स्थलांतरितांचा देश

दोन बॅग आणि एक लॅपटॉप इतके सामान घेऊन या देशात, अनोळखी प्रदेशात पाऊल टाकल्यावर काय वाटते हे खरे तर शब्दात सांगता येणार नाही. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांचे तसे बरे असते त्यांना आल्याआल्या महिन्याचा पगार चालू होतो, बरेचदा भारतात घेऊन ठेवलेले फ्लॅट असतात. इथे आधी ऑफिसमधून आलेली माणसे असतात. विद्यार्थी म्हणून आले की सगळेच अवघड असते. कधी स्टुडन्ट लोन घेऊन आलेली मुले, तर कधी अगदी घर गहाण ठेवून आलेली मुले असतात. डोळे विस्फारून जातील इतके नवे रोज बघायला मिळते. नवीन संस्कृती, वातावरण, या सगळ्यात स्वत:ला सामावून घेत असताना, सतत आपण भारतीय आहोत ही गोष्ट पाठ सोडत नाही.

Advertisements

परकेपण सरता सरत नाही

अचानकपणे माणसेच काय, पण एकही  झाड, पक्षी, माणसांची नावे,  दुकाने काहीही ओळखीचे नाही. इतके दिवस खोलवर रूजलेलं आणि रूतलेलं,  हे सगळं माझं आहे, आणि हे असंच राहाणार आहे ह्या सगळ्या समजूती एका फटकार्‍यात मूळापासून उखडून निघाल्या आणि असुरक्षित वाटू लागलं.  देश-वेश-भाषा यानं तर परकेपण जाणवलंच. पण त्याबरोबरच त्रास झाला तो तो इथल्या एकाही झाडाला अन पक्षाला नावानं हाक न मारता यावी याचा. सह्याद्री बघितल्यावर मनात जी तार झंकारत असे तीच इथलाही डोंगर बघताना  झंकारत नाही, याचाही. कित्येक दिवस रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि माणसांच्या चेहऱ्यामध्ये दिलासा शोधायचा निष्फळ प्रयत्न करत राहिले. स्वतःचीही ओळख विसरायला लावणारी, एक परकेपणाची जाणीव आतपर्यंत खोलवर पोचली. 

मोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका

इतका हाय क्लास एरिया असून राहणारे लोक फार मनमोकळे भेटले. सुरुवातीला वाटायचं काय गावंढळ आहोत आपण, पण जे भेटत ते आस्थेनं चौकशी करत, अरीनशी खेळत, काही लागली तर स्वतःहून मदत करत. बसेस, सबवे ट्रेन, येलोकॅब आणि लोकांची गर्दी यांमुळे मुंबईचा फील आला. ९/११ मेमोरियल, वन वर्ल्ड ट्रेंड सेंटर, ब्रुकलिन ब्रिज, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, सेंट्रल पार्क सारं दोन-दोन वेळा पाहून झालं. न्यू यॉर्कसारख्या शहरात एकटीनं फिरल्यामुळे जो आत्मविश्वास आला, तो वेगळाच!