संपादकीय

माणूस प्रवास कसा करायला लागला याबद्दल माझ्या मनात फार कुतूहल आहे. अर्थातच तो शिकारीच्या शोधात भटकायला लागला असणार हे जरी खरं असलं तरी नंतरच्या काळात त्याला नवनवीन गोष्टी शोधण्याची आस कशी लागली असेल?

प्रवास ही एक नशा आहे. प्रवास करायला लागल्यावर आणि त्यातली गंमत कळल्यावर माणसाला प्रवासाची अक्षरशः चटक लागते. काही प्रवास हे ठरवून केलेले असतात तर काही प्रवास हे न ठरवता घडलेले असतात. कामाच्या, नोकरीच्या, चांगल्या आयुष्याच्या, चांगलंचुंगलं खाण्यापिण्याच्या, निसर्गभेटीच्या, इतिहासाच्या, संस्कृतीच्या निमित्तानं अनेक प्रवास घडत असतात. शिवाय भौतिक प्रवास आणि मानसिक प्रवास हेही वेगळेच.

मला स्वतःला माझ्या वडलांनी प्रवासाचं दालन खुलं करून दिलं. प्रवास कसा करावा आणि का करावा हे नकळतपणे मनावर बिंबवलं. आणि माझ्या नव-याला अगदी मनातून प्रवास आवडत नसला तरी जेव्हा प्रवास करायचा तेव्हा तो कसा करावा हे त्याला चांगलंच माहीत आहे.

आमच्या या अंकात अशाच काही प्रवासांचा वेध घेतलेला आहे. स्थलांतर हा प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग. स्थलांतर अनेक कारणांनी होत असतं. चांगल्या आयुष्याच्या आशेमुळे सगळ्यात अधिक स्थलांतरं होतात पण त्याचबरोबर मनाविरूद्ध करावी लागणारी स्थलांतरं फार दुःखदायक असतात. सगळं नीट चाललेलं असताना अशी काही आपत्ती येते की अचानक एक दिवशी माणसं देशोधडीला लागतात. केवळ जीव वाचवायचा आहे या प्रेरणेतून ही स्थलांतरं होत असतात. आपण सीरियातून होणारी स्थलांतरं बघतोच आहोत.

या अंकाचा एक मोठा विभाग स्थलांतर या विषयावर आहे. यात दोन प्रकारची स्थलांतरं आहेत. एक देशात, विशेषतः मुंबईत झालेली स्थलांतरं आणि दुसरं विविध कारणांनी परदेशात झालेली स्थलांतरं. मनापासून केलेलं असो किंवा मनाविरोधात केलेलं असो, स्थलांतर हे माणसाचं आयुष्य बदलवून टाकणारं असतं. आमच्या स्थलांतरितांच्या कथा या अशाच काहीशा आहेत. अतिशय प्रांजळपणानं केलेलं हे लिखाण तुम्हाला नक्की भावेल.

 याशिवाय अंकात ज्ञानाच्या शोधातले प्रवासी धर्मानंद कोसंबी आणि मराठीतले आद्य प्रवास वर्णनकार गोडसे भटजी यांच्यावर लिहिलेले दोन अभ्यासपूर्ण लेख आहेत. प्रवासातलं ललित सांगणारे सुरेख लेख आहेत. देशविदेशात केलेल्या प्रवासांची वर्णनं आहेत. काही रोचक अनुभव आहेत.

डिजिटल अंकासाठी आम्ही काही खास व्हिडिओ करतो. यामागचं मुख्य कारण असं की जर YouTube वर बघितलं तर मराठी लेखक, कवी, कविता याबद्दल फारच कमी साहित्य सापडतं. तर त्याचं थोडं डॉक्युमेंटेशन व्हावं हा उद्देश. नवीन पिढी ही लिखित माध्यमापेक्षा दृकश्राव्य माध्यमाचा जास्त वापर करणारी आहे. त्यामुळे त्यांना मराठीतले उत्तमोत्तम लेखक-कवी कळावेत हाही उद्देश यामागे आहे. आणि हे दृकश्राव्य माध्यम असल्यानं नुसतंच स्क्रीनवर वाचण्यापेक्षा बघणं-ऐकणं जास्त चांगलं वाटतं त्यासाठीही आम्ही हे व्हिडिओ करतो.

यंदा सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, सीमा देशमुख, मेधा कुळकर्णी यांनी अंकासाठी खास वाचन केलेलं आहे. याशिवाय प्रवास हेच आपलं मुख्य इप्सित मानणा-या संदीपा-चेतन कारखानीस यांची मुलाखत, अल्ट्रा रनर शिबानी घरत हिची मुलाखत, सायकलवरून प्रवास करणारा अंकुश वेंगुर्लेकर याची मुलाखत, सेक्सॉलॉजिस्ट प्रकाश कोठारी यांनी जगभरात केलेल्या प्रवासातून जमवलेल्या इरॉटिकाबद्दल त्यांची मुलाखत असंही या अंकात आहे.

स्लम टुरिझम ही कल्पना पटली नाही तरी ते एक वास्तव आहे हे मान्यच करावं लागतं. स्लम टुरिझम आणि त्यानिमित्तानं धारावीवर तयार केलेली डॉक्युमेंटरीसुद्धा अंकात आहे. मुंबईचं अनोखं दर्शन घडवणारी एक छोटी फिल्म आम्ही खास अंकासाठी केलेली आहे.

असे उपक्रम चालवत राहण्यासाठी आर्थिक पाठबळ लागतं. म्हणून यावर्षीही आम्ही क्राऊड फंडिगच्या माध्यमातून काही रक्कम उभी केली आहे. यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार. टाटा कॅपिटलनं यंदाही आम्हाला जी आर्थिक मदत दिली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार. यावर्षी आमच्या अंकासाठी जाहिराती देणा-यांचे आभार.

अंकात सहभागी झालेले सगळे लेखक, अभिवाचन करणारे, मुलाखती देणारे हे सगळे विनामोबदला अंकात सहभागी झाले आहेत. त्यांच्या सहकार्याशिवाय इतका मोठा अंक प्रत्यक्षात येऊच शकला नसता. त्यामुळे त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. व्हिडिओ तयार करताना त्यात सहभागी होणा-या व्यक्ती विनामोबदला सहभागी झाल्या तरी व्हिडिओच्या तंत्रिक बाजूसाठी चांगलेच पैसे लागतात. त्यामुळे क्राउड फंडिगच्या माध्यमातून किंवा प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मिळणा-या निधीचा बराचसा भाग यासाठी वापरला जातो. उरलेली रक्कम इतकीही मोठी नसते की त्यातून लेखकांना आणि अभिवाचन करणा-यांना मानधन देता येईल. इतक्या चांगल्या साहित्याची बोळवण ५००-७०० रूपयांमध्ये करणं खरोखर पटत नाही. पण म्हणून नेहमीच सगळ्यांना विनामोबदला काम करणं सांगणं मला स्वतःला मनातून पटत नाही. पण याला दुसरा काहीही पर्याय दिसत नाही. त्यापेक्षा ठरावीक काळाकरता हा उपक्रम चालवून नंतर तो बंद करावा हाच उत्तम मार्ग आहे.

यंदा अंकाच्या मुद्रितशोधनाचं काम अरूण फडके आणि त्यांच्या पत्नी वृषाली फडके यांनी केलं आहे. मात्र फडक्यांना थोडंसं बरं नसल्यानं शेवटच्या काही लेखांचं मुद्रितशोधन आम्ही केलं आहे. त्यामुळे काही लेखांमध्ये त्रुटी दिसू शकतात. मुद्रितशोधनाच्या कामात राजन बापट यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार.

आमच्या अंकाचे विषय हे अगदी जगावेगळे असतात असा माझा दावाच नाही. विषय तोच असला तरी त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोण कसा आहे हे जास्त महत्त्वाचं असतं मी मानते. अनेक लोक सांगतात की, अंकाचा आकार लहान ठेवा कारण इतकं सगळं वाचून होत नाही. हे मान्यच आहे. पण अंकासाठी लिहिण्याचं आवाहन केल्यानंतर लोक इतके भरभरून प्रतिसाद देतात आणि मुख्य म्हणजे इतकं चांगलं लिहितात की त्यांचं साहित्य अंकात समाविष्ट करण्याचा मोह सोडवत नाही.

दिवाळी अंक ही मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव आहे. दिवाळीची त्याची कल्पना दिवाळी अंकाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं रूप बदललं तरी त्याचा गाभा तोच आहे. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची आणि सुख-समाधानाची जावो हीच शुभेच्छा!

सायली राजाध्यक्ष

21463418_1846372728714009_5463551426590018023_n

इ-मेल – sayali.rajadhyaksha@gmail.com

अंकाचं काम करणारे माझे सहकारी