सुखद उबदार इंडोनेशिया

 ऋता पंडित

ऑस्ट्रेलियाला बहिणीकडे दोन महिने राहायचे व भारतात परत येताना काही दिवस इंडोनेशियात फिरून यायचे असा प्रवासाचा बेत ठरला. इंडोनेशियाला नेमके काय पहायचे हे ठरवणे सोपे नव्हते. टिपिकल साईट सीइंगमध्ये रस नव्हता. त्यामुळे इंडोनेशियात राहणार्‍या एका मराठी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला नेमकं काय बघायची आवड आहे, म्हणजे बीचसाइड की कंट्रीसाइड, मंदिरं की म्युझियम्स, हेरिटेज की मॉडर्न टूर अशी ठरवण्यासाठी दिशा दिली. कंट्रीसाइड, मंदिरं व म्युझियम, सहा दिवसांचा हेरिटेज टूर प्लान  ठरला. प्रवासाचा प्लान करताना मला नेहमी तोत्तोचान या पुस्तकाची आठवण येते. तोत्तोचानच्या डब्यात कधी समुद्रातले काही, तर कधी जमिनीवरचे काही असा खाऊ असे तसेच काहीसं प्रवास करताना काही नैसर्गिक, काही मानवनिर्मित अशा सौंदर्य स्थळांच्या शोधात मी असते.

खल-बत्ता-टेराकोटा-टी-सेट
इंडोनेशियन खलबत्ता सेट

कंट्रीसाइड, निसर्गसौंदर्य, म्युझियम म्हणून उबड आणि हेरिटेज म्हणून योग्यकर्ता ह्या दोन ठिकाणी जायचे नक्की केले. काउच सर्फिंग ह्या ऑनलाइन ट्रॅव्हल कम्युनिटीचे मेंबर असल्याने त्यांच्या व्हाट्सप ग्रुपवरूनही इंडोनेशियाला फिरून आलेल्या प्रवाशांकडून उबड आणि योग्यकर्ता या ठिकाणांची माहिती मिळवली. उबडच्या एका टॅक्सीचालकाशी संपर्क झाला. त्यानेही स्थळांची माहिती, फोटो पाठवले.

दोन महिन्याचा बहिणीकडील मुक्काम संपला. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – डेंपासारच्या विमानात चढायची वेळ आली. मेलबर्न विमानतळावर पटापट चेक-इन झाले. इमिग्रेशन क्लियर विदाउट एनी ह्युमन इंटर्व्हेंन्शन झाले, पासपोर्टचे पान स्कॅन झाले, इमिग्रेशन पूर्ण. चटचट लाइन पुढे गेली. जेटस्टारची फ्लाइट छान ऐसपैस होती. पण खायला, मूवी बघायला ऑस्ट्रेलियन डॉलर्स मोजावे लागणार होते. इंटरनॅशनल फ्लाइटमध्ये पैसे मोजावे लागणं, हे मला नवीनच होते. त्यात बाजूला बसलेल्या तीन मुलांच्या सुंदर ऑस्ट्रेलियन आईने बॅगमधून सँडविच, चिप्स, ज्यूस काढले, मुलांना, नव-याला दिले, स्वत: ताव मारला.. मला मात्र पोटातल्या कावळ्याची साथ. शेवटी खूप वेळाने मनातला डॉलर रुपयाचा हिशोब बाजूला सारून एक सँडविच व कॉफी घेतली. पोटातल्या आगीपुढे क्षूद्र डॉलर तो काय?

भारतीयांना इंडोनेशियन विसा ऑन अराइवल मिळतो. किती दिवस राहणार विचारलं. परतीचे तिकीट बघितलं. झालं. स्टॅम्प मारला, डन! बॅगेज क्लेम झाले. बाहेर काउचसर्फिंगमार्फत ओळख झालेला पुटू ड्रायवर आला होता. दुपारचे तीन वाजून गेले होते. सणकून भूक लागली होती. बाबारे, एखाद्या चांगल्या हॉटेलला घे, पुटूला सांगितले. विमानतळाबाहेर दिसणारे प्रत्येक हॉटेल बघून अजूनच भूक खवळत होती. अर्ध्या पाऊण तासाने पुटूने एका गल्लीत गाडी वळवली. समोरच गोपालन प्योर व्हेज रेस्टॉरंट दिसले. शिरलो, आत हसरी रिसेप्शनिस्ट.. हॅलो झाले, भर दुपारी रेस्टॉरंटमध्ये शुकशुकाट, तरीही बसलो. सँडविच, ज्यूस ऑर्डर दिली. कधी खायला मिळेल? खात्री वाटत नव्हती. थोड्याच वेळात भरगच्च सँडविच व ज्यूस टेबलवर आले आणि इंडोनेशियातल्या सुखद अनुभवांची नांदी झाली. मेलबर्नच्या थंड हवेतून उबदार इंडोनेशियात आल्याने मला बरे वाटत होते.

इंडोनेशिया तिथल्या सुंदर समुद्रासाठी, किनार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे. कुटा, उबड, सानुर, नुसा दुवा ही ठिकाणं ४०-५० किलोमीटरच्या परिसरात आहेत. त्यामुळे बीच व इंटिरियर अशी बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस ट्रीप होऊ शकते. बीच व वॉटर स्पोर्ट्समध्ये आम्हाला रस नव्हता. उबड रिट्रीट या छोट्याश्या जागेचे ऑनलाइन बुकिंग Booking.com मार्फत केले होते. फोटोपेक्षा प्रत्यक्ष रिट्रीट अधिकच चिमुकली होती, पण रूम पुरेशी होती, बाथरूम बर्‍यापैकी स्वछ व रूमच्या तुलनेत खूपच मोठी होती. साडेसहा हजार भारतीय रुपयांमधे चार दिवस तीन रात्री विथ ब्रेकफास्ट. हा सौदा चांगला होता. पुरेसा ब्रेकफास्ट, हसतमुख स्टाफ व स्वच्छता याव्यतिरिक्त आमच्या दुस-या अपेक्षाही नव्हत्या.

तमंसरी-जल-महल
जलमहल

पुटू ड्रायवरशी गप्पा मारत पुढचं सगळं ठरवत होते. उद्या सकाळी ८ ला निघू, पुटू म्हणाला. आम्ही सुट्टीवर आहोत, आरामात निघू, सगळे स्पॉट्स बघायचा आमचा आग्रह नाही, ९.३० ला निघूया, असे पुटूला सांगितले.

उबडमध्ये छोटी सुबक कौलारू घर आहेत. घरटी एक छोटे मंदिर, घरासमोर नक्षी कोरलेला लाकडी दरवाजा, दोन द्वारपाल. दगडाचा राखाडी रंग व नक्षीचा लाल सोनेरी पोत…फारच मनोहारी होते. पुटूने सांगितले, प्रत्येक घराच्या अंगणात देवघर आहे. प्रत्येक घराण्याचे मुख्य मंदिर गावात आहे. रोज सकाळी घरातील स्त्री फुले, नैवेद्य, उदबत्ती अशी छोटीशी परडी देवासमोर ठेवते व दिनचर्या चालू होते. परडीत पांढरा उकडलेला भात, कधी छोटेसे बिस्किट, कधी चॉकलेट, ताजी रंगीत फुलं आणि उदबत्ती ठेवलेली असे. ही प्रथा आम्ही राहत असलेल्या रिट्रीटमध्येही होती. रोज सकाळी रूमच्या दारासमोर काहीसं अंतर ठेऊन ही नैवेद्याची परडी ठेवलेली असे. आजूबाजूचे पक्षी, चिमण्या येऊन शीतं टिपून जात. उबड एका छोट्या गावासारखे होते. गोर्‍या, चायनीज तसेच भारतीय प्रवाशांची वर्दळ जाणवत होती. रस्ते छोटे छोटे, ट्राफिक होता.

उबड टूर ची सुरवात ‘चेकिंग राइस-फील्ड’ टूरने झाली. डोंगरावरून खालपर्यंत भाताची लागवड, हिरवेगार शेत, मधूनच फुलाची पखरण, नागमोडी चढण-वाटा…पिक्चर पर्फेक्ट!

तानाह-लोट
तानाह लोट

गंमत म्हणजे डोंगरावर एक दोन ठिकाणी वाटेत बांबू टाकून रास्ता रोको केलेला. मी विचारले तिकीट कसले, तो म्हणाला नो तिकिट, डोनेशन. आता इथवर चढून आलोय तर टाकू पैसे व पुढे जाऊ. पुढे गेलो. मग कळले की ती जागा खाजगी मालकीची आहे. इथे टुरिस्टांना फिरण्यास परवानगी दिली, त्याचे डोनेशन. अधिकृत तिकीट नाही. जागा छान होती, थोडं डोनेशन दिलं तरी वाईट वाटले नाही. पुढे ‘गोआ गजाह’ म्हणजे गुहेतल्या गणपती मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताना गुडघे झाकलेले नसतील तर सराँग म्हणजे कमरेभोवती लुंगीसारखे कापड गुंडाळायचे, समोर किंवा साइडला गाठ. मंदिरात प्रवेशाचे तिकीट घेऊन सराँग त्यावेळी वापरण्यापुरता मिळतो किंवा बाहेत विकत. तिकीट खिडकीशेजारील टेबलावर व्यवस्थित इस्त्री केलेले सराँग ठेवले होते. उबडमधील सर्व मंदिरांचे द्वारपाल, विशेष वृक्ष, देवांच्या मूर्ती यांना काळ्या, पांढर्‍या, चेसबोर्ड सारख्या कापडाचे सराँग घातले होते. कमरेपासून पावलापर्यंतचा भाग झाकलेला मूर्तीचाही!

गणपती मंदिरानंतर मंकी फॉरेस्ट या माकडांच्या राज्यात तिकीट काढून प्रवेश केला. सर्वत्र माकडांचा सुळसुळाट. कॅमेरा गळ्यात लटकवला. खाऊ नाहीच, पाण्याची बाटलीही रिकामी आहे खात्री केली. माकड व माणसांच्या माकडचेष्टा बघत फॉरेस्टमध्ये फेरफटका मारला. बाहेर पडण्याआधी स्वच्छ स्वच्छतागृहास भेट द्यावी म्हणून नवरोबा प्रथम आत गेला व मी फॉरेस्टमधील अॅम्फी थिएटरच्या पायर्‍यांवर सॅक जवळ घेऊन बसले. घाम सतत गळतच होता. प्रवासात उपयोगी पडतील असे महागडे वेट वाईप जवळ होते, घामेजला चेहरा पुसावा म्हणून वाईप्सचा पॅक सॅकमधून बाहेर काढला आणि कुठून कोण जाणे एक माकड माझ्या समोर उडी मारून हजर….अस्फुट किंकाळी.. वाईप्सचे पाकीट लांबवर फेकले. माकडाने धावत जाऊन पाकीट उचलले व ते झाडांत गायब झाले. ४-५ सेकंदात माझे महागाचे वेट वाईप्स माकडाने पळवले. नवरोबा एव्हाना बाथरूम मधून बाहेर आला. कधी नव्हे ते “तरी मी तुला सांगत असतो…,” असं म्हणायची दुर्मीळ संधी त्याला मिळाली.

गणपतीबाप्पा
गणपती

मंकी फॉरेस्टच्या अगदी समोरच हॅबिटाट नावाचे छानसे रेस्टॉरंट दिसले. मंकी फॉरेस्टचे तिकीट दाखल्यास १० टक्के सूट मिळणार होती. तिथे शिरलो. बाहेर मोकळ्या जागेत हुश करून बसलो. माकडांच्या इतक्या जवळ खायचे, इथे माकड तर येत नाही ना, मी वेटरला विचारले. तो हसून नाही म्हणाला. बसलो. ऑर्डर दिली. पण बाहेरची मोकळी जागा असल्याने मागून पुढून धूम्रपानाचा आस्वाद घेणारे टुरिस्ट होते. आत एसीत बसलो, माकडेही नको, धूरही नको. लोकल राइस डिश, आले-लिंबू-गूळ मिश्रीत पेय व इंडोनेशियन कॉफी सारे टेबलवर आले. भात चांगला होता पण माझे पेय जरा अतिच तिखट, आंबट होते. वरून साखर घातली, आंबटपणा कमी झाला, गोड व तिखट पेय छान कॉम्बिनेशन. इंडोनेशियन क्युझिन भात, भाज्या, नूडल्स, टोफू, अंडी, चिकन, बीफ याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन. मसाले बरेचसे ओळखीचे, चव भारतीय समुद्रकिनार्‍यावरील खाद्यपदार्थांची आठवण यावी अशी. कमी तेल पण चविष्ट! गोड पदार्थात ओल्या नारळाचा, गुळाचा मनसोक्त वापर. खायला आवडतं म्हणून किती खाणार …त्यात लाखो रूपयांचे बिल बघून, नको जाऊ दे, उद्या खाऊ …असा विचार मनात येत होता. पण खायची चंगळ करायला परत इंडोनेशियात यायचं हे ठरलं. इंडोनेशियन एक लाख रूपीए म्हणजे भारतीय पाचशे रुपये, त्यामुळे इंडोनेशियात खिशात लाखों रूपीए घेऊन फिरावे लागते!

पुढे मोर्चा वळवला ‘पुरी लुकिसान’ म्युझियमकडे. तिकीट काढले, हाताशी वेळ होता. हिरवागार कौलारू पारिसर, वेगवेगळी दालनं, लघु चित्रकलेचे सुंदर आविष्कार, चित्रांमधील बारकावे, रंगसंगती, मोहून टाकणारी होती. देव, देवता, पक्षी, प्राणी, रामायण, महाभारतातील प्रसंग, रोजच्या जीवनातील स्त्री पुरुषाचे देखावे, उत्सवांचे प्रसंग, डोळ्यांचे पारणे फिटले. चित्रांच्या बाजूला महिती, चित्रं सुबक लाकडी फ्रेममध्ये, वातावरण शांत, मधूनच पक्ष्यांचा किलबिलाट, फोटो, किती आणि कुठले काढू, कुठले चित्र बघू …सौंदर्याची बरसात. मन भरत नव्हते. एक मात्र खरं, इंडोनेशियात विमानतळाबाहेर पडल्यापासून एक शांतपणा, निवांतपणा जाणवत होता. गर्दी, वर्दळ होती, तरीही शांत शांत वाटत होते. सुट्टीच्या मूडचा परिणाम म्हणावा तर गेल्या वर्षी जर्मनीत अतिसुंदर, अतिशांत, निसर्गरम्य परिसरात फिरलो होतो. पण हा अनुभव काहीतरी वेगळा होता, मनात ओलावा निर्माण करणारा होता.

पुरी लुकिसान म्युझियमची सर्व दालन पालथी घातली, चार वाजून गेले, म्युझियम बंद व्हायची वेळ झाली होती. पण कुणीही आम्हाला हटकले नाही, आवरावर झाली होती, आता निघा असा भाव कोणाच्याही चेहर्‍यावर नव्हता. मन रेंगाळत होते, पण कॉफीच्या ओढीने बाहेर पडलो.

काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले होते, एलिझाबेथ गिल्बर्ट लिखित “Eat, Pray, Love”, ह्या पुस्तकात एलिझाबेथने तिच्या घटस्फोटानंतरच्या अस्वस्थ मूड मधून बाहेर येण्यासाठी एक वर्ष काय-काय केले याचे वर्णन आहे. ती उबडला काही काळ राहिली होती व तिच्या पुस्तकात एका हॉटेलचा उल्लेख आहे, ती जेवायला तिथे जात असे.

टूरचा पुढचा टप्पा नेका म्युझियम. त्याच्या समोरच नॉटी नुरी हॉटेल. ‘Eat, Pray, Love’ ह्या एलिझाबेथ गिल्बर्ट च्या पुस्तकात नॉटी नुरीचा उल्लेख आहे. नॉटी नुरीच्या दारातच त्या पुस्तकाचे कव्हर, पण “Eat, Pay, Leave!” अशी कव्हरची सुधारीत आवृत्ती ग्राहकांना सांगणारी ‘खा, पैसे द्या, व फुटा,’ लवची भानगड नको…हसू आले.

नृत्यांगना
नृत्यांगना

छोटीशी जागा, लाकडी बाकडी, उंच टेबल, ढाबा स्टाइल, जिथे जागा मिळेल तिथे बसा. एका टेबलावर एका साईडला जागा मिळाली. फ्राइड राईस, कॅप-के व्हेज मागवले. आइस-टीची साथ होती. चव ठीक होती, पोटभर झाले.  ईट, पे, लीव्ह…! रस्ता ओलांडून नेका म्युझियममध्ये. छान प्रसन्न वातावरण, कमळाचे तळे, कमालीची शांतता, कोपर्‍यात पडलेला पिवळ्या चाफ्याचा सडा. आधी भेट दिलेल्या पुरी लुकिसान म्युझियममधील पेंटिंगपेक्षा इथली पेंटिंग मोठी, भव्य होती. लाकडी कोरीव वस्तू, मूर्ती यांची यथायोग्य बडदास्त ठेवली होती. चित्रांमधील विषय, रंगसंगती, भाव निरखत दालनं पालथी घातली. एका दालनात इंडोनेशियातील वेगवेगळ्या घराण्यांमधील मानाच्या तलवारी ठेवल्या होत्या. दागिने लाजतील अशी कलाकुसर तलवारीच्या मुठीवर, म्यानावर होती. सोनं, पाचू, माणंकांची रेलचेल. काचेच्या पेट्यांमध्ये तलवारी ठेवल्या होत्या. तलवारींच्या दालनात शिरताना ह्या कोणाच्या, तलवारी, त्यांचे महत्व काय असा मोठा बोर्ड होता.

आज पावसाचा रंग नव्हता. डान्स बघायला मिळेल अशी खात्री वाटली.  लोटस टेम्पल बघितले. तिथेच मंचावर नृत्याच्या कार्यक्रमाची सजावट चालू होती. तिकीट काढले. सात वाजले. प्रेक्षक आधीच येऊन बसले होते. आम्हाला शेवटच्या रांगेत जागा मिळाली. वादक मंचावर आले. बासरीसारखे एक वाद्य, दोन प्रकारच्या ढोलक्या व एक मेटलिक तबला…काही वेळ वादन झाले व मंचावर नृत्यांगना आली. गुडघ्यात किंचित वाकून हाताच्या बोटांची, डोळ्याची नाजुक हालचाल करत नृत्य सुरू झाले. संगीत हळूवार होते. प्रेक्षकांवर फुले उधळत वेलकम डान्स झाला, मोरनृत्य, हंसनृत्य असे चार पाच प्रकार झाले. मग एक नृत्यांगना आली व प्रेक्षकांमधून एका-दोघांना उठवून रंगमचावर नृत्य करण्यास बोलावू लागली. कार्यक्रम संपत आला होता. पावसाचे थेंब जोर धरू लागले. निघालो. थोडे पुढे एक पुस्तकांचे दुकान दिसले. लाखो रूपीयांची पुस्तक खरेदी झाली.

इंडोनेशियाच्या मातीची आणि माणसांची ही लोभस झलक आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली.

ऋता पंडित

इ-मेल – ruta19@gmail.com

2 thoughts on “सुखद उबदार इंडोनेशिया

  1. हे केवळ सुंदर प्रवास वर्णन नाही तर इंडोनेशियाची सफर करू इच्छिणार्यांसाठी एक छान गाईड सुद्धा आहे. भारतातल्या प्रवासाची आवड असणाऱ्या लोकांचा अधिक ओढा पश्चिमेकडे असतो. तो पूर्वाभिमुख करेल असा लेख!

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s