सुखद उबदार इंडोनेशिया

गंमत म्हणजे डोंगरावर एक दोन ठिकाणी वाटेत बांबू टाकून रास्ता रोको केलेला. मी विचारले तिकीट कसले, तो म्हणाला नो तिकिट, डोनेशन. आता इथवर चढून आलोय तर टाकू पैसे व पुढे जाऊ. पुढे गेलो. मग कळले की ती जागा खाजगी मालकीची आहे. इथे टुरिस्टांना फिरण्यास परवानगी दिली, त्याचे डोनेशन. अधिकृत तिकीट नाही. जागा छान होती, थोडं डोनेशन दिलं तरी वाईट वाटले नाही. पुढे ‘गोआ गजाह’ म्हणजे गुहेतल्या गणपती मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताना गुडघे झाकलेले नसतील तर सराँग म्हणजे कमरेभोवती लुंगीसारखे कापड गुंडाळायचे, समोर किंवा साइडला गाठ. मंदिरात प्रवेशाचे तिकीट घेऊन सराँग त्यावेळी वापरण्यापुरता मिळतो किंवा बाहेत विकत.

माझ्या  युरोप  प्रवासाची नांदी – सेविल

डीजेच्या घरच्यांच्या शाकाहारी हॉटेलमध्ये चवदार बीटरूट सूप आणि कुसकुसचं सारण भरलेल्या भोपळी मिरचीवर ताव मारून आम्ही मोर्चा वळवला रोसियोच्या लाडक्या त्रियानाकडे. त्रियाना हा सेविलचाच भाग असूनही सेविलपेक्षा पुष्कळच वेगळा आहे. इथल्या उंच इमारती,  रुंद रस्ते, कमी रहदारी ह्या बांद्र्याच्या कार्टर रोडची किंवा रेक्लेमेशन एरियाची आठवण करून देतात. त्रियानात डीजेच्या आवडत्या पबमध्ये गेलो. नदीच्या काठावर असलेला हा पब दुपारच्या उन्हात अनेकांसाठी विसावा आहे. बियरबरोबर पब मालकाने मक्याच्या दाण्यासारख्या कसल्याशा बिया आणून ठेवल्या. जरा वेळाने तो स्पॅनिशमध्ये डीजेशी काहीतरी बोलला आणि त्याला प्रत्युत्तर देत डीजेही हसला. त्या बिया सोलून खायच्या असतात हे मला माहितच नव्हते. म्हणून दोघेही गमतीने हसत होते.

उत्तर पूर्व क्वीन्सलँड

कुरांडा हे तसे छोटेसे खेडे. अत्यंत देखणे. पिटुकलेच. पर्यटकांसाठी आता विकसित केले गेले असले तरी उसाच्या शेतीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध. छोटी छोटी दुकाने, फार्मर्स मार्केट एखाद्या युरोपिअन खेड्यात असल्याचा भास करून देतात. फक्त हवामान मात्र अजूनही ऑस्ट्रेलियातच आहोत ह्याची पदोपदी जाणीव करून देते. येथील बटरफ्लाय सँकच्युअरी अप्रतिम आहे. विषुववृत्तीय जंगलात प्रचंड प्रमाणात फुलपाखरे आढळतात. त्यांचे हे छोटेखानी अभयारण्यच. मुक्त फुलपाखरांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये पाहणे हा अनुभव वेगळाच आहे. 

अनमोल मेघालय

शाळेत असताना भूगोलामध्ये वाचलं होतं. मेघालयात गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या असतात. तिथल्या लोकांच्या जमातीवरूनच ही नावं पडली आहेत. केरळ सोडून फक्त मेघालयात असलेली मातृसत्ताक पद्धती, नावानुसारच ढगांचं घर असलेलं राज्य, आणि त्यामुळेच पावसाचा वरदहस्त असलेलं मेघालय. इतका पाऊस की भारतातलं सर्वात जास्त पाऊस नोंदवलेलं ठिकाणदेखील याच राज्यात आहे. या सगळ्यामुळेच हे राज्य कायम एक कुतूहलाचा विषय होतं.

माझा डच अनुभव

इथले लोक खूपच लॉजिकल आहेत. प्रत्येक गोष्ट ते सारासार विचार करूनच करतात. या वेळच्या निवडणुकांमध्ये ही गोष्ट कसाला लागणार असे वाटत होते, पाश्चात्त्य देशात वाढत चाललेल्या कडव्या प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर, रोख अर्थात अमेरिका आणि ब्रिटन, नेदरलँड्समधील जनतेने विद्यमान पंतप्रधानांनाच निवडून दिले आणि खरोखरच ते उदारमतवादी आहेत, हे कृतीने दाखवून दिले. सध्या तरी नेदरलँड्सने (आणि नंतर फ्रान्सने ) नक्कीच ह्या बाबतीत योग्य दिशा दाखवली आहे आणि ब्रिटन अमेरिकेने चालू केलेली साखळी मोडून काढली आहे. इथे मतदानासाठी सुट्टी नसते आणि मतदान केंद्रे रेल्वेस्टेशनवरसुद्धा असतात जेणेकरून लोकांना ऑफिसला जाताना मतदान करता यावे. 

माझं इंग्लंड…

या देशांमधल्या लोकांकडून खूप काही घेण्यासारखं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य इथं खूप जपलं जातं. आपल्या देशात आपण प्रत्येक गोष्टीला ‘answerable’ असतो. लग्नाआधी पालकांना आणि नंतर सासरच्यांना, आजूबाजूच्यांना, मित्रमैत्रिणींना आणि ऑफिसमध्ये सहका-यांना आपण प्रत्येक गोष्ट का करतो, हे समजावून सांगावं लागतं. आपल्याला कराव्याशा वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असावं लागत नाही, ही संकल्पना आपल्या पचनीच पडत नाही. त्यामुळे सतत सगळ्याची उत्तरं शोधण्याचं खूप बंधन वाटतं आणि तीच अपेक्षा मग आपणही इतरांकडून करतो. इथं एखादी गोष्ट जमणार नाही असं म्हटल्यावर समोरचा का असं विचारात नाही.

सर्वत्र खुणा मजला…

बेगीनाज म्हणजे स्वतंत्रपणे आयुष्य जगणा-या स्त्रियांसाठी त्यांच्याच इच्छेतून आणि कष्टांतून झालेली राहण्याची सामूहिक सोय. किती पुरोगामी कल्पना आहे ही. मध्ययुगात संपूर्ण जगातच स्त्रियांना विशेष स्थान आणि अस्तित्व नव्हतं. आणि या परिस्थितीत लग्न न करता आणि  कुठलेही धार्मिक दीक्षासोहळे न करता काही स्त्रियांना समाजसेवेसाठी जीवन जगायचं होतं. अर्थात त्याबरोबर वैयक्तिक आंतरिक आध्यात्मिक समृद्धीही आलीच. अशा स्त्रियांची संख्या वाढायला लागल्यावर बेगीनाजची निर्मिती झाली, जिथं काही ठरावीक नियमांचं पालन करून अपेक्षित जीवन जगता येणं शक्य होतं.