माझा प्रवास – एका प्रवासाची कहाणी

भटजींचा आणखी एक मनोरंजक दृष्टिकोन म्हणजे ते वैयक्तिक आचरणाचा कार्यकारणभाव  एका प्रकारच्या ‘नैतिक पर्यावरणा’शी लावतात, आणि असे करताना नैसर्गिक पर्यावरणातल्या बाबींचा आधार घेतात. उदाहरणार्थ, बुंदेलखंडातल्या स्त्रियांच्या व्यभिचाराचे कारण हे तिथले ‘पाणी’ आहे, असे त्यांचे मत आहे. हे पाणी ‘पुरुषांना वाईट’ आणि त्यामुळे ‘येथे षंढ फार निपजतात’ असे ते सांगतात. अशा प्रकारे पर्यावरणीय बाबीमुळे निष्पन्न होणाऱ्या षंढत्वाची सांगड त्यांनी नैतिक भ्रष्टतेशी घातली आहे. एकंदरीतच, लैंगिक नीतिमत्तेचा अभाव किंवा एक प्रकारची स्वैर सामाजिक नीतिमत्ता हे भटजींच्या ‘परदेश’-संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर भारतीय लोकांचा उल्लेख, ते ब्राह्मण असले तरीही, ‘रांगडे’ असा करतात; किंबहुना ‘रांगडे’ आणि ‘दक्षिणी’ ही त्यांनी वापरलेली एक वर्गीकरणात्मक दुविधा आहे.