नायजेरिया वास्तव्यातलं कडूगोड

मनीषा बिडीकर

जून १९८०मध्ये माझं नायजेरियाला प्रयाण झालं. त्यावेळी एअर इंडियाची विमानं थेट लागोसला जात. तिथे उतरल्यावर थोडा वेळ डोकं बधीरच झालं. चारी बाजूला पाहावं, तिथे एकसारखे चेहरे. ते दिसण्यापेक्षा पांढरेशुभ्र दात तेवढे दिसत होते. नजर सरावल्यानंतर नाक – डोळे दिसले. थोडक्यात काय, सगळे एका साच्यातून काढल्यासारखे.  हे प्रथम दर्शन! जगात नायजेरियासारखे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच देश असतील, जिथे भारतीयांना ‘ओहीबो’ म्हणजे गोरे म्हटलं जातं.

हळूहळू रुळलो आम्ही तिथे. तिकडे जायचं ठरल्यापासून नायजेरियाबद्दल सर्व भीतीदायकच कानावर येत होतं. इथली माणसं चोर आहेत, पूर्णपणे अविश्वासू!  त्यांची भूक कधी भागतच नाही. बघावं तेव्हा, “मास्ता (मालक), आय एम हंगरी ओ, नेवर चोप सिन्स मोर्निंग ओ (मला भूक लागली आहे हो, सकाळपासून काही खाल्ले नाही हो) वगैरे. ऎकलेलं सगळंच खोटं नव्हतं. पण शंभर टक्के खरंही नव्हतं.

सुरूवातीला आम्ही ओंडो राज्यातील ओव्वो गावात राहत होतो. तिथे वीज नव्हती. जो काय थोडा वेळ जनरेटर चालवला जाई, तेवढाच वेळ लाईट. आणि एकमेव संपर्कसाधन म्हणजे रेडिओसंदेश, तेही कंपनीचे मोठे साहेब येतील तेव्हाच. मुंबईहून निघताना सामानाचे निर्बंध माहीत नसल्याने जास्तीचं मागे ठेवलेलं सामान सासर्‍यांनी कार्गोने पाठवलं. ते सहाशे किलोमीटर दूर लागोसला येऊन पडलंय, हे समजेपर्यंत दोन महिने उलटून गेले होते. एका ठराविक मुदतीनंतर सामानाच्या सोडवणुकीसाठी भरमसाठ किंमत मोजावी लागते. आम्ही दोघं घाबरत कस्टमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायला गेलो. जवळ होते नव्हते, ते सारे पैसे नेले होते. जाणं भाग होतं. कारण मागे राहिलेल्या सामानात माझेच सगळे कपडे होते. दोन महिन्यापासून मधुकरची लुंगी आणि शर्ट यावर चालविलं होतं. पण प्रत्यक्षात आम्हाला  सुखद धक्का बसला. काय सांगू, साध्या रेक्झिनच्या फोल्डिंग बॅगा, दोन महिने होत्या तशाच पडून होत्या. कोणी त्याला बोटही लावलेलं नव्हतं. एकही पैसा न घेता आम्हाला सामान देण्यात आलं. आता सांगा, मी यांना चोर कसं म्हणू? आणि मग पुढे काही वर्षांनी परत येताना, मुंबई विमानतळावर माझ्या पत्र्याच्या पेट्या कापून त्यातील सामान राजरोसपणे गायब करणाऱ्या आपल्या बांधवांना काय म्हणू?

आम्ही ज्या गावात राहत होतो ते गाव, ओव्वो. मला कोकणातल्या आमच्या गावाचीच आठवण करून देणारं. लाल मातीचे रस्ते, मातीची सारवलेली, पत्र्यांनी शाकारलेली घरं, मागच्या अंगणात लाकडाच्या चुली, हवेत जराही दमटपणा नाही. आम्ही राहात होतो ती घरं कंपनीने युकेहून प्री फॅब्रिक्ड भिंती आणून उभी केलेली होती. घरं सुंदर होती. त्या खुशीत दिवसभर लाईट नाहीत, हेही मला जाचक नाही वाटलं. बाजारात दोनच भाज्या. कोबी आणि दुसरी स्थानिक भेंडी, लेडीज फिंगर हे नाव न शोभणारी. विविध प्रकारच्या मिरच्या आणि टोमॅटो मात्र भरपूर. डाळ, मोहरी वगैरे स्वयंपाकासाठी लागणारे जिन्नस मिळायचे नाहीत. पण बिनफोडणीचा स्वयंपाक आम्हाला चालत होता, बिनडाळीचं सांबार आम्हाला आवडत होतं.

दिवसभर बागकाम करण्यात माझा वेळ जात होता. तिथली जमीन एवढी सुपीक होती की कधी कचऱ्यात असलेल्या टोमॅटोसारख्या फळभाजीचा गर जमिनीवर पडला, तर महिन्याच्या आत त्याची रोपं उगवत असत. पण सर्वसामान्य माणसांना शास्त्रोक्त शेतीचं ज्ञान कमीच होतं. आणि कदाचित अफाट उष्णतेमुळे. आवड तर त्याहून कमी. विनासायास आणि कमी वेळात येणारं पीक म्हणजेच मका, कोणीही कुठेही लावत असे. तीस चाळीस दिवसात कणसं लागत असत.

अनाकलनीय भाषा (तिथे योरुबा, इबो आणि हंसा भाषा बोलतात), अनोळखी माणसं. त्यामुळे बाहेर एकट्यानं जाण्याचा प्रश्नच नव्हता. तशीही घरकोंबडीच. सुरुवातीला खाणाखुणांनी काम भागवलं. हळूहळू सवयीने थोडंथोडं समजू लागले. एकारो म्हणजे शुभ सकाळ, एकासो म्हणजे शुभ दुपार, बाओनी म्हणजे हॅलो, ओडाबो म्हणजे शुभ रात्री. तिथे इंग्रजी बोलणारे होते. पण तेही प्रत्येक शब्दामागे ‘ओ’ लावून बोलत असत. आणि काही तर गमतीदार बोलायचे. आय डोंट डू इट म्हणजे आय हॅव डन इट !

अचानक काही कारणाने आम्हाला तिथून गाशा गुंडाळायची वेळ आली. आधी लागोसमध्ये सुरुलेरे इथे आणि नंतर सहा महिन्यांनी ओगुन राज्यात शागामू या गावी राहायला आलो. इथल्या आमच्या घराची खासियत, त्याच्या मुख्य दाराला कुलूपकिल्ली काहीच नव्हतं. तरीही आम्ही राहिलो. इथल्या काही श्रद्धांची (?) पण माहिती झाली. घराच्या पायऱ्या मुद्दाम वेड्यावाकड्या ठेवतात, म्हणजे भूत-प्रेतात्म जिना चढून घरात येऊ शकत नाहीत. इथली जुजु म्हणजे काळी जादू. आपल्या स्वस्तिकाची त्यांना भीती वाटायची. त्यामुळे घराच्या भिंतीवर स्वस्तिक काढणं सुरक्षिततेच्या दृष्टीने बरंच वाटायचं. आमची गणपती वा दिवाळीची पूजा प्रथमदर्शनी त्या लोकांना काळी जादू वाटत असे. सवयीने आणि ओळखीने मग गैरसमज दूर होऊ लागले. इथे घरमालकाने म्हणे जादू (जुजु) करून काही समान (हाडं) घराच्या अंगणात पुरून ठेवली होती, ज्यामुळे चोर येऊ शकत नव्हते. घरमालक हा चीफ होता, त्याच्या ३ बायका होत्या. इथे द्विभार्या प्रतिबंधक कायदा नसावा. त्या सगळ्या गुण्यागोविंदाने रहात होत्या. साधारणपणे उच्च पांढरपेशा धार्मिक कुटुंबं असतात तसंच वातावरण होतं. ख्रिस्ती असल्याने रविवारी न चुकता चर्चला जात असत. सहा महिने या घरात काढले.

मधुकरला अबेओकुटाला दुसरी नोकरी मिळाली. तिथे हजर होण्याआधी आम्ही मुंबईला एक धावती भेट दिली. परदेश म्हटलं की युरोप, अमेरिकेतल्या वास्तव्याची चित्रंच आपल्या नातेवाइकांच्या डोळ्यापुढे येण्याचा तो काळ. त्याही पलिकडे जग आहे, याचीच माहिती नसायची. त्यांना असंही वाटायचं, हे आता कशाला भारतात परतणारेत? पण सगळ्यांची विचारधारा सारखी नसते ना ? मला तर आपल्या माणसांतच राहायचं होतं. पण ती वेळ दूरच होती. नायजेरियाचा दुसर्‍या टप्प्याचा प्रवास सुरु झाला होता. घराची व्यवस्था होईपर्यंत मायाज रीवर बॅंक होटेलमध्ये राहिलो.

नायजेरियन लोक बीफ फार खातात. किंबहुना बैलाचा मारून खाण्याखेरीज दुसरा काही, शेतीसाठी वगैरे उपयोग असतो हे त्यांना माहीत नसावं. तसं तर तिथे कोणताही पशु – पक्षी जर विषारी नसेल, तर तो खाद्यपदार्थ असतोच. इतकं, की बकरी ईदला बळी देण्यासाठी आपापल्या ऐपतीनुसार बैल, बोकड, कोंबडी, मासा आणि अगदीच काही नाही, तर कुत्रासुधा चालत असे. बुश मिट म्हणजे जंगलात झुडूपात मिळणारे उंदीर, साप तिथे फार आवडीने खातात. एरव्ही मला मत्स्याहार प्रिय. पण बीफचा वास माझ्या डोक्यात जात असे. हॉटेलात पहिल्या दिवशी जेवणात उकडलेला भात आणि टोमॅटो सूप मिळालं. म्हटलं हेही नसे थोडके. मग कळलं, की वेज सूप मागितलं की त्यातले बीफचे तुकडे बाजूला काढून देतात. पुढचा पूर्ण महिना ब्रेकफास्ट, दुपार, रात्रीचं जेवण फक्त आणि फक्त कोबी-टोमॅटोचं सलाड आणि स्पॅनिश ऑम्लेट यावर काढावा लागला.

अबेओकुटा या शब्दाचा अर्थ दगडाच्या खाली असा आहे. या शहराच्या मध्यभागी ओलुमो दगड आहे. ओलुमो म्हणजे देवाची कृपा. दुरून दुरून लोक हा दगड बघायला येतात. अबेओकुटा शहरात राहत असताना एका पूर्णपणे यंत्रचलित लॉंड्रीमध्ये मी मॅनेजर म्हणून कामही केलं. ओलुवो हे लॉंड्रीप्रमुखाचं नाव. आपल्याकडे जसं पूर्वी रावसाहेब, पाटील अशा पदव्या देत असत, तशाच तिकडच्या वेगवेगळ्या पदव्या – ओनी, ओबा, चीफ. त्यासाठी नक्की काय गुणवत्ता लागते हे मला नीट माहीत नाही. पण ही पदवी ज्याला मिळते त्याला काही विशिष्ट अधिकारही मिळतात. आणि तो पदवीदान सोहळा जेव्हा होतो त्यावेळी गावातले लोक त्याला भेटवस्तू देतात, प्रणाम करतात. आणि त्यावेळी जर पाया पडणारी स्त्री असेल आणि तिच्या डोक्याला त्याने आपल्या पायाचा अंगठा लावला, तर ती त्याची बायको होते! बापरे! मला हे लॉंड्रीतल्या सहकार्‍याकडून कळलं. “मॅडम, तुम्ही का नाही आलात काल? ओलुवोने तुम्हाला बायको बनवलं असतं की!”  मी घाबरून दुसर्‍याच दिवसापासून कामाला जायचं बंद केलं, हे सांगायची गरज आहे का?

अबेओकुटामध्ये दीडेक वर्ष राहिलो. जवळपास काही भारतीयांची घरं होती. बरीच वर्षं स्वकीयांपासून दूर राहिल्याने नवीन भारतीयांची भेट म्हणजे सणच असायचा. यापैकीच एक अक्षय देसाईचं कुटुंब. खूप मायाळू माणसं! अक्षयच्या आई – वडिलांमुळे मला परदेशातही माहेरच्या मायेचा ओलावा सापडला होता. १९८९मध्ये जेव्हा माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला, तेव्हा तिथे भर दंगल असतानाही अक्षयनेच आम्हा मायलेकराना हॉस्पिटलमधून सुखरूप घरी पोचवलं होतं. त्याचे उपकार मी कधीही फेडू शकणार नाही.

नाताळच्या सुट्टीत आम्ही, आमचे स्नेही सराफ पती-पत्नी आणि श्री. कोटकर, दोन गाड्या करून पूर्ण नायजेरियाचा दौरा करून आलो. देशाच्या काही भागात नरभक्षक जमाती अद्यापही असल्याचं समजल्याने त्या भागात जाणं टाळून, १० दिवसांच्या या दौर्‍यात आम्ही लेगोस, इबादान, बेनिन, वारी, ओनिटशा, जोस, मैदुगिरी, पंक्षीन या  शहरांना धावती भेट दिली. त्यावेळी जाणवलं की या लोकांना आवाजाची निसर्गदत्त देणगी आहे. रंग काळा असला तरी दात पांढरे शुभ्र आणि ताकदवान आहेत. नजर तीक्ष्ण आहे. दोन दोन बायका करणारे बरेच असले, तरी स्त्रीला कोणी दासी किंवा गुलाम मानत नाही. एकत्र कुटुंबपद्धती प्रचलित होती. लहान मुलांना कामाला लावण्याचे प्रकारही कमीच. स्त्री-पुरुष दोघं मिळून घर चालवतात. पुरुष नोकरीला अथवा अन्य कामाला गेला तर स्त्री घराच्या बाहेरच किंवा आसपास छोट्यामोठ्या वस्तू अथवा भात आणि भाजी (जोल ऑफ राईस आणि स्ट्यू) असे काही विकून कमाई करते. शहरांमध्ये पाण्याचं दुर्भिक्षच होतं. गावात विहिरी, शहरात बोअरवेल किंवा टँकर. मूळची गरिबी जास्त असलेल्या या देशात कच्च्या तेलाचे साठे मिळाल्यावर पैसा खुळखुळू लागला. पण एव्हढी सुज्ञता नव्हती, की आपण कच्चं तेल युरोपला कवडी दामात विकतो आणि प्रक्रिया केलेलं तेल सोन्याच्या भावाने घेतो. हळूहळू चित्र बदललं. शिक्षणाने विचारशक्ती दिली आणि पुष्कळ सुधारणा आल्या.

आमच्या शेजारच्या बंगल्यात चीफ अबिओला रहात होते. नायजेरियाच्या फुटबॉल टीमचा मेंटॉर. तिथे फुटबॉल आणि टेबल टेनिसचं खूप वेड. मॅच असली की सगळी कामं सोडून ते मॅच बघणार. एरव्ही लाईट सारखे जात असत. आपल्या बीइएसटीसारखी तिथली वीज पुरवठा करणारी कंपनी नेपा (NEPA). या शब्दाचा लोकांनी सोयीस्कर अर्थ काढला होता – ‘नेव्हर एक्स्पेक्ट पॉवर अगेन’! पण मॅच असेल त्या दिवशी काय बिशाद होती कोणी पॉवर कट करण्याची?

पुढे काही कारणास्तव आम्ही भारतात परतण्याचा निर्णय घेतला. १९८४ च्या जानेवारीत परतलो, ते गुजराथमध्ये अंकलेश्वरला! इथे चार वर्ष राहिलो. या काळात माझ्या मुलीचा जन्म झाला. आणि ती एक वर्षाची असताना परत एकदा मधुकरनी नायजेरियाला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी माझी जराही इच्छा नव्हती पण, “चिमु शाळेत जायला अजून अवकाश आहे, आपण दोन वर्ष राहून परत येऊ,” असं म्हणून त्यांनी माझी समजूत घातली. आम्ही पुन्हा तिसऱ्या टप्प्यात नायजेरियात प्रवेशकर्ते झालो. या वेळी आम्ही ओगुन राज्यातच पण लागोसच्या जवळ होतो. एव्हाना इथल्या लोकांच्या राहणीशी, विचारसरणीशी थोडेफार परिचित झालो होतो. इथले लोक धर्माबाबत कडवे नाहीत. मुस्लीम आणि ख्रिश्चन यांनी आपापसात लग्न करणं, ईद आणि नाताळ सारख्याच उत्साहाने साजरं करणं पाहिलं. अतिश्रीमंत आणि अतिगरीब असे दोन थर. पण प्रमुख आहार मात्र सर्व साधारणपणे सारखाच होता. कसावा या सुरणासारख्या वनस्पतीच्या मुळापासून तयार केलेला गारी हा सर्वात जास्त प्रचलित अन्नपदार्थ. त्याच्याबरोबर ऐपतीनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी स्ट्‍यू. सफेद चवळीसुद्धा त्यांची आवडती. त्यांचा राष्ट्रीय पोशाख म्हणजे पुरुषांसाठी अग्बाडा, कफ्तानसारखाच पायघोळ झगा. बहुधा लेसच्या कापडाचा शिवलेला.  बुबा (पायजमा) आणि शोकोटो (झब्बा). पूर्ण ड्रेस शिवायला नऊ मीटर कापड लागतं.  बायकांचा पोषाख बुबा आणि रॅपर. काही बायका अग्बाडाही वापरतात. पुरुष डोक्यावर गोंडेवाली किंवा नक्षीकाम केलेली टोपी घालतात. तर बायका स्कार्फ बांधतात. काम करणाऱ्या बायका आपल्या बाळांना पाठीवर बांधतात. शहरातल्या मुख्य बाजारात बहुतेक भाजीवाले कामचलाऊ हिंदी बोलून ग्राहकाला आकर्षून घ्यायचे.

१८ वर्षांच्या वास्तव्यातला सर्वात जीवघेणा अनुभव आम्ही इथे घेतला. इथल्या दरोडेखोरांबद्दल ऐकून होतो. पण अनुभव पहिल्यांदा घेतला. तेही वड्याचं तेल वांग्यावर निघतं या म्हणीचा प्रत्यय घेत. १९८८चा डिसेंबरचा महिना. आमच्या कंपनीच्या अर्थ विभागात काम करणाऱ्या एका देशबांधवाने घराच्या रखवालदाराला नातळचा बोनस नाकारल्याने तो चवताळला आणि त्याच्या रागाला बळी पडलो आम्ही. त्याने आमच्या घरात शिरून, वेगवेगळ्या खोल्यांत आम्हा सर्वांना कोंडून ठेवलं. जी चीजवस्तू हाती आली, ती ती आणि आमची गाडी घेऊन निघून गेला. बरं, गाडीच्या चोरीचा रिपोर्ट करायला मधुकर पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस सांगतात “आम्हाला एक गाडी द्या, म्हणजे आम्ही चोराला शोधायला जातो.” पुढे बरेच दिवस हाफ पॅंट आणि बिनमोज्याचे कॅनवासचे बूट असे कोणाचे पाय दिसले की मला घाम फुटायचा. त्या घराला आम्ही भूतबंगला असं नाव ठेवलं. ही घटना १९८८ डिसेंबरची. आणि माझ्या मुलाचा जन्म १९८९ मे मधला. साहजिकच आम्ही त्वरेने घर बदललं.

नव्या ठिकाणी सगळे भारतीयच होते. मिनी इंडिया म्हणा न! जात धर्माचा विचार न करता आम्ही गणपती, दिवाळी, ईद, नाताळ, नवरात्री सगळे सण एकत्र साजरे करत असू. या नव्या घरात राहायला आल्यावर एक महिन्यात माझ्या मुलाचा जन्म झाला होता. लोक किती चांगले असतात याचा अनुभव लुसीने मला दिला. माझा मुलगा ३-४ महिन्याचा असताना लुसी माझ्याकडे कामाला लागली. दिवसभर आपल्या गोड आवाजात स्वतःच्या भाषेतली गाणी गुणगुणायची. स्वतः स्वच्छ होतीच. घरही स्वच्छ ठेवायची. एकदा मधुकर कामानिमित्त जर्मनीला गेले होते. तीन वर्षांची मानसी आणि तीन महिन्यांचा मकरंद यांच्यासह एकटीने राहणं मला सुरक्षित वाटत नव्हतं. म्हणून लुसीला काही दिवस रात्रीला मुक्कामाला यायला सांगितलं. दोन दिवस ठीक गेले. तिसऱ्या दिवशी तिचं कामात लक्ष नव्हतं. बेचैन दिसत होती. विचारल्यावर म्हणाली, ‘मॅडम, आत्ता एका मुलाने येऊन सांगितलं की नाक्यावर अपघात झालाय. माझ्या मुलीला गाडीने धक्का मारलाय. आणि मला फक्त माझी मुलगी जिवंत आहे की नाही तेव्हढं बघायचंय. पण सरांनी मला तुमच्यासोबत रहायला सांगितलंय.’ मी तिला लगेच जा म्हणून सांगितलं. तासाभराने ती परत येऊन म्हणाली, माझ्या मुलीचा फक्त एक हात तुटलाय. पण ती जिवंत आहे.” मला एक क्षण काय बोलावं, तेच कळेना. “अग, मग तू इथे काय करते आहेस, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा”. तिच्या उत्तराने मी अवाक झाले.  “मॅडम, तिला आमची कोणी न कोणी माणसं नेतील हॉस्पिटलमध्ये. पण तुमच्याबरोबर कोणी नाही इथे. आणि तुमचं बाळ खूप लहान आहे. मास्तरनी माझ्यावर विश्वासाने सोपवलंय आहे तुम्हा तिघांना. अशी कशी जाईन मी तुम्हाला सोडून ?” मी तिला नमस्कार केला. असा अनुभव विरळाच.

पुढे मुलांच्या शाळेसाठी आम्ही लागोसला राहायला आलो. इथल्या वास्तव्यातच २७ जानेवारी २००२ ला लागोसच्या शस्त्रसाठ्यामध्ये स्फोट झाला होता. याची सविस्तर माहिती नंतर जगभराच्या वृत्तपत्रात आली होतीच. नक्की काय झालं हे कळत नव्हतं. चारी बाजूंनी आगीचे लोळ, कानठळ्या बसणारे आवाज. हादर्‍यांनी खिडक्यादारांच्या काचा फुटत होत्या. लोक सैरावैरा पळत सुटले होते. आम्हीसुद्धा पासपोर्ट घेऊन जी कोणाची गाडी उभी होती त्यात बसून संचालकांच्या घरी कसंबसं पोचलो होतो. अनेक निष्पाप कुटुंबीय मृत्युमुखी पडली होती. बरीचशी पोलिसांचीच होती. त्या दिवशी अजून एका म्हणीचा अर्थ नीट समजला – काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

तिथे एकटे राहाणारे आमच्यासारखे, बहुतेक मराठीच, थोडे जुन्या वळणाचे, सातच्या आत घरात टाईपचे, पार्टी कल्चर न आवडणारे, क्लबला दूर ठेवणारे अनेकजण आमच्यासारख्या कुटुंबांत मन रमवत असत. माझ्यासारखे असुरक्षिततेच्या भयाने मुलांना मोकळं खेळायला न पाठवणारेही अनेकजण होते. मात्र मनात एक अपराधी भावना कायमची घर करून राहिली की तिथे आपल्या मुलांचं बालपण हिरावलं गेलं. सततच्या तणावामुळे आपणही अनेक गोष्टींना मुकलो. आपल्या देशात असतो तर मुलांना मोकळेपणाने फिरायला, खेळायला नेलं असतं, त्यांना आजी-आजोबांची माया मिळाली असती. त्यासाठी कोणा गाडीवर अथवा जीडेवर (ड्रायवरचे नाव जीडे) अवलंबून राहावं लागलं नसतं. मी आत्मविश्वास गमावला नसता, आत्मनिर्भर झाले असते. शिकूनसुद्धा चार भिंतींत अडकून स्वतःच्या आणि मुलांच्या प्रगतीला पायबंध घातले नसते. म्हणायला मोठं घर, गाडी, ड्रायवर सगळं होतं. पण त्याचबरोबर एक भीतीही होती, जी मोकळं हसायलासुद्धा देत नसे.

चिमुची शाळा सुरु होण्याआधी परत यायच्या बोलीने आलो होतो ते आता तिची शाळा संपायची वेळ आली होती. आणि जसं पूर्वी आम्ही ठरवलं होतं की जिथे कुठे जाऊ, एकत्र राहू, तसंच आता ठरवलं. दोन गुणी मुलं आपल्याला लाभली आहेत, त्यांना आपल्यापासून दूर वसतिगृहात ठेवण्यापेक्षा आपणच आपल्या मूळ वसतीस्थानी जाणं योग्य! माझी मनोकामना प्रबळ ठरली आणि २००३ मध्ये आम्ही भारतात परतलो.

इथे परतल्यावर समवयस्क स्थिरस्थावर झाले आहेत पाहिल्यावर कधीतरी मनात काहूर माजतं. आपली उमेदीची वर्ष दूरदेशी गेली. गेले नसते, तर मीही आज अशीच यशस्वी झाले असते का? बरीच वर्षे दूर राहिल्याने परत येताना माझ्या डोळ्यासमोर नातेवाइकांचं २० वर्षापूर्वीचं जुनं चित्रच होते. पण ते खूप बदलले होते. जो तो आपापल्या आयुष्यात मग्न. त्यात काही चुकीचं नव्हतंच. आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड असं आपल्या बाबतीत झालेलं असू शकतं. काळजात काही गमावल्याची कळ उठते. त्याच वेळी, अजूनही, कधी बातम्यांमध्ये नायजेरियातल्या घडामोडींचा उल्लेख आला तर मन लगेच भूतकाळात जातं…….अविस्मरणीय कडू आणि गोड आठवणींच्या!

मनीषा बिडीकर

इ-मेल – manishamadhukar@ymail.com

संपर्क या एनजीओमध्ये प्रशासकीय आणि लेखा व्यवस्थापक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s