स्थलांतरितांचा देश

श्वेता चक्रदेव

आजकाल काय घरटी एक माणूस परदेशात असतो आणि खरंच आहे म्हणा ते. माझे कित्येक मित्रमैत्रिणी  ठरवून अगदी दहावी-बारावीपासून तयारी करून इथे शिकायला आले आहेत. काहीही झाले तरी परदेशात जायचे असे ठरवलेले लोक मी पाहायचे ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचे. माझे काही मित्रमैत्रिणी तर भारतात असतानाच परदेशात असल्यासारखे वागायचे. त्यांना भारताची नसेल इतकी इत्यंभूत माहिती दुस-या देशाची असायची. इथले वेगवेगळे गायक, इथल्या मालिका, त्यातल्या पात्रांचे आयुष्य असले काय काय माहीत असायचे त्यांना. त्यामानाने मी अगदीच बाळबोध, इतकी की श्रावणात कांदा लसूण न खाणाऱ्या घरातून आलेली. मी परदेशात येईन, शिकेन, राहीन हे मलाच काय माझ्या आजूबाजूच्या कोणाच्याही स्वप्नातही आले नसते.

मेडिकलला खुल्या प्रवर्गात ऍडमिशन मिळाली नाही आणि फार्मसीला मिळाली  म्हणून तिथे गेले. पुढे काय करायचे हे काहीही माहित नव्हते. मग माझा बॉयफ्रेंड म्हणाला की तू GRE दे. अठरा-एकोणीस वर्षाचे प्रभावाखाली यायचे वय होते ते. वर्गातली बाकी हुशार मुलेही तेव्हा परदेशात  जायची तयारी करत होती. आपणही देऊन बघू ना परीक्षा केवळ आणि केवळ हा विचार करून परीक्षा दिली. पुढे काय करायचंय हे आधी माहीत नव्हते पण आपल्याला हे  जमणार आहे असा विश्वास यायला लागल्यावर मात्र जरा सिरिअसली विचार केला गेला. फार्माकॉलॉजी अगदी पहिल्यापासूनच आवडत असल्याने तोच विषय निवडला. परदेशात जायचे म्हणजे अमेरिकेत हे तसे ठरलेलेच होते. अमेरिकेत नसते येता आले तर मग बाकीच्या देशांचा विचार केला असता कदाचित.

image1
निर्जन समुद्रकिनारी मऊ वाळूत पावलं उमटवतं चालताना मला कसलं भारी वाटतं होतं. आईला हा फोटो पाठवला तर म्हणाली, नशिबवान आहेस.

दोन बॅग आणि एक लॅपटॉप इतके सामान घेऊन या देशात, अनोळखी प्रदेशात पाऊल टाकल्यावर काय वाटते हे खरे तर शब्दात सांगता येणार नाही. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांचे तसे बरे असते त्यांना आल्याआल्या महिन्याचा पगार चालू होतो, बरेचदा भारतात घेऊन ठेवलेले फ्लॅट असतात. इथे आधी ऑफिसमधून आलेली माणसे असतात. विद्यार्थी म्हणून आले की सगळेच अवघड असते. कधी स्टुडन्ट लोन घेऊन आलेली मुले, तर कधी अगदी घर गहाण ठेवून आलेली मुले असतात. डोळे विस्फारून जातील इतके नवे रोज बघायला मिळते. नवीन संस्कृती, वातावरण, या सगळ्यात स्वत:ला सामावून घेत असताना, सतत आपण भारतीय आहोत ही गोष्ट पाठ सोडत नाही. रात्री अपरात्री आपली रोजी -रोटी भागवण्यासाठी कॅम्पसच्या कॅन्टीनमधून नोकरी संपवून येताना, अंधा-या गल्लीमधून आपल्या सामुहिक भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये  गेल्यावर स्वयंपाक करून जेवताना पहिले काही महिने निघून जातात. थोडे रुळल्यावर जरा धीर येतो. श्रीमंत आई बापाची मुलेदेखील हात राखूनच खर्च करतात. परदेशातील सगळेच भारतीय विद्यार्थी एकमेकांना खूप घट्ट धरून असतात. अगदी साध्या तापापासून ते अगदी जीवघेणा आजार झाला तरी आपापसात मदत करून वेळ निभावून नेतात आणि हे करताना केवळ आपण भारतीय आहोत हा समान धागा असतो.

घर, गाड्या, नोकरी, पैसा, तब्येत सगळे सगळे उत्तम असते पण काहीही कारण नसताना एखाद्या रात्री विचित्र वेळी जाग येऊन, आत्ता याक्षणी आपण आपल्या घरापासून किती लांब आहोत याची जाणीव होते आणि मग संपूर्ण रात्र तशीच जाते. जीव कसनुसा होतो. आजूबाजूची शांतता, सुरूवातीला जिचे आपल्याला अप्रूप वाटत असे ती आता खायला उठते. इतक्या वर्षांनीही मला स्वप्नात आपले घर दिसते ते आमचे अगदी छोटेसे घर होते (जे आम्ही मी पाचवीत असताना सोडले ते आमचे गावचे घर किंवा माझ्या आजीचे घर). पासपोर्टवरचे, लायसेन्सवरचे पत्ते बदलले तरी मनातला पत्ता अजून तोच आहे त्याला काय करू मी?

काळ कोणासाठीही थांबत नसतो. तो अव्याहतपणे आपले काम करत असतो. परदेशात येताना नोकरी करत असलेले किंवा उत्तम आरोग्य असणारे आपले आई वडील आता मात्र वृद्धत्वाकडे झपाट्याने जाऊ लागलेले असतात. दर भारत भेटीत ते मागच्यापेक्षा जास्त थकलेले दिसायला लागतात. कितीही सांगितले की एअरपोर्टवर रात्री घ्यायला येऊ नका तरी तिथे पोचलेले आणि त्या लोकांच्या गर्दीत, गोंधळात आपले अजूनच वृद्ध झालेले हे लोक पाहिले की काळजात काय होते हे मला नाही सांगत येणार. आता हे लिहितानासुद्धा डोळ्यातून घळाघळा वाहत असलेले पाणीच कदाचित ते सांगू शकेल. आणि हे दुःख असे आहे की ते कोणाला सांगताही येत नाही, पटकन म्हणून जाते कोणीही की मग या परत कोणी अडवलंय आणि ते खरेही असते. कोणीच नाही अडवलंय तरीही का नाही आम्ही परतीची वाट धरत?

वेळेतला फरक म्हणा किंवा दोन देशांमधले भौगोलिक अंतर म्हणा, नातेवाईकांशी असलेले घट्ट सबंध, थोडेसे कमी  होतात. वाटेल त्या वेळी जागून, स्काइपवरून किंवा फेसटाईमवरून कितीही समारंभ पहिले तरी हे अंतर त्याचे काम करत असते. महिन्यातून एकदा ना चुकता भेटणारा आपला काका अचानक काही निमित्त होऊन या जगातून निघून जातो आणि आपण काहीही करू शकत नाही. त्या दिवशी गप्प गप्प राहून, ऑफिसमधे कोणी बघत नाहीये ना हे बघत पटकन अश्रू पुसून, घरी सतत किती वाजता नेणार आहेत, दहावा कधी वगैरे प्रश्न विचारतो. घरच्यांना वाटते की बघा किती काळजी आहे पण ते खरे तर म्हणजे इतक्या लांब बसून आपणच आपले स्वतःचे केलेले सांत्वन असते.

एकदा आई बोलता बोलता म्हणाली, जास्त उशीर करू नकोस, भराभर माणसे निघून जातायत आपल्यातून, तेव्हा वाटले की आपली आई जरा अतिच बोलते कधीकधी पण आता हे लिहिताना जाणवतंय की खरंच तर बोलत होती ती. आप्पाकाका, मावशी, अनिलकाका अशी नवे आठवायला गेले तर कितीतरी नावे पुढे आली भराभरा जी आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत आणि कधीच दिसणार नाहीयेत. आपल्या ड्रायव्हर काकांनी ऐपत नसताना समोरच्या वाण्याकडून घेऊन दिलेली कॅडबरी आता आठवत राहते अधूनमधून. अनेक जणांना वाटते की हे तर आपण आपल्या देशात असतो तरीही झालेच असते ना, कदाचित खरेही असेल ते पण.

image5
जीवाचा आटापीटा करून, हौसेने जमेल तशा परंपरा पाळतो आम्ही

अमेरिका हा देशच मुळी इमिग्रंन्ट्स म्हणजे स्थलांतरितांचा आहे. हा देश स्वप्ने पहायला शिकवतो, पण त्याच बरोबरीने मेहनत करायला, कोणत्याही कामाची लाज न बाळगायला, शिस्त आणि नियम पाळायला शिकवतो. साहजिकच मेहनत करा आणि कमवा हा उसूल असल्याने अनेकांना मोहून टाकतो. तुम्ही कोणत्याही धर्माचे, वंशाचे आणि रंगाचे असा, ह्या भल्या मोठ्या मेल्टिंग पॉटमध्ये तुम्ही सहज मिसळून जाता. आजही अनेक विद्यार्थी मोठी मोठी स्वप्ने घेऊन या देशात येतात. पण दर वर्षी हजारोंच्या संख्येने इथे भारतातून विद्यार्थी येतात. मला नेहमी प्रश्न पडतो की या सगळ्यांना त्यांच्या स्वप्नात असलेल्या भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळणार का? यातले अनेकजण आपल्या कुवतीच्या बाहेर आपल्या पदरचे पैसे मोडून, अनेकजण आपली घरे गहाण टाकून इथे आलेली ऐकली आहेत, पाहिले आहेत.

विद्यापीठांचीही यात काही चूक आहे असे नाही म्हणता येणार. मागच्या काही वर्षात हा विद्यार्थ्यांचा लोंढा इतका वाढलाय की मागणी तिथे पुरवठा या न्यायाने अगदी सरसकट अनेक विद्यापीठे याचा धंदा करू पाहातायत. स्कॉलरशिप आणि असिस्टंटशिप मिळणं दिवसेंदिवस अवघड होतंय. ह्या सगळ्याचा घाबरवणं हा उद्देश नसून दोन्ही बाजू माहिती व्हाव्यात हा आहे. एक काळ नक्कीच असा होता की नुकती इंजिनीअरिंग पास झालेली मुलं परदेशी जाऊन अचानक भरपूर पगार कमवू लागत पण आता ही संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होतेय. आणि हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही, आपल्या आजुबाजूच्या कोणत्याही आयटी क्षेत्रातल्या माणसाला विचारा.

इथे राहून भारताकडे बघताना आजही तसाच आपलेपणा वाटतो. आपण काय करू शकतो हा विचार सतत मनात असतो. या ना त्या मार्गाने इथे राहणार प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही समाजाला हातभार लागावा म्हणून काम करतच असतो. भारतात आता आल्यावर काय वाटते. अनेकदा लोक विचारतात की भारतात आल्यावर सगळीकडे घाण दिसत असेल ना, इथली गर्दी, इथले प्रदूषण खटकत असेल ना? तर हो नक्कीच खटकतं पण मुळात या दोन देशांची तुलना करणे चुकीचे आहे या दोन मोठ्या आणि पूर्ण वेगळ्या सिस्टिम आहेत.

मी हे नेहमी म्हणते की मला परदेशात आल्या दिवसापासून जेवढे सुरक्षित वाटलंय की ते सांगणे खूप गरजेचे आहे. रस्त्याने येत जात कोणी धक्का मारतंय कोणीतरी पाठलागच करतंय, शिट्टी मारतंय असे कधीही झाले नाही आणि मला इतके मोकळे वाटलंय ना या गोष्टीचे. परदेशातली नियमानुसार चालणारी यंत्रणा, इथे वाटणारी सुरक्षितता, आपल्याला हवे तसे जगता येणे या बरोबर इथे आल्यावर पाळावे लागणारे नियम आणि येणाऱ्या जबाबदाऱ्या  या गोष्टीही आल्याच. कायमचे परदेशात, मी अमेरिकेबद्दल बोलतेय हे पण कायमचे राहायला यायचे कि नाही का खूपच पुढचा प्रश्न झाला. आज आत्ता या क्षणी, अमेरिकेमध्ये कायमचे स्थायिक होणे २० वर्षांपूर्वी होते तसे सोपे अजिबातच राहिलेले नाही. १०-१५ वर्षे सुद्धा इथे राहून आजही ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत असलेली कित्येक कुटुंबे तुम्हाला सहज दिसतील आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यांची मुले इथेच जन्माला अाली, इथलीच झाली पण आईवडील मात्र आजही उभे आहेत त्या ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत. अशा वेळी नक्की कुठले आहोत आपण हा प्रश्न त्यांना वाटल्याशिवाय राहत नाही.

पण तरीही माणसाने काही काळ तरी परदेशात राहावे हे मात्र मी नक्की म्हणेन. जमले तर एकटे राहावे, बॅकपॅकिंग करावे, अनोळखी माणसांना भेटावे. परदेशातले हे वास्तव्य आपल्या विचारांची कक्षा वाढवते. आपल्याला वाटते ते आणि तसेच बरोबर असते, योग्य असते हा किती पोकळ भ्रम असतो आपला हे लख्ख समोर येते. हा देश आपलासा कधी झाला ते नक्की नाही सांगता येणार व पण आता हा देश परका वाटत नाही हे मात्र खरे. काही तुरळक अपवाद वगळता इथल्या माणसांनी दरवेळी भरभरून प्रेम दिले, समजुतीने चार गोष्टी सांगितल्या. वयाची तिशी यायच्या आत इतक्या भव्य गोष्टी या देशामुळेच मिळाल्या. आपली भारतीय किंवा आपली मराठी माणसे सोडा, त्याव्यतिरिक्त आता जगाच्या कोणत्या कोणत्या कोप-यातूनआलेल्या माणसांशी माझी इथे जिवाभावाची नाती झाली आहेत. आणि माझ्या नकळत माझे इथल्या संस्कृतीशी, इथल्या माणसांशी नाते निर्माण झाले आहे. मग असे वाटते की, फक्त या माणसांशीच  का म्हणून कदाचित या मातीशीसुद्धा आपले ऋणानुबंध असणार म्हणूनच आज इथे आपण आपले छोटेसे का होईना पण पाय रुजवू पाहतोय आपल्यापुरते का होईना एक छोटेसे अंगण आखू  पाहतोय.

कोणीतरी म्हणूनच गेलंय की,  Once you travel you will never be home again because part of your heart will always be somewhere else. अगदी हे असे आणि असेच होते. आपल्या जाणीवा, आपले क्षितिज विस्तारते आणि मग कधी कधी आपली घराची वेस आपल्याला खुजी वाटू लागते, बाहेरचे विस्तीर्ण आकाश खुणावायला लागते. माणूस खूप चिवट प्राणी आहे, जिथे त्याला टाकाल तिथे तो आहे त्याच्यात आपले छोटे जग, आपल्यापुरते एक छोटे गाव उभे करतो. आम्हा परदेशात राहणाऱ्या लोकांच्या घरी येउन बघा, आमची घरे म्हणजे आमची छोटी छोटी गावं असतात.

image10

नक्की कुठे राहावे, गड्या आपुला गाव बरा  म्हणताना हे जे गाव आहे ते नक्की कुठले त्याचे उत्तर मला आज काय बहुतेक कधीच देत येणार नाही पण एक नक्की, your home is where your heart is. आणि जगभरात कुठेही गेले, कितीही वेगळ्या लोकांत राहिले, वेगळ्या संस्कृती पहिल्या, थॅंक्सगिविंगला टर्की शिजवून खायला घातला, वेगळ्या वाईन प्यायले तरी , मी मात्र राहणार १००% मराठी आणि याचे कारण असे कि “तू कोण?” असे मला उद्या कोणी विचारले तर . …आमटीचे भुरके मारणारी आणि मोदकावर तूप घालून नव्हे तूपात भिजवून खाणारी  आणि बेंबीच्या देठापासून गणपती बाप्पा मोरया आणि शिवाजीमहाराज की जय ओरडणारी तीच तर आहे मी.

श्वेता चक्रदेव

1010280_10200490478042208_678730380_n

इ-मेल – shweta.pharmacy@gmail.com

गाणं म्हणते, वाचते, नाटकात कामं करते, छोटं-मोठं लिहू पाहते. पिट्सबर्गला मैत्रिणींच्या मदतीने मराठी शाळा चालवते. मराठी मंडळात सक्रिय कार्यरत. निवेदन करते. नवीन पदार्थ करून गोतावळा जमवून खाऊ घालणे मनापासून आवडते.

One thought on “स्थलांतरितांचा देश

  1. Woow shweta ….ekdam jhakkaaasss…. khup avadale… kiti mana pasun lihites…. avadale…. dolyat pani pan anlas ani vachun jhalyavar shiti maravashi pan vatali…. Thanks for being my friend… I am always proud of you.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s