मुखपृष्ठ

AC2a-1

हे ईजलवरचं पेंटिंग पूर्ण झालं की मी बाहेर पडणार आहे. किती दिवस झाले बाहेर पडलेलोच नाही. स्टुडिओत सगळीकडे चित्रं आणि स्केचेस बघावी तिकडे…गॅलरीला द्यायची कामं…
थोडा कंटाळा आल्यासारखा वाटतोय. रुटीन झाल्यासारखं…
चार भिंतीच्या आत…
थोडं भटकून यावं…
त्या रस्त्याने..
तो रस्ता, विस्तीर्ण माळ, ते स्तब्ध डोंगर…या सगळ्याची आठवण येतेय खूप. तो पळस फुलला असेल आता. त्या वळणावरचा.
रस्ता सोडून डोंगराकडे जाणाऱ्या त्या वाटेवरच्या झाडाखाली थांबून समोरचं लँडस्केप पुन्हा एकदा बघितलं पाहिजे.
स्केच बुक, रंग घेऊन जाऊ .वाटलं तर एखादं स्केच करू. झाडाचं..
बाहेर पडलो सकाळी लवकर…
हायवे ओलांडून त्या रस्त्याने पुढे जाता जाता कसं सगळं मुक्त झाल्यासारखं वाटायला लागतं. अमर्याद पसरलेल्या दृश्यांचा सच्चेपणा, ताजेपणा मन काबीज करतो. मनात चित्रं साठत राहतात. काही वेळा रहावत नाही… थांबावंच लागतं , मग ते दृश्य स्केच बुक मध्ये नाहीतर कॅनव्हास वर सोबत घ्यायचं..
असं दिवसेंदिवस भटकत राहतो…
कित्येकदा वाटत राहतं, असंच फिरत रहावं. दूरदूर ..गावं, निसर्ग,समुद्रकिनारे,लहान मोठे डोंगर, झाडं, माळरानं, पायवाटा, निळशार आकाश या सगळ्यांच्या मागे..सगळ बघत, मनात साठवत, पेन्सिल घेऊन सगळं स्केचबुकात रेखाटत सुटावं..मस्त पैकी त्या छोट्या टेकडीवर ईजल लावून ऑइल कलरमधे पलिकडचा प्रदेश ब्रशच्या फटकर्यांमध्ये कॅनव्हास वर निवांत पणे उतरवत रहावं…
या शहाण्या व्यावहारिक दुनियेपासून दूर दूर….
अन्वर हुसैन
1622015_496969587081391_1916761797_n
इ-मेल – anwarhusain02@gmail.com
Diwali Greeting