूप जाड कोट-स्वेटर-जॅकेट घेण्याऐवजी उबदार कपड्यांचे थर अंगावर घालावेत. यामुळे थंडीचा बचाव अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतो. शिवाय उकाडा वाटलाच तर हे थर काढणं जास्त सोयीचं असतं. अशा हवेत आत घालण्यासाठी वॉर्मर्स, वुलनचे मोजे, हातमोजे, कानांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी वुलन टोप्या, स्वेटर्स आणि जॅकेट्स (खास थंडीसाठी मिळणारे जॅकेट्स) असं सगळं घ्या.
५) उष्ण प्रदेशात जात असाल तर आपले नेहमीचे पातळ कॉटनचे कपडे घ्या. वाळवंटात जात असाल तर कॉटनचे पण अंगभर कपडे घ्या. कारण तिथे उन्हाचा तडाखा प्रचंड असू शकतो. त्यामुळे हातपाय झाकणारे कपडे हवेत. समशीतोष्ण भागात जाताना कसेही कपडे (शॉर्ट्स किंवा स्लीव्हलेस) चालू शकतात. सहलीसाठी जात असाल तर रंगीबेरंगी, डोळ्यांना फ्रेश वाटतील असे मस्त कपडे घ्या. पण जर कामाला जात असाल तर मग तुमच्या ऑफिसच्या पद्धतीनुसार कपडे घ्यावे लागतील.
६) प्रवासाला कुठे जातोय हे लक्षात घेऊन नेहमीच पॅकिंग करावं लागतं. पण काही ठिकाणी विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ गुरूद्वारात जाणार असाल तर डोक्यावर ओढणी किंवा स्कार्फ घ्यावा लागतो. किंवा काही अरब देशांमध्ये जाताना डोक्यावर स्कार्फ घालणं सक्तीचं असतं. तेव्हा हेही लक्षात ठेवा.
७) कपडे कसे घ्यावेत?
प्रवासासाठी कपडे भरताना शक्य तितकं कमी सामान कसं होईल हे बघा. याचं कारण जर तुम्ही विमानानं प्रवास करत असाल तरी हल्ली देशांतर्गत प्रवासाला फक्त १५ किलो सामान नेता येतं. जर तुम्ही ट्रेननं किंवा बसनं प्रवास करत असाल तर आपलं सामान आपल्यालाच ओढायचं आहे हे लक्षात ठेवा. कारण सगळ्या ठिकाणी आता हमाल मिळतीलच असं नाही. पुरूषांचं सामान तुलनेनं हलकं असतं. कारण बहुतेक पुरूष पँट्स-शर्ट्सच घालतात. पण बायकांचं तसं होत नाही. सलवार-कमीज किंवा साड्या नियमितपणे वापरणा-या अनेकजणी आहेत. साडी म्हटली की परकर आणि ब्लाउज हवंच. शक्य असेल तर पँट्स आणि टॉप्स वापरणं सगळ्यात उत्तम. पण जर शक्यच नसेल तर मग शक्यतो जाड ओढण्यांचे ड्रेस टाळा. ओढण्यांनीच अर्धी बॅग व्यापते. त्याऐवजी लेगिंग आणि साधे कुडते घ्या. लेगिंग असे निवडा की एका लेगिंगवर दोन-तीन कुडते घालता येतील. तसंच स्कार्फही असेच निवडा की जे दोन-तीन ड्रेसवर वापरता येतील. काळा-पांढरा-ग्रे-मरून असे काही रंग ब-याच रंगांशी मॅच करता येतात.
जीन्स आणि कुडते वापरत असाल तर पॅकिंग फारच सोपं होतं. २-३ जीन्स आणि ७-८ कुडते एका आठवड्याच्या प्रवासासाठी भरपूर होतात. त्यावर स्टोल्स घेतले की स्मार्ट दिसतं. प्रवासाला जाताना शक्यतो दागिने बरोबर नेऊ नका. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की जितकं सामान आणि जोखमीचं सामान कमी तितका तुम्ही प्रवासाचा जास्त आनंद घेऊ शकाल. प्रवासात छान दिसण्यासाठी २-३ इयरिंग्ज आणि २-३ लिपस्टिक्स पुरेसं आहे. प्रवास करताना आपण आनंदी असतेच त्यामुळे आपोआप छान दिसतोच.
अजून एक गोष्ट – ५-६ दिवसांचा प्रवास असेल आणि हॉटेलमध्ये उतरणार असाल तर अजिबात कपडे धुवत बसू नका. आपल्या सगळ्यांकडे आतल्या कपड्यांचे तितके जोड असतात. जास्त दिवसांचा प्रवास असेल तर ठीक आहे पण नाहीतर उगाचच कपडे धुवत बसू नका. आणि त्या कपड्यांच्या पताका हॉटेलच्या बाल्कनीत वाळत घालू नका.
८) आजकाल आपण प्रवास करताना आपल्याबरोबर गॅजेट्सही असतात. लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड, आयपॉड, पॉवर बँक अशा गोष्टींसाठी चार्जर्स लागतात. हे चार्जर्स घेण्याची आठवण ठेवा. परदेशात चार्जिंगचे सॉकेट्स वेगवेगळे असतात. त्यामुळे युनिव्हर्सल सॉकेट बरोबर ठेवा (कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात मिळतात). गाणी ऐकत असाल तर इयरफोन पॅक करायला विसरू नका.

पॅकिंग कसं कराल याची एक यादी देते आहे. ही यादी मी डायरीत करून ठेवली आहे. ती बघून मी पॅकिंग करते. अक्षरशः १५ मिनिटांत पॅकिंग होतं. ही मी साधारण आठवड्याचा प्रवास आहे असं धरून केलेली यादी आहे.

 1. A) कपडे – २-३ जीन्स आणि ८-९ कुडते किंवा टीशर्ट किंवा टॉप्स (एखादा दुसरा नेहमी जास्त असावा) पुरूषांना २-३ जीन्स आणि ८-९ टीशर्ट किंवा शर्ट्स
  B) आतले कपडे – ७ सेट्स (म्हणजे धुवावे लागणार नाहीत) काही कुडत्यांना स्लीप वापरत असाल तर त्याही आठवणीनं घ्या. ७-८ रूमाल
  C) थंड प्रदेशात जात असाल तर – वॉर्मर्स, स्वेटर, जॅकेट, मोजे, टोपी, हातमोजे
  D) समुद्रावर जात असाल तर – स्लीपर, पोहणं येत असेल तर स्विमिंग कॉश्चूम
  E) टॉयलेटरी – टूशपेस्ट, टूथब्रश, छोटी शँपूची बाटली किंवा सॅशे, माउशवॉशची लहान बाटली, व्हॅसलिन, मॉइश्चरायझरची लहान बाटली, डिओडरंट, बॉडी वॉशची लहान बाटली, फेसवॉश वापरत असाल तर ती लहान बाटली, सनस्क्रीन लोशन, कंगवा, लिपस्टिक वापरत असाल तर तीही (हे सगळं एका पाउचमध्ये घ्या)
  F) चार्जर्स – मोबाइल, आयपॅड किंवा टॅब, आयपॉड (यांचे चार्जर्स), लॅपटॉप घेणार असाल तर त्याचा चार्जर लॅपटॉप बॅगमध्येच असतो. हल्ली मोबाइलमुळे कॅमेरा फार कुणी नेत नाही. पण नेत असाल तर त्याचा चार्जर, युनिव्हर्सल सॉकेट किंवा एडाप्टर (या चार्जरचं दुसरं वेगळं पाउच करा.)
  G) औषधं – रोज काही औषधं घेत असाल तर ती औषधं. शिवाय जिथे जात असाल तिथे दुकानं सहज मिळण्याची शक्यता नसेल तर क्रोसिन, पोटासाठीचं एखादं औषध, एसिडिटीसाठीचं औषध, उलटीसाठीचं औषध, एखादं अँटीअलर्जिक, एखादं अँटिबायोटिक (डॉक्टरांना विचारून घ्या), विक्स, नोजल ड्रॉप्स, एखादं अँटिबायोटिक ऑइंटमेंट ही ढोबळ औषधं. जर परदेशी जाणार असाल तर लागणा-या औषधांचं आपल्या डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घ्या. (याचं एक पाउच करा)
  H) फुटवेअर – प्रवासात नेहमी वॉकिंग शूज वापरावेत. पण एक चपलेचा जोड बरोबर ठेवावा. काही ठिकाणी उदाहरणार्थ धार्मिक स्थळांमध्ये जाताना चपला वापरणं जास्त सोपं होतं. शिवाय हॉटेलमध्ये उतरला असाल तर तिथल्यातिथे फिरायला बरं पडतं. शूज वापरणार असाल तर मग मोज्यांचे तीन जोड.
  I) पर्स – प्रवासासाठीची पर्स नेहमी थोड्या मोठ्या आकाराची घ्या. शिवाय ती वॉटरप्रूफ असावी. त्यात नेहमी लागतील इतपत पैसे, क्रेडीट आणि डेबिट कार्ड, कंगवा, रूमाल, नॉशिया येत असेल तर ती गोळी, चघळता येतील अशा गोळ्या, वाचायला एखादं पुस्तक, गॉगल्स, चष्मा असेल तर ते कव्हर, एखादं रबरबँड किंवा केस बांधण्याचा चिमटा, गाणी ऐकायला इयरफोन्स, हँड सॅनिटायझर, पेन
  J) परदेशी जात असाल तर – पासपोर्ट, व्हिसा, परदेशी चलन, परदेशी चलनाचं क्रेडिट कार्ड
  K) विमानानं जात असाल तर हँड बॅगेजमध्ये – एखादं स्वेटर किंवा शाल (मला विमानात थंडी वाजते), लॅपटॉप नेणार असाल तर त्याच बॅगेत ठेवा, लॅपटॉपचं चार्जर, पुस्तकांशिवाय माझा प्रवास होत नाही त्यामुळे २-३ पुस्तकं, एखादी लहानशी डायरी, काही कानात-गळ्यात घालणार असाल तर त्याचं पाउच.
  मुलं आणि मित्रमंडळींबरोबरही पत्ते खेळायला मजा येते. त्यामुळे पत्त्यांचे दोन जोड ठेवाच.
  L) ऑनलाइन तिकिटं काढली असतील तर ती डाऊनलोड करून ठेवा. विमानाची बोर्डिंग कार्ड्स हल्ली ऑनलाइन घेता येतात तीही डाउनलोड करून ठेवा. ट्रेनच्या तिकिटाचा मेसेज इमेल करून ठेवा. पासपोर्ट आणि व्हिसा स्कॅन करून मेलमध्ये ठेवा.

ही यादी समोर ठेवलीत आणि पॅकिंग केलंत तर अक्षरशः १५ मिनिटांत पॅकिंग होतं. यादी मोठी असली तरी सामान फार होत नाही! आणि शेवटी प्रवास हा आनंदासाठी करतोय हे लक्षात ठेवा. काही लोकांना लहानसहान गोष्टीवरून कुरकर करायची सवय असते. प्रवासात थोडं वरखाली होणार हे गृहीत घरून चाला. कधी ट्रेन लेट होते तर कधी विमानाला उशीर होतो, कधी खाणंपिणं मनासारखं मिळत नाही. पण या गोष्टी लहान आहेत. आपल्या घरच्यांबरोबर, मित्रमंडळींबरोबर आपण प्रवास करतो तेव्हा खूप मजा येते. सगळेजण रोजचे ताण विसरलेले असतात, एकमेकांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे प्रवासाची मजा घ्या आणि इतरांनाही घेऊ द्या.

Happy Travelling!

सायली राजाध्यक्ष

IMG_20170617_192124_01

इ-मेल – sayali.rajadhyaksha@gmail.com

4 thoughts on “पॅकिंग पॅकिंग!

 1. मस्त सायली! अजून एक म्हणजे हवं असल्यास पॅकिंग क्युब्स मिळतात ते वापरावेत. त्यामध्ये लहान जागेत इस्त्री केलेले कपडे पण व्यवस्थित राहतात. 🙂

  Like

 2. मस्त सायली! 🙂 अजून एक म्हणजे जर शक्य झालं तर “पॅकिंग क्युब्स” वापरावेत म्हणजे जर इस्त्री केलेले कपडे असतील तर ते घडी न बिघडवता, कमी जागेत ठेवून सुद्धा व्यवस्थित आपल्याबरोबर नेता येतात.

  Like

 3. मस्तच. ..खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे. मी पण वरचे वर प्रवास करते. आता ही यादी कपाटात लावून ठेवते. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा! !!!

  Liked by 1 person

 4. ‘थोडक्यात पण महत्त्वाचे ‘ अशी उपयुक्त माहिती.प्रवासाची तयारी करताना ब्यागेत ठेऊन टिक मार्क करावी अशी

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s