३१ ऑक्टोबर १९८४

वसुधा कुळकर्णी

३१ ऑक्टोबर १९८४ चा एक अविस्मरणीय अनुभव. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये  आम्ही सगळे, म्हणजे आई, वडील बहीण, भाऊ आणि मी, नैनितालला गेलो होतो. कांचनगंगेच्या डोळे दिपवणाऱ्या रांगा बघून हॉटेलवर परतलो होतो, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत गरमागरम चहाबरोबर रेडिओवर लागलेल्या जुन्या गाण्यांचा आस्वाद घेत सगळेच रिलॅक्स झालो होतो. अचानक गाणी थांबली. निवेदिकेने ती धक्कादायक आणि दुखःद बातमी दिली. “पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या….” बापरे… सगळे एकदम उडालोच. तिथून रात्रीच्या बसने आम्ही दिल्लीला जायला निघणार होतो. पण मग वेळ न दवडता ताबडतोब सामान बांधून आम्ही दिल्लीचा रस्ता पकडला. दुसर्‍या दिवशी दिल्लीहून आमचे परतीचे रिझर्वेशन होते. माझी परीक्षा होती म्हणून मी नागपूरला जाणार होते आणि बाकीचे सगळे भोपाळला, काकांकडे जाणार होते. आमच्या गाड्या वेगवेगळ्या पण साधारण एकाच वेळी सुटणार्‍या होत्या.

दिल्लीत मावशीच्या घरी सुखरूप पोचलो पण भयानक बातम्या कानावर येत होत्या. दिल्लीत सगळीकडे जाळपोळ सुरू झाली होती. पुढचा प्रवास करावा की काही दिवस दिल्लीतच मुक्काम करावा यावर घरात बरीच चर्चा झाली. ही जाळपोळ अशीच चालू राहिली तर गाड्या रद्द केल्या जातील आणि दिल्लीत अडकून पडू अशी काळजी वाटल्याने त्या चालू आहेत तोवर दिल्लीतून बाहेर पडणेच हिताचे आहे असे सर्वानुमते ठरले. दुसर्‍या दिवशी आम्ही स्टेशनवर जाण्यासाठी बाहेर पडलो. माझी नागपूरची गाडी संध्याकाळी सव्वा सहाची आणि बाकीच्यांची भोपाळची गाडी सात वाजताची. एकंदर गंभीर परिस्थिती पाहून आम्ही सकाळी ११ वाजताच बाहेर पडलो.

रस्ते सुनसान… निर्मनुष्य आणि गाड्या सुद्धा अगदी तुरळक. एखादी रिक्षा दिसली तरी ती थांबायलाच तयार नव्हती. … तास दीड तास शोधाशोध करून शेवटी २ रिक्षा तयार झाल्या. एका रिक्षात मी, आई, धाकटा भाऊ आणि माझा मावस भाऊ तर दुसर्‍या रिक्षात वडील, बहिण आणि आजी असे बसलो. मावशीच्या घरापासून रेल्वे स्टेशन बरंच दूर होत. थोडं अंतर जात नाही तर एक मोठ्ठ्या घोळक्याने रिक्षाला गराडा घातला आणि एकदम ४-५ माणसांनी रिक्षात डोकं घुसवलं.  त्यांच्या हातात काठ्या, चाकू, तलवारी असं बरंच काही होत. मी तर इतकी घाबरले होत की डोळे घट्ट मिटून राम राम राम राम म्हणायला सुरवात केली होती. ती घुसलेली डोकी एका क्षणात बाहेर गेली. नंतर कळलं ती माणसं शिखांना शोधत होती. जिथे कुठे शीख दिसेल त्यांना पकडून बेदम मारत होती. आई तर घाबरून रिक्षा वळवून मावशीकडे परत जाण्याचा आग्रह करत होती. पण आमची दुसरी रिक्षा कुठे जवळपास  दिसत नव्हती आणि त्यांच्याशी संपर्क करायला आतासारखे मोबाईल नव्हते. तेव्हा ठरवल्यासारखं स्टेशनवर भेटणंच ठीक म्हणून आईला भावाने धीर दिला. मी तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते.

रिक्षा अडवण्याचा प्रकार आणखी दोनदा झाल्यावर रिक्षावाला स्वतःच खूप घाबरला आणि त्याने सरळ रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली. “इसके आगे रिक्षा नाही जायेगा” अस म्हणून तो सरळ रिक्षाच्या बाहेर उभा राहिला. आईने त्याच्या किती विनवण्या  केल्या पण जिवाच्या भीतीने त्याने स्पष्ट नकार दिला. शेवटी सामान बाहेर काढून जीव मुठीत घेऊन आम्ही दुसर्‍या रिक्षेच्या प्रतिक्षेत उभे राहिलो. पण रस्त्यावर रिक्षाच काय एकही वाहन नव्हते. मधूनच पंधरा वीस लोकांचा घोळका जोरजोरात ओरडत, घोषणा करत यायचा… आमच्याकडे निरखून बघायचा आणि आम्ही शीख नसल्याची खात्री झाली की दुसरीकडे वळायचा. मला आणि आईला खूप भीती वाटत होती.  त्यातल्या त्यात भावाचाच आधार.  रिक्षाचा मागमूस ही नाही… तेवढ्यात त्या सुनसान रस्त्यावर लांबून एक फियाट कार येताना दिसली. आम्ही तिघांनी हात हलवून हलवून त्या गाडीला थांबवलं. गाडीच्या चालकाचा जवळच कुठेतरी कारखाना होता आणि त्याला आग लावल्याची बातमी ऐकून ते तिकडे निघाले होते. पण आमची अडचण ओळखून त्यांनी आम्हाला जवळच असलेल्या कीर्तीनगर लोकल स्टेशनवर सोडायचं औदार्य दाखवलं.  त्यांचे किती आभार मानावेत तेवढे थोडेच होते. स्वत: अडचणीत असताना त्यांनी आम्हाला मदत केली होती.

कीर्तीनगर स्टेशनवरून लोकल पकडून आम्ही नवी दिल्ली स्टेशनवर  पोचलो. पाहतो तो संपूर्ण स्टेशन शीख लोकांनी खचाखच भरलेलं… बाहेर गावच्या सगळ्या गाड्यांमधून आलेल्या शिखांना रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर आश्रय दिला होता. बाहेर त्यांची कत्तल चाललेली होती. एरवी आपल्या कुर्रेबाज मिशा पिळत दमदार आवाजात बोलणारा उमदा शीख तिथे भेदरलेल्या अवस्थेत बघून खरंच हृदयात कालवाकालव झाली. फलाटावर जिकडे तिकडे शिखांची कुटुंबं, लहान लहान मुलं, बायका चादरी टाकून बसलेली. रेल्वेच्या कॅन्टीनमधून त्यांना जेवण पुरवलं जात होतं. खाली माना घालून बसलेले घाबरलेले ‘सरदार’ बघवत नव्हते. या माणसांच्या समुद्रातून आम्हाला वडील, आजी आणि बहिणीला शोधायचं होत. त्यांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्याव लागलं, ते स्टेशनवर पोचले का.. काहीच माहीत नव्हतं. पण ठरल्याप्रमाणे आम्ही पहिल्या फलाटाच्या स्टेशनमास्तरच्या ऑफिसजवळ गेलो तर ही मंडळी आमच्या आधीच पोचली होती. सगळ्यांच्या जीवात जीव आला. सकाळी अकराला घरातून  निघालेलो. स्टेशनला पोचेतो दुपारचे तीन वाजले होते. घरातून स्टेशनवर पोचलो म्हणजे अर्धा गड सर झाला होता. आता गाडी कधी येते आणि वेळेवर जाते का हा दुसरा प्रश्न होता.  पोटात कावळे कोकलत होते. भावाने कॅन्टीनमध्ये मिळणारी पुरी भाजी आणली. पण मनावरच्या ताणाने दोन घाससुद्धा गेले नाहीत.

माझी नागपूरची गाडी भोपाळच्या गाडीच्या आधी होती. आईची सारखी भुणभुण चालू होती की मी एकटीने नागपूरला न जाता सगळ्यांबरोबर भोपाळला चलावं. पण माझी परीक्षा होती आणि ती मला मुळीच चुकवायची नव्हती. आजीने समजावून पाहिलं, वडिलांनी रागावून पाहिलं पण माझं लॉजिक एकदम थेट होतं. दिल्लीहून गाडी निघाल्यानंतर नागपूर काय किंवा भोपाळ काय. दोन्हीकडे शांतता आहे. दिल्लीच्या बाहेर पडणं महत्त्वाचं. मा‍झ्या हट्टापुढे सगळ्यांनी हात टेकले आणि मी नागपूरच्या गाडीत बसले. गाडी तशी रिकामीच होती. टीसीसुद्धा आलेला नव्हता. काही उद्घोषणाही नव्हती. कदाचित गाडी उशिरा सुटेल असं समजून माझं सामान मा‍झ्या जागी नीट लावून बाकी मंडळी त्यांच्या गाडीसाठी दुसर्‍या फलाटाकडे निघून गेली. मी संपूर्ण डबा फिरून बघितला तर एकही प्रवासी नव्हता. आणलेलं उसनं अवसान दिल्ली सोडायच्या आधीच गळून चाललं होत. संपूर्ण डब्यात मी एकटीच होते… गाडी सुटायची वेळ झाली तरी कोणीच येईना …. आता मात्र माझी चांगलीच सटारली होती. सगळा धीर एकवटून गाडीच्या दरवाज्यात जाऊन उभी राहिले. गाडीने हिरवा कंदील दाखवला आणि हळू हळू गाडी स्टेशनच्या बाहेर पडली. आता मागे फिरण्याचा मार्ग बंद झाला होता.

दरवाज्यातून मी मागे फिरले. प्रचंड धास्तावलेली, संपूर्ण बोगीमध्ये मी एकटी आणि गाडी तर सुटलेली. आता आत जाऊन बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. आईचं ऐकायला हवं होत.. त्यांच्या बरोबर भोपाळला गेले असते तर माझ्यावर आज ही परिस्थिती ओढवली नसती.  डोळे पाण्याने डबडबले होते. जोरात रडावंसं वाटत होतं पण त्या रिकाम्या बोगीच्या भयाण शांततेत मला मा‍झ्या आवाजाचीही भीतीच वाटली. मी बोगीचं दार लावून घेतलं आणि आत जाण्यासाठी वळले तर बोगीच्या दुसर्‍या दरवाज्यातून टीसी आलेला दिसला. हाय राम! आत्तापर्यंत एकटेपणाची भीती वाटत होती. पण आता या टीसीची भीती वाटायला लागली. गाडीने चांगलाच वेग पकडला होता. आणि अख्ख्या बोगीत मी आणि टीसी. काय करावं, काहीच सुचेना. जीव मुठीत घेऊन मी मा‍झ्या जागेवर जाऊन बसले. मला पाहताच टीसी पुढे आला. साधारण पन्नाशीचा हा गृहस्थ हातात परीक्षेचा असतो तसा खरडा, कधी काळी काळा असावा, अश्या राखाडी कोटाच्या खिश्यात एक पेन. आणि पॉलिशचा कधीही स्पर्श न झालेले काळे पांढरे बूट या वेशातला अगदी टिपिकल टीसी माझ्यासमोर डोळे विस्फारून बघत होता. मी आणखीनच घाबरले. तो समोरच्या बर्थवर ऐसपैस बसला तशी मी आणखीनच अंग चोरून कोपर्‍यात सरकले. मी डोळ्याच्या कोपर्‍यातून त्यांच्याकडे बघत होते. त्यांनी मी कोण कुठची वगैरे चौकशी सुरू केली. आणि मी या अशा प्रसंगी एकटीने प्रवास करत होते याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होत.  मी परीक्षेचं कारण सांगितलं. पण आई-वडीलांनी मला एकटीला प्रवास करूच कसा दिला याबद्दल त्यांनाच बेजबाबदार ठरवलं. तेव्हा मला मा‍झ्या हट्टीपणाची खरं तर लाज वाटली. तो सद्गृहस्थ नागपूरचाच होता आणि त्याने मला दिलासा दिला की नागपूरमध्ये वातावरण अगदी शांत आहे. एकंदरीत त्याच्या सभ्य वर्तणुकीने मी थोडी सैलावले होते.

दिल्लीत मात्र अजून खूप तणाव होता. गाडी दिल्लीबाहेर पडेपर्यंत कोणती अडचण येऊ शकेल याचा अंदाज नव्हता. म्हणून त्यांनी माझं सामान लेडिज कुपेमधे हलवलं. आणि वडिलकीच्या नात्याने सक्त ताकीद दिली, “आतून दरवाजा बंद करायचा. कोणी कितीही दार ठोठावलं तरी उघडायचं नाही आणि खिडकीच्या काचाच नाही तर शटरही बंद ठेवायचं.” मी मान डोलावली आणि कंपार्टमेंटच दार बंद करून आत बसले. दिवसभर वणवण झालेली. खरं तर खूप दमले होते. पण न पोटात भूक होती न डोळ्यात झोप. खिडकीचं शटर बंद करून पत्र्याच्या त्या चार भिंती निरखत गुडघे पोटाशी घेऊन बसून राहिले. किती तास गेले कोण जाणे, गाडीच्या लयीत कधी झोप लागली कळलंच नाही. एकदम जोरात ब्रेक लागल्यासारखा आवाज आला, स्पीड कमी झाला, जोरदार शिट्टी वाजली आणि वाजत राहिली. शटर उघडण्याची हिम्मत झाली नाही. पण शटरच्या मधल्या फटींमधून मी बाहेर बघण्याचा प्रयत्न केला. थोडा उजेड दिसला. कुठलं तरी गाव आलं असावं… म्हणजे दिल्ली मागे पडलं, आता काही भीती नाही अस समजून मी शटर उचललं. आणि मा‍झ्या तोंडून जोरात किंकाळी फुटली. बाजूच्या रुळांवर असंख्य प्रेतं फेकलेली होती. कित्येक शरीरे धडाशिवाय तर काही नुसतीच धडे…. बाहेर बसलेल्या टीसीला माझी किंकाळी ऐकू गेली. त्याने रागाने मला खिडकी बंद करायला सांगितले. आणि दम दिला. अजून आपण दिल्लीतून बाहेर पडलेलो नाही. गाडी खूप उशिराने धावते आहे. सगळीकडे शिखांना मारण्यासाठी लोक पेटून उठले होते… गाड्या थांबवत होते. आत शिरून शिखांना शोधात होते. त्यामुळे सगळ्या गाड्या उशिराने चालल्या होत्या. मी तर थरथर कापत होते. काहीच सुचत नव्हतं. पण आता काय करणार? काहीही कुठे जाणार?  मा‍झ्या हातात काहीच नव्हतं. जवळची चादर  डोक्यावरून पांघरून डोळे घट्ट मिटले. डोळ्यासमोरून खिडकीबाहेरचं दृश्य हलत नव्हतं.

गाडीने शिट्टी दिली, आणि एक धक्का देऊन पुढच्या मार्गाला लागली. आयुष्यात रामनामाचा एवढा जप मी कधीच केला नव्हता. सकाळी उजाडल्यावर मी कंपार्टमेंटचं दार उघडून बाहेर आले. असं वाटलं गाडी काटोलजवळ पोचली असेल. आता २-३ तासात नागपूर… हुश्श!. टीसीला विचारलं काटोल गेलं का? तो जोरात हसला,” काटोल? आत्ता आग्रा गेलं. गाडी चौदा तास उशिराने धावते आहे. पण आता आम्ही धोक्याच्या कक्षेबाहेर होतो. असाही एक प्रवासाचा अनुभव.

वसुधा कुळकर्णी

2 thoughts on “३१ ऑक्टोबर १९८४

  1. बापरे खूपच भीषण! तुमच्या हिमतीची दाद द्यायलाच हवी! Too much daring!
    लेख वाचण्याचं मुख्य कारण, शीर्षक माझी जन्मतारीख!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s