अगला स्टेशन मुंबई …

थोडक्यात सांगायचं तर अठरा पगड जातींच्या माणसांबरोबरच, ज्यांना सगळ्यांनीच टाकलंय असे ख-या अर्थानं दलित, भंगी, कचरा कामगार आणि हिजडेही या एकाच चाळीत एकत्र असल्यागत राहायचे. ही सगळी माणसं एकमेकांत विरघळलेली बघितल्यावर मला ती जातीपातींनी बरबटलेली गावची वेस पहिल्यांदाच ओलांडल्यागत वाटलं. या चाळीतल्या खोल्या जरी लहान असल्या तरी इथं राहणा-यांनी, जातीपातीच्या, भेदभावाच्या सगळ्या चौकटी कधीच बाजूला सारल्या आहेत. मुंबईचा हा चेहरा बघितल्यानंतर ख-या अर्थानं वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या एका शहरात आपण आलोय असं वाटायला लागलं.

मी एक पुणे-मुंबई मोईतो

तरी काही म्हणा, पण मुंबईत आल्यावर एक प्रकारचा मोकळेपणा, बिनधास्तपणा, माझ्यात आला. वेळेची शिस्त पाळणं, कामाचा प्रोफेशनॅालिजम मला इथं जास्त जाणवला आणि भावला. मुंबईतल्या 'कॅास्मो' कल्चरमुळे मला अनेक ख्रिश्चन, मुस्लीम, पारसी मित्र-मैत्रिणी मिळाले आणि अगदी जिवाभावाचे झाले.

ये है बाॅम्बे मेरी जान….

मी मुंबई सोडून परभणी, पुणे आणि औरंगाबाद ह्या शहरांतही दीर्घकाळ वास्तव्य केलं आहे. परंतु मुंबईचं जसं समूहातलं बहुतांश जगणं असूनही प्रत्येक माणसासोबतचं एक असं स्वयंभू नातं जुळतं तसं इतर शहरांचं झालेलं दिसत नाही. मुंबईतला प्रत्येक जण सतत समूहाचा भाग असल्यामुळे त्यातूनही स्वतःची स्पेस शोधण्याचं कसब साधलंय. त्यातच मुंबईच्या आणि मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या नात्याचं मूळ धरून असलं पाहिजे.

वो ख्वाबों के दिन…

मुंबई नकोशी वाटण्याचं जे महत्त्वाचं कारण, प्रवासाची कटकट, तेच पुसलं गेल्यानं मला मुंबई हवीहवीशी वाटू लागली. आपण नवखे आहोत, ही जाणीव प्रत्येक सरत्या दिवसासोबत पुसली जाऊ लागली आणि पत्रकार परिषदा, वेगवेगळ्या लोकांच्या भेटीगाठी, यांमुळे मुंबईच्या आत दडलेल्या एका वेगळ्या मुंबईची ओळखही होऊ लागली.

मुक्त तितकीच सक्त मुंबई

मुंबईनं मला स्वातंत्र्य दिलं आणि त्या स्वातंत्र्याबरोबर येणा-या जबाबदारीची जाणीवही. घरापासून लांब राहताना पदोपदी येणा-या अडचणींशी लढण्याची ताकद दिली. आजारी पडल्यावर बेडजवळ बसून राहणा-या आणि काळजी घेणा-या मैत्रिणी दिल्या. पैसे संपत आल्यावर घरातून पैसे मागायचे नाहीत असं ठरवल्यावर करायची काटकसर शिकवली.