एका झंझावाताची शतकपूर्ती

संदीप कलभंडे 

७ नोव्हेंबर २०१७ ह्या दिवशी रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (त्या काळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असल्यामुळे ही घटना २५ ऑक्टोबर ची म्हणून नोंदली गेली होती. म्हणून ह्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.)

बोल्शेव्हिक राज्यक्रांतीबद्दल आजवर फारसे अलिप्तपणे बोलले गेलेले नाही. देशोदेशींच्या कम्युनिस्टांमध्ये ही क्रांती हा एक प्रेरणेचा स्रोत बनून राहिली आहे, तर कम्युनिझमच्या विरोधकांमध्ये ह्या घटनेकडे भीतीने व तिरस्काराने पाहिले गेले आहे. काहीही असले तरी ह्या घटनेने संपूर्ण जगाला एवढा प्रचंड हादरा दिला होता की तिच्याकडे दुर्लक्ष करणे मात्र कुणालाच शक्य नव्हते. विकसित भांडवलशाही देशांमध्ये एक गंभीर धोक्याची घंटा म्हणून त्याकडे पाहिले गेले. अनेक देशांमध्ये ह्या क्रांतीमुळे आर्थिक, सामाजिक, परराष्ट्रीय धोरणांमध्ये मूलगामी बदल घडून आले. अविकसित देशांमध्ये, (त्यातले अनेक देश विकसित देशांच्या पंजाखाली होते), ह्या घटनेने साम्राज्यवादाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्यात चिनी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांचाही समावेश आहे.

परंतु ही घटना अकस्मात घडली होती असे नाही. कम्युनिझम किंवा साम्यवाद ही विचारधारा जगाला माहीत नव्हती असेही नाही. त्याची अंमलबजावणी प्रथम रशियात घडून आली. ही मात्र जगाला अनपेक्षित असणारी घटना होती.

एकोणिसाव्या शतकात जर्मन तत्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ असलेले कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स ह्यांनी साम्यवादी तत्वज्ञान जगापुढे मांडले. एवढेच नव्हे तर युरोपात श्रमिकांच्या क्रांतिकार्याला चालना देण्याचे प्रयत्न केले. त्यांचा दास कापिताल हा भांडवलशाहीचे मर्मभेदक विश्लेषण करणारा ग्रंथ, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा श्रमिकांना एकत्र येण्याचे आवाहन करणारा जाहीरनामा, आणि इतर ग्रंथ ह्यांनी युरोपात १९व्या शतकात खळबळ माजवली होती. हे तत्त्वचिंतन केवळ विचारवंतांच्या वर्तुळात नव्हे तर श्रमिक वर्गापर्यंत पोचले होते आणि त्यांनी युरोपात कामगार चळवळींना मोठीच चालना दिली.  मार्क्स ह्यांनी इतिहासाच्या गतीचे विश्लेषण करून असे प्रतिपादन केले की भांडवलशाहीत असलेल्या अंतर्विरोधांमुळे श्रमिकांचे शोषण आणि भांडवलदार आणि श्रमिक वर्ग ह्यांच्यातील संघर्ष ह्या दोन्ही गोष्टी अपरिहार्य आहेत. तसेच भांडवलशाहीच्या गतितत्वामुळे ती विनाशाकडे वाटचाल करील आणि वर्गसंघर्ष अधिकाधिक तीव्र होत जाईल. ह्यातून एक दिवस असा येईल जेव्हा ही व्यवस्था उलथवून टाकली जाईल आणि श्रमिकांची सत्ता प्रस्थापित होईल. हीच साम्यवादी क्रांती. ह्या क्रांतीनंतर क्रमश: समाजाची वाटचाल साम्यवादाकडे होईल असे त्यांचे भाकीत होते.

परंतु पश्चिम युरोपातल्या विकसित भांडवली व्यवस्थांमध्ये ही क्रांती होऊ शकली नाही. ह्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु मुख्यतः भांडवलशाहीला आधार देणारा साम्राज्यवाद हा एक मोठा घटक होता. व्लादिमीर इल्यिच लेनिन ह्यांनी जागतिक भांडवलशाहीची साम्राज्यवादी वाटचाल लक्षात घेऊन मार्क्सवादी विचारसरणीमध्ये भर घातली. त्यांच्या मांडणीनुसार जागतिक भांडवलशाहीने स्वत:चे संरक्षण अविकसित देशांच्या शोषणातून केले. रशिया हा जागतिक भांडवली व्यवस्थेच्या साखळीतील सर्वात कमजोर दुवा होता, म्हणून सर्वप्रथम तो निखळणे अपरिहार्य होते.

क्रांतीपूर्व रशियामध्ये रोमानोव्ह घराण्याची अत्यंत जुलमी आणि शोषक अशी राजसत्ता होती. एकीकडे रोमानोव्ह सम्राट झार निकोलस दुसरा आणि त्याच्या कुटुंबाची आणि अधिकाऱ्यांची ऐषारामी राहणी आणि चैनबाजी ह्यांना ऊत आला होता, आणि दुसरीकडे सामान्य जनतेचे दारिद्र्य, शोषण व विषमता, जनतेवरील जाचक कर आणि अत्याचार ह्यांनी कळस गाठला होता. देश पूर्णतः शेतीप्रधान होता. आधुनिक उद्योग फार विकसित झालेले नव्हते, पण होऊ लागले होते. त्याबरोबर एक कामगारवर्गही आपोआप संघटित होत होता. कामगारांची स्थिती हलाखीची होती. त्यांना युनियन करण्याचे, आर्थिक मागण्या करण्याचे अधिकारही नव्हते. शेतकऱ्यांमध्येही कमालीचे दारिद्र्य होते. त्यांना दिल्या गेलेल्या जमिनीतून पोट भरण्याएवढे उत्पन्न त्यांना मिळू शकत नव्हते.  मॅक्झिम गॉर्की च्या “आई” ह्या कादंबरीत ह्या सर्व परिस्थितीचे प्रभावी चित्रण आहे. क्रांतीची प्रेरणा कशी निर्माण होत गेली हे त्यातून दिसून येते.

शेतकरी आणि कामगार ह्यांच्यात दारिद्र्यामुळे खदखदत असलेल्या असंतोषाचा पहिला स्फोट झाला १९०५ साली.  झारविरोधी निदर्शनावर एका “रक्तरंजित रविवारी” झारच्या सैनिकांनी गोळीबार करून शेकडो लोकांची हत्या केली.  परिणामी शेतकऱ्यांनी घडवून आणलेली जाळपोळ, लुटालूट, कामगार आणि विद्यार्थी  ह्यांचे संप, आणि सैनिकांची बंडे अशा विविध मार्गांनी क्रांतीचा उद्रेक झाला. पुढे सम्राट झार ह्याने आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी काही थोड्याफार ही क्रांती शमवण्यासाठी काही तात्पुरते उपाय केले. ह्यातून एक नवीन घटना अस्तित्वात आली. द्युमा नामक संसदेची निर्मिती झाली. काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या.

परंतु ह्याने मूळ समस्या सुटल्या नाहीत. पहिल्या महायुद्धापर्यंत परिस्थिती अजून बिघडत गेली आणि जनतेचा असंतोष वाढत गेला. झार निकोलसने रशियाला युद्धात लोटले ही गोष्ट रशियामध्ये फारशी रुचली नाही. युद्धात रशियाचे मोठे पराभव होत होते. त्यातून होणारी प्रचंड मनुष्यहानी आणि अन्नधान्याची टंचाई, ह्यामुळे झार कमालीचा अप्रिय होत गेला. ह्यातून पेट्रोग्राड मध्ये पहिली “फेब्रुवारी क्रांती” (आजच्या कॅलेंडरप्रमाणे मार्च १९१७) आकाराला आली. पेट्रोग्राड (जुने नाव सेंट पिटर्सबर्ग) ही तेव्हा रशियाची राजधानी होती. ही क्रांती स्त्रियांच्या उठावाने सुरु झाली. “ब्रेड, शांतता, जमीन” ही ह्या उठावाची घोषणा होती. नंतर त्यात कामगार, विद्यार्थी, सैनिक हे सामील होत गेले आणि आंदोलकांची संख्या लाखांमध्ये गेली. झारने सैनिकांच्या मदतीने उठाव दाबून टाकण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. क्रांतीचा प्रक्षोभ एवढा वाढला की अखेर झार निकोलस दुसरा ह्याला सिंहासन सोडावे लागले. (पुढे एक वर्षाने झार निकोलसची त्याच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली.) एका अस्थायी सरकारची निर्मिती झाली. ह्या सरकारवर सोशॅलिस्टांचे प्रभुत्व होते. अलेक्झांडर केरेन्स्की हा पुढे ह्या  सरकारचा प्रमुख बनला. ह्या सरकारने शांतता प्रस्थापित करण्याचे खूप प्रयत्न केले. पण ह्या सरकारला फारशी लोकप्रियता मिळू शकली नाही. क्रांतीनंतर कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे पेट्रोग्राड सोविएत अस्तित्वात आले. हे सोविएत आणि अस्थायी सरकार ह्यांच्यात सत्तेचे विभाजन झाले होते. एकमेकांवर कुरघोडी करून अधिकाधिक सत्ता मिळवण्याचे दोन्हींकडून प्रयत्न होत राहिले.

ह्याच सुमारास स्वित्झर्लंडमध्ये भूमिगत असलेले व्लादिमीर लेनिन हे रशियात परतले व बोल्शेव्हिकांचे नेते म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली. पेट्रोग्राड सोविएतमध्ये बोल्शेव्हिकांनी पद्धतशीर  प्रचार करत हळूहळू प्रभुत्व मिळवले. लिऑन ट्रॉट्स्की हे आधी मेन्शेव्हिक गटाचे होते ते नंतर बोल्शेविकांना सामील झाले. लेनिन हे कडवे युद्धविरोधी होते. त्यांच्या धडाकेबंद प्रचाराने ते लोकप्रिय बनत गेले. फेब्रुवारी क्रांती ते ऑक्टोबर क्रांती ह्या मधल्या काळात देशात सर्वत्र सोव्हिएट्स उदयाला आली. तिथे क्रमशः बोल्शेव्हिकांचा प्रभाव वाढत गेला. मधल्या काळात अनेक उठाव झाले, त्यातले अनेक चिरडले गेले. बोल्शेव्हिक नेत्यांना अटक झाली. अखेर बोल्शेव्हिकांनी सैनिकांच्या मदतीने पेट्रोग्राड ह्या राजधानीच्या शहरात सशस्त्र उठाव करण्याचे ठरवले. एका क्रांतिकारी सेनेची स्थापना करण्यात आली. ह्यात कामगार, शेतकरी, विद्यार्थी, सैनिक अशा सर्वांचा भरणा होता. ह्या सेनेला रेड गार्ड हे नाव देण्यात आले. ह्या रेड गार्डने ७ नोव्हेंबर सशस्त्र उठाव केला. त्यांनी एकेक करून पेट्रोग्राड मधल्या सर्व सरकारी, रेल्वे व सैनिक ऑफिसेसच्या इमारती ताब्यात घेतल्या. रेल्वे मार्ग ताब्यात घेतले. शेवटी त्यांनी केरेन्स्कीचे मंत्रिमंडळ स्थित असलेल्या विंटर पॅलेसला घेराव घातला. पेट्रोग्राडमध्ये सर्वत्र अस्थायी सरकारचे सैनिक होते. पण बोल्शेविकांना कुठेच फारसा विरोध झाला नाही. अखेर मंत्रिमंडळाने शरणागती पत्करली. केरेन्स्की मात्र तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

दुसऱ्या दिवशी व्लादिमिर लेनिन ह्यांनी सर्व सोविएट्सच्या काँग्रेसमध्ये सर्व सत्ता ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. अशा रीतीने बोल्शेव्हिक पक्षाने लेनिन ह्यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या असंतोषाला दिशा देऊन राज्यक्रांती यशस्वी केली आणि जगाच्या इतिहासात प्रथमच श्रमिकांचे शासन अस्तित्वात आले. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लेनिन ह्यांनी युद्धातून रशिया बाजूला होत असण्याचीही घोषणा केली.

क्रांती झाल्यावर रशियात सर्व काही साध्य झाले असे अजिबात नाही. किंबहुना एका अत्यंत खळबळजनक कालखंडाची ती सुरुवात होती. क्रांतीनंतर लगेच बोल्शेव्हिक पक्षाला क्रांतीच्या विरोधात असलेले श्वेत रशियन्स व कोझॅक्स, मेन्शेव्हिक्स, सोशलिस्ट्स आणि अन्य प्रतिक्रांतिकारी समाजघटकांना तोंड द्यावे लागले. ह्या संघर्षाची व्याप्ती एवढी प्रचंड होती की त्याला एका देशव्यापी गृहयुद्धाचे स्वरूप आले. परंतु बोल्शेव्हिक पक्षाच्या नेतृत्वाने क्रमाक्रमाने विरोधी शक्तींवर मात केली. ठिकठिकाणच्या सोव्हिएट्सवर प्रभुत्व मिळवले व ४ वर्षानंतर बोल्शेव्हिक सत्ता निर्णायकपणे प्रस्थापित केली. ह्या गृहयुद्धातील विजयानंतर १९२२ साली सोविएत समाजसत्तावादी गणराज्यांच्या संघाची (USSR) स्थापना झाली.

आर्थिक आघाडीवर सोविएत युनियनची वाटचाल अधिकच कष्टप्रद होती. सुरुवातीला उत्पादन साधनांची सार्वजनिक मालकी प्रस्थापित करताना त्यांना अवाढव्य समस्यांना तोंड द्यावे लागले. जमिनीची सार्वजनिक मालकी प्रस्थापित करणे हे एक मोठे आव्हान होते. हे साध्य करताना अतिरेक करण्यात आले, आणि साम्यवादी धोरणे न मानणाऱ्या शेतकऱ्यांच्या (कुलक्स) कत्तली करण्यात आल्या. ह्यातून शेतीतील उत्पादनावर दुष्परिणाम होऊन ३० च्या दशकात देशाला भीषण दुष्काळांना तोंड द्यावे लागले. मात्र शेतीवर मिळवलेल्या नियंत्रणाचा फायदा उठवत स्टालिनने औद्योगिक विकासाला मोठी चालना दिली. १९२८ मध्ये सोविएत युनियन मध्ये पंचवार्षिक योजना सुरु झाल्या आणि तिथपासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत विस्मयकारक अशी प्रगती साध्य करण्यात आली. विशेषतः १९२९ च्या जागतिक मंदीच्या काळात ही प्रगती उठून दिसणारी होती. एका अतिशय मागासलेल्या आणि कृषिप्रधान देशाला वेगाने औद्योगिक देशात परिवर्तित करणे हे सोविएत युनियनचे मोठे यश होते. परंतु त्यासाठी द्यावी लागलेली किंमतही भयावह होती. स्टालिनच्या धोरणाविरुद्ध जाणाऱ्या, बंडखोरी करणाऱ्या तसेच प्रतिक्रांतिकारी असण्याची शंका असणाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात आल्या. त्यात दुष्काळामुळे झालेल्या प्रचंड जीवितहानीचीही भर पडली. ह्या हत्यांमुळे आणि मनुष्यहानीमुळे सोविएत युनियनची वाटचाल गंभीरपणे डागाळली गेली. लोकशाहीचा संकोच करून स्टालिनच्या कारकीर्दीत लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना बळाने केवळ आज्ञापालन करायला लावण्यात आले आणि देशात सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले.

परंतु ह्याहीपेक्षा दुसऱ्या महायुद्धाने सोविएत युनियनवर जो आघात केला तो अत्यंत राक्षसी आणि अमानुष होता. एवढे अजस्त्र आणि सर्वंकष युद्ध ह्याआधी जगाने कधीही पाहिलेले नव्हते. हे युद्ध शौर्याची पराकाष्ठा करून सोविएत युनियनने जिंकले खरे, पण ह्या युद्धाने देशाचे कंबरडे मोडले. २ कोटींच्या आसपास झालेली जीवितहानी ही कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती. तसेच देशातील विविध पायाभूत सुविधा, उदा. धरणे, रस्ते, पूल, मोठे मोठे कारखाने, शेती, हे सर्व मोठया प्रमाणावर उध्वस्त करण्यात आले होते. ह्यातून वर उठायला देशाला फार प्रचंड प्रयास लागले.

युद्धोत्तर १९९१ पर्यंतचा इतिहास जसा राखेतून वर उठण्याचा होता तसेच अमेरिका आणि सोविएत युनियन ह्यांच्यातील शीतयुद्धाचा होता. ह्या काळात ह्या दोन्ही देशांचे शस्त्रबळ मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. अण्वस्त्र स्पर्धेने संपूर्ण जगाला विनाशाच्या सीमेवर आणून ठेवले. हा सर्व कालखंड कमालीचा अस्वस्थ आणि तणावग्रस्त होता. ह्याच काळात सोविएत युनियनने अंतरिक्ष संचार आणि आण्विक शक्ती ह्या दोन्ही आघाड्यांवर मोठी प्रगती केली.  परंतु शीतयुद्धाच्या परिणामी सैन्य, शस्त्रास्त्रे व युद्धसज्जता ह्यावरील खर्च ताकदीच्या बाहेर गेला होता. दुसरीकडे ख्रुश्चेव्ह आणि ब्रेझनेव्ह ह्यांच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था हळूहळू कुंठित होत गेली.

८० च्या दशकात गोर्बाचेव्ह ह्यांच्या आगमनानंतर सोविएत युनियनमध्ये परिवर्तनाला प्रारंभ झाला. ग्लासनोस्त (मोकळेपणा) व पेरेस्त्रोइका (पुनर्रचना) ही धोरणे अंमलात आणली गेली. हे परिवर्तन मनापासून झाले असे नाही. टिकून राहण्याच्या अपरिहार्यतेतून ते आले होते. लष्करी खर्च, जो अमेरिका आणि नेटो देशांविरुद्ध वॉर्सा करारातल्या देशांमध्ये, अफगाणिस्तान व अन्य संघर्षस्थानांवर करण्यात येत होता तो देशाला न झेपणारा होता. त्यात कुंठित अर्थव्यवस्थेने भर टाकली होती. ह्या दोन्ही गोष्टींवर मात करून टिकून राहणे हे अशक्य होत गेले.

परंतु गोर्बाचेव्ह ह्यांनी चालना दिलेल्या परिवर्तनवादी धोरणांनी आघात केला तो देशाच्या समस्यांच्या आधी प्रथम देशाच्या रचनेवर, तत्वप्रणालीवर व साम्यवादी सत्तेवरच होता. मोकळ्या झालेल्या ह्या शक्तींना तोंड देण्याएवढी ताकद सोविएत शासनात नव्हती. त्यात संघराज्यातील घटक देशांनी केंद्रीय सत्तेविरुद्ध निर्णायक बंड केले. ह्या सर्व अंतर्विरोधांमुळे सोविएत युनियनच्या चिरेबंदी रचनेला तडे गेले आणि अखेर २५ डिसेम्बर १९९१ ला सोविएत युनियनचा अस्त झाला.

सोविएत युनियन च्या उदयास्ताची ही उण्यापुऱ्या ७४ वर्षांची अत्यंत वादळी कहाणी पाहताना कुणीही अचंबित होऊन जाईल. हे सर्व काय होते? मानवाच्या इतिहासातील एक अभिनव प्रयोग, ज्यात दारिद्र्याने आणि शोषणाने असहाय्य झालेल्या श्रमिक-कृषक वर्गाला एक भरभक्कम, सर्वव्यापी अशी आर्थिक-सामाजिक संरचना प्राप्त झाली. त्यांना कामाचा हक्क मिळाला, शिक्षण, आरोग्य, निवास ह्या साऱ्या गोष्टींच्या उपलब्धतेची  खात्री देण्यात आली. ह्या व्यवस्थेने एका मागासलेल्या समाजाला एका पिढीच्या अंतरात औद्योगिक दृष्ट्या प्रगत पातळीवर नेले. परंतु ह्या सगळ्याच्या अंमलबजावणीत झालेल्या अमानुष घटना, स्वातंत्र्याचा गळा आवळला जाणे, अत्यंत भीषण अशा कत्तली, लोकशाहीचा आणि लोकांच्या मनापासून असलेल्या सहभागाचा अभाव ह्यामुळे ह्या विचारसरणीचा आणि तदंतर्गत प्रयोगाचा झालेला प्रखर विरोधही स्वाभाविकच होता. तसेच वैयक्तिक उद्योजकतेचा गळा घोटल्यामुळें अर्थव्यवस्थेला आलेला साचलेपणा हाही ह्या व्यवस्थेवर शंका घेण्याचे एक मुख्य कारण होते.

परंतु साम्यवादाच्या ह्या अपयशाचा मागोवा घेताना हे अपयश मुळातच चुकीच्या आणि विकृत विचारसरणीमुळे अपरिहार्य होते का? की मुख्यतः हुकूमशाही प्रवृत्तींनी केलेले अत्याचार, महायुद्धाने केलेला प्रचंड आघात आणि शीतयुध्दकालीन शस्त्रस्पर्धेमुळे व्यवस्थेवर आलेला असह्य ताण ह्या कारणांमुळे ही व्यवस्था अयशस्वी झाली?  ह्याचा अखेरचा निर्णय झालेला नाही असे मला वाटते.

दुसरे म्हणजे ह्या व्यवस्थेने जगावर केलेले परिणाम अतिशय मूलगामी होते आणि आहेत. साम्यवादी क्रांतीचा धोका टाळण्यासाठी जी अभेद्य अशी संरक्षक तटबंदी विकसित देशांमध्ये उभी राहिली ती अप्रत्यक्षपणे त्या त्या देशांतील श्रमिक वर्गाला उपकारक ठरली आहे. मार्क्सवादी व्यवस्थेबद्दलचे आकर्षण सोविएत युनियनच्या अस्तानंतर एवढ्या वर्षांनीही संपलेले नाही. आजही भांडवलशाहीमध्ये चक्राकार गतीने वारंवार येणारी अरिष्टे व मंदी, विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेची कुंठितावस्था आणि तेथील कमाल विषमता, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका ह्या खंडांमध्ये आजही असणारे दारिद्र्य ह्यामुळे मार्क्सवादी विचारांचे पुनःपुन्हा मंथन आजही होत असते. समाजवादसदृश अनेक धोरणे ते शब्द वापरून किंवा न वापरता अमलातही आणले जात असतात.

ह्या सर्व खळबळीचे उगमस्थान असलेल्या बोल्शेव्हिक राज्यक्रांतीचे स्मरण सर्वांनाच विचाराला प्रवृत्त करणारे आहे आणि श्रमिकाभिमुख दृष्टीकोण देणारे आहे ह्याची जाणीव होणे हेच ह्या लेखाचे उद्दिष्ट.

संदीप कलभंडे

13173820_1238249782859816_1529892100148952007_n

इ-मेल – sandeep.kalbhande@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s